Maharashtra

Wardha

CC/16/2013

BANSILAL TATOBA TELANG - Complainant(s)

Versus

LAKHOTIYA AND RATHI ADHIKRUT RASOI GAS VITARAK - Opp.Party(s)

A.R.Orkay

20 Sep 2014

ORDER

प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम-12 अन्‍वये विरुध्‍द पक्षा विरुध्‍द 4,55,000/-रुपये नुकसानभरपाई व 50,000/-रुपये मानसिक, शारीरिक त्रासाकरिता नुकसानभरपाई म्‍हणून व तक्रार अर्जाचा खर्च मिळण्‍याकरिता दाखल केलेली आहे.

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अशी आहे की, विरुध्‍द पक्ष क्रं.1 वर्धा गॅस कनेक्‍शन विकणारी एजन्‍सी असून विरुध्‍द पक्ष क्रं.2 चे विरुध्‍द पक्ष क्रं.1 वर संपूर्ण नियंत्रण आहे व विरुध्‍द पक्ष क्रं.2 च्‍या अधिपत्‍याखाली विरुध्‍द पक्ष क्रं.1 गॅस कनेक्‍शन सेवा व सुविधा पुरवितात. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 कडून गॅस कनेक्‍शन ग्राहक क्रं. 631876 प्रमाणे घेतला. म्‍हणून तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 चा कायदेशीर ग्राहक आहे.
  2. तक्रारकर्त्‍याने असे कथन केले आहे की, दि. 15.12.2011 रोजी त्‍यांनी विरुध्‍द पक्ष क्रं.1 कडून भरलेले गॅस सिलेंडर घेतले. सदर गॅस सिलेंडरचा उपयोग घरात स्‍वयंपाकाकरिता केला. परंतु सदर गॅस सिलेंडर हे निकृष्‍ट प्रतिचे असल्‍यामुळे गॅस गळती  सुरु झाले व क्षणातच भयंकर विस्‍फोट झाले व गॅस सिलेंडरचे तुकडयांमध्‍ये रुपांतर झाले.
  1. सदरील विस्‍फोटामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या घराला आग लागली व तक्रारकर्त्‍याच्‍या  घरातील सर्व साहित्‍य जळून खाक झाले.
  2. सदरील आगीमुळे तक्रारकर्त्‍याच्‍या घरातील गृहोपयोगी साहित्‍य व उपयोगी सुख-सुविधा फर्निचर जळून 4,00,000/-रुपयाचे नुकसान झाले.
  3. सदर अपघात हा विरुध्‍द पक्ष क्रं.1 ने पुरविलेल्‍या निकृष्‍ट दर्जाच्‍या सिलेंडरमुळे व विरुध्‍द पक्ष यांच्‍या निष्‍काळजीपणामुळे झाला.
  4. सुदैवाने तक्रारकर्त्‍याच्‍या कुटुंबातील सदस्‍यांनी पळ काढल्‍यामुळे त्‍यांची प्राणहानी व दुखापत टाळता आले व कोणत्‍याही प्रकारची प्राणहानी व दुखापत झाली नाही.
  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे असे कथन केले की, सदर अपघातानंतर ते विरुध्‍द पक्ष क्रं.1 ला भेटले व विनंती केली की, दुसरा गॅस सिलेंडर व निकृष्‍ट दर्जाच्‍या सेवेमुळे झालेली नुकसानभरपाई मिळावी. परंतु विरुध्‍द पक्ष क्रं.1 यांनी तक्रारकर्त्‍याला वेळोवेळी आश्‍वासन दिले. परंतु त्‍याची पूर्तता केली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि. 25.08.2012 ला विरुध्‍द पक्षाला सूचनापत्र पाठवून तक्रारीचे निरसन करण्‍याची विनंती केली. परंतु विरुध्‍द पक्ष यांनी नोटीसला उत्‍तर दिले नाही व तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवेमुळे झालेल्‍या नुकसानीची भरपाई करुन दिलेली नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदरील अर्ज मंचासमक्ष दाखल केले व त्‍याला झालेले नुकसान रु.4,55,000/- व मानसिक, शारीरिक त्रासामुळे झालेले नुकसान रु.50,000/-ची मागणी केली.
