द्वारा - श्री.शि.भि.धुमाळ : मा.अध्यक्ष
1. ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणे -
तक्रारदारांचे पती श्री विजय शिवराम पिचड यांचे निधन 13/01/2000 रोजी मुंबई येथे झाले. तक्रारदार ही त्यांच्या पतीची एकमेव वारस आहे. तक्रारदारांचे पती श्री.विजय पिचड यांनी त्याचे हयातीत सामनेवाला यांचेकडून दि.30/09/1995 रोजी विमा पॉलिसी नं.901006442 घेतील होती. सदरची विमा पॉलिसी 1 लाख रुपयांसाठी होती व तिची मॅच्यूरीटी दि.12/10/2010 होती. तक्रारदारांच्या पतीचे निधन झाल्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून वरील विमा पॉलिसीपोटी देय असणारी रक्कम मिळावी म्हणून अर्ज केला व त्यासोबत आवश्यक ते कागदपत्रे सादर केले तसेच वेळोवेळी सामनेवाला यांनी मागितलेली माहिती सामनेवाला यांना दिली. तथापि, सामनेवाला यांनी दि.31/03/2003 चे पत्राने तक्रारदारांचा क्लेम क्षुल्लक व चुकीच्या कारणाने नाकारला. तक्रारदारांचा क्लेम नाकारण्यासाठी सामनेवाला यांनी दिलेले कारण म्हणजे प्रिमियम रक्कम न दिल्यामुळे पॉलिसी लॅप्स होवून दिली होती. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे पती हयात असेपर्यंत सर्व प्रिमियम रक्कम सामनेवाला यांना देण्यात आली त्यामुळे सामनेवाला यांनी दि.10/12/1999 रोजी पॉलिसी पुनर्जिवीत केली होती व त्याखाली संपूर्ण आश्वासित रक्कम देवू करणेत आली होती. तक्रारदारांचा क्लेम नाकारण्यासाठी तक्रारदारांचे पती दि.03/12/1999 पासून अनाधिकृतपणे रजेवरती होते व त्यानंतर दि.17/12/1999 पासून आजारपणाच्या कारणावरुन रजेवर गेले असेही कारण दिले. वर नमूद केलेले कारण क्षुल्लक व असर्मनीय असून अशा कारणावरुन क्लेम नाकारता येत नाही.
2) तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे तिच्या पतीने सामनेवाला यांचेकडून विमा पॉलिसी घेतली त्यावेळी सामनेवाला यांना सर्व सत्य परिस्थिती सांगण्यात आली होती. तसेच पॉलिसीचे पुनर्जिवीत करतेवेळी सुध्दा सर्व गोष्टी सामनेवाला यांना सांगण्यात आल्या व त्यामुळे सामनेवाला यांनी सदरची पॉलिसी पुनर्जिवीत केली. जर यदाकदाचित तिचे पतीने सामनेवाला यांचेपासून काही महत्वाची माहिती लपवून ठेवली असती तर सामनेवाला यांनी सदर पॉलिसी पुनर्जिवीत केली नसती.
3) सामनेवाला यांनी दि.31/03/02 रोजी तक्रारदारांचा क्लेम नाकारल्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाला यांचे झोनल मॅनेजर व इतर वरिष्ठ अधिका-यांना पत्र पाठवून तिच्या क्लेमचा विचार करावा अशी विनंती केली होती तसेच दि.13/08/2007 रोजी आय.आर.डी.चे मॅनेजर यांनाही त्याबाबत पत्र पाठविले होते. त्यावर त्यांनी तक्रारदार हिने इन्शुरन्स अंम्बुड्समेंटकडे दाद मागावी असा सल्ला दिला. तक्रारदारांनी नंतर इन्शुरन्स अंम्बुड्समेंटकडे (महाराष्ट्र आणि गोवा) यांचे सेक्रेटरीकडे तक्रार दाखल केली तथापि, इन्शुरन्स अंम्बुड्समेंटकडून वरील तक्रारीसंबंधी कोणतीही कार्यवाही करणेत आली नाही. अशा परिस्थितीत तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दाखल केला असून सामनेवाला यांनी तक्रारदारांना विमा पॉलिसीपोटी रक्कम रु.1 लाख त्यावर 10 टक्के व्याजासहित द्यावेत असा आदेश सामनेवाला यांना करावा अशी विनंती केली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून तिला झालेल्या त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.5 लाख व या अर्जाच्या खर्चाची मागणी केली आहे.
