:: नि का ल प ञ ::
(मंचाचे निर्णयान्वये मनोहर गो. चिलबुले, मा.अध्यक्ष)
(पारित दिनांक : 19/0 7/2013)
1) अर्जदाराने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
संक्षेपाने तक्रारदाराचे म्हणणे असे की, अर्जदार व त्याचे मिञ विनोद गौरकार व विनोद बारसागडे यांनी केबल टि.व्ही. वर गैरअर्जदार क्र 2 आकाश भारव्दाज यांनी दिलेल्या प्लॉट विक्री विषयक जाहिरातीच्या अनुषंगाने त्यांची भेट घेतली. प्रत्यक्ष मौका पाहणी नंतर गै.अ. क्र. 2 ने केलेले मौजा देवाडा ता. व जि. चंद्रपूर येथील सर्व्हे नंबर 225/1 मधील विकसीत प्लॉट क्र. 73 व 74 विक्रीबाबत अनुक्रमे विनोद बारसागडे व विनोद गौरकार यांचेशी करार केला तसेच प्लॉट क्र. 51, क्ष्ेाञफळ 1614.60 चौ.फुट हा प्रती चौ.फुट रुपये 95 प्रमाणे अर्जदारास विकण्याचा करार केला. त्यापोटी दिनांक 29/11/2009 रोजी अर्जदाराने गै.अ.क्र. 2 यांस रुपये 10,000/- चेक द्वारे देवून सदर प्लॉट बुक केला. अर्जदार व त्याच्या वरील मिञांनी प्लॉटचे हप्ते 30 जुन 2011 पूर्वी द्यावे आणि 30 जुन पर्यंत गै.अ.क्र.2 ने अर्जदार व त्याचा वरील मिञांना प्लॉटची विक्री करुन द्यावी असे ठरले. विनोद गौरकार व विनोद बारसागडे यांनी उपरोक्त प्लॉटची रक्कम दिल्यावर गै.अ. ने त्यांच्या नावाने प्रमोद दवे मार्फत विक्री करुन दिली. माञ अर्जदाराने प्लॉट क्र 51 ची पूर्ण किंमत रुपये 1,53,387/-, दिनांक 20/06/2011 पर्यंत गै.अ.क्र. 2 कडे भरणा केल्यावरही सतत मागणी करुन देखिल नोंदणीकृत खरेदीखत करुन दिले नाही.
2) दिनांक 16/07/2012 रोजी अर्जदाराने गै.अ. क्र. 2 ला विक्री करुन देण्याबाबत पञ पाठविले परंतु त्याने ते स्विकारले नाही. अधिक चौकशीत अर्जदारास कळले कि, गै.अ. क्र. 2 पूर्वीच्या लॅंडमार्क रिअल इस्टेट ऐवजी लॅन्डमार्क वास्तुनिर्माण प्रा.लि. या नव्या नावाने व्यवसाय करीत आहे. अर्जदाराने पुन्हा 02/08/2012 चे पञान्वये गै.अ.क्र.2 कडे खरेदीखत करुन देण्यास कळविले परंतु गै.अ.क्र. 2 ने सदर नोटीसला खोटे उत्तर पाठविले आणि खरेदीखत करुन दिले नाही म्हणुन सदर तक्रारीत गै.अ. क्र. 1 व 2 यांनी अर्जदाराने बुक केलेल्या प्लॉट क्र 51 चे खरेदीखत करुन द्यावे याशिवाय शारीरीक व मानसिक ञासाबद्दल रुपये 50,000/-, इतर आनुषंगिक खर्चाबाबत रुपये 7,000/- आणि सदर तक्रारीच्या खर्चाबाबत रुपये 3,000/- नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
3) गै.अ.क्र.1 व 2 यांनी निशानी क्र.9 प्रमाणे लेखी उत्तर दाखल केले असुन तक्रारदाराची मागणी अमान्य केली आहे. टी.व्ही. वरील जाहिरात पाहुन अर्जदार व त्याचे मिञांनी गै.अ. क्र.2 ची भेट घेतली व त्याने अर्जदारास मौजा देवाडा येथील सर्व्हे नंबर 225/1 पैकी प्लॉट क्र. 51, प्रति चौ. फुट रुपये 95 प्रमाणे विक्रीचा करार केला आणि त्यापोटी अर्जदाराने वेळोवेळी रुपये 1,53,387/- दिले हे नाकबुल केले आहे. तसेच गै.अ.क्र.2 पूर्वी ‘लॅन्डमार्क रिअल इस्टेट’ या नावाने विकसक म्हणुन व्यवसाय करीत होता व आता तो लॅन्डमार्क वास्तुनिर्माण प्रा.लि. या नावाने व्यवसाय करीत असल्याचे आणि कराराप्रमाणे अर्जदारास प्लॉट नंबर 51 ची खरेदीखत करुन देण्यास जबाबदार असल्याचे नाकबुल केले आहे. विनोद बारसागडे व विनोद गौरकार यांचेकडुन अनुक्रमे प्लॉट क्रमांक 73 व 74 चे पैसे मिळाले व त्यांना संबंधीत प्लॉट चे नोंदणीकृत खरेदीखत करुन दिल्याचे गैरअर्जदारांनी कबुल केले आहे.
4) वरील प्रमाणे तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र 1 व 2चे परस्पर विरोधी कथनावरुन खालिल मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारण मिमांसा पूढीलप्रमाणे
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारदाराने गै.अ. कडे मौजा देवाडा ता व जि चंद्रपूर होय
येथील सर्व्हे नं.225/1 पैकी परावर्तीत प्लॉट क्र. 51
क्ष्ेाञफळ1614.60 चौ.मी. प्रती चौ.फुट रुपये 95 प्रमाणे
बुक केला व त्यापोटी भरावयाची पूर्ण रक्कम रुपये 153387/-,
जुन 2011 पर्यंत गै.अ.क्र.2 कडे जमा केली आहे काय?
2) कराराप्रमाणे प्लॉट नंबर 51 च्या भरण्याची पूर्ण रक्कम होय
मिळुनही गै.अ.क्र1 व 2 यांनी तक्रारदारास सदर प्लॉटचे
नोंदणीकृत खरेदीखत करुन देण्यास कसुर केला आहे काय?
3) तक्रारदार मागणी प्रमाणे दाद मागण्यास पाञ आहे काय? होय
4) अंतिम आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे अंशतः
मंजुर
कारणमिमांसा
5) या प्रकरणात तक्रारदार मंगल आनंदराव नांदे याने स्वतःची साक्ष शपथपञ नि.क्र. 12 प्रमाणे दिली असुन साक्षिदार क्र. 2 विनोद गोसाई गौरकार ची साक्ष शपथपञ नि.क्र. 13 व साक्षिदार क्र. 3 विनोद जनार्दन बारसागडेची साक्ष शपथपञ नि.क्र. 14 प्रमाणे नोंदविली आहे. सदर साक्षिशिवाय तक्रारदाराने आपल्या म्हणण्याच्या पृष्ठर्थ अनेक दस्तऐवज दाखल केले असुन त्याचा यथावकाश उल्लेख होईल.
गै.अ. क्र. 1 व 2 यांनी स्वतःची किंवा अन्य साक्षिदारांची साक्ष नोंदविली नाही किंवा आपल्या कथनाचे पृष्ठर्थ कोणतेही दस्तऐवज दाखल केले नाही.
अर्जदाराने लेखी युक्तीवाद नि.क्र. 18 प्रमाणे सादर केला. गैरअर्जदार व त्यांचे अधिवक्ता श्री हस्तक यांनी लेखी किंवा तोंडी युक्तीवाद केला नाही व ते युक्तीवादाचे वेळी गैरहजर राहिले.
मुद्दा क्र. 1 व 2 बाबत.
6) या प्रकरणात अर्जदार मंगल आनंदराव नांदे यांनी त्यांच्या साक्षित सांगितले कि, त्याचे मिञ विनोद गौरकार व विनोद बारसागडे यांचे सह त्याने दिनांक 28/11/2009 रोजी चंद्रपूर येथील गै.अ. चे कार्यालयात जावून गै.अ.क्र.2 आकाश भारव्दाज कडे प्लॉटच्या उपलब्धतेबाबत चौकशी केली. गै.अ.क्र.2 ने मौजा देवाडा येथील सर्व्हे नं. 225/1 मधील 118 परावर्तीत भुखंड कागदोपञी दाखविल्यावर प्रत्यक्ष मौक्यावर जावून पाहणी केल्यावर विनोद बारसागडे आणि विनोद गौरकार यांनी अनुक्रमे प्लॉट क्र. 73 व 74 पसंत केले आणि प्रती चौ.फुट रुपये 105 प्रमाणे सदर प्लॉट त्यांना विकण्याचा गैरअर्जदाराने त्यांच्याशी करार केला. तसेच अर्जदाराने प्लॉट क्र. 51 पसंत केला व चर्चेनंतर प्रति चौ.फुट रुपये 95 प्रमाणे सदर प्लॉट अर्जदारास विकण्याचा गै.अ.क्र.2 ने करार केला. सदर कराराप्रमाणे दिनांक 29/11/2009 रोजी अर्जदाराने रुपये 10,000/- चा पहिला हप्ता चेक क्रमांक 2563 प्रमाणे दिला. सदर चेक एकुण रुपये 20,000/- चा होता व त्यात अर्जदाराच्या हप्त्याची रक्कम रुपये 10,000/- व त्याचा मिञ विनोद गौरकार यांच्या हप्त्याची रक्कम रुपये 10,000/- होती. ठरलेल्या प्रमाणे प्लॉटची पूर्ण किंमत हप्त्याहप्त्याने जुन 2011 पर्यंत दिल्यावर गै.अ.ने प्लॉटचे नोंदणीकृत खरेदीखत करुन देण्याचे कबुल केले होते. विनोद बारसागडे व विनोद गौरकार यांनी प्लॉटची पूर्ण रक्कम दिल्यानंतर गै.अ. क्र. 2 ने विनोद गोसाई गौरकार यांचे नावाने प्लॉट क्र. 74 चे प्रमोद अनुभाई दवे यांच्या द्वारे नोंदणीकृत खरेदीखत दि. 14/01/2011 रोजी करुन दिले. सदर दस्तऐवजाची प्रत यादी नि.क्र. 5 सोबत दस्त क्र. 5 वर दाखल आहे. तसेच विनोद बारसागडेचे नावानेही प्लॉट क्र.73 चे खरेदीखत प्रमोद अनुभाई दवे यांच्या मार्फत नोंदवून दिले.
7) साक्षीदार क्र. 2 विनोद गौरकार व साक्षीदार क्र. 3 विनोद बारसागडे यांनीही गै.अ.क्र. 2 ने त्यांचे सोबत तसेच अर्जदारासोबत वरील प्रमाणे प्लॉट विक्रीचा व्यवहार केल्याचे आणि त्यांचे कडुन प्लॉटची किंमत अनुक्रमे रुपये 1,79,648/- आणि रुपये 2,41,810/- स्विकारुन दिनांक 14/01/2011 रोजी प्रमोद दवे यांनी गै.अ. क्र. 2 भारव्दाज यांचे सांगण्याप्रमाणे खरेदीखत लिहुन व नोंदुन दिल्याचे सांगितले आहे. तसेच सदरच्या रकमा देतांना बरेच वेळा अर्जदारानेही त्यांचे बरोबरच गैरअर्जदाराचे कार्यालयात पैसे जमा केल्याचे व गैरअर्जदार क्र.2 आणि त्याचे कार्यालयातील कर्मचा-यांनी त्यांना व अर्जदारास स्विकारलेल्या रकमाबाबत पावत्या दिल्याचे सांगितले आहे.
गै.अ. क्र.1 व 2 यांनी त्यांच्या लेखी बयानात देखिल साक्षिदार क्र. 2 व 3 यांनी गै.अ.क्र. 2 सोबत अनुक्रमे प्लॉट क्र. 74 व 73 खेरेदीचा व्यवहार केला होता व पूर्ण पैसे मिळाल्यानंतर त्यांच्या नावाने दिनांक 14/01/2011 रोजी नोंदणीकृत खरेदीखत प्रमोद दवे यांचे मार्फत करुन दिले हे निर्विवादपणे कबुल केले आहे. म्हणजेच प्रमोद दवे यांच्या नावाने असलेल्या ले आऊट मधील प्लॉट ग्राहकांना विकण्याचे व ग्राहकांकडुन पैसे मिळाल्यानंतर सदर प्लॉटची विक्री प्रमोद दवे मार्फत करुन देण्याचा व्यवहार गै.अ. करीत होते व त्यासाठी प्रमोद दवे यांची कोणतीही हरकत नव्हती.
