1. त.क.वर्धा येथील कायम रहिवासी आहे. त्याने वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे पॉलिसीपोटी प्रथम प्रिमियमचा हप्ता रक्कम रु.-946/- भरुन मनी बॅक पॉलिसी CC/54/2011 दि.28.10.2003 रोजी काढली व तिचा क्रमांक 974147787 असा आहे. अशाप्रकारे त.क. हा वि.प.क्रं 1 विमा कंपनीचा ग्राहक आहे. सदर पॉलीसी ही 20 वर्षाचे कालावधीची आहे. तक्रारकर्त्याने विमा प्रस्ताव अर्ज भरताना स्वतःची जन्मतारीख 01.04.1959 दर्शविणारा जन्माचा दाखला, ओळखपत्र, छायाचित्रे, रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी दस्तऐवज वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे प्रतिनिधी जवळ दिलेत. 2. त.क.ने स्वतःचे योग्य नाव दर्शविणारे दस्तऐवज सादर केल्यानंतरही त.क.ला कळले की, वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे प्रतिनिधी/एजंटचे चुकीमुळे पॉलिसीमध्ये त.क.चे नाव "Abdul Khalil Rashid Sheikh" असे चुकीचे नमुद केलेले आहे. जेंव्हा सदर चुक त.क.चे लक्षात आली त्याचवेळी त्वरीत त्याने दिनांक 20.07.2010 व 27.04.2010 रोजी वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे लेखी स्वरुपात पॉलिसीमध्ये त्याचे नावामध्ये झालेली चुक दुरुस्त करुन देण्याची विनंती केली परंतु वि.प.क्रं 1 विमा कंपनीने त्यावर काहीही कार्यवाही केली नाही.
3. त्यानंतरही वि.प.क्रं 1 विमा कंपनीने पुन्हा चुक करुन सदर मनी बॅक पॉलिसीपोटी मिळणा-या पहिल्या हप्त्याची रक्कम रु.9053/- धनादेश क्र 873, दिनांक 28.10.2008 अन्वये वि.प.क्रं 3 यांना पाठविला व वि.प.क्रं 3 ने सदर धनादेशाची रक्कम, वि.प.क्रं 2 बँकेतून उचलली आणि त्यासाठी वि.प.क्रं 2 बँक सुध्दा तेवढीच जबाबदार आहे. 4. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने त.क.चे मनी बॅक पॉलिसीचा प्रथम देय हप्ता चुकीचे व्यक्तीला म्हणजे वि.प.क्रं 3 ला दिलेला आहे. अशाप्रकारे त.क.ला झालेल्या शारिरीक , मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसानीसाठी सर्व वि.प. जबाबदार आहेत आणि वि.प.नीं त.क.ला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.
5. त.क.ने सदर मनी बॅक पॉलिसी अंतर्गत शेवटचा विमा हप्ता दिनांक 04.02.2009 रोजी भरला परंतु पॉलिसी अंतर्गत प्रथम हप्त्याची रक्कम दुस-या व्यक्तीस दिल्या गेल्या मुळे त.क.चे मनात भिती निर्माण झाल्याने त्याने पुढील विम्याचे हप्ते भरले नाहीत.
6. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने पॉलिसीमधील त.क.चे नावात कोणतीही दुरुस्ती केली नाही. तसेच त.क.चे पॉलिसीतील नावातील चुकीमुळे मनी बॅक पॉलिसीचे प्रथम हप्त्याची रक्कम वि.प.क्रं 3 ला अदा झाल्यामुळे त.क.ने सर्व वि.प.नां रजिस्टर पोस्टाने नोटीस दिनांक 18.05.2011 रोजी पाठवली असता, ती वि.प.क्रं 1 CC/54/2011 व 2 ला मिळूनही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही वा साधे उत्तरही पाठविले नाही.वि.प.क्रं 3 ला पाठविलेली रजिस्टर पोस्टाची नोटीस न स्विकारता लिफाफयासह परत आली. अशाप्रकारे वि.प.नीं आपले सेवेत त्रृटी ठेवलेली आहे.
