( पारीत दिनांक :18/11/2013 ) ( द्वारा अध्यक्ष(प्रभारी) श्री.मिलींद भि.पवार(हिरुगडे) ) 01. अर्जदार यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये गैरअर्जदार यांच्या विरुध्द दाखल केली असून, तीद्वारे पुढील प्रमाणे मागण्या केलेल्या आहेत. 1. गैरअर्जदार यांनी पॉलीसी क्र.976339536 व 976339869 ची रकम सर्व लाभांसह व तक्रार दाखल केल्या दिनांकापासुन ते रक्कम मिळेपर्यंत दसादशे 18 टक्के व्याजासह तसेच सर्व दस्तावेज अर्जदार यांना द्यावे. 2. मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रु.10,000/- 3. तक्रारीचा खर्च रु. 5000/- अर्जदाराच्या तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे आहे. अर्जदार यांनी सदर तक्रार अर्जामध्ये नमुद केले आहे की, अर्जदार हे मयत श्रीमती पंचफुला भाउराव लोहकरे यांचे मुले आहेत. मयत श्रीमती पंचफुला भाउराव लोहकरे यांचा व मुलगी कु.साक्षी भाउराव लोहकरे हिचा दिनांक 24/11/2011 रोजी अपघातात मृत्यु पावल्या होत्या व त्यांच्या नावे विमा पॉलीसी क्र.976339536 व 976339869 क्रमशः रु.55,000/- व रु.1,05,000/- जोखमेच्या रकमेच्या होत्या. सदर विमा पॉलिसीमध्ये नॉमीनी म्हणुन अर्जदारांच्या बहिनेची नावे दर्शविले होते परंतु तिचासुध्दा अपघाती मृत्यु झाला होता. अर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, मयत श्रीमती पंचफुला भाउराव लोहकरे यांचे नॉमीनी म्हणुन विमा पॉलीसी क्र.976339536 व 976339869 क्रमशः रु.55,000/- व रु.1,05,000/- जोखमेच्या रकमेची रक्कम व ईतर लाभ मिळावे म्हणुन दिनांक 27/12/2011 रोजी गैरअर्जदार यांच्या कार्यालयात जावुन विमा दावा फॉर्मची मागणी केली व सदर विमा पॉलीसीचा ईतर कोणालाही लाभ न मिळण्यासाठी रितसर अर्ज केला. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा अर्ज स्विकारला नाही उलटपक्षी सदर विमा पॉलिसीची रक्कम ही प्रमोद नितनवरे यांना देण्यात येईल असेही अर्जदार यांना सांगण्यात आले. अर्जदार यांनी वारंवार गैरअर्जदार यांच्या कार्यालयात जावुन विमा रक्कम मिळण्याबाबत सर्व कागदोपत्री कार्यवाही करण्यासंबंधी विनंती केली तसेच सदर विमा रक्कम ही प्रमोद नितनवरे यांना देण्यात येवु नये कारण ते मयत यांच्या कुठल्याही प्रकारच्या रक्त नात्यातील व्यक्ति नाही. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदार यांच्या सर्व म्हणण्याकडे दुर्लक्ष केल्याचे अर्जदार यांचे म्हणणे आहे. अर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, विमा रक्कम मिळण्यासंबंधी कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन न करणे, विमा फॉर्म न देणे तसेच विम्याची रक्कम त्रयस्त व्यक्तिला देण्याची भाषा करणे ही बाब गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रृटी असुन त्यांनी अनुचित व्यापार प्रणालीचा अवलंब केलेला आहे, त्यामुळे अर्जदारांनी गैरअर्जदारांविरुध्द प्रस्तुत तक्रार मंचामध्ये दाखल केली आहे व वरीलप्रमाणे मागणी केली आहे. 02. गैरअर्जदार यांनी आपला लेखी जवाब दाखल केलेला आहे. त्यानुसार गैरअर्जदार यांनी तक्रारीतील विपरित विधाने / आरोप अमान्य करुन पुढे असे नमुद केले की, मयत श्रीमती पंचफुला भाउराव लोहकरे यांनी मृत्यु उपरांत काढलेल्या दोन पॉलीसींच्या रकमा कुठलेही दस्तावेजी पुरावा न सादर करता फक्त तलाठ्यांच्या प्रमाणपत्रावर सदर विमा रक्कम हडपण्याचा प्रयत्न करीत आहे. गैरअर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, मयत श्रीमती पंचफुला भाउराव लोहकरे यांच्या विमा पॉलिसीमध्ये नॉमीनी म्हणुन कु.दिक्षा हिचे नाव निर्देशीत केलेले आहे, परंतु कु.दिक्षा ही अज्ञान असल्यामुळे प्रमोद नितनवरे यांना नियुक्त करण्यात आले आहे. श्री प्रमोद नितनवरे यांनी दिनांक 1/3/2012 रोजी गैरअर्जदार यांना दिलेल्या पत्रानुसार अर्जदार यांचे विमाकर्तीसोबत कुठल्याही प्रकारचे कौटुंबिक संबंध नसल्याचे स्पष्ट दिसुन येते व त्याबाबतचे सर्व दस्तावेजी पुरावे गैरअर्जदार यांनी मा.मंचासमक्ष सादर केलेले आहेत असे गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी जबाबामध्ये नमुद केले आहे. तसेच गैरअर्जदार यांना ते मयत हिचे वारसदार असल्यासंबंधीचे न्यायालयाडुन कायदेशीररित्या वारसान प्रमाणपत्र आणण्याविषयी पत्राद्वारे कळविण्यात आले होते, परंतु अर्जदार यांनी त्याबाबतची माहिती ही मा.मंचासमक्ष आणलेली नाही. गैरअर्जदार यांनी नमुद केले आहे की, अर्जदार यांनी विमा रक्कम मिळण्याकरीता तलाठयाचे प्रमाणपत्र दिले होते, परंतु सदर प्रमाणपत्रानुसार अर्जदार यांचे त्यांचे वडील भाउराव सोमाजी लोहकरे यांचे वारस ठरत असले तरी ते मयत पंचफुला भाउराव लोहकरे यांचेही वारस ठरतील असे नाही. श्री प्रमोद नितनवरे यांनी दि.1/3/2012 रोजी दिलेल्या पत्रानुसार मयत पंचफुला भाउराव लोहकरे यांची आई जिवंत असल्याचे नमुद केले आहे व सदर विमा रकमेची राशी मिळण्यास हकदार ठरेल ही बाब अर्जदार यांनी हेतुपुरस्सर मा.मंचासमोर आणली नाही व लपुन ठेवण्यात आली. गैरअर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, जर अर्जदार यांनी आजही मयत हिचे वारसदार असल्यासंबंधीचे न्यायालयाडुन कायदेशीररित्या वारसान प्रमाणपत्र आणल्यास गैरअर्जदार हे विमा रक्कम देण्याची तयारी दर्शविली आहे. गैरअर्जदार यांच्या तर्फे कुठल्याही प्रकारची चुक झालेली नसल्यामुळे अर्जदाराची सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी उत्तरा्द्वारे मा.मंचास केलेली आहे. 05. अर्जदारांनी प्रस्तुत तक्रार प्रतिज्ञापत्रावर दाखल केली असून, सोबत घटनास्थळ पंचनामा, एफ.आय.आर, ईन्क्वेस्ट रिपोर्ट, गाव नमुना 7/12,गांव, इत्यादी एकुण 9 दस्तावेंजांच्या छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहे. तसेच लेखी युक्तिवाद व न्यायनिवाडे दाखल केले आहे. गैरअर्जदार यांनी त्यांचा लेखी जवाब प्रतिज्ञापत्रावर दाखल केला असुन सोबत विमा पॉलिसी, डॉ.