  2.           विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 13 वर दाखल करुन कबूल केले की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं.1 कडून विरुध्‍द पक्ष क्रं.2 च्‍या कंपनीचे गॅस कनेक्‍शन विकत घेतले व तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष क्रं.1 चा ग्राहक आहे. तसेच विरुध्‍द पक्ष क्रं.1 नी हे ही कबूल केले की, दि. 15.12.2011 रोजी तक्रारकर्त्‍याच्‍या घराला आग लागली, त्‍यात त्‍याचे घरगुती साहित्‍य जळाले परंतु विरुध्‍द पक्ष क्रं.1 ने दिलेल्‍या निकृष्‍ट दर्जाच्‍या सिलेंडरमुळे सदर अपघात झाला व त्‍याचे घर जळाले व त.क.चे नुकसान झाले हे नाकबूल केले आहे. वि.प. 1 ने पुढे असे कथन केले की, तक्रारकर्त्‍याने गॅस कनेक्‍शन घेते वेळी जो पत्‍ता दिला होता तो मार्फत श्री. गणपतराव शेळकुळे, पेट्रोल पंपजवळ, देवळी रोड, वर्धा असा असून समतानगर, वरुड या पत्‍त्‍याबद्दल विरुध्‍द पक्षाकडे कधीही माहिती दिली नाही. अगर नियमानुसार पत्‍ता बदलवून सुध्‍दा घेतला नाही. तक्रारकर्ता स्‍वतः दि. 13.12.2011 रोजी सिलेंडरची रक्‍कम देऊन भरलेले सिलेंडर त्‍याच दिवशी प्राप्‍त करुन घेऊन गेले. सिलेंडर नेते वेळी ते नियमानुसार तपासणीकरुन दिले होते.  सिलेंडरवर घट्ट झाकण होते व त्‍यावर सील लागले होते. सिलेंडर मधून गळती होत नव्‍हती. सर्व पाहणीकरुन विरुध्‍द पक्ष क्रं.1 ने त.क.ला सिलेंडर दिले होते. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 चे पुढे असे म्‍हणणे आहे की, घटनेच्‍या वेळी घरात कुणीच नव्‍हते. घर बंद करुन घरातील सर्व सदस्‍य कामावर निघून गेले होते. आगीमुळे घरातील सर्व साहित्‍याचे नुकसान झाले, यात वाद नाही. परंतु ते नुकसान रुपये 4,00,000/-चे झाले हे खोटे आहे.
  3.      सदरील नुकसान विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ने दिलेल्‍या निकृष्‍ट दर्जाच्‍या सिलेंडरमुळे झालेले नसून तक्रारकर्त्‍याच्‍या निष्‍काळजीपणामुळे झालेले आहे. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रं.1 हे तक्रारकर्त्‍याला नुकसानभरपाई देण्‍यास बाध्‍य नाही.
  4.      विरुध्‍द पक्ष क्रं.1 चे असे ही म्‍हणणे आहे की, ते तक्रारकर्त्‍याला दुसरे सिलेंडर देण्‍यास तयार होते व आहे. त्‍याकरिता आवश्‍यक असलेली पूर्तता करण्‍यास तक्रारकर्त्‍याला वारंवांर निरोप देऊन ही पूर्तता  केलेली नाही. त्‍यामुळे सिलेंडर देण्‍यात आलेले नाही.
  5.      विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ने सेवा देण्‍यास कोणताही कसूर केलेला नाही. उलट पक्षी त्‍याने योग्‍य व नियमानुसार संपूर्ण सोयी उपलब्‍ध करुन दिलेल्‍या आहेत.  foवि.प. क्रं. 1 ने वि.प.क्रं. 3 कडून एल.पी.जी. डिलर पॅकेज पॉलिसी घेतली आहे. अपघाताची माहिती मिळालयानंतर वि.प. यांनी ताबडतोब वि.प. 3 यांना सूचना दिली होती. त्‍यानुसार विमा कपंनीने शशिकांत भागवतकर यांची सर्व्‍हेअर म्‍हणून नियुक्‍ती करुन घटना स्‍थळाची चौकशी करण्‍यास सांगितले होते. त्‍याप्रमाणे शशिकांत भागवतकर सर्व्‍हेअर यांनी वि.प.क्रं. 1 ला कळविले की, त.क. यांनी कागदपत्रची पूर्तता केली नाही. त्‍यामुळे यासर्व बाबींसाठी त.क. स्‍वतः जबाबदार आहे.