7. म्हणून त.क.ने प्रार्थने नुसार तक्रार मंजूर व्हावी. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने आपले सेवेत त्रृटी केली असे जाहिर करावे आणि वि.प.क्रं 3 ला चुकीचे पध्दतीने पॉलिसीचे प्रथम देय हप्त्याची रक्कम दिल्या गेल्यामुळे त.क.चे झालेले आर्थिक नुकसान हे तीन्ही वि.प.नीं भरुन द्यावे. वि.प.क्रं 3 ला चुकीचे पध्दतीने दिल्या गेलेली पॉलिसीचे प्रथम हप्त्याची रक्कम रुपये-9035/- त.क.ला परत करण्यात यावी आणि शारिरीक मानसिक त्रास व आर्थिक नुकसानी बद्यल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/- मिळावेत.
8. त.क.ने पान क्रं 11 वरील यादी सोबत 19 दस्तऐवज दाखल केले, त्यामध्ये प्रिमियम भरल्याच्या मूळ पावत्या, वि.प.नां पाठविलेली नोटीस, पोच पावती आणि परत आलेला लिफाफा, वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे त.क.चे नावात दुरुस्ती करीता दिलेला अर्ज, पॉलिसीची झेरॉक्स प्रत व इतर दस्तऐवज दाखल केलेत.
9. मंचातर्फे स्विकृतीवर प्रकरण तपासले असता फक्त वि.प.क्रं 1 विमा कंपनीला नोटीस काढण्यात आली असता, वि.प.क्रं 1 विमा कंपनीतर्फे संबधित उपस्थित होऊन पान क्रं 38 वर आपला लेखी जबाब दाखल केला आणि त्याद्वारे त.क.हा वि.प.क्रं 1 विमा कंपनीचा ग्राहक असल्याचे तसेच पॉलिसी काढल्या बद्यल आणि पॉलिसीचे हप्ते भरल्या बद्यल विवाद नसल्याचे नमुद केले. विमा पॉलिसीतील नावा बद्यलचा वाद वि.प.क्रं 1 ने उपस्थित केलेला आहे. सदर पॉलिसीवर विमा धारकाचे नाव "अब्दुल खलील शेख" असे नमुद केलेले आहे व त.क.ने स्वतःचे संपूर्ण नाव व माहिती अधिकृत प्रतिनिधीस पुरविली नाही व अर्धवट माहिती पुरविण्या करीता त.क. स्वतः जबाबदार आहे. माहिती देताना त.क.ने चुकीची माहिती दिली आणि चुकीचे माहितीसाठी त.क. जबाबदार आहे आणि त्यामुळे पॉलिसीमध्ये तसे नाव उपस्थित झालेले आहे. 10. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. दिलेल्या पत्त्यावर संपूर्ण पॉलिसीची माहिती व इतर माहिती असलेल्या पत्रासह मनीबॅक पॉलिसीचा प्रथम हप्ता असलेला धनादेश पाठविला असता, तो अयोग्य व्यक्तीला म्हणजे वि.प.क्रं 3 ला मिळाला व त्याने तो स्विकारुन फसवणूक केली. यामध्ये CC/54/2011 वि.प.क्रं 1 विमा कंपनीचीची कोणतीही चुक नाही. वि.प.क्रं 3 ने त्याचे हक्काची रक्कम नसतानाही सदर विमा हप्त्याची रक्कम प्राप्त केलेली आहे. त.क.ची नोटीस मिळाल्या बद्यल कोणताही वाद नाही परंतु त.क.ने दिलेली सदर नोटीस चुकीची आहे. 11. त.क.ला विमा पॉलिसी देताना वि.प.क्रं 1 विमा कंपनी तर्फे पत्र देण्यात येऊन त्याद्वारे कळविण्यात आले होते की, पॉलिसीमध्ये आवश्यक बाबी योग्यरित्या नमुद नसल्याचे आढळून आल्यास त्वरीत तसे विमा कंपनीस कळविण्यात यावे, परंतु असे पत्र असतानाही त.क.ने त्याच वेळी कोणताही उजर घेतलेला नाही, त्यामुळे त.क.चे नावातील चुकीसाठी त.क.हाच स्वतः जबाबदार आहे. पॉलिसीतील नावा नुसार दिलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे अकाऊंट पेयी चेक पाठविण्यात आला होता. वि.प.क्रं 3 ने सदर नावाचा गैरफायदा घेउन सदर लिफाफा सोडवून त्यातील धनादेशाद्वारे रक्कम हडप केलेली आहे. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने त.क.ला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही म्हणून या वि.प.विरुध्दची तक्रार खारीज व्हावी. 12. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने आपले लेखी जबाबा सोबत पान क्रं 43 वरील यादी सोबत 5 दस्तऐवज दाखल केले असून त्यामध्ये प्रामुख्याने विमा प्रस्ताव अर्ज, पॉलिसीची प्रत व इतर दस्तऐवज दाखल आहेत.