प्रमोद नितनवरे यांनी विमा दाव्यासंबंधी दिलेले पत्र, गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दिलेले पत्र, विमाधारकाचे प्रस्तावपत्र इत्यादी एकुण 8 दस्तावेजांच्या छायांकीत प्रती तसेच लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. -: कारणे व निष्कर्ष :- प्रस्तुत कामी अर्जदार यांनी दाखल केलेले तसेच गैरअर्जदार यांनी सुध्दा दाखल केलेल्या सर्व दस्तावेजांचे बारकाईने अवलोकन करण्यात आले. विमा पॉलिसी बाबत अर्जदार गैरअर्जदार यांचे मध्ये वाद नाही, वाद आहे सदर विमा पॉलिसी मधील विमा धारकाचा व त्यामधील नाम निर्देशीत केलेल्या व्यक्तिचा अपघाती मृत्यु झाला आहे व त्यामुळे सदर विमा पॉलिसीची रक्कम कोणाला द्यायची यामधुन अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचे मध्ये वाद निर्माण झालेला आहे. प्रस्तुत तक्रारीचे अवलोकन केले असता, अर्जदार यांना फक्त मयत पंचफुला लोहकरे यांच्या दोन विमा पॉलिस्या आहे हे पावती वरुन दिसुन आले एवढीच माहिती आहे, मात्र त्यांनी सदर विमा पॉलिस्या या कामी दाखल केलेल्या नाही. मात्र गैरअर्जदार यांनी नि.क्र.17/8 व 9 कडे विमा पॉलिसी क्र.976339536 व 976339869 दाखल केलेल्या आहेत, यावरुन मयत पंचफुला लोहकरे यांनी विमा पॉलिस्या काढल्या होत्या हे सिध्द होते. सदर विमा धारक मयत पंचफुला लोहकरे व त्यांची कन्या कु.दिक्षा यांचे दिनांक 24/11/2011 रोजी अपघाती निधन झाले आहे हे नि.क्र.3/2 ते 3/5 वरील एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा व एनक्वेस्ट पंचनामा यावरुन सिध्द होते. सदर मृत्युबाबतही अर्जदार व गैरअर्जदार यांचे मध्ये वाद नाही. विमा धारकाच्या मृत्यु नंतर अर्जदार यांना विमा धारकाने काढलेल्या विमा पॉलिसीच्या रक्कम भरल्याच्या पावत्या सापडल्या हे सदर पावत्या नि.क्र.3/6 व 3/7 कडे दाखल आहे. सदर पावत्यावरुन अर्जदार यांना मयत पंचफुलाबाईने विमा पॉलिसी काढली होती हे समजले व सदर विमा पॉलिसीवर नॉमिनी म्हणुन नोंद असलेल्या व्यक्तिचाही अपघाती मृत्यु झाला म्हणुन अर्जदार यांनी सदर विमा धारकाचे वारस म्हणुन सदर विम्याची रक्कम मिळण्याकरीता गैरअर्जदार यांचेकडे अर्ज केला हे नि.3/9 व 3/10 वरुन दिसुन येते. परंतु त्यांचे अर्जाप्रमाणे गैरअर्जदार यांनी सदर रक्कम दिली नाही म्हणुन अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार मा.मचात दाखल केली आहे व नि.क्र.4 कडे अंतरीम अर्ज दाखल करुन मुळ तक्रारीतचा अंतिम निकाल लागेपर्यंत सदर विम्याची रक्कम कोणालाही अदा करण्यात येवु नये असा आदेश व्हावा अशी विनंती मा.मंचास केली. सदर अर्जावर गैरअर्जदार यांनी हरकत घेतली नाही, त्यामुळे अंतरीम अर्जावर आदेश होवुन मुळ तक्रारीचा अंतिम निकाल लागेपर्यंत विम्याची रक्कम कोणालाही अदा करु नये असा अंतरीम आदेश दिनांक 7/3/2012 रोजी मा.मंचाने पारीत केला. सदर विम्याची रक्कम अर्जदारांना का अदा करण्यात आली नाही या बाबत गैरअर्जदार यांचे लेखी जबाब व त्यासोबत दाखल कागदपत्रांचे तसेच त्यांच्या वकीलांनी केलेल्या युक्तिवाद यांचे बारकाईने अवलोकन करण्यात आले. गैरअर्जदार यांच्या म्हणण्यानुसार सदर विमा पॉलिसी मध्ये नॉमिनी म्हणुन दिक्षा लोहकरे हिची नोंद होते व दिक्षा सुध्दा अपघातामध्ये मृत्यु पावली. परंतु नॉमिनी दिक्षा ही अज्ञान होती म्हणुन डॉ.प्रदिप नितनवरे हे त्यांचे अपाक म्हणुन नोंद होती. मात्र नॉमिनी सुध्दा मयत झाल्यामुळे सदर डॉ.प्रदिप नितनवरे यांनीही गैरअर्जदार यांच्या कडे अर्ज दाखल केला व सदर विमा पॉलिसीची रक्कम मागितली. सदर अर्ज नि.