  6.      अपघाताची सूचना पोलिसांना सुध्‍दा देण्‍यात आली होती. दि. 15.12.2011 रोजी पोलिसांनी घटना स्‍थळी जाऊन  पंचनामा केला. साक्षीदार व तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीचा जबाब त्‍याच दिवशी नोंदविला. त्‍याप्रमाणे असे निदर्शनास आले की, घटनेच्‍या दिवशी त.क. ची पत्‍नी सकाळी 07.30 वाजता मजुरीच्‍या कामाला गेली. तक्रारकर्ता नातेवाईकां सोबत मुलगी पाहायला घरुन अगोदरच बाहेर  गेले होते व मुलगा शाळेत गेला होता. त.क. ची पत्‍नी कामावर जातांना सिलेंडर बंद करुन गेली होती असे तिने पोलिसांना दिलेल्‍या जबाबात नमूद आहे.  तिच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे घटनेच्‍या दिवशी, पाणी गरम करण्‍याकरिता घराच्‍या दक्षिण-पश्चिम कोप-यात विटाची चुल होती. तसेच चुल पेटवून आंघोळीसाठी पाणी गरम केले होते. त्‍यांनतर सकाळी 11.15 वाजता तिला निरोप मिळाला व ती घरी परत आली तेव्‍हा घर जळालेले दिसले.
  7.      वि.प.क्रं.1 ने असे कथन केले की, तक्रारकर्त्‍याच्‍या घरात दोन शेगडया होत्‍या व दोन्‍ही शेगडया जोडून एकत्रित वापरत होते. सिलेंडरमध्‍ये कोणताही बिघाड नव्‍हता किंवा त्‍यात गळती नव्‍हती.
  8.      वि.प.क्रं. 1 ने असे कथन केले की, त.क.चे घर लाकडी वेळू, कमचीच्‍या ताटया यांनी बांधलेले होते व छत टिनाचे होते. सदरहू घर आबादी जागवेर म्‍हणजेच सरकारी जागेवर अतिक्रमण करुन बांधलेले होते. तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीने त्‍यांच्‍या  घरात जळालेल्‍या वस्‍तू संबंधी  माहिती पोलिसांना दिलेली आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची मागणी ही अवास्‍तव आहे. पोलिस पंचनामाप्रमाणे तक्रारकर्त्‍याचे फक्‍त रुपये 25,000-30,000/- चे नुकसान झालेले आहे.
  9.      सुरुवातीला घराला आग लागली व आग पसरल्‍यामुळे सिलेंडरचा स्‍फोट झाला. त्‍यामुळे वि.प.क्रं.1 च्‍या  निष्‍काळजीपणामुळे सदर अपघात झालेला नाही. वरील निवेदनाला कुठलीही बाधा न येता वि.प.क्रं.1 चे असे ही म्‍हणणे आहे की, घटनेच्‍या दिवशी विमा अस्तित्‍वात होता व नुकसान भरपाई करुन देण्‍याची जबाबदारी वि.प.क्रं.3 विमा कंपनीवर आहे. वरील सर्व कारणावरुन त्‍याच्‍या विरुध्‍द  तक्रार अर्ज नामंजूर करण्‍यात यावा अशी विनंती केलेली आहे.
  10.      विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 12 वर दाखल केला व तक्रार अर्जाचा सक्‍त विरोध केला. वि.प.क्रं. 2 च्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे त.क. हा सिलेंडरचा उपयोग अनाधिकृतरित्‍या  दुस-या पत्‍त्‍यावर करीत होता. वि.प.क्रं. 1 ने अशा अपघाताबाबत वि.प.क्रं.3 कडे विमा काढलेला आहे. त.क. यांनी विमा कंपनीने मागितलेली कागदपत्रे पुरविलेली नाही. तसेच त.क. हा वि.प.क्रं.2 चा ग्राहक होत नाही. त्‍यामुळे त्‍याच्‍या विरुध्‍द हे प्रकरण चालू शकत नाही व नामंजूर करण्‍यात यावे अशी विनंती केली आहे.
  11.      वि.प.क्रं. 3 यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 25 वर दाखल केला व तक्रारकर्त्‍याचा तक्रार अर्ज नाकारला. वि.प. क्रं.3 चे असे म्‍हणणे आहे की, सेवाग्राम पोलिस स्‍टेशनला अपघाताची सूचना मिळाल्‍यानंतर, पोलिस स्‍टेशनचे अधिकारी यांनी घटना स्‍थळावर जाऊन चौकशी केली व घटना स्‍थळ पंचनामा केला. सदरहू पंचनामाप्रमाणे त.क.चे रु.4,00,000/- पर्यंतचे नुकसान झालेले दिसून येत नाही.  