13. प्रस्तुत प्रकरण युक्तीवादासाठी आले असता, मंचाचे असे निदर्शनास आले की, वादीत मुद्या निकाली काढण्या करीता वि.प.क्रं 3 ला प्रस्तुत प्रकरणात ऐकणे अत्यंत गरजेचे आहे, म्हणून मंचाचे आदेश दिनांक 12.09.2011 नुसार वि.प.क्रं 3 ला नोटीस काढण्यात आली. 14. त्यावरुन वि.प.क्रं 3 ने उपस्थित होऊन लेखी जबाब पान क्रं 71 वर दिनांक 22.11.2011 रोजी मंचा समक्ष सादर केला. वि.प.क्रं 3 ने आपले लेखी जबाबद्वारे तक्रारीतील सर्व आक्षेप फेटाळलेत आणि नमुद केले की, वि.प.क्रं 3 नियमित विमा हप्ते भरीत आहे आणि सदर पॉलिसी ही त्याचीच आहे. वि.प.क्रं 3 अशिक्षीत आहे आणि त्यास प्रस्तुत प्रकरण दाखल होई पर्यंत हे सुध्दा माहित नव्हते की, वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे चुकीमुळे नामनिर्देशित व्यक्तीचे नाव चुकीचे आहे. त.क. चुकीचे नावाचा गैरफायदा घेत आहे. त.क.ची तक्रार मुदतबाहय आहे त्यामुळे ती खारीज करण्यात यावी. CC/54/2011 15. वि.प.क्रं 3 ने पान क्रं 75 वरील यादी सोबत 16 दस्तऐवज दाखल केले, त्यामध्ये पॉलिसीची प्रत (दुयम झेरॉक्स) विमा हप्ता भरल्याच्या झेरॉस पावत्या, आधार कॉर्डची प्रत व इतर दस्तऐवज दाखल आहेत.
16. तक्रारकर्त्याने त्यानंतर आपला लेखी युक्तीवाद व प्रतिज्ञालेख दाखल केला.
17. मंचाद्वारे वि.प.क्रं 1 विमा कंपनीला मूळ दस्तऐवज हजर ठेवण्याचे निर्देशित करण्यात आले.
18. त.क.ने पान क्रं 98 वरील यादी सोबत 7 दस्तऐवज दाखल केले, ज्यामध्ये त.क.चे मुलाची 10 ची मूळ गुणपत्रिका, सरपंचाचे प्रमाणपत्र, निवडणूक ओळखपत्र, मतदान कॉर्ड, आधार कॉर्ड, मूळ पॉलिसी इत्यादीचा समावेश आहे.
