जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/162 प्रकरण दाखल तारीख - 16/07/2009 प्रकरण निकाल तारीख – 30/10/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य हेमंत पि.वामनराव गुटटे, अर्जदार. वय वर्षे 28 धंदा शेती, रा.अहमदपुर ता.अहमदपुर जि.लातुर. विरुध्द. प्रो.प्रा.अंबादास पि.पांडुरंग सावजी सावकार, लालुपोतू कलेक्शन, गैरअर्जदार. होलसेल रिटेल कापड दुकान, महात्मा गांधी रोड,जुना मोंढा, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.एस.एस.देशमुख. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.स्वतः. निकालपञ (द्वारा-मा.बी.टी.नरवाडे पाटील,अध्यक्ष) गैरअर्जदार लालपोतु कलेक्शन यांनी फसवणुक केली याबद्यलची तक्रार अर्जदाराने दाखल केलेली असून त्यांच्या तक्रारीप्रमाणे दि.07/04/2009 रोजी अर्जदार यांनी त्यांचे मित्र श्री.अड.जी.बी.जाधव यांच्या सोबत गैरअर्जदाराच्या दुकानात जाऊन त्यांच्या पसंतीने एक साडी व ब्लाऊज फिस रु.3,082/- बिल क्र.34340 द्वारे खरेदी केली. यानंतर गैरअर्जदारांनी यांनी नौकरास सदर साडी पॅक करुन आणण्यास दिली व नंतर नौकराने साडी पॅक करुन दिल्यावर ती घेऊन मित्रासोबत वापस अहमदपुरला आले. घरी जाऊन बघितल्यावर पाहीले तेंव्हा साडी पासुन ब्लाऊजचे फिस अलग केलेले दिसले जे पसंत केले तेंव्हा साडी पासुन कट केलेले नव्हते यावरुन संशय आल्याने फिर्यादीने साडी पुर्ण उघडुन पाहिली तेंव्हा ती साडी आतुन जुनी पुरानी व जागो जागी जीर्ण झालेली व वितळुन ठिकठिकाणी छिद्र पडलेली दिसली जी साडी पसंत केली ती त्यावेळी पुर्णपणे उघडुन पाहीली होती तेंव्हा ती नवीन होती व चांगल्या स्थितीत होती त्यावरुन स्पष्ट झाले की, गैरअर्जदाराने आपले नौकरा मार्फत पसंत केलेल्या साडीचे जागी बदल करुन दुसरी साडी पॅक केली व अर्जदाराची फसवणुक केली. दि.08/04/2009 रोजी गैरअर्जदाराच्या दुकानात जाऊन त्यांनी सदरची साडी दाखवुन ती बदल करुन पसंत केलेली साडी मागणी केली असता, त्यांनी बदलुन न देता शिवीगाळ केली यानंतर नाईलाजाने वकीला मार्फत दि.22/04/2009 रोजी नाटीस पाठविली व ती त्यांना मिळुनही नोटीसचे उत्तर दिलेले नाही त्यामुळे अर्जदाराची मागणी आहे की, दिलेली रक्कम रु.3,082/- तसेच मानसिक त्रासाबद्यल रु.25,000/- व दावा खर्च म्हणुन रु.5,000/- गैरअर्जदारास देण्याचे आदेश व्हावे. गैरअर्जदार हे हजर झाले त्यांनी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदारांचे म्हणण्याप्रमाणे अंबादास पांडुरंग सावजी सावकार हे सदर गैरअर्जदार फर्मचे मालक नसुन चुकीच्या नांवावर तक्रार दाखल केलेली आहे. तसेच साडी व ब्लाऊज खरेदी केलेल्या तारखेपासुन अर्जदाराच्या जवळच असुन ती ते वापरत आहेत. अर्जदारांनी साडी व ब्लाऊज खरेदी करते वेळेस पुर्ण पडताळुन व पाहुनच सदर वस्तु खरेदी केलेली आहे. तसेच सदरची साडी खरेदी करते वेळेस चांगल्या स्थितीमध्ये होती, सदर साडी आतुन जुनी व जीर्ण झालेली नव्हती व छिद्र पडलेले नव्हते. अर्जदार यांनी चांगल्या व सुस्थितीमध्ये वस्तु खरेदी केलेले आहे गैरअर्जदार यांनी कोणत्याही प्रकारची फसवणुक केलेली नाही. गैरअर्जदारांनी अर्जदारांना शिवीगाळ केली हे त्यांचे म्हणणे खोटे आहे. फक्त त्रास देण्याचे उद्येशाने ही तक्रार दाखल केलेली आहे. सदर तक्रार खर्चासह फेटाळण्या वी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेली दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदार फसवणुक केली हे अर्जदार सिध्द करता काय ? होय. 2. काय आदेश ? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 – अर्जदार यांनी दि.07/04/2009 रोजी बिल क्र.34343 द्वारे नगदी रक्कम देऊन दि.07/04/2009 रोजी डी.एन.क्र.1502 रु.3,082/- रुपयास खरेदी केलेले साडीचे बिल दाखल केलेले आहे. गैरअर्जदारांनी अर्जदारास त्यांनी पसंत केलेली साडी न देता जुनी व छिद्र पडलेली व जीर्ण झालेली साडी पॅक करुन दिली व त्यांनी घरी जाऊन उघडुन पाहील्यावर त्यांना तसे ते आढळले. गैरअर्जदार जरी म्हणत असले की, त्यांनी अर्जदारास नवीन चांगल्या स्थितीतील साडी दिली या दोघांच्या म्हणण्यांना त्यांचे शपथपत्रा शिवाय दुसरा कुठलाही पुरावा नाही. अर्जदाराचे शपथपत्र हेच पुरावा गृहीत धरल्यास रु.3,082/- साठी अर्जदार हे एवढे उठाठेव करुन केस करतील हा प्रश्न शिल्लक राहतो, याचा अर्थ गैरअर्जदाराकडुन काही तरी चुक झाली व त्यांनी अर्जदाराच्या पसंतीची साडी न देता पॅकींग करते वेळेस आतुन जीर्ण व छिद्र पडलेली साडी त्यांना दिली. हा प्रकार अर्जदाराने घरी गेल्यावर बघितला. दुस-या दिवशी दि.08/04/2009 रोजी गैरअर्जदाराकडे समक्ष जाऊन साडी बदलुन देण्या सांगीतले परंतु गैरअर्जदारांनी बदलुन दिले नाही शेवटी यानंतर दि.22/04/2009 रोजी वकीला मार्फत नोटीस गैरअर्जदारांना प्राप्त झाल्यानंतर त्याचे उत्तर त्यांनी दिले नाही व ते गप्प बसले याचा अर्थ अर्जदार जे म्हणतात ही तक्रार खरी आहे असे समजण्यास हरकत नाही. कारण गैरअर्जदार यांनी उत्तर दिले नाही याचा फायदा अर्जदारांना दिला पाहीजे. वरील सर्व बाबींवरुन हे स्पष्ट होते की, गैरअर्जदारांनी अर्जदाराची फसवणुक केली आहे, ही खरे आहे की, पसंत केलेली साडी बॉक्समध्ये किंवा कागदामध्ये लपटुन कॅरीबॅगमध्ये ग्राहकाकडे दिल्यानंतर ते घरी जाईपर्यंत ग्राहक उघडुन बघत नाही. गैरअर्जदारांनी त्याची साडीचे खरेदी बिल दाखल केलेले आहे. यात अनुक्रमे 15 वर लेझर डिझाईन 1502 या एका साडीची किंमत रु.2,283/- असतांना गैरअर्जदांरानी अर्जदाराकडुन रु.3,082/- म्हणजे जवळपास रु.800/- जास्त घेतल्याचे दिसतात. यात त्यांचा नफा वइतर खर्च जरी गृहीत धरले तरी त्यांनी जास्त किंमत घेतल्याचे दिसुन येत आहे. वरील सर्व बाबींवरुन गैरअर्जदांरानी अर्जदाराची फसवणुक केल्याचे दिसते. वरील सर्वर बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदारांनी हा निकाल लागल्या पासुन 30 दिवसांच्या आंत अर्जदार यांना रु.3,082/- किंमतीची दुसरी एखादी नवीन साडी ज्यात कुठलेही दोष नसलेले अर्जदारास द्यावी व अर्जदाराने ही नवीन साडी घेतांना त्यांच्या जवळील गैरअर्जदाराकडुन खरेदी केलेली डिफेक्टीव्ह साडी गैरअर्जदारांना वापस द्यावी. 3. अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासाबद्यल रु.2,000/- व दावा खर्चाबद्यल रु.500/- मंजुर करण्यात येतात. 4. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्य गो.प.निलमवार, लघूलेखक. |