     वि.प. क्रं. 3 यांनी शशिकांत भागवतकर यांना सर्व्‍हेअर म्‍हणून नियुक्‍त केले होते व त्‍या अनुषंगाने संपूर्ण नुकसानीचा आराखडा तयार केला. सर्व्‍हेअरने कित्‍येक वेळा त.क.च्‍या कुटुंबियांना त्‍यांच्‍या घरामध्‍ये कोण कोणत्‍या वस्‍तू जळून खाक झाले व किती व काय नुकसान झाले याबाबतच्‍या कागदपत्राची मागणी केली होती. तक्रारकर्त्‍याने किंवा त्‍यांच्‍या कुटुंबियाने कागदपत्रांची मागणीप्रमाणे पूर्तता केली नाही. त.क. च्‍या कुटुंबियानी माहिती न पुरविल्‍यामुळे सर्व्‍हेअरने त.क.च्‍या घरी जाऊन पूर्ण माहिती गोळा केली. त्‍याप्रमाणे अहवाल सादर केला व 52,500/-रुपयाचे नुकसान झाल्‍याचे कळविले.

     वि.प. क्रं. 3 यांनी पुढे असे ही कथन केले की, अपघात हा गॅस गळतीमुळे झालेला नसून तक्रारकर्त्‍याच्‍या चुकिमुळे झालेला आहे. त्‍यामुळे विमा कंपनी नुकसान भरपाई देण्‍यास बांधिल नाही. या सर्व कारणावरुन त.क.चा अर्ज खारीज करण्‍यात यावा अशी विनंती केली आहे.

  1.      तक्रारकर्त्‍याने आपली तक्रार साबित करण्‍याकरिता स्‍वतःचे शपथपत्र व गॅस कनेक्‍शन घेतल्‍याचे कागदपत्र, घराची टॅक्‍स पावती  व इतर कागदपत्र दाखल केले. वि.प. क्रं. 1 व 2 यांनी आपले शपथपत्र दाखल केले नाही.परंतु वि.प.क्रं. 1 यांनी त्‍यांचे लेखी बयाणासोबत काही कागदपत्र व पोलिसांनी घेतलेल्‍या साक्षीदारांच्‍या जबाबाची नक्‍कल प्रत दाखल केली. वि.प.क्रं.3 ने प्रल्‍हाद काशीनाथ धनविज, शाखा व्‍यवस्‍थापक यांचे शपथपत्र दाखल केले. 
  2.      तक्रारकर्त्‍याने लेखी युक्तिवाद नि.क्रं. 29 वर दाखल केला. वि.प. क्रं. 1 व 3 यांच्‍या वकिलांनी तोंडी युक्तिवाद ऐकला.
  3.      तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्षाचा वाद, प्रतिवाद, त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला युक्तिवाद पाहता आमच्‍या समोर खालील मुद्दे उपस्थित होतात. ते मुद्दे  व त्‍यावरील उत्‍तर पुढील कारणे व मिमांसात नमूद केल्‍यानुसार खालीलप्रमाणे आहे.

                  

  1. मुद्दा क्रमांक 1 –वि.प.क्रं.1 ने दिलेल्‍या गॅस सिलेंडरमधून गळती झाल्‍यामुळे त्‍याच्‍या घरात आग लागली व घरातील साहित्‍य जळून  भस्‍मसात झाल्‍यामुळे त्‍याचे 4,00,000/-रुपयाचे नुकसान झाले हे सिध्‍द केले काय ?   उत्‍तर -  नाही.
  2. मुद्दा क्रमांक 2 – विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी त्रृटीपूर्ण सेवा  व अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला आहे काय ?  उत्‍तर – नाही.
  3. मुद्दा क्रमांक -3 तक्रारकर्ता मागणीप्रमाणे लाभ मिळण्‍यास हक्‍कदार आहे काय ? उत्‍तर – अंतिम आदेशाप्रमाणे

-: कारणे व निष्‍कर्ष :-

 

  1.      तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 कडून गॅस कनेक्‍शन ग्राहक क्रं. 631876 प्रमाणे घेतला व त.क. हा वि.प.क्रं. 1 चा कायदेशीर ग्राहक आहे हे उभय पक्षानां कबूल आहे. तसेच दि. 13.12.2011 रोजी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 कडून भरलेले गॅस सिलेंडर विकत घेतले हे सुध्‍दा उभयतांना मंजूर आहे. तसेच दि. 15.12.2011 रोजी त.क. च्‍या घराला आग लागून त्‍याचे घर व घरातील जीवनावश्‍यक वस्‍तू कपडे, फर्नीचर व इतर साहित्‍य जळून भस्‍मसात झाले हे सुध्‍दा उभयतांना कबूल आहे. त.क. ची अशी तक्रार आहे की, वि.प.1 ने निकृष्‍ट दर्जाचा गॅस सिलेंडर दिल्‍यामुळे त्‍यातून गॅस गळती होऊन स्‍फोट झाला व त्‍याच स्‍फोटामुळे तक्रारकर्त्‍याचे घर व त्‍यातील साहित्‍य संपूर्ण जळून भस्‍मसात झाले व तक्रारकर्त्‍याचे एकूण 4,00,000/-रुपयाचे नुकसान झाले. त्‍यामुळे प्रथमतः हे पाहणे जरुरी आहे की, त.क.च्‍या घराला वि.प.क्रं.1 ने पुरवठा केलेल्‍या गॅस गळतीमुळे आग लागली काय ?
  2.      त.क. च्‍या वकिलांनी आपल्‍या लेखी व तोंडी युक्तिवादात असे कथन केले की, वि.प.क्रं. 1 ने त.क.च्‍या घराला आग लागली कबूल केले. तसेच गॅस गळतीमुळे स्‍फोट होऊन त.क.चे घर जळाले हे सुध्‍दा विमा कंपनीला कळविले आहे. तसेच घराला आग लागली त्‍यावेळी अग्निक्षमन दल वर्धा यांनी आग विझवली व त्‍यांनी त्‍याप्रमाणे प्रमाणपत्र दिले व कळविले की, सदर गॅस गळतीमुळे त.क. चे एकूण रुपये 4,00,000/-चे नुकसान झालेले आहे. वि.प.क्रं. 1 हे वि.प. क्रं. 2 चे वितरक आहे. वि.प.क्रं. 3 ही विमा कंपनी असल्‍यामुळे हे संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या नुकसानीस कारणीभूत आहे . त.क. वेळोवेळी वि.प.क्रं. 1 कडे जाऊन त्‍याने झालेल्‍या नुकसान भरपाईची मागणी केली. तसेच नविन सिलेंडर देण्‍याची विनंती केली. परंतु वि.प.क्रं. 1 ने त्‍याची पूर्तता केली नाही. त्‍यामुळे तक्रारकरर्त्‍याला मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागला. त्‍यामुळे त.क. हा 50,000/-रुपये नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे.

     या उलट विरुध्‍द पक्ष क्रं.1 च्‍या वकिलांनी युक्तिवाद केला की, पोलिस पंचनामावरुन व पोलिस अधिकारी यांनी केलेल्‍या चौकशीवरुन असे निदर्शनास येते की,  सुरुवातीला त.क. च्‍या घराला आग लागली त्‍या आगीमुळे गॅस सिलेंडरचा स्‍फोट झाला आणि सदरील आग ही त.क. व कुटुंबाच्‍या निष्‍काळजीपणामुळे लागली. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाच्‍या निष्‍काळजीपणामुळे किंवा दोषपूर्ण सेवा दिल्‍यामुळे अपघात झालेला नाही. म्‍हणून वि.प.क्रं. 1 हा त.क.ला नुकसान भरपाई देण्‍यास बांधिल नाही. वि.प.क्रं.3 ने अपघाताची माहिती मिळाल्‍याबरोबर शशिकांत भागवतकर, यांना सर्व्‍हेअर  म्‍हणून नेमले. सर्व्‍हेअरने संपूर्ण चौकशी करुन अहवाल सादर केला. त्‍याप्रमाणे त.क. चे फक्‍त रु.52,500/-चे नुकसान झाले आहे व तसेच पोलिसांनी केलेला घटना स्‍थळाचा पंचनामा पाहिले असता जास्‍तीत जास्‍त 25,000-30,000/-रुपयाचे नुकसान तक्रारकर्त्‍याला झाल्‍याचे आढळून येते.म्‍हणून तक्रारकर्त्‍याने मागणी केल्‍याप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र नाही.  