19. वि.प.क्रं 3 ने पान क्रं 101 वरील यादी सोबत 18 दस्तऐवज दाखल केले, त्यामध्ये मूळ पॉलिसी दुयम प्रत, विमा हप्ता भरल्याच्या मूळ पावत्या, राशन कॉर्ड, इलेक्शन कॉड (झेरॉक्स प्रत) दाखल केले आहेत. 20. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने आपला लेखी युक्तीवाद दाखल केला व पान क्रं 124 वरील यादी सोबत विमा हप्ता स्विकारल्याचा तक्ता, मनी बॅक पॉलिसी अंतर्गत असलेल्या अटी व शर्तीचा दस्तऐवज व टेबल/तक्ता दर्शविणारे दस्तऐवज दाखल केलेत. तसेच वि.प.क्रं 1 विमा कंपनीने त्यांचे प्रतिनिधी श्री ज्ञानेश्वर रामराव ढगे, वय 55 वर्ष, राहणार वर्धा यांचा प्रतिज्ञालेख दाखल केला. 21. वि.प.क्रं 3 ने पान क्रं 136 वर आपला लेखी युक्तीवाद व प्रतिज्ञालेख दाखल केलेला आहे. 22. उभय पक्षांचे शपथे वरील लेखी कथन, दाखल कागदोपत्री पुरावे, शपथपत्र, लेखी युक्तीवाद यांचे सुक्ष्म वाचन केल्या नंतर व उभय पक्षांचा युक्तीवाद काळजीपूर्वक ऐकल्या नंतर मंचाद्वारे निर्णयान्वित करण्या करीता खालील मुद्ये उपस्थित होतात. अक्रं मुद्या उत्तर (1) वि.प.ने त.क.ला दोषपूर्ण सेवा दिली आहे काय ? होय. (2) जर होय तर, त्यासाठी कोण वि.प. जबाबदार आहे? वि.प.क्रं 1 आणि वि.प.कडून काय दाद मिळण्यास त.क. पात्र आहे? काय आदेश? अंतीम आदेशा नुसार CC/54/2011 : कारणे व निष्कर्ष :: मुद्या क्रं-1 व 2 23. प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले. वि.प.क्रं 1 भारतीय जीवन बिमा निगम यांनी अभिलेखावर पान क्रं 44 वर विमा प्रस्तावाची प्रत दाखल केलेली असून त्यामध्ये विमाधारकाचे नाव अब्दुल खलील शेख, रा.महादेवपुरा, वर्धा असे नमुद आहे तर विमा प्रस्तावावरच त.क.ने सही करताना अब्दुल खालीक शेख अशी स्वाक्षरी केल्याचे पान क्रं 48 वरुन दिसून येते. सदर स्वाक्षरी वरुन असा निष्कर्ष निघतो की, तक्रारकर्त्याने स्वाक्षरी केल्या प्रमाणे त्याचे नाव "अब्दुल खालीक शेख " असे आहे मात्र सदर विमा प्रस्तावात चुकीने विमाधारकाचे नाव अब्दुल खलील शेख असे नमुद केलेले आहे, जेंव्हा की, विमा प्रस्तावा वरील स्वाक्षरी नुसार ते अब्दुल खालीक शेख असे असावयास हवे होते. यामध्ये विमाधारक आणि संबधित वि.प.क्रं 1 विमा कंपनीची व त्यांचे प्रतिनिधी यांची सारखीच जबाबदारी येते, विमाधारकाने (त.क.ने) विमा प्रस्तावावर आपली स्वाक्षरी करताना आपले नाव व्यवस्थित नमुद आहे किंवा नाही? याची पडताळणी करणे गरजेचे आहे व तेवढीच जबाबदारी वि.प.क्रं 1 विमा कंपनीची व विमा कंपनीचे प्रतिनिधीची सुध्दा पॉलिसी निर्गमित करतानाची आहे. 24. याच अनुषंगाने वि.प.क्रं 1 विमा कंपनीने पान क्रं 51 वर दाखल केलेल्या पॉलिसीचे प्रतीवरुन सुध्दा त्यामध्ये विमित व्यक्तीचे नाव व पत्ता यामध्ये SHRI ABDUL KHALIL SHEIKH WARD NO. 21, MAHADEOPURA, AT POST TQ.DT. WARDHA असे नमुद केलेले आहे. पॉलिसीचे प्रतीमध्ये सुध्दा त.क.चे नावात चुक झालेली दिसून येते. सदर त.क.ला निर्गमित पॉलिसीचे प्रतीवरुन पॉलिसीचा क्रमांक 974147787 आणि आरंभ तिथी 28.10.2003 ही असल्याचे स्पष्ट होते. 25. अशाप्रकारे विमा प्रस्ताव आणि विमा पॉलिसीमधील त.क.चे नाव चुकीचे नमुद झाल्यामुळे मनीबॅक पॉलिसी अंतर्गत मिळणारी प्रथम हप्त्याची रक्कम ही धनादेश क्रं 873 दिनांक 23.10.2008 रक्कम रुपये-9035/- ही SHRI ABDUL KHALIL SHEIKH या नावाने दिल्या गेल्याचे आणि सदर धनादेशाची रक्कम रुपये-31.10.2008 रोजी संबधित बँकेतून काढली गेली असल्याचे आणि तक्रारदार यांना सदर धनादेश प्राप्त न झाल्या बद्यलचा मजकूर वि.प.क्रं 1 विमा कंपनीने वि.प.क्रं 2 बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वर्धा यांना (पान क्रं 55) दिनांक-12.10.2010 रोजी लिहिलेल्या पत्रातील मजकूरा वरुन दिसून येतो. त्यावर वि.प.क्रं 2 बँक ऑफ CC/54/2011 महाराष्ट्र यांनी, वि.प.क्रं 1 विमा कंपनी शाखा वर्धा यांना दिनांक 18.10.2010 रोजी लिहिलेल्या उत्तरात चेक क्रं 873 दिनांक 23.10.2008 favouring Abdul Khalil असे नमुद करुन पुढे नमुद केले की, सदरचा चेक संबधित ग्राहकाने आपले बँक अकाऊंट नंबर 20020166474 in the name of Abdul Khalil मध्ये जमा केला असून सदर धनादेशाची रक्कम त्याचे खात्यात दिनांक 31.10.2008 रोजी जमा केल्याचे नमुद केलेले आहे. 26. यामध्ये वि.प.क्रं 2 बँकेची कोणतीही चुक दिसून येत नाही, त्यांनी धनादेशामध्ये नमुद असलेल्या नावा प्रमाणे रक्कम दिलेली आहे. त्यामुळे त्यांचें विरुध्दची तक्रार प्रथमदर्शी सिध्द होत नाही म्हणून त्यांचे विरुध्द नोटीस काढलेली नाही. 27. उपरोक्त संबधित नमुद असलेले विमा प्रस्ताव, पॉलिसी प्रत आणि सदर मनीबॅक पॉलिसी अंतर्गत मिळणारी प्रथम हप्त्याचे रकमेचे चुकीचे भुगतान झाल्या बद्यलचा पत्रव्यवहार पाहता ही बाब सिध्द होते की, सदर पॉलिसी ही त.क.चे नावानेच होती आणि मनी बॅक पॉलिसी अंतर्गत मिळणारी प्रथम हप्त्याची रक्कम ही त.क.लाच मिळणे क्रमप्राप्त होते आणि आवश्यक होते परंतु नावातील थोडयाफार सार्धम्यामुळे सदर मनीबॅक पॉलिसी अंतर्गत मिळणारी प्रथम हप्त्याचे रकमेची वि.प.क्रं 3 ने उचल केल्याची बाब सिध्द होते. सदर मनी बॅक पॉलिसी क्रमांक- 974147787 ही वि.प.क्रं 3 ची होती या संबधाने कोणताही ठोस पुरावा वि.प.क्रं 3 ने सदर प्रकरणात दाखल केलेला नाही. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने दाखल केलेला विमा प्रस्ताव आणि पॉलिसीची प्रत यावरुन पॉलिसी ही त.क.यांचे नावाने होती ही बाब पूर्णतः प्रकरणात सिध्द झालेली आहे. 28. वि.प.क्रं 3 अब्दुल खलील अब्दुल रशिद शेख आणि त.क.अब्दुल खालीक गनी शेख यांचे नावातील व पत्त्यातील थोडयाफार साधर्म्या मुळे सदर प्रकार घडलेला आहे व त.क.च्या पॉलिसी प्रस्ताव व पॉलिसी प्रत मध्ये SHRI ABDUL KHALIL SHEIKH असे नाव चुकीने नमुद केलेले आहे. वि.प.क्रं 3 यांनी सदर मनी बॅक पॉलिसी ही त्यांनीच काढली होती व ती त्यांचेच नावावर होती या संबधाने कोणताही सक्षम पुरावा वि.जिल्हा न्यायमंचा समक्ष दाखल केला नाही. या उलट, त.क.चे सदर मनी बॅक पॉलिसी अंतर्गत मिळणारी प्रथम हप्त्याचे धनादेशाचे रकमेची उचल वि.प.क्रं 3 यांनी केली अशाप्रकारे वि.प.क्रं 3 यांनी एक प्रकारे त.क. आणि वि.प.क्रं 1 विमा कंपनीची दिशाभूल केलेली आहे. CC/54/2011 29. त.क.चे म्हणण्या नुसार सदर मनी बॅक पॉलिसी अंतर्गत मिळणारी प्रथम हप्त्याची रक्कम वि.प.क्रं 3 ला दिल्या गेल्या मुळे त.क.चे मनात भिती व संभ्रम निर्माण झाल्याने त्याने पुढील विम्याचे हप्ते भरले नाहीत, त.क.चे हे विधान मान्य करण्या सारखे आहे कारण कोणत्याही व्यक्तीचे मनात त्याचे पॉलिसीचे क्लेमची रक्कम दुस-या व्यक्तीने उचलल्या नंतर भिती व संभ्रम निर्माण होईलच आणि ही एक मान्य वस्तुस्थिती आहे त्यामुळे त.