क्र.17/1 व 17/2 कडे दाखल आहे. त्यामुळे सदर पॉलिसीची रक्कम कोणाला द्यायची याबाबत संभ्रम निर्माण झाला होता म्हणुन गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना न्यायालयातुन वारसा प्रमाण पत्र आणावे असे कळविले हे नि.क्र.17/5 वरुन दिसुन येते. गैरअर्जदार यांनी घेतलेला निर्णय व अर्जदार यांना सक्षम न्यायालया कडुन वारसा प्रमाणपत्र दाखल करण्याकरीता दिलेला सल्ला हा योग्य व कायदेशीर मार्ग होता असे मा.मंचास वाटते. मात्र सदरची बाब अर्जदार यांनी आपल्या तक्रारीमध्ये लपवुन ठेवली व गैरअर्जदार सारख्या नामांकीत कंपनी विरुध्द पोकळ आरोप केले असल्याचे दिसुन येते. गैरअर्जदार विमा कंपनीने वारसा प्रमाणपत्राबाबत घेतलेला निर्णय योग्य व कायदेशीर होता. कारण अर्जदार हे खरेच मयत पंचफुलाबाई यांचे वारस आहे काय ? हे सिध्द होणे गरजेचे ठरते. याबाबतची पुढे मा.मंचाने योग्य तो खुलासा केलेला आहे व मा.मंच सुध्दा याबाबत संभ्रमात आहे की अर्जदार हे मयत पंचफुला लोहकरे यांचे वारस आहेत की नाही ? अर्जदार यांनी मुळ तक्रारीमध्ये मयत पंचफुला हया त्यांच्या आई होत्या असे नमुद केले आहे व ते सर्व एकाच कुटूंबातील होते म्हणुन नि.क्र.3/1 शेतजमीनीचा 7/12 व नि.क.15/1 व 2 कडे तलाठी व तहसीलदार यांचे कुटूंब सदस्यांचे प्रमाणपत्र या कामी हजर केले आहे. मात्र या बाबत तक्रारी सोबत दाखल कागदपत्रावरुन वि.मंचास एक महत्वपुर्ण माहिती निदर्शनास आले जी माहिती अर्जदाराने लपवुन ठेवली होती व गैरअर्जदार विमा कंपनीच्या सुध्दा लक्षात आली नाही ती म्हणजे, अर्जदार हे मयत पंचफुला व दिक्षा हया अपघातात मृत्यु पावल्या हे ज्या पोलीस पेपरचा आधार घेतात व पंचफुला व दिक्षा अपघाती मृत्यु पावल्या त्यामुळे त्यांचे अर्जदार हेच वारस आहे असे स्वतः म्हणवतात, त्या नि.क्र.3/2 व 3/3 पोलीस पेपर्स मध्ये सदर मयत पंचफुला यांना आपली आई व दिक्षा हिला सख्खी बहिन मानण्यास सुध्दा अर्जदार तयार नाहीत. मात्र ज्यावेळी घरात मयताचे विम्याचे कागदपत्रे सापडले त्यावेळी मात्र मयत व्यक्तींना आई व बहिन म्हणवुन घेण्याचा कसा काय पान्हा अर्जदार यांना फुटला ? याचा विचार करणे न्यायोचित व जरुरीचे ठरते. मयत पंचफुलाबाई ही अर्जदारांची आई होती तर त्याबाबत जेंव्हा पंचफुलाबाई व दिक्षा अपघातात मरण पावल्या त्यावेळी एफआयआर व घटना स्थळ पंचनामा करतांना अर्जदार यांनी मयत हया त्यांच्या आई व बहीन होत्या असे पोलिसांना सांगीतले नाही, तर मयत पंचफुलाबाई ही त्यांची काकु होती व दिक्षा ही चुलत बहिन होती असे पोलिसांना सांगितले ही बाब जेंव्हा नि.क्र.3/2 वरील एफआयआर व 3/3 वरील घटनास्थळ पंचनामा बघतांना मा.मंचाला दिसुन आली. सदर एफआयआर, घटनास्थळ पंचनामा हे अर्जदारांनी सांगितल्या प्रमाणे लिहीला व त्यानंतर वाचुन त्यावर सही केली ही बाब अर्जदार यांनीच नमुद केली आहे. यावरुन पंचफुलाबाई ही चुलती (काकु) व दिक्षा ही चुलत बहिन होती असे अर्जदारांनी का सांगितले ? या मागचे गौडबंगाल काय आहे अशी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. याबाबत अर्जदारांची प्रस्तुत तक्रारीतील मजकुर व पोलिस कागदपत्रातील बयानामध्ये तफावत दिसते. त्यामुळे मा.