Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ::: (मंचाचे निर्णयान्वये, कल्पना जांगडे (कुटे)मा.सदस्या) (पारीत दिनांक :- २०/०१/२०२२) - तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली आहे प्रस्तुत तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
- तक्रारकर्त्याने त्यांचे बल्लारपूर येथील राहत्या घराचे संपूर्ण फिनीशींगसह १००० चौरस फुट भुखंडावर बांधकामाचा ठेका दिनांक १५/०५/२०१८ रोजी विरुध्द पक्षाला दिला. बांधकामाचा ठेका रुपये ९२०/- प्रति चौरस फुटाप्रमाणे एकूण रुपये ९,२०,०००/- मध्ये विरुध्द पक्षाला दिला. करारनाम्यानुसार उपरोक्त बांधकाम ६ महिण्यांमध्ये पूर्ण करण्याचे ठरले होते. करारनाम्याप्रमाणे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना पहिली किस्त दिनांक ३/५/२०१८ रोजी धनादेश क्रमांक ०३८९७९ रुपये ६०,०००/-, दुसरी किस्त दिनांक ७/५/२०१८ रोजी धनादेश क्रमांक ९३६१८८ रुपये १,१०,०००/- आणि दिनांक १५/०५/२०१८ रोजी नगदी रक्कम रुपये ३०,०००/- असे एकूण रक्कम रुपये २,००,०००/- विरुध्द पक्ष यांना बांधकामाकरिता दिले. विरुध्द पक्ष यांना बांधकाम करण्याकरिता अग्रीम रक्कम रुपये २,००,०००/- देऊन सुध्दा त्यांनी बांधकाम करण्याकरिता कोणतीही सुरुवात केली नाही आणि बांधकाम मुदत ही संपली होती त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचेकडे जमा असलेली अग्रीम रक्कम रुपये २,००,०००/- परत मागीतले तेव्हा विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास दिनांक २५/०२/२०१९ रोजी रुपये २,००,०००/-चा क्रमांक ७१७९७१ असलेला धनादेश दिला होता. तक्रारकर्त्याने सदर धनादेश वटविण्याकरिता स्टेट बॅंक ऑफ इंडिया,शाखा बल्लारपूर येथील खात्यात जमा केला असता ‘सदर धनादेश विरुध्द पक्ष यांच्या खात्यामध्ये रक्कम शिल्लक नसल्यामुळे वटविला गेला नाही.’ अशा शेरा बॅंकेतर्फे देऊन तक्रारकर्त्यास परत दिला. तक्रारकर्त्याने बांधकामाच्या करारनाम्यानुसार अग्रीम रक्कम रुपये २,००,०००/- विरुध्द पक्षास दिले आणि विरुध्द पक्ष यांनी रक्कम प्राप्त होऊनही घराचे बांधकाम हे ठरलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही आणि तक्रारकर्त्यास रक्कम सुध्दा परत केली नाही, ही विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याप्रति न्युनतापूर्ण सेवा दिली असून त्यामध्ये तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचे विरुध्द दिनांक १५/०४/२०१९ रोजी अधिवक्ता श्री पोसलवार यांचे मार्फत नोटीस पाठविले. नोटीस प्राप्त होऊन सुध्दा विरुध्द पक्ष यांनी नोटीस ची दखल घेतली नाही आणि पूर्तता सुध्दा केली नाही. सबब तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचे विरुध्द आयोगामध्ये तक्रार दाखल करुन त्यामध्ये विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याकडून घेतलेली एकूण रक्कम रुपये २,००,०००/- आणि त्यावर दिनांक १५/०५/२०१८ पासून १५ टक्के व्याज तसेच शारीरिक व मानसिक ञासाकरिता नुकसान भरपाई रक्कम रुपये २,००,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १५,०००/- देण्याचे आदेशीत व्हावे अशी मागणी केली आहे.
- तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्षाला नोटीस काढण्यात आले. विरुध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त होऊनही ते आयोगासमक्ष उपस्थित झाले नाही. करिता विरुध्द पक्षाविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दिनांक १३/११/२०१९ रोजी निशानी क्रमांक १ वर पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, तक्रारीतील मजकूर आणि दस्तावेज यांना तक्रारकर्त्याचे शपथपञ आणि लेखीयुक्तीवाद समजण्यात यावे अशा दोन पुरसिस नि.क्र. ११ व १२ वर दाखल यावरुन खालील मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणि त्यावरील निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष (१) तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष यांचा ग्राहक आहे काय ? होय. (२) विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याप्रति न्युनतापूर्ण होय सेवा दिली आहे काय ? (३) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणमिमांसा मुद्दा क्रं. १ बाबत :- 5. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना बल्लारपूर येथे १००० चौरस फुटवर राहत्या घराचे संपूर्ण फिनिशींगसह बांधकामाचा ठेका रुपये ९२०/- प्रति चौरस फुटाप्रमाणे एकूण रुपये ९,२०,०००/- मध्ये विरुध्द पक्षाला दिला. करारनाम्यानुसार तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना अग्रीम रक्कम रुपये २,००,०००/- मोबदला दिला. यासंदर्भात तक्रारकर्ता आणि विरुध्द पक्ष यांच्यामध्ये दिनांक १५/०५/२०१८ रोजी करारनामा झाला. तक्रारकर्त्याने सदर करारनामा निशानी क्रमांक ४ वरील दस्त क्रमांक अ-१ वर दाखल केला आहे. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष यांचा ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्रं. २ बाबत :- 6. तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष यांचेमध्ये दिनांक १५/०५/२०१८ रोजी उपरोक्त बांधकाम संदर्भात करारनामा झाला. करारनाम्यानुसार तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना रुपये २,००,०००/- अग्रीम रक्कम सुध्दा दिली. परंतु विरुध्द पक्ष यांनी बांधकामास सुरवात केली नाही. तक्रारीत दाखल नि.क्र.४वरील दस्त क्र.अ-१ करारनाम्याचे अवलोकन केले असता अटी व शर्ती मध्ये “संपूर्ण बांधकाम करण्याचा अवधी हा दिनांक २/५/२०१८ ते १/८/२०१८ पर्यंत ३ महिण्याची राहील या तारखेनंतर जर कामाची सुरवात करण्यास विलंब झाला तर संपुर्ण दिलेले ॲडव्हान्स रक्कम रुपये २,००,०००/- व्याजासह परत करण्यात येईल तसेच त्यानंतर हा बांधकाम करारनामा रद्द समजण्यात येईल’’ असे नमूद आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांना करारनाम्यानुसार अग्रीम रक्कम रुपये २,००,०००/- दिले व ती रक्कम विरुध्द पक्ष यांनी प्राप्त झाल्याचे करारनाम्यावर हस्ताक्षरात लिहून विरुध्द पक्षांची सही सुध्दा आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रार कर्त्याकडून अग्रीम रक्कम घेऊन सुध्दा तक्रार कर्त्याच्या घराचे बांधकामच केले नाही व तक्रारकर्त्याने करारनाम्यानुसार अग्रीम रक्कम परत मागीतले असता ती सुध्दा परत केली नाही. तक्रार कर्त्याने विरुध्द पक्षाला रक्कमेची मागणी वारंवार केली असता त्यांनी तक्रार कर्त्यास रुपये २,००,०००/- धनादेश दिला. परंतु दिनांक २५/०२/२०१९ चा दिलेला धनादेश त्यांच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्यामुळे वटविला गेला नाही. तसेच तक्रारकर्त्याने दिनांक १५/०४/२०१९ रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवून रकमेची मागणी केली असता नोटीस प्राप्त होऊन सुध्दा विरुध्द पक्षाने त्यांची पुर्तता केली नाही. सदर नोटीस, धनादेश तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केला आहे. विरुध्द पक्षयांनी प्रकरणात उपस्थित राहून आपल्या बचावाकरिता लेखी उत्तर व कोणतेही दस्तावेज दाखल करुन तक्रारकर्त्याचे कथन खोडून काढले नाही. विरुध्द पक्ष यांनी करारनाम्यामध्ये नमूद असलेल्या अटी नुसार तक्रारकर्त्याकडून अग्रीम रक्कम रुपये २,००,०००/- घेऊन सुध्दा ठरलेल्या मुदतीत बांधकामच केले नाही तसेच रकमेची मागणी केली असता ती परत केली नाही असे करुन तक्रारकर्त्याप्रति न्युनतापूर्ण सेवा दिल्याचे सिध्द होते. त्यामुळे तक्रार कर्ता हे वि.प. यांच्याकडून त्यांना बांधकामाकरीता दिलेली अग्रीम रक्कम रुपये २,००,०००/- व्याजासह तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्रं. ३ बाबत :- 7. मुद्दा क्रं. १ आणि २ च्या विवेचनावरुन आयोग खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार क्र. १९/७८ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास बांधकामाकरीता घेतलेली अग्रीम रक्कम रुपये २,००,०००/- व त्यावर रक्कम अदा करेपर्यंत निकाल दिनांक पासून ६ % द.सा.द.से. व्याज दयावे.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये १०,०००/- व तक्रार खर्च रुपये ५,०००/- दयावे.
- उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
- तक्रारकर्ता यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
| |