क.ने सदर मनी बॅक पॉलिसी अंतर्गत शेवटचा विमा हप्ता दिनांक 04.02.2009 रोजी भरलेला आहे, हे सिध्द होते. 30. त.क.चे पुढे असेही म्हणणे आहे की, मनी बॅक पॉलिसी अंतर्गत मिळणारी प्रथम हप्त्याची रक्कम वि.प.क्रं 3 ला अदा झाल्यामुळे त.क.ने सर्व वि.प.नां रजिस्टर पोस्टाने नोटीस दिनांक 18.05.2011 रोजी पाठवली असता, ती वि.प.क्रं 1 व 2 ला मिळूनही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही वा साधे उत्तरही पाठविले नाही. वि.प.क्रं 3 ला पाठविलेली रजिस्टर पोस्टाची नोटीस न स्विकारता लिफाफयासह परत आली. अशाप्रकारे वि.प.नीं आपले सेवेत त्रृटी ठेवलेली आहे आणि ही बाब उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे पूर्णतः सदर प्रकरणात सिध्द झालेली आहे. 31. त.क.ने विमा प्रिमियम भरल्या बाबत विमा प्रिमियमच्या पावत्याच्या प्रती रेकॉर्डवर दाखल केलेल्या आहेत. तसेच रेकॉर्डवर त्याचे स्कूल लिव्हींग सर्टिफीकेटची प्रत दाखल केलेली आहे त्यामध्ये सुध्दा त.क.चे नाव Abdul Khalik Abdul Gani असे नमुद केलेले आहे. तसेच सदर मनीबॅक पॉलिसी अंतर्गत मिळणारी प्रथम हप्त्याची रक्कम दुस-याच व्यक्तीने उचल केल्या बाबतची दिनांक 20.07.2010 रोजी व दिनांक 27.04.2010 रोजी तक्रार वि.प.क्रं 1 कडे केल्या बाबत तक्रारीच्या प्रती रेकॉर्डवर दाखल केलेली आहे. तसेच त.क.ने पुराव्या दाखल पान क्रं 59 वर प्रतिज्ञालेख दाखल केलेला आहे. 32. वि.प.क्रं 3 ने पान क्रं 75 वरील यादी नुसार 16 दस्तऐवज दाखल केलेत, ज्यामध्ये पॉलिसीची प्रत तसेच विमा हप्ता भरल्याच्या पावत्या तसेच आधार कॉर्डची प्रत दाखल केली. वि.प.क्रं 3 ने दाखल केलेल्या पॉलिसीचे प्रतीवरुन असे दिसून येते की, सदर पॉलिसी ही प्रतिरुप (दुयम प्रत) पॉलिसी आहे. सदर पॉलिसीमध्ये विमाधारकाचे नाव SHRI ABDUL KHALIL SHEIKH, WARD NO. 21,MAHADEOPURA, AT POST TQ.DISTT.WARDHA असे नमुद केलेले असून पॉलिसीचा क्रमांक 974147787 व आरंभ तिथी 28.10.2003 असे नमुद केलेले आहे. CC/54/2011 33. उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे सदर पॉलिसी क्रमांकाचा विमा प्रस्ताव वि.प.क्रं 1 विमा कंपनीने प्रस्तुत प्रकरणात दाखल केलेला असून, सदर विमाप्रस्तावावर विमा प्रतिनिधीने केलेल्या चुकीमुळे त.क.चे नाव श्री अब्दुल खालीक ऐवजी श्री अब्दुल खलील असे नमुद झालेले आहे व सदर विमा प्रस्तावावरील सही ही मात्र त.क.श्री अब्दुल खालीक यांचीच आहे व ही बाब प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजावरुन सुध्दा पूर्णतः सिध्द झालेली आहे. 34. मंचा समक्ष ही बाब स्पष्ट होते की, उभय पक्षांनी, वि.प.क्रं 1 विमा कंपनी कडून मिळालेले दस्तऐवज प्रस्तुत प्रकरणात दाखल केलेले आहेत आणि त्यावरुन ही बाब स्पष्ट आणि सिध्द होते की, मूळ मनीबॅक पॉलिसी क्रमांक-974147787 ही त.क.चेच नावाची होती व त्यांचीच आहे परंतु सदर पॉलिसी निर्गमित करण्यापूर्वी विमा प्रस्ताव अर्ज भरताना संबधित विमा प्रतिनिधीने त.क.चे नाव श्री अब्दुल खालीक ऐवजी श्री अब्दुल खलील असे चुकीचे व नावातील शब्दार्थ योग्यप्रकारे न समजून चुकीची नोंद केलेली आहे. सदर विमा प्रतिनिधीचे नाव श्री डी.आर.ढगे, वर्धा असल्याचे स्पष्ट होते.