8) अर्जदाराने आपल्या साक्षित पुढे सांगितले कि, त्याने दिनांक 29/11/2009 पासुन 22/06/2011 पर्यंत तक्रार अर्जात परिच्छेद क्र. 6 मध्ये नमुद केल्याप्रमाणे वेळोवेळी एकुण रुपये 1,53,387/- गैरअर्जदारास दिले आहेत व त्याबाबत गै.अ.क्र.2 किंवा त्यांचे कर्मचारी यांनी रितसर पावत्या दिल्या आहेत. सदर एकुण 14 पावत्या यादी नि.क्र. 5 सोबत दस्त क्र. 1 अन्वये दाखल आहेत. तसेच विनोद गौरकार यांनी गै.अ.कडे भरणा केलेल्या रुपये 1,79,648/- बाबत पावत्या दस्त क्र. 4 (1) ते 4(10) वर आणि विनोद बन्सोड यांनी गै.अ. कडे भरणा केलेल्या रुपये 2,41,810/- च्या पावत्या दस्त क्र.6(1) ते 6(12) वर दाखल केल्या आहेत. सदर पावत्यावरील सहया गैरअर्जदारांनी नाकारलेल्या नाहीत.
9) अर्जदाराने गैरअर्जदारास काही हप्ते चेकने दिलेले आहेत. अर्जदाराने नि.क्र. 10 प्रमाणे दिनांक 25/03/2013 रोजी अर्ज देवून सोबतच्या यादी प्रमाणे दस्तऐवज दाखल करण्याची परवानगी मिळविली, त्या यादीतील दस्त क्र. 3 वर अर्जदाराने त्यांच्या कन्यका परमेश्वरी नागरी सहकारी बॅंकेचे गै.अ.क्र. 2 ला दिलेल्या (1) चेक क्र. 2563 दिनांक 28/11/2009, रुपये 20,000/- (2) चेक क्र. 3473, दिनांक 28/04/2010, रुपये 6,000/- (3) चेक क्र.2568, दिनांक 23/02/2010, रुपये 6,000 च्या सत्यप्रती आहेत. पैकी वरील क्र.1 चा चेक आकाश वासुदेवराव सादमवारयांचे नावने आहे. सदर चेकची रक्कम स्विकारल्याबद्दल त्याचा भाऊ पवन वासुदेवराव सादमवार ची सही आहे. क्र.2 चा चेक ‘Self’ चा आहे व त्याची रक्कम स्विकारणार म्हणुन राजुकंडे यांची सही आहे. सदर राजुकंडे यांचे नाव दिनांक 25/03/2013 च्या दस्तऐवजाच्या यादीसोबत दाखल केलेल्या फोटो क्र. 1 मध्ये लॅंडमार्क वास्तुनिर्माण च्या नविन कार्यालयाच्या शुभारंभाप्रित्यर्थ शुभेच्छु म्हणुन दिसत आहे व तो गै.अ. क्र.1 व 2 शी संबंधीत आहे. क्रमांक 3 चा चेक आकाश सादमवार यांचे नावाने असुन सदरचा चेक त्याने दिनांक 03/03/2010 रोजी त्याचे युनियन बॅंक ऑफ इंडियाचे चंद्रपूर शाखेतील खात्यात जमा करण्यासाठी दिला होता. याबाबत जमा पावती सदर बॅंकेच्या व्यवस्थापकाने दाखल केली असुन ती नि.क्र. 17 सोबत दस्त क्र.2 वर आहे. तसेच सदर चेकची रक्कम आकाश कुमार भारव्दाज यांचे बचत खाते क्रमांक 407802010011916 मध्ये दिनांक 04/03/2010 रोजी जमा झाल्याची नोंद असलेला खाते उतारा दस्त क्र. 1 वर आहे. वरील चेकच्या रकमा अर्जदाराच्या खात्यास नावे टाकण्यात आल्याच्या नोंदी दर्शविणारा कन्यका परमेश्वरी नागरी सहकारी बॅंकेने दिलेला अर्जदाराच्या खात्याचा उतारा निशानी 10 सोबतच्या यादीप्रमाणे दस्त क्रमांक 5 वर आहे.