मंचापुढे सुध्दा संभ्रम निर्माण झाला की, मयत पंचफुलाबाई व दिक्षा हया खरच अर्जदारांची अनुक्रमे आई व सख्खी बहिन होती की चुलती (काकु) व चुलत बहिन होती ? अर्जदारांनी पोलिसांना एक माहिती सांगितली व महसुल अधिकारी यांना दुसरी माहिती सांगितली आणि कुटूंब सदस्य प्रमाणपत्र मिळविले असावे अशी शंका निर्माण होते. त्यामुळे अर्जदारांनी 15/1 वरील तलाठी यांचे कुटूंब सदस्य प्रमाणपत्र व नि.15/2 वरील तहसीलदार यांचे प्रमाणपत्र हे नेमकी कोणती माहिती व कागदपत्रे दाखवुन मिळविले याबाबत सुध्दा संदिग्धता निर्माण होते. त्यामुळे सदर कुटूंब सदस्य प्रमाणपत्र हे वारसा प्रमाणपत्र होवु शकते काय ? अशी रास्त शंका मा.मंचापुढे आली. कु.दिक्षा हिचे नांव सुध्दा अर्जदारांनी मुळ तक्रारीत कु.साक्षी म्हणुन नमुद केले आहे. त्यामुळे स्वतःची बहीनेचे नाव सुध्दा साक्षी आहे की दिक्षा हे ज्यांना माहित नाही ते नक्कीच भाऊ आहे ना ? अशी शंका उत्पन्न होणे स्वाभाविकच आहे. कुटूंब सदस्य प्रमाणपत्र हेच वारस प्रमाणपत्र ठरु शकत नाही असे मा.मंचाचे मत आहे. कारण सदर नि.क्र.15/2 वरील तहसीलदार देवळी यांनी नमुद केलेल्या प्रमाणपत्रात मयत पंचफुला लोहकरे यांचा मृत्यु नंतर त्यांचे कुटूंबात अर्जदार क्र.1 व 2 हेच सदस्य आहेत असे नमुद केले आहे. मात्र याबाबत मा.मंचाने आणखी एका दस्तावेजाचे बारकाईने अवलोकन केले व आणखी एक महत्वपुर्ण माहिती उजेडात आली जी गैरअर्जदार यांचे सुध्दा लक्षात आली नाही ती म्हणजे नि.क्र.17/7 व नि.क्र.17/8 मध्ये नमुद पंचफुला यांनी सदर विमा पॉलिसी काढण्या पुर्वी भरुन दिलेले दोन विवरण पत्र ( प्रपोजल फॉर्म) मधील कलम 10 मधील नमुद पारिवारीक इतिवृत्त (फॅमीली हिस्ट्री) यांचे अवलोकन करता पंचफुला यांनी सदर विमा पॉलिसी काढणेपुर्वी प्रपोजल फॉर्म भरतांना आई, वडील, भाऊ,बहीन, पती व मुले यांची माहिती देतांना त्यांना एकुण 8 मुले असल्याचे नमुद केले आहे व त्या मुलांची तब्बेत चांगली असल्याचे नमुद केले आहे. सदर माहिती मृत्यु पुर्वी पॉलिसी काढतांना म्हणजे दिनांक 1/9/2008 रोजी म्हणजे सुमारे 3 वर्षापुर्वी दिलेली आहे. यावरुन 8 मुलांपैकी फक्त दोनच मुले म्हणजे अर्जदार जिवंत असल्याची शक्यता शंकेला वाव देणारी वाटते. म्हणुनच मा.मंचाने वर नमुद केल्याप्रमाणे अर्जदार क्र.1 व 2 यांनी महसुली अधिकारी यांना नेमकी कोणती व कश्या प्रकारची माहिती दिली व कुटूंब सदस्यांचे प्रमाणपत्र मिळविले ही शंका रास्त व योग्य होती हे दिसुन येते. त्यामुळे अर्जदार हे वि.मंचात तक्रार दाखल करतांना स्वच्छ हाताने आलेले नाहीत हे दिसुन येते. कारण Principle of Natural Justice व Law of Equity चे तत्वानुसार “Who seeks equity must do equity.” and “Every one must come with clean hand” असे मा.मंचास नमुद करावसे वाटते. म्हणुनच गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदार यांना नि.क्र.17/5 पत्रानुसार सक्षम न्यायालया कडुन वारसा प्रमाणपत्र आणावे व दाखल करावे हे सांगीतले होते ते योग्य व कायदेशीर होते. कारण प्रस्तुत कामी नि.क्र.17/6 कडे डॉ.प्रमोद नितनवरे यांनी गैरअर्जदार यांना दिलेल्या पत्राचे अवलोकन करता अर्जदार व मयत पंचफुला यांचे मध्ये कौटूंबिक संबंध चांगले नव्हते हे दिसुन येते व निव्वळ मयत पंचफुला लोहकरे याचे विम्याची रक्कम हडप करण्याचे हेतुने ती आमची आई होती असे नमुद करुन रक्कम हडपण्याच्या प्रयत्नात अर्जदार असल्याचे दिसुन येते. सदर नि.क्र.17/6 कडील डॉ.नितनवरे यांचे पत्र व त्यांनी नि.क्र.22 वरील मा.मंचात दाखल प्रतिज्ञालेखावरुन मयत पंचफुला यांची आई अजुन जिवंत असल्याचे दिसुन येते. सदर मयत पंचफुलाच्या आई सुध्दा सदर विमा रक्कम मिळण्यास पात्र आहेत किंवा नाही हे हिंदु वारसा कायद्या प्रमाणे ठरविण्याचे अधिकार मा.दिवाणी न्यायालयाला आहे. तसेच मयत पंचफुला यांचे नि.क्र.17/7 वरील विमा प्रस्तावात नमुद केल्याप्रमाणे 8 मुलांपैकी किती मुले जिवंत आहेत व ती कोठे आहेत यांचीही चौकशी वारसा दाखला देतांना होईल असे मा.मंचास वाटते. त्यामुळे सदर मयत पंचफुला लोहकरे यांच्या विम्याची रक्कम त्यांचे कायदेशीर वारसांना मिळावी अस मा.मंचास प्रामाणिकपणे वाटते म्हणुनच योग्य त्या दिवानी न्यायालयाकडुन वारसा दाखला आणल्यानंतरच सदर रक्कम अदा करणे योग्य ठरेल असे मा.मंचास वाटते, म्हणुन गैरअर्जदार विमा कंपनी यांनी अर्जदार किंवा त्यांचे इतर वारसांनी योग्य त्या सक्षम दिवाणी न्यायालयातुन वारसा दाखल आणल्या खेरीज सदर पंचफुला लोहकरे यांचे विमा पॉलिसी क्र.976339536 व 976339869 ची रक्कम अदा करु नये असा आदेश करणे व अर्जदारांची तक्रार नामंजुर करणे उचित ठरेल असे मा.मंचास वाटते. अर्जदार यांनी वि.मंचाची दिशाभुल करण्याचा तसेच गैरअर्जदार यांना पुर्ण व खरी माहिती न देता त्यांच्या विरुध्द खोटी तक्रार वि.मंचात दाखल करुन चुकीचे आरोप लावले. सदर बाब ही अत्यंत निंदनिय असल्यामुळे अर्जदार यांचेवर रु.10,000/- दंड बसविने न्यायोचित ठरेल. उपरोक्त सर्व विवेचनावरुन अर्जदार हे सदर विमा धारक मयत पंचफुला लोहकरे यांची विमा पॉलिसीची रक्कम मिळण्यास पात्र नाही या निर्णयाप्रत हे मंच आले असल्याने अर्जदारांची तक्रार दंडासह नामंजुर करुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश // 1) अर्जदार यांची तक्रार रु.10,000/- दंडासह नामंजुर करण्यात येत आहे. 2) गैरअर्जदार विमा कंपनी यांना निर्देश देण्यात येते की, मयत पंचफुला भाउरावजी लोहकरे यांची विमा पॉलिसी क्र.976339536 व 976339869 ची होत असणारी रक्कम सध्यास्थितीत अर्जदार यांना अदा करु नये व सदर रक्कम अर्जदार किंवा योग्य त्या कायदेशीर वारसांनी सक्षम दिवाणी न्यायालयातुन वारसा दाखला आणल्या शिवाय अदा करु नये. 3) अर्जदार यांनी उपरोक्त कलम 1 मध्ये नमुद असलेली दंडाची रक्कम रु.10,000/- पैकी रु.5000/- गैरअर्जदार विमा कंपनी यांना द्यावी व रु.5000/- मा.मंचाच्या ग्राहक साह्यता निधीमध्ये आदेश प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसांच्या आंत जमा करावी. 4) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधीतांनी परत घेवुन जाव्यात. 5) निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधीत पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यात. |