35. तक्रारकर्त्याने त्याचे मुलाची गुणपत्रिका प्रत तसेच मुलाचे व पत्नीचे निवडणूक ओळखपत्र व मुलाचे मूळ आधार कॉर्ड प्रस्तुत प्रकरणात दारखल केलेले आहे. तसेच सदर मनीबॅक पॉलिसीची मूळ प्रत सुध्दा प्रकरणात दाखल केलेली आहे. त्यावरुन त.क.ची पत्नी वारस म्हणून पॉलिसी मध्ये दर्शविलेली असून पॉलिसीमध्ये त.क.चे वय स्पष्ट नमुद आहे.
36. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने सदर मनीबॅक पॉलिसीचे सर्क्युलर व सदर मनीबॅक पॉलिसीचे विमा हप्ते भरल्याच्या नोंदी दाखल केलेल्या आहेत आणि यावरुन स्पष्ट होते की, वि.प.क्रं 3 चे वयाचे व्यक्तीला अशा प्रकारची पॉलिसी दिल्या जाऊ शकत नाही आणि म्हणून मंचाचे मते वि.प.क्रं 3 ने, त.क.चे मनीबॅक पॉलिसी अंतर्गत मिळालेल्या प्रथम हप्त्याचे रकमेचा धनादेश वाईट हेतूने वटविला व रकमेची उचल केली. त.क.चे लक्षात हा प्रकार आल्या नंतर त.क.ने वि.प.ला नोटीस पाठवून रकमेची मागणी करुन देखील ती परत केलेली नाही. मंचाचे मते वि.प.क्रं 3 हा सदर मनीबॅक पॉलिसी अंतर्गत मिळालेली प्रथम हप्त्याची रक्कम मिळण्यास मूळातच पात्र नव्हता व नाही परंतु वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे कार्यालयीन चुकीमुळे तसेच विमाप्रतिनिधीचे चुकीमुळे प्रस्तुत प्रकरण उदभवलेले आहे. CC/54/2011 37. त.क.ने सदर मनीबॅक पॉलिसी अंतर्गत मिळालेल्या प्रथम हप्त्याची रक्कम न मिळाल्यामुळे पुढील विमा हप्ते भरलेले नाहीत असे त्याने स्वतः कबुल केलेले आहे म्हणजेच दिनांक 04.02.2009 चा हप्ता वगळता सदर मनीबॅक पॉलिसी अंतर्गत त.क.ऐवजी वि.प.क्रं 3 ला प्रथम रकमेचा हप्ता मिळाल्या नंतर, त्यानंतर सदर पॉलिसीचे संपूर्ण हप्ते वि.प.क्रं 3 ने भरल्याची बाब मंचा समक्ष सिध्द झालेली आहे आणि म्हणून मंच ग्राहय धरते की, मनीबॅक क्लेम अंतर्गत चुकिने धनादेश वि.प.क्रं 3 ला मिळाल्यानंतर व त्याने तो वटविल्या नंतर सदर पॉलिसी अंतर्गत देय विमा हप्त्याची संपूर्ण रक्कम वि.प.क्रं 3 ने भरलेली आहे परंतु सदर मनीबॅक पॉलिसी स्वतःची नसताना, वि.प.क्रं 1 विमा कंपनी व तिचे प्रतिनिधीचे झालेल्या चुकीचा गैरफायदा घेण्याचे हेतूने वि.प.क्रं 3 ने ही गैरकायदेशीर कृती केलेली आहे.