4) सामनेवाला 1 ते 3 यांनी एकत्रितरित्या कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्य केली आहे. तक्रारअर्ज खोटा व चुकीचा असून तो रद्द करणेत यावा असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे. विम्याचा करार हा उभपक्षकारांच्या विश्वासावर आधारीत असतो तथापि, या प्रकरणात मयत विमाधारकाने त्यांच्या प्रकृतीविषयी सामनेवाला यांना चुकीची माहिती दिली होती. विमाधारकाने दिलेल्या माहितीवर विसंबून राहून सामनेवाला यांनी तक्रारदारांना पॉलिसी दिली होती. विमाधारकाने महत्वाची माहिती सामनेवाला यांचेपासून लपवून ठेवून विमा पॉलिसी घेतली असल्यामुळे मुलतःच ती रद्दबातल होती. या प्रकरणातील सर्व वस्तुस्थितीचा सामनेवाला यांनी गांभिर्याने विचार करुन तक्रारदारांचा क्लेम नाकारण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी सविस्तर कारणे दिलेली आहेत. केवळ क्लेम नाकारणे ही सामनेवाला यांचे सेवेतील कमतरता आहे असे म्हणता येणार नाही.
5) मयत विमाधारक श्री.विजय शिवराम पिचड यांनी दि.30/09/1995 रोजी सामनेवाला यांना विमा पॉलिसी प्रपोजल फॉर्म सादर केला. त्याचा विचार करुन सामनेवाला यांनी तक्रारअर्जात नमूद केलेली विमा पॉलिसी दि.13/12/95 रोजी रक्कम रु.1 लाखासाठी मयत विमाधारक श्री.विजय शिवराम पिचड यांना दिली होती. सदरची पॉलिसी प्लान 74/15 वर्षाची मनीबॅक पॉलिसी होती. सदरची पॉलिसी वैद्यकिय तपासणी न करताच देण्यात आली होती. या पॉलिसीपोटी वार्षिक प्रिमियम रु.7,990/-निश्चित करणेत आला होता. विमा पॉलिसीमध्ये विमाधारक श्री.विजय शिवराम पिचड यांनी त्यांची पत्नी श्रीमती मंगल विजय पिचड यांना नॉमिनी म्हणून नियुक्त केले. वरील पॉलिसीची छायांकित प्रत सामनेवाला यांनी कैफीयतसोबत नि.‘अ’ ला दाखल केली आहे. विमाधारक श्री.विजय पिचड यांनी सन् 1998 पासून प्रिमियम न भरल्यामुळे पॉलिसी लॅप्स झाली. त्यानंतर पॉलिसी पुनर्जिवीत करण्यासाठी विमाधारक श्री.विजय पिचड यांनी सामनेवाला यांचेकडे विनंती केली. विमाधारक श्री.विजय पिचड यांनी सामनेवाला यांना दि.09/12/1999 या तारखेचे त्यांची प्रकृती चांगली असल्याचे निवेदन दिले व त्या आधारे सामनेवाला यांनी थकबाकी असलेली प्रिमियमची रक्कम घेवून सदरची पॉलिसी पुनर्जिवीत केली. सामनेवाला यांनी कैफीयसोबत विमाधारक श्री.विजय पिचड यांनी त्यांची प्रकृती चांगली असल्याचे दिलेले निवेदन, प्रिमियम भरल्याची पावती, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
6) दि.22/05/2000 रोजी सामनेवाला यांना श्रीमती मंगल विजय पिचड यांचेकडून विमाधारक श्री.विजय शिवराम पिचड मरण पावल्याची माहिती मिळाली. श्रीमती. मंगल विजय पिचड यांनी सामनेवाला यांना आवश्यक ते क्लेम फॉर्म व क्लेम मिळण्यासाठी मार्गदर्शन करावे अशी विनंती केली. त्यानंतर तक्रारदारांचे वतीने त्यांचे वकील श्री.एम्.एस्.शिंदे यांनी दि.03/10/2000 चे पत्राने सदर विमा पॉलिसीचे पैसे मिळावे म्हणून सामनेवाला यांचेकडे मागणी केली. विमाधारक यांचे निधन पॉलिसी पुनर्जिवीत केल्यापासून 2 वर्षांच्या आत झाल्यामुळे नियमाप्रमाणे सामनेवाला यांनी सदर क्लेमसंबंधी चौकशी करणेसाठी शाखा व्यवस्थापक श्री.डी.आचार्य यांची नियुक्ती केली. सामनेवाला यांनी दि.18/10/2000 चे पत्राने तक्रारदार श्रीमती मंगल विजय पिचड यांनी आवश्यक ते कागदपत्र सादर करावेत असे सांगितले त्याप्रमाणे श्रीमती मंगल विजय पिचड यांनी मयत विमाधारकाचे नोकरीसंबंधीचा तपशिल, मृत्युचा दाखला, इत्यादी कागदपत्रे सादर दाखल केली. चौकशी अधिकारी यांनी दि.30/01/2000 रोजी त्याची माहिती सामनेवाला यांना सादर केली. तक्रारदारांच्या वकीलांनी दि.21/11/2000 रोजी सामनेवाला यांना पत्र पाठवून तक्रारदारांनी वारसा हक्क प्रमाणपत्र मिळण्यासाठी दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केल्याचे कळविले व संबंधीत अर्ज निकाल लागेपर्यंत विम्याची रक्कम इतर कोणासही देण्यात येवू नये अशी विनंती केली. दरम्यानच्या काळात तक्रारदारांनी डिस्चार्ज् फॉर्म, ओळख प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रं दाखल केले. दि.10/04/2002 च्या पत्रासोबत तक्रारदारांनी सक्सेशन सर्टिफीकेट सामनेवाला यांचेकडे सादर केले. सामनेवाला यांनी तक्रारदारांना दि.19/06/2002 व 26/11/2002 च्या पत्राने काही बाबींची पुर्तता करावी असे कळविले. त्यानंतर तक्रारदारांनी संबंधीत कागदपत्रे सामनेवाला यांचेकडे दाखल केले. सामनेवाला यांनी डॉ.बी.जे.गांधी यांचेकडून वैद्यकीय परीक्षक प्रमाणपत्र मिळविले. सदर वैद्यकीय परीक्षक प्रमाणपत्राची छायांकित प्रत सामनेवाला यांनी कैफीयतसोबत नि.‘F’ला सादर केली आहे. डॉ.गांधी यांनी सदर प्रमाणपत्रामध्ये विमाधारकास Ext.Pulmonary, Koch’s चा आजार पॉलिसी पुनर्जिवीत करण्यापूर्वीच होता असे नमूद करुन विमाधारक विजय पिचड यांनी त्यांचे प्रथमः दि.13/01/1999 रोजी सल्ला घेतला होता असे नमूद केले आहे. विमाधारक हा दि.03/12/99 ते 16/12/99 रोजी त्याची प्रकृती चांगली असल्याचे प्रतिज्ञापत्र सामनेवाला यांना सादर केले होते. वास्तवित विमाधारकाने त्यापूर्वीच डॉ.बी.जे.गांधी यांचा दि.13/01/99 रोजी सल्ला घेतला व त्यांना Ext.Pulmonary, Koch’s च्या आजारची पूर्णपणे माहिती होती असे असताना विमाधारकाने त्याच्या प्रकृतीविषयी महत्वाची माहिती सामनेवाला यांचेकडून लपवून ठेवून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे प्रतिज्ञापत्र सामनेवाला यांना दि.09/12/99 रोजी दिले.
7) विमाधारक विजय पिचड यांना दिलेल्या विमा पॉलिसीची प्रिमियम रक्कम न भरल्याने सदर पॉलिसी लॅप्स झाली होती व ती पॉलिसी वरीलप्रमाणे विमाधारकाने कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर दि.10/12/99 रोजी संपूर्ण आश्वासित रक्कमेसाठी पुनर्जिवीत करणेत आली. तथापि, विमाधारक श्री.विजय पिचड यांनी त्यांचे प्रकृतीविषयी खरी माहिती लपवून ठेवून चुकीची माहिती म्हणजेच त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगितल्यामुळे सदरची पॉलिसी पुनर्जिवीत करण्यात आली. वर नमूद केलेली पॉलिसी प्रिमियम रक्कम न भरल्यामुळे खंडित झाली होती त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांना दि.16/05/2007 चे पत्राने तक्रारदारांना फक्त रु.25,500/- मिळतील व त्यासाठी त्यांनी डिस्चार्ज् फॉर्म भरून द्यावा असे कळविले. सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेम क्षुल्लक व चुकीच्या कारणावरुन नाकारला हा तक्रारदारांचा आरोप सामनेवाला यांनी नाकारला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांचे इतर सर्व आरोप नाकारले असून मयत विमाधारक याने त्याच्या प्रकृतीविषयी महत्वाची माहिती सामनेवाला यांचेपासून लपवून ठेवल्यामुळे सामनेवाला हे वर नमूद विमा पॉलिसीपोटी कोणतीही रक्कम तक्रारदारास देण्यास जबाबदार नाहीत असे म्हटले आहे. सबब तक्रारअर्ज खर्चासहित रद्द करणेत यावा असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे.
8) तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत यादीप्रमाणे कागदपत्रे दाखल केले आहेत. सामनेवाला यांनीसुध्दा त्यांचे एकत्रित कैफीयतसोबत यादीप्रमाणे कागदपत्रे दाखल केले आहेत. तक्रारदारांनी प्रतिनिवेदन दाखल करुन सामनेवाला यांनी केलेले सर्व आरापे नाकारले आहेत. याकामी तक्रारदारांनी तसेच, सामनेवाला यांनी आपआपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदारांचे वकील श्री.विजय के.तोंदवलकर व सामनेवाला यांचे वकील श्री.नवीनकुमार यांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यात येवून सदर प्रकरण निकालासाठी ठेवण्यात आले.
9) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात -
मुद्दा क्र.1 - तक्रारदार सामनेवाला यांचे सेवेत कमतरता आहे हे सिध्द करतात काय ?
उत्तर - होय.
मुद्दा क्र.2 - तक्रारदारांना सामनेवाला यांचेकडून विमा पॉलिसीपोटी देय असणारी रक्कम, व्याज व नुकसानभरपाईसहित मागता येईल काय ?
उत्तर - अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 - उपलब्ध कागदपत्रांवरुन असे दिसून येते की, तक्रारदारांचे मयत पती श्री. विजय शिवराम पिचड यांनी त्यांचे हयातीत सामनेवाला एल.आय.सी.ऑफ इंडिया यांचेकडून दि.30/09/1995 रोजी विमा पॉलिसी नं.901006442 घेतील होती. त्या पॉलिसीची छायांकित प्रत सामनेवाला यांनी कैफीयतसोबत दाखल केली असून त्यामध्ये तक्रारदार श्रीमती मंगल विजय पिचड यांचे नांव नॉमिनी म्हणून नमूद करणेत आले आहे. वरील पॉलिसीची योजना व अवधि 74/15 असून आश्वासित रक्कम रु.1 लाख नमूद केली आहे. वार्षिक प्रिमियमची रक्कम रु.7,990/- अशी आहे. विमाधारक श्री.विजय पिचड यांचे निधन 13/01/2000 रोजी मुंबई येथे झाले व त्यानंतर तक्रारदारांनी वरील पॉलिसीपोटी देय असणारी रक्कम मिळण्यासाठी सामनेवाला यांचेकडे अर्ज दाखल केला. सामनेवाला यांनी मागितल्याप्रमाणे तक्रारदारांनी वेळोवेळी सामनेवाला यांना कागदपत्रे दिलेले असून सदर बाब उपलब्ध कागदपत्रावरुन दिसून येते. मयत विमाधारकाने सन् 1998 साली प्रिमियम भरला नव्हता म्हणून सदरची पॉलिसी लॅप्स झाली होती. त्यानंतर सदरची पॉलिसी पुनर्जिवीत करण्यासाठी मयत श्री.विजय पिचड यांनी सामनेवाला यांना विनंती केल्याचे दिसते, तसेच सामनेवाला यांना दि.09/12/1999 रोजी त्यांची प्रकृती चांगली असल्याबद्दलचे प्रतिपादन दिले व थकीत प्रिमियमची रक्कम दिल्यानंतर सामनेवाला यांनी त्यांची पॉलिसी पुनर्जिवीत केली. विमाधारकाचा मृत्यु पॉलिसी पुनर्जिवीत केल्यापासून 2 वर्षाच्या आत झाल्यामुळे सामनेवाला यांनी शाखा व्यवस्थापक, श्री.डी.आचार्य यांची इन्व्हेस्टीगेटर म्हणून नियुक्ती करुन याबाबत चौकशी केली होती असे दिसून येते. दरम्यानच्या काळात तक्रारदारांनी मा.दिवाणी न्यायालयातून सक्सेशन सर्टिफीकेट मिळवून ते सामनेवाला यांना दिले. सामेनवाला यांचे म्हणण्याप्रमाणे इन्व्हेस्टीगेटरचा रिपोर्ट त्यांना दि.30/01/2000 रोजी मिळाला. त्यामध्ये डॉ.बी.जे.गांधी यांचा वैद्यकीय सल्ला विमाधारकाने घेतला होता. डॉ.बी.जे.गांधी यांनी दिलेला वैद्यकीय परीक्षक प्रमाणपत्र दाखल केले आहे. याकामी डॉ.बी.जे.गांधी यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करुन मयत विमाधारक श्री.विजय पिचड याला त्यांनी दि.13/01/1999 रोजी तपासले व श्री.विजय पिचड यास गेल्या एक वर्षापासून Ext.Pulmonary, Koch’s चा आजार होता असा अभिप्राय प्रतिज्ञापत्रात नमूद केला आहे. वरील डॉ.गांधी यांचे प्रतिज्ञापत्राचा आधार घेवून सामनेवाला यांनी असे सांगितले की, मयत विमाधारक त्यांचे पॉलिसी पुनर्जिवीत करण्यासाठी दि.09/12/1999 रोजी त्यांचे प्रकृतीविषयी जे डिक्लेरेशन दिले आहे त्यामध्ये त्याने त्याची प्रकृतीविषयीची खरी माहिती सामेनवाला यांचेपासून जाणूनबुजून लपवून ठेवली. विमाधारक श्री.विजय पिचड यांनी पॉलिसी लॅप्स झाल्याने सामनेवाला यांनी दि.30/05/2006 चे पत्राने तक्रारदारांना फक्त रक्कम रु.25,500/- मिळतील असे कळविले व त्यानंतर डिस्चार्ज् फॉर्म भरुन द्यावा असे सूचवून सदरची बाब तक्रारदारांना मान्य नव्हती असे दिसते. मयत विमाधारकाने त्याचे प्रकृतीविषयी महत्वाची माहिती सामनेवाला यांचेकडून पॉलिसी पुनर्जिवीत करतेवेळी लपवून ठेवली व मुद्दामहून प्रकृती चांगली असल्याचे डिक्लेरेशन दिले तसेच मयत विमाधारक हे दिनांक 03/12/1999 पासून अनाधिकृतपणे रजेवर गेले होते व त्यानंतर दि.17/12/99 पासून आजापणात रजेवर होते व या कारणामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेम नामंजूर केला. सामनेवाला यांचे वकील श्री.नवीनकुमार यांनी मयत विमाधारकाने त्याचे प्रकृतीविषयी महत्वाची माहिती सामनेवाला यांचेपासून लपवून ठेवल्यामुळे तक्रारदारांचा क्लेम मान्य करता येणार नाही या आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ मा.सर्वोच्च न्यायालयाच्या Mithoolal Nayak V/s. Life Insurance Corporation of India AIR 1962 SC 814, Smt.Vidya Devi V/s. Life Insurnace Corporation of India – National Commission in Revision Petition No.2050 & 2051 of 2000 तसेच Life Insurance Corporation of India V/s. Pramodbhai Dahyabhai Parikh – Gujarat State Commission in Appearl No.554 of 1998, Divisional Manager, L.I.C. of India V/s.Saramma Varghese 1999 (1) CPR 443, L.I.C. of India and another V/s.M.Gowri and others 1986-94 (NS) 1387 या व इतर निकालांचा आधार घेतला.
तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेम क्षुल्लक व चुकीच्या कारणावरुन नाकारला आहे. मयत विमाधारकाची पॉलिसी लॅप्स झाली होती व ती पॉलिसी पुनर्जिवीत केल्यामुळे विमाधारकाने सामनेवाला यांना दि.09/12/1999 रोजी डिक्लेरेशनद्वारे त्यांच्या प्रकृतीविषयीची महत्वाची माहिती जाणूनबुजून लपवून ठेवली होती हा आरोप तक्रारदारांनी नाकारला आहे. पॉलिसी पुनर्जिवीत करेपर्यंत मयत विमाधारकास Ext.Pulmonary, Koch’s चा आजार होता याची कोणतीही माहिती विमाधारकास नव्हती. मयत विमाधारकाचे मृत्युचे कारण डॉ.गांधी यांनी दिलेल्या वैद्यकीय परीक्षक प्रमाणपत्रमध्ये AC- Cardio-Respirotary failure असे नमूद केले आहे. दुसरे कारण म्हणजे Ext.Pulmonary, Koch’s असे नमूद केले आहे. AIDS/Ext.Pulmonary, Koch’s या आजाराचा संबंध AC- Cardio–Respirotaryशी संबंध असत नाही. याकामी डॉ.बी.जे.गांधी यांचे प्रतिज्ञापत्र सामनेवाला यांनी दाखल केले असून सदर प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी दि.13/01/1999 रोजी मयत विमाधारक श्री.विजय पिचड यांची तपासणी करुन त्यांना सल्ला दिला असे म्हटले आहे. डॉ.गांधी यांनी दि.13/01/1999 चे केसपेपर्स याकामी दाखल केलेले नाहीत. डॉ.गांधी यांनी दिलेले वैद्यकीय परीक्षक प्रमाणपत्र हे विमधारक मृत्यु झाल्यानंतर दिलेले आहे. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेम नाकारला याचे समर्थन करण्यासाठी डॉ.गांधी यांचे वर नमूद केलेले प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र नंतर तयार करुन दाखल केलेले आहे त्यामुळे डॉ.गांधी यांचे वरील प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्रावर विश्वास ठेवता येणार नाही. जर डॉ.गांधी यांनी मयत विमाधारकास दि.13/01/1999 रोजी तपासले असते तर त्या संबंधातील केसपेपर्स त्यांनी प्रतिज्ञापत्रासोबत दाखल केले असते. डॉ.गांधी यांनी वरील माहिती सामनेवाला यांना दिल्यानंतरसुध्दा सामनेवाला यांनी तक्रारदारांना क्लेमपोटी रक्कम रु.25,500/- देवू केली होते हे तक्रारदारांनी त्यांचे कैफीयतीमध्ये नमूद केले आहे. जर मयत विमाधारकाने त्याच्या प्रकृतीविषयी महत्वाची माहिती लपवून ठेवली असती तसेच पॉलिसी पुनर्जिवीत केली असती तर सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्कम रु.25,500/- देवू केले नसते.
तक्रारदार या मयत विमाधारक यांच्या पत्नी असून विमा पॉलिसीमध्ये त्यांचे नांव नॉमिनी म्हणून नमूद करण्यात आलेले आहे. उपलब्ध कागदपत्रावरुन लॅप्स झालेल्या विमा पॉलिसीचे सामनेवाला यांनी नुतनीकरण करुन दिलेले असल्यामुळे पॉलिसी लॅप्स झाली होती असा बचाव सामनेवाला यांना घेता येणार नाही. डॉ.गांधी यांनी मयत विमाधारक यांना दि.13/01/99 रोजी तपासल्यासंबंधी त्यावेळचे वैद्यकीय कागदपत्र हजर केले नाहीत. डॉ.गांधी यांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र दि.23/06/98 चे म्हणजेच सदरचा तक्रारअर्ज दाखल केल्यानंतरच्या तारखेचे आहे. वैद्यकीय परीक्षक प्रमाणपत्र संबंधी मयत विमाधारक श्री.विजय पिचड यांचे निधन झाल्यानंतर तयार करणेत आले असून ते कोणत्या तारखेस दिले याची तारीख लिहीण्यात आलेली नाही. डॉ.गांधी यांनी त्यांचे प्रतिज्ञापत्रामध्ये ते गेली 27 वर्षे वैद्यकिय व्यवसाय करतात असे म्हटले आहे. डॉ.गांधी हे प्रत्येक दिवशी अनेक रुग्णांची तपासणी करुन केसपेपर्स तयार करीत असतील. डॉ.गांधी यांनी त्यांच्या दि.23/06/2008 चे प्रतिज्ञापत्रामध्ये यातील विमाधारक विजय पिचड यांची दि.13/01/1999 रोजी तपासणी करुन त्यांना आढळलेला आजार Ext.Pulmonary, Koch’s हा एक वर्षापासून असावा असे निदान केले आहे पण श्री.विजय पिचड यांचा केसपेपर हजर केला नाही. केसपेपर किंवा इतर लेखी टिपणीशिवाय साधारणपणे 9 वर्षाच्या कलावधीनंतर विजय पिचड यास कोणत्या तारखेस तपासले व त्याला कोणता आजार होता हे कशाच्या आधारे डॉ.गांधी यांनी सांगितले याचा खुलासा केलेला नाही. सबब डॉ.गांधी यांचा पुरावा संशयास्पद वाटतो. वरील सर्व बांबींचा विचार करता मयत विमाधारक श्री.विजय शिवराम पिचड यांना त्यांच्या आजारासंबंधी पूर्व कल्पना असून सुध्दा दि.13/09/2009 रोजी त्यांनी त्यांचे प्रकृतीविषयीचे डिक्लेरेशन सामनेवाला यांना दिले हा सामनेवाला यांचा आरोप संशयास्पद वाटतो. मयत विमाधारक कोणत्या कालावधीसाठी रजेवर गेला ही बाब तक्रारदारांचा क्लेम नाकारण्यासाठी कारण होवू शकत नाही. वरील सर्व गोष्टींचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेम नाकारण्याचा घेतलेला निर्णय समर्थनिय वाटत नाही. अशा त-हेने क्लेम नाकारने ही सामनेवाला यांचे सेवेतील कमतरता आहे असे म्हणावे लागते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देणेत येते.
मुद्दा क्र.2 -वर नमूद केल्याप्रमाणे तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून मयत पती श्री.विजय पिचड यांचे विमा पॉलिसीपोटी रक्कम रु.1 लाख वसुल होवून मिळावेत अशी मागणी केली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेम ज्या कारणांवरुन नाकारला होता ती कारणे योग्य व पुरेशी समर्थनीय नसल्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांना मयत विमाधारक श्री.विजय पिचड यांचे विमा पॉलिसीपोटी रक्कम रु.1 लाख द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल.
तक्रारदारांनी वरील रक्कम रु.1 लाख यावर द.सा.द.शे. 10 टक्के दराने व्याजाची मागणी सामनेवाला यांचेकडून केली आहे. या प्रकरणातील वस्तुस्थितीचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्कम रु.1 लाख यावर तक्रार दाखल केलेल्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे असा आदेश करणे योग्य होईल. तक्रारदारांनी त्यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,00,000/- व या अर्जाच्या खर्चाची मागणी सामनेवाला यांचेकडून केली आहे. तक्रारदारांनी नुकसानभरपाईपोटी मागणी केलेली रक्कम अवास्तव व जादा आहे. एवढया मोठया रकमेच्या नुकसानभरपाईचे समर्थन करणारा पुरावा तक्रारदारांनी सादर केलेला नाही. या प्रकरणातील वस्तुस्थितीचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारांना नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.5,000/- व या अर्जाचा खर्च रु.1,000/- देणे उचित होईल सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर त्याप्रमाणे देण्यात येते.
वर नमूद केलेल्या कारणास्तव तक्रारअर्ज अंशतः मंजूर करुन पुढील प्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येतो -
अं ति म आ दे श
1.तक्रार क्रमांक 72/2008 अंशतः मंजूर करणेत येत आहे.
2.सामनेवाला नं.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या अथवा संयुक्तरित्या तक्रारदारांना रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख मात्र) द्यावेत व सदर
रकमेवर तक्रारअर्ज दाखल तारखेपासून म्हणजेच दि.02/05/2008 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने संपूर्ण रक्कम तक्रारदारांना अदा
होईपर्यंत व्याज द्यावे.
3.सामनेवाला नं.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या अथवा संयुक्तरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम
रु.5,000/-(रु.पाच हजार मात्र) व या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार मात्र) द्यावेत.
4.सामनेवाला नं.1 ते 3 यांनी वरील आदेशाची अंमलबजावणी सदर आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आत करावी.
5. सदर आदेशाची प्रमाणित प्रत सर्व पक्षकारांना देणेत यावी.