  1.      प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये त.क.ने स्‍वतःचे शपथपत्र व इतर कागदपत्र दाखल केले. शपथपत्रानुसार त.क.ने वि.प.क्रं. 1 कडून गॅस सिलेंडर दि. 13.12.2011 रोजी खरेदी केल्‍याचे नमूद केले आहे. परंतु अर्जामध्‍ये दि. 15.12.2011 रोजी गॅस सिलेंडर वि.प.क्रं. 1 कडून खरेदी केल्‍याचे दर्शविले व त.क. च्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍याच दिवशी सिलेंडरमधून गॅस गळती झाली व त्‍याचा स्‍फोट होऊन त्‍याच्‍या घराला आग लागली. परंतु शपथपत्रामध्‍ये मात्र त्‍यांनी दि. 13.12.2011 ला सिलेंडर खरेदी केल्‍याचे सांगितले आहे. जर त.क.ने दि. 13.12.2011 ला गॅस सिलेंडर खरेदी केले असेल तर त्‍यांना दि. 13.12.2011 व 14.12.2011 ला गॅस सिलेंडरचा वापर केला आहे. जर वि.प.क्रं. 1 ने पुरवठा केलेल्‍या  गॅस सिलेंडरमधून गॅस  गळती होत होती तर ते नक्‍कीच त.क.च्‍या निदर्शनास दि.13.12.2011 ला किंवा दि.14.12.2011 ला आले असते व तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं.1 ला कळविले असते.  परंतु आग ही दि. 15.12.2011 ला लागली आहे. तसेच त.क.ने त्‍याच्‍या तक्रार अर्जामध्‍ये नमूद केले की, गॅस सिलेंडर स्‍फोट झाल्‍यामुळे तेथून कुटुंबातील सदस्‍यांनी पळ काढल्‍यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही.परंतु पोलिसांनी प्रत्‍यक्षदर्शनी साक्षीदारांच्‍या नोंदविलेल्‍या जबाबानुसार व त.क.च्‍या पत्‍नीच्‍या जबाबावरुन असे निदर्शनास येते की, दि. 15.12.2011 रोजी त.क. हा सकाळी नातेवाईकासोबत मुलगी पाहाण्‍यास बाहेरगावी गेला होता. त.क. ची पत्‍नी ही कामासाठी घराबाहेर गेली होती व मुलगा शाळेत गेला होता. त.क.च्‍या पत्‍नीने घराचे दार बंद करुन कामावर गेली होती. याचा अर्थ दि. 15.12.2011 ला जेव्‍हा तक्रारकर्त्‍याच्‍या घराला आग लागली त्‍यावेळेस घरात कुणीही नव्‍हते व शेजा-यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीला कळविले तेव्‍हा त.क.च्‍या पत्‍नीला त्‍यांच्‍या घराला आग लागल्‍या संबंधी  कळले, ही बाब त.क.नी आपल्‍या तक्रार अर्जामध्‍ये नमूद केलेली नाही. याचा अर्थ त.क. हा मंचासमोर स्‍वच्‍छ हाताने आलेला नाही.
  2.      तसेच त.क. यांनी आपल्‍या तक्रार अर्ज व शपथपत्रामध्‍ये असे नमूद केले की, त्‍यांच्‍या घराला आग लागल्‍याची माहिती ताबडतोब पोलिसांना देण्‍यात आली.  पोलिस घटना स्‍थळावर आले व घटना स्‍थळ पंचनामा व चौकशी केली. त.क.ने घटना स्‍थळ पंचनामा दाखल केला. परंतु इतर कादगपत्र दाखल केलेले नाही.  वि.प.क्रं. 1 यांनी पोलिसांनी अपघातानंतर घटना स्‍थळावर जाऊन प्रत्‍यक्षदर्शनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्‍या साक्षीदारांच्‍या जबाबाची प्रत मंचासमक्ष दाखल केलेली आहे. साक्षीदारांचे जबाबाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, साक्षीदार मायाबाई रमेशराव भगत यांचा जबाब पोलिसांनी त्‍याच दिवशी म्‍हणजेच दिनांक 15.12.2011 ला नोंदविला. सदरील मायाबाई रमेशराव भगत हीचे घर तक्रारकर्त्‍याच्‍या घराच्‍या पूर्वेला 25 फुट अंतरावर आहे व सदरील अपघाताच्‍या वेळी ती घरी हजर होती. तिने तिच्‍या पोलिसांसमोरील जबाबात असे नमूद केले की, दि. 15.12.2011 रोजी सकाळी 11.00 वाजताच्‍या दरम्‍यान ती तिच्‍या  घराच्‍या बाहेर घरघुती भांडी घासत असतांना तिला सविता बंडुजी कांबळे हिचा आग लागली असा ओरडण्‍याचा आवाज आला. तेव्‍हा ती तिच्‍या पती सोबत तक्रारकर्ता व सुरेंद्र लांडगे यांच्‍या घराकडे निघाले व घराला आग लागल्‍याचे तिच्‍या निदर्शनास आले. ती व तिचे पती, सविताबाई, वैशालीबाई पाटे हे लोक त्‍या ठिकाणी जमा झाले व घरावर पाणी टाकत होते. तेव्‍हाच काही वेळाने सिलेंडरचा स्‍फोट झाला. त्‍यामुळे ते तेथून दूर पळाले व आगीत  संपूर्ण घर जळून नष्‍ट झाले.      

          तसेच साक्षीदार सौ. प्रमिला सुरेंद्र लांडगे हिचे जबाब सुध्‍दा सदरील बाबी आलेल्‍या  आहेत. वैशालीबाई देविदास पोटे हिचा जबाब  सुध्‍दा पोलिसांनी त्‍याच दिवशी नोंदविला. तिने सुध्‍दा पोलिसां समोरील जबाबात त.क. व सुरेंद्र लांडगे यांच्‍या घरातून धूर निघत असल्‍यामुळे घराला आग लागल्‍याचे निदर्शनास आले व त्‍या ठिकाणी जमलेले लोक पाणी टाकून आग विझवितांना दिसले. त्‍यानंतर त.क.च्‍या घरातील गॅस सिलेंडरचा भयंकर स्‍फोट  झाला. त्‍यामुळे ते घरापासून दूर पळाले.

     तसेच साक्षीदार सौ. दुर्गा सुखदेवराव गोंडाणे ही या अपघातात जखमी झाली व तिला दवाखान्‍यात दाखल करण्‍यात आले. दवाखान्‍यात तिचा मृत्‍युपूर्व जबाब नोंदविण्‍यात आला. त्‍या जबाबात सुध्‍दा तक्रारकर्त्‍याच्‍या घराला आग लागली तेव्‍हा सदर साक्षीदार घटनास्‍थळाचे शेजारी तिच्‍या आंगणात उभी असतांना आग लागलेल्‍या घरातून गॅस सिलेंडरचा तुकडा बाहेर आला व तिच्‍या हातावर लागल्‍या. त्‍यामुळे ती जखमी झाली असे नमूद केलेले आहे.  