38. या संपूर्ण प्रकरणात एक तरी चांगले झाले की, त.क.ला कोणताही अपघात किंवा ईजा किंवा त्याचा नैसर्गिक मृत्यू झालेला नाही. असे झाले असते तरी वि.प.क्रं 3 ने स्वार्थापोटी केलेली कृती म्हणजेच सदर मनीबॅक पॉलिसीचे उर्वरीत विमा हप्ते भरुन सदर पॉलिसी जीवंत व सुरु ठेवलेली आहे आणि म्हणून वि.प. क्रं 3 कडून अप्रत्यक्ष्यरित्या व खोडसाळपणाची घडलेली कृती ही पॉलिसी जीवंत राहिल्यामुळे चांगली कृती झालेली आहे. 39. मंचा समक्ष असे सिध्द झालेले आहे की, सदर विमाबॅक पॉलिसी ही वि.प. क्रं 3 ची नाही, तरी देखील त्याने विमा हप्त्याची रक्कम भरलेली आहे. सदर मनीबॅक विमा पॉलिसीतील त.क.चे नावाचे चुकीमुळे, वि.प.क्रं 3 ला रुपये-9035/- एवढी रक्कम प्रथम मनीबॅक क्लेम पोटी मिळालेली आहे व सदर रक्कम मिळाल्यानंतरच, त्यापैकीच रक्कम ,वि.प.क्रं 3 ने सदर विमा पॉलिसीचे हप्त्यापोटी भरलेली आहे. 40. या संपूर्ण प्रकरणात झालेल्या घोळास वि.प.क्रं 1 विमा कंपनी व तिचे प्रतिनिधी यांची झालेली चूक कारणीभूत ठरलेली आहे कारण प्रतिनिधीने अनेक विमा हप्ते कन्सालिडेटेड चेकद्वारे जमा केल्याचे विमा हप्त्याचे पावत्यां वरुन स्पष्ट होते. म्हणजेच सदर प्रतिनिधी, पॉलिसीधारकां कडून त्यांची विमा हप्ता रक्कम गोळा करुन, चेकद्वारे निरनिराळया पॉलिसीसाठी जमा करीत होता ही बाब स्पष्ट होते. परंतु त्याने विमा हप्ता भरल्याची पावती संबधित विमाधारकांना देताना योग्य ती काळजी घेतल्याचे दिसून येत नाही आणि म्हणून विमा प्रस्ताव अर्ज भरण्याचे कारवाई पासून ते विमा हप्ता भरल्याच्या पावत्या देई पर्यंत वि.प.क्रं 1 विमा CC/54/2011 कंपनीचे प्रतिनिधीने योग्य ती काळजी घेतलेली नाही आणि पॉलिसी निर्गमित करताना वि.प.क्रं 1 विमा कंपनीने सुध्दा पॉलिसी काढणा-याचे नाव व सही यामध्ये कोणतीही शहानिशा केलेली नाही आणि म्हणून वि.प.क्रं 1 विमा कंपनीने त.क.ला दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब पूर्णतः सिध्द होते. 41. पॉलिसीची प्रत त.क.ला प्राप्त झाल्यानंतर त.क.ने सुध्दा त्याचे नावात झालेली चुक दुरुस्त होण्यासाठी पुर्नअवलोकन प्रस्ताव पाठविलेला नाही कारण त.क. हा उच्चशिक्षीत व्यक्ती नसून तो एक अल्पशिक्षीत व्यक्ती आहे आणि म्हणून त्याचे नावातील पॉलिसीतील चूक ही त्याचे लक्षात आलेली नाही व त्यामुळे हा सर्व घोळ/गुंतागुंत झालेली आहे. मंचाचे मते यास त.क. सुध्दा काही अंशी दोषी आहे. 