निकालपत्र :- (दि. 09-06-2015) (द्वारा- मा. श्री. संजय पी. बोरवाल, अध्यक्ष)
प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये वि.प. कडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांचेविरुध्द नोटीसचा आदेश झाला. वि.प. यांना नोटीसा लागू होऊन हजर होऊन त्यांनी म्हणणे दाखल केले. तक्रारदार तर्फे वकिलांनी युक्तीवाद केला. वि.प. गैरहजर.
2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी की,
वि.प. हे कॉम्पुटर खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन त्याअनुषंगाने सेवा देतात. तक्रारदार ही B.C.A. ची विद्यार्थीनी असून तिने त्यांचे शैक्षणिक वापराकरिता लॅपटॉपची आवश्यकता असलेमुळे “डेल “ कंपनीचा लॅपटॉप खरेदी करणेचे ठरविले. वि.प. यांनी “डेल” कंपनीच्या लॅपटॉपची वैशिष्टे व विक्रीपश्चात सेवा देण्यात येणा-या सोयी-सुविधांची हमी व खात्री देऊन अन्य वैशिष्टे म्हणून लॅपटॉपकरिता Net Protector Anti Virus ( NPAV) मोफत इनस्टॉल करुन देणेचे मान्य व कबूल केले होते. तक्रारदारांनी वि.प. कडून Dell 15 R INS (C13 2nd Gen/3/320/15.6/DOS) S/N-6095958517 /-2 STD/PL हा लॅपटॉप रक्कम रु. 31,500/- किंमतीस खरेदी केला. तक्रारदारांनी वि.प. यांचेकडून खरेदी केलेल्या लॅपटॉपची किंमत वि.प. यांचे विनंतीनुसार एस.एस. एंटरप्राईजेस यांचेकडे डी.डी.ने अदा केली आहे. सदर लॅपटॉपमध्ये विविध प्रोग्रॅम्स इनस्टॉल करीत असताना प्रथम( NPAV) इनस्टॉल करणे आवश्यक होते. तथापि, वि.प. यांनी NPAV चे लाससन्स उपलब्ध नाही अशी सबब सांगून नंतर NPAV इनस्टॉल करुन देणेचे मान्य केले होते. तक्रारदार हया शैक्षणिक कार्यासाठी पुणे येथे गेल्या असता लॅपटॉपची बॅटरी चार्ज करणेसाठी लॅपटॉप चार्जर जोडून पॉवर ऑन करतात चार्जरमध्ये धूर येऊन चार्जर निकामी झाला त्याची माहिती तक्रारदार यांनी एस.एस. एंटरप्राईजेस यांना दिली व त्यांनतर वि.प. यांना दाखविली असता वि.प. यांनी लॅपटॉप चार्जर बदलून देणेचे मान्य करुन कंपनीकडून प्राप्त होताच देतो असे सांगितले. तसेच NPAV मोफत इनस्टॉल करुन देणेचे मान्य केले, त्यानंतर वि.प. यांनी दि. 19-10-2011 रोजी NPAV इनस्टॉल करुन दिले. वि.प. यांनी NPAV इनस्टॉल केलेचे रु. 400/- ची मागणी केली. वि.प. यांनी तक्रारदार यांचेशी वाद घातलेनंतर तक्रारदारांनी NPAV चे रु.400/- वि.प. यांना अदा केले. विक्रीपश्चात सेवा देणेचे वि.प. यांची जबाबदारी असताना तक्रारदारांकडून NPAV ची रक्कम रु. 400/- घेतले. वि.प. यांनी लॅपटॉपचे विक्री पश्चात सेवा देण्यात त्रुटी ठेऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. तदनंतर तक्रारदारांनी दि. 8-11-2011 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली. तक्रारदारांना सदरची तक्रार करणे भाग पडले आहे. तक्रारदारांनी वि.प. कडून रु. 400/- NPAV चे इनस्टॉलेशनची अतिरिक्त घेतलेली रक्कम, लॅपटॉप शैक्षणिक कामासाठी वापरता न आलेमुळे नुकसानीची रक्कम रु. 10,000/-, मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु. 5,000/- अशी एकूण रु. 25,400/- वि.प. कडून मिळावेत म्हणून प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे.