     वरील सर्व साक्षीदारांच्‍या जबाबावरुन एक गोष्‍ट निश्चित होते की, सुरुवातीला तक्रारकर्ता व सुरेंद्र लांडगे यांच्‍या घराला आग लागली व त्‍यानंतर गॅस सिलेंडरचा स्‍फोट झाला. तसेच असेही सिध्‍द होते की, घराला लागलेल्‍या आगीमुळे गॅस सिलेंडरला आग लागली व स्‍फोट झाला. परंतु गॅस सिलेंडरचा स्‍फोट झाल्‍यामुळे घराला आग लागलेली नाही. तक्रारकर्त्‍याने सदरील साक्षीदारांचे पोलिसांनी घेतलेले जबाब चुकिचे आहे असे आपल्‍या शपथपत्रात कुठेही नमूद केलेले नाही किंवा तक्रारकर्त्‍याने वरील साक्षीदारांचे शपथपत्र स्‍वतःच्‍या तक्रारीच्‍या पृष्‍टयर्थ दाखल केलेले नाही. जर खरोखरच सिलेंडरचा स्‍फोट होऊन  तक्रारकर्त्‍याच्‍या घराला आग लागली असती  तर वरील साक्षीदारांनी पोलिसांसमोर, आग लागल्‍यानंतर गॅस सिलेंडरचा स्‍फोट झाला असे जबाब दिले नसते साक्षीदारांचे जबाब जर पोलिसांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे घेतले नसते तर तक्रारकर्त्‍याला त्‍या साक्षीदाराला जे अपघाताचे प्रत्‍यक्षदर्शनी साक्षीदार होते, त्‍यांना मंचासमोर आणता आले असते व त्‍यांचे शपथपत्र दाखल करता आले असते व तसे  तक्रारकर्त्‍याला सहज शक्‍य  होते. परंतु तक्रारकर्त्‍याने असा प्रयत्‍न केला नाही किंवा वरील प्रत्‍यक्ष दर्शनी साक्षीदाराचे शपथपत्र त्‍याच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍ठयर्थ दाखल केलेले नाही.  म्‍हणून आम्‍ही या निष्‍कर्षा प्रत येतो की,  तक्रारकर्त्‍याच्‍या घराला लागलेली आग ही गॅस सिलेंडरच्‍या स्‍फोटमुळे लागली नसून तक्रारकर्त्‍याच्‍या घराला लागलेल्‍या आगीमुळे सिलेंडरचा स्‍फोट झाला आणि त्‍याच्‍या घरातील साहित्‍य जळून नुकसान झाले. त्‍यामुळे वि.प. क्रं. 1 ते 3 हे तक्रारकर्त्‍यास नुकसानभरपाई देण्‍यास बांधिल नाही.

24       तक्रारकर्त्‍याने नि.क्रं. 5(6) प्रमाणे अग्‍नीक्षमन  दल नगर परिषद वर्धा   यांनी दिलेले प्रमाणपत्र दाखल करुन असे दर्शविण्‍याचा प्रयत्‍न केला की, सदरील आग ही गॅस सिलेंडरमधून गळतीमुळे झाली आहे, त्‍यामुळे भडका होऊन त्‍याच्‍या घराला आग लागली आहे. सदरील प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, सदरील प्रमाणपत्र दि. 07.02.2012 म्‍हणजेच घटनेनंतर दिड महिन्‍याने दिलेले आहे व प्रमाणपत्रात असे कुठेही नमूद केलेले नाही की, त्‍यांनी चौकशीकरुन त्‍यांच्‍या चौकशीत गॅस सिलेंडरच्‍या गळतीमुळे हा अपघात झालेला आहे. त्‍यामुळे नुसते प्रमाणपत्र दिल्‍यामुळे असे सांगता येणार  नाही .

     वरील सर्व विवेचनावरुन मंच या निष्‍कर्षा प्रत येते की, विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ने दोषपूर्ण सेवा तक्रारकर्त्‍याला दिल्‍यामुळे,  तक्रारकर्त्‍याच्‍या घराला आग लागली व त्‍याचे नुकसान झाले हे  तक्रारकर्ता सिध्‍द करु शकला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ता कोणत्‍याही प्रकारची नुकसान भरपाई विरुध्‍द पक्षाकडून मिळण्‍यास हक्‍कदार नाही. म्‍हणून सर्व मुद्दयाचे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येत आहे. 

     खालील प्रमाणे आदेश   पारित करीत आहे.

आदेश

1)     तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.

2)   उभय पक्षांनी खर्चाचे वहन स्‍वतः करावे.

3)      मा.सदस्‍यांसाठीच्‍या ‘ब’ व ‘क’ फाईल्‍स संबंधितांनी परत घेवून 

     जाव्‍यात.

4)   निकालपत्राच्‍या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्‍तव व उचित 

     कार्यवाही करिता पाठविण्‍यात याव्‍यात.

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.