10) गैरअर्जदार क्र.1 चे पूर्वीचे नाव ‘Land Mark Real Estate’ असे असल्याने अर्जदार व साक्षदार क्र. 1 व 2 यांचेकडुन प्लॉटबाबत स्विकारलेल्या रकमांच्या पावत्या त्यांचे नावाने दिलेल्या आहेत व अर्जदाराचे पावत्यांवर सदरची रक्कम देवाडा येथील सर्व्हे नंबर 225/1 पैकी प्लॉट नंबर 51 बाबत स्विकारल्याची नोंद आहे. गै.अ.क्र.2 हा सदर संस्थेचा मालक होता व युनियत बॅंक ऑफ इंडिया चंद्रपूर येथे आकाश वासुदेव सादमवार या नावाने त्याचे बचत खातेक्र. 407802010011916 (201 11916) होते. त्याने आपले नाव बदलवून आकाश कुमार भारव्दाज केले आणि ते दिनांक 25 नोव्हेंबर 2010 च्या महाराष्ट्र शासनाच्या राजपञात प्रसिद्ध केले. त्या राजपञाची प्रत नि.क्र.17 सोबत दस्त क्र. 4 वर आहे. सदर बदलाप्रमाणे बॅंक खात्यात नाव व सही बदलावी म्हणून गै.अ.क्र.2 ने युनियन बॅंकेकडे केलेल्या दिनांक 08/04/2011 च्या पञाची सत्यप्रत दस्त क्र.3 वर आहे. तसेच नविन सहीच्या नमुना स्वाक्षरी कार्ड ची प्रत दस्त क्र. 5 वर आहे. वरील कोणत्याही दस्तऐवजाचा खरेपणा गैरअर्जदारांनी शपथेवर नाकारलेला नाही. त्यामुळे अर्जदार व त्याचे साक्षीदारांची शपथपञावरील साक्ष व वरील दस्तऐवजांचे सत्यतेबाबत शंका घेण्यास कारण नाही.
वरील सर्व पुराव्यावरुन गै.अ.क्र.2 आकाश कुमार भारव्दाज याचे पूर्वीचे नाव आकाश वासुदेव सादमवार होते व त्याने पूर्वीच्या ‘ Landmark Real Estate’ या नावाने सिटी प्लाझा, दुसरा मजला, जटपुरा गेट, चंद्रपूर येथे प्लॉट बुकींग चा व विक्रीचा व्यवसाय सुरु केला व पुढे स्वतःचे आणि संस्थेचे नावातही ‘ Landmark Vastu Nirman Private Ltd.’ असा बदल केला असे सिद्ध होते.
11) तसेच गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने अर्जदाराकडुन वेळोवेळी प्लॉट क्र. 51 च्या किंमतीपोटी रुपये 1,53,387/- स्विकारले परंतु अर्जदाराने वारंवार निशानी क्र. 5 सोबतच्या दस्त क्र. 10, 13 व 16 प्रमाणे लेखी मागणी करुनही खरेदीखत करुन दिले नाही हे देखील अर्जदाराची साक्ष आणि वरील दस्तऐवजांवरुन सिद्ध होते. अर्जदाराशी व्यवहारच झाला नाही आणि त्याच्या कडुन पैसेही घेतले नाही असा खोटा व बनवाबनवीचा बचाव गैरअर्जदारांनी नोटीस चे उत्तर दस्त क्र. 19 व लेखी जबाबात घेतला आहे. गैरअर्जदार 1 व 2 या प्लॉट विक्रेत्यांनी प्लॉटची पूर्ण रक्कम घेवून झाल्यावर खरेदीखत करुन देण्याची कायदेशीर जबाबदारी टाळणे ही ग्राहकाप्रती सेवेतील ञुटी असून त्या द्वारे गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे, अशा निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आल्याने मुद्दा क्र. 1 व 2 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविले आहेत.
मुद्दा क्रमांक 3 बाबत.
12) गैरअर्जदार क्र.2 आकाश कुमार भारव्दाज हाच पूर्वीचा आकाश वासुदेव सादमवार व पूर्वीच्या ‘Land Mark Vastu Nirman Private Ltd.’ चा मालक आहे साक्षिदार क्र.2 व 3 यांच्याकडुन प्लॉट नंबर 74 व 73 च्या किंमतीपोटी त्यानेच रक्कम घेतली व त्या रकमेपोटी सदर प्लॉट खरेदीखत खरेदीदारांच्या नावाने गैरअर्जदार क्र. 2 चे सांगण्यावरुन प्रमोद अनुभाईदवे यांनी लिहून दिले आहे. म्हणुन प्लॉट क्र. 51 ची पूर्ण रक्कम रुपये 1,53,387/- वेळोवेळी अर्जदाराकडून स्विकारलेल्या गै.अ.क्र.2 ने सदर प्लॉटचे खरेदीखत प्लॉट हस्तांतरणाचा कायदेशीर अधिकार असलेल्या व्यक्तिमार्फत लिहून व नोंदवून देणेची जबाबदारी त्यांचेवर आहे. अर्जदाराने प्लॉटची पूर्ण किंमत गैरअर्जदार क्र. 2 ला दिल्याने प्लॉट क्र. 51 चे खरेदीखत करुन मिळण्यास तो पाञ आहे, म्हणुन मुद्दा क्र. 3 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
या प्रकरणात गैरअर्जदारांनी अर्जदाराकडुन प्लॉट क्र.51 ची किंमत स्विकारली व त्याबाबत पावत्या दिल्या असल्या तरी असा कोणताही व्यवहार अर्जदाराबरोबर झाला नाही असा धादांत खोटा बचाव घेतला आहे. गैरअर्जदराच्या अशा खोटया बचावामुळे आपली खरी बाजु सिद्ध करण्यासाठी अर्जदारास अनेक कागदपञांची जुळवाजुळव करावी लागली असून पैसे देवूनही प्लॉट त्याचा नावाने झाला नाही व उपभोग घेण्यापासून वंचित राहावे लागले म्हणुन त्यास मानसिक, शारीरीक व आर्थिक ञास सहन करावा लागला आहे. गैरअर्जदाराने स्वतःचे व संस्थेचे नाव बदलून त्याद्वारे अर्जदाराचा कायदेशीर हक्क डावलण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. गैरअर्जदारासारख्या विकसकावर विश्वासून गरजू ग्राहक आपली कष्टाची कमाई निवारा मिळविण्यासाठी मोठया विश्वासाने त्यांच्या सुपूर्द करतात. अशी रक्कम मिळाल्यावर स्वतःचे व संस्थेचे नांव बदलून आणि कराराप्रमाणे प्लॉटचे खरेदीखत करुन देण्याचे टाळुन . ग्राहकांचा विश्वासघात करणा-या विकसकांच्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी त्यांच्यावर शास्ती बसेल अशी कारवाई होणे अपेक्षित आहे म्हणून या प्रकरणाचा विचार करता अर्जदारास झालेल्या मानसिक व शरीरीक ञासाबद्दल रुपये 20,000/-, पञव्यवहार व नोटीस खर्च रुपये ,2000/- आणि सदर तक्रार अर्जाचे खर्चाबद्दल रुपये 3,000/- अशी एकूण रुपये 25,000/- नुकसान भरपाई देण्याचा गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देणे न्यायोचित होईल असे या मंचाचे मत आहे.
वरील निष्कर्षांना अनुसरुन मंच खालिलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
अर्जदाराचा तक्रार अर्ज खालिलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
1) गै.अ. क्र. 1 व 2 यांनी सदर आदेशापासून 1 महिन्याचे आंत अर्जदाराने बुक केलेल्या व रुपये 1,53,287/- या पूर्ण किंमतीचा भरणा केलेल्या मौजा देवाडा तह.जि. चंद्रपूर येथील सर्व्हे नंबर 225/1 पैकी विकसीत प्लॉट क्र.51, क्षेञफळ 1614.60 चौरस फुट चे खरेदीखत हस्तांतरणाचे कायदेशीर अधिकार असलेल्या व्यक्तिमार्फत लिहुन व नोंदवून द्यावे आणि सदर प्लॉटचा अर्जदारास ताबा द्यावा.
2) अर्जदारास झालेल्या मानसिक व शारीरीक ञासाबद्दल रुपये 20,000/-, पञव्यवहार व नोटीस खर्च रुपये ,2000/- आणि या तक्रार अर्जाच्या कारवाईचा खर्च रुपये 3,000/- अशी एकुण रुपये 25,000/- नुकसान भरपाई गै.अ. नी अर्जदारास आदेशाचे तारखेपासुन 1 महिण्याचे आंत द्यावी.
3) गै.अ. ने दिलेल्या मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्यास ग्राहक हक्क संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 25 व 27 अन्वये होणा-या कारवाईस पाञ राहील.
4) सदर आदेशाची प्रत विनामुल्य सर्व संबंधीतांना पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 19/07/2013