3) तक्रारदारांनी तक्रारीसोबत एकूण 3 कागदपत्रे दाखल केली आहेत. अ.क्र. 1 कडे वि.प. यांचेकडील बिल दि. 22-08-2011, अ.क्र. 2 कडे वि.प. कडील NPAV चे बिल दि. 19-10-2011, अ.क्र. 3 कडे तक्रारदार यांनी वि.प. यांना वकिलामार्फत पाठविलेली नोटीस दि. 8-11-2011 इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तसेच तक्रारदारांनी तक्रारीसह शपथपत्र दाखल केले आहे.
4) वि.प. तक्रारदारांचे तक्रारीस म्हणणे दाखल करुन तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. तक्रारदार हिने वि.प. कडून लॅपटॉप विकत घेतलेला नाही. व तक्रारदार ग्राहक नाहीत. तक्रारदारांनी निलेश यादव यांचे जे नाव लावले आहे ते चुकीचे आहे. तो लॅपटॉप स्पेसचा प्रोप्रायटर नाही. तक्रारदाराचा तक्रार अर्ज चुकीचा आहे. तक्रारदार हिने शैक्षणिक वापराकरिता डेल कंपनीचा लॅपटॉप घेणेचे निश्चित करुन विक्री पश्चात सेवा देणेची हमी व खात्री तसेच लॅपटॉपकरिता Net Protector Anti Virus (NPAV) मोफत देणेचे कबूल केले होते. त्यामुळे लॅपटॉप खरेदी केला. लॅपटॉप खरेदीची किंमत डी.डी.ने अदा केली आहे हे मान्य व कबूल नाही. लॅपटॉपला वुईथ प्रोग्राम इनस्टॉल करीत असताना NPAV Install करणे आवश्यक होते परंतु लायसन्स उपलब्ध नाही, नंतर MPAV Install करुन देणेचे मान्य केले होते. तक्रारदारांनी NPAV Install इन्टॉलेशन व रक्कम रु. 400/- घेतलेचे तसेच वि.प. यांनी उध्दट भाषा तक्रारदारांना वापरली हे मान्य व कबूल नाही.
वि.प. त्यांचे म्हणण्यात पुढे नमूद करतात, एस.एस. एंटरप्राईजेस, कोल्हापूर यांनी लॅपटॉप स्पेस तर्फे दिपक महादेव यादव यांचेकडे डेल कंपनीच्या लॅपटॉपसाठी ऑर्डर नोंदविली व ऑर्डर फॉर्मसाठी ज्या बाबी नमूद केल्या होत्या त्याप्रमाणे पुर्तता करुन ऑर्डरपोटी रु. 1,000/- एस.एस. एंटरप्राईजेस, कोल्हापूर तर्फे देणेत आले. त्याबाबत ऑर्डर फॉर्मवर सही आहे. सदर ऑर्डरप्रमाणे Dell 15 INS (CI3 Second Generation/3/320/15.6/dos) चार्जर, कॅरी केस ऑर्डर फॉर्ममध्ये पुरविणेबाबत नमूद होते. त्यांनतर दि. 22-08-2011 रोजी इनव्हाईस नं. 1402 डिलिवरी चलन नं. 1402 ने ऑर्डर फॉर्मप्रमाणे एस.एस. एंटरप्राईजेस, कोल्हापूर यांनी लॅपटॉप अदा केला. त्यावर त्यांचेतर्फे इनवॉईसच्या अटी व शर्ती होत्या, व तशा सहया घेतेलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सर्व अटी व शर्ती मान्य करुन लॅपटॉप एस.एस. एंटरप्राईजेस, कोल्हापूर यांना नेहलेला आहे. NPAV मोफत Install करणेचे लेखी व तोंडी आश्वासन दिलेले नव्हते. तक्रारदार व एस.एस. एंटरप्राईजेस, कोल्हापूर यांचेमध्ये तक्रारदार यांचे वडील किंवा तक्रारदार यांचेत काही फेरविक्रीचे व्यवहार झाले असलेस त्याची माहिती वि.प. यांना नाही. तक्रारदार हे वि.प. चे ग्राहक होत नाहीत. तक्रारदाराची तक्रार कायदयाने चालणेस पात्र नाही. सबब, तक्रारदाराकडून वि.प. मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 30,000/- द्यावेत अशी वि.प. यांनी विनंती केली आहे. वि.प. यांनी म्हणणेसोबत शपथपत्र दाखल केले आहे.
5) तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, शपथपत्र व तक्रारदार तर्फे वकिलांचा युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी मंचापुढे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी
ठेवेली आहे काय ? होय
2. तक्रारदार कोणता अनुतोष/नुकसानभरपाई
मिळणेस पात्र आहेत ? होय
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
वि वे च न
मुद्दा क्र. 1:
तक्रारदार ही B.C.A. ची विद्यार्थीनी असून तिने शैक्षणिक वापराकरिता “डेल “ कंपनीचा लॅपटॉप एस.एस. एंटरप्राईजेस यांचे विनंतीनुसार वि.प. कडून खरेदी केला. वि.प. यांनी “डेल” कंपनीच्या लॅपटॉपची वैशिष्टे व विक्रीपश्चात सेवा, सोयी-सुविधेची हमी व खात्री देऊन सदर लॅपटॉपकरिता Net Protector Anti Virus ( NPAV) मोफत इनस्टॉल करुन देणेचे तोंडी मान्य केले होते. तक्रारदारांनी त्यावर विश्वास ठेवून वि.प. कडून Dell 15 R INS हा लॅपटॉप रक्कम रु. 31,500/- किंमतीस खरेदी केला. सदर लॅपटॉपमध्ये विविध प्रोग्रॅम्स इनस्टॉल करीत असताना प्रथम( NPAV) इनस्टॉल करणे आवश्यक होते. तथापि, वि.प. यांनी NPAV चे लासन्स उपलब्ध नसलेमुळे नंतर NPAV इनस्टॉल करुन देतो असे सांगितले. तक्रारदार ही शैक्षणिक कार्यासाठी पुणे येथे गेल्या होत्या त्यावेळी लॅपटॉपची बॅटरी चार्ज करणेसाठी लॅपटॉप चार्जर जोडला असता चार्जरमध्ये धूर येऊन चार्जर निकामी झाला त्याची माहिती तक्रारदार यांनी एस.एस. एंटरप्राईजेस व वि.प. यांना दिली. वि.प. यांनी लॅपटॉप चार्जर बदलून देणेचे मान्य करुन कंपनीकडून प्राप्त होता देतो तसेच वि.प. यांनी लॅपटॉप चार्जर बदलून दिला. NPAV मोफत इनस्टॉल करुन देणेचे मान्य केले होते, व वि.प. यांनी दि. 19-10-2011 रोजी NPAV इनस्टॉल करुन दिले. परंतु वि.प. यांनी NPAV इनस्टॉल केलेचे रु. 400/- ची मागणी केली होती. वि.प. यांनी तक्रारदार यांचेशी वाद घातलेनंतर तक्रारदारांनी NPAV चे रु.400/- वि.प. यांना अदा केले. वि.प. हे तक्रारदारांना NPAV मोफत इनस्टॉल करणेचे मान्य केले होते, वि.प. यांनी विक्रीपश्चात सेवा देणेचे वि.प. यांची जबाबदारी असताना तक्रारदारांकडून NPAV ची रक्कम रु. 400/- घेऊन वि.प. यांनी तक्रारदारांकडून लॅपटॉपचा मोबदला स्विकारुन तक्रारदार यांना लॅपटॉपचे विक्री पश्चात सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 2 :
वर मुद्दा क्र. 1 चे विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेमुळे वि.प. यांनी तक्रारदारांकडून NPAV ची रक्कम रु. 400/- घेतलेली रक्कम तक्रार दाखल दि. 25-01-2012 पासून द.सा.द.शे. 6% व्याजासह अदा करावी. तक्रारदारांना मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला. व तक्रार अर्ज दाखल करावा लागला. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- मिळण्यास पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र. 2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 3- सबब, मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2. वि.प. यांनी तक्रारदारांकडून NPAV ची रक्कम रु. 400/-(अक्षरी रुपये चारशे फक्त) घेतलेली रक्कम तक्रार दाखल दि. 25-01-2012 पासून द.सा.द.शे. 6% व्याजासह अदा करावी.
3. वि.प. यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 1,000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त) अदा करावेत.
4. वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत आदेशाची पूर्तता करावी.
5. सदर निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.