निकालपत्र :- (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला यांच्या वकिलांनी मागील तारखेस युक्तिवाद केलेला आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांचे पती दि.02.12.2008 रोजी मयत झाले आहेत. त्यांच्या पतीच्या नांवे सामनेवाला विमा कंपनीकडे विमा पॉलीसी उतरविली आहे. सदर पॉलीसीचा क्रमांक हा 947418806 असा असून पॉलीसी रक्कम रुपये 50,000/- इतकी आहे. तक्रारदारांच्या पतीना नोव्हेंबर 2008 मध्ये कावीळ आजार झाला. त्यामुळे दि.02.12.2008 रोजी ते मयत झाले. मृत्यूचे कारण Cardio respiretory arrest due to renal failure due to infective hepatitis असे आहे. तक्रारदारांनी सामनेवाला विमा कंपनीकडे क्लेमची मागणी केली असता चुकीचे कारण देवून क्लेम नाकारलेला आहे. सबब, क्लेम रक्कम रुपये 50,000/- द.सा.द.शे.12 टक्के व्याजासह देणेचा आदेश व्हावा. मानसिक-शारीरीक त्रासापोटी रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला यांचे दि.30.03.2009 व दि.18.11.2009 रोजीची पत्रे, तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि.23.05.2009 रोजी दिलेले पत्र, मृत्यूचा दाखला, विमा हप्ता पावती दि.29.09.2008 इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (4) सामनेवाला विमा कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, विमा कंपनी व पॉलीसी धारक यांच्यामधील असलेला करार हा परमविश्वासावर आधारित आहे. तक्रारदारांनी पॉलीसी प्राप्त करणेपूर्वी दि.02.09.2008 रोजी अपल हॉस्पिटल, कोल्हापूर येथे Colour Doppler Echocardiography Test करुन घेतली होती. याबाबतची वस्तुस्थिती पॉलीसी घेतेवेळेस लपवून ठेवली आहे. त्यामुळे पॉलीसीतील अटी व शर्तींचा भंग केलेला आहे. सबब, सामनेवाला यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी झालेली नाही. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे. (5) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांच्या पतींच्या नांवे पॉलीसी दिली होती. ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तसेच, तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू हा Cardio respiretory arrest due to renal failure due to infective hepatitis सदर कारणाने झाले असल्याचे या मंचाचे निदर्शनास आणून दिले आहे. सामनेवाला विमा कंपनीने पॉलीसीच्या अटी व शर्ती दाखल केलेल्या आहेत. तसेच, तक्रारदारांच्या पतीने पॉलीसीबाबत दिलेला प्रस्ताव दाखल केलेला आहे याचे अवलोकन केले असता सामनेवाला विमा कंपनीने नाकारलेला क्लेम हा Colour Doppler Echocardiography Test घेतलेली आहे या कारणावरुन नाकारलेचे सामनेवाला विमा कंपनी त्यांच्या म्हणण्यात प्रतिपादन करतात. सदर टेस्ट अथवा कोणतीही टेस्ट घेतली या वरुन पॉलीसी घेणेपूर्वी तक्रारदारांच्या पतींना आजार होता यावरुन निष्कर्ष काढता येणार नाही. केवळ वैद्यकिय चाचणी घेतली म्हणजे तक्रारदारांच्या पतींना पॉलीसी घेणेपूर्वी आजार होता असा सामनेवाला विमा कंपनीने काढलेला निष्कर्ष हा विसंगत आहे. तसेच, याबाबत कोणताही तज्ज्ञ मताचा अहवाल नाही. पॉलीसी घेणेपूर्वी तक्रारदारांच्या पतींना आजार होता व सदर आजाराने तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू झाला आहे याबाबत सामनेवाला विमा कंपनीकडे कोणताही सुसंगत पुरावा नाही. वस्तुस्थितीचा विचार करता सामनेवाला विमा कंपनीच्या कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झालेचे दिसून येत नाही. सबब, क्लेम रक्कम मिळणेस तक्रारदार हे पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. क्लेम रक्कमेवर तक्रारदार व्याज रक्कम मिळणेस पात्र असल्याने नुकसान भरपाई मिळणेस पात्र असणार नाहीत. सबब, आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना क्लेम रक्कम रुपये 50,000/- (रुपये पन्नास हजार फक्त) द्यावेत. सदर रक्कमेवर दि.02.12.2008 रोजीपासून द.सा.द.शे.8 टक्के व्याज द्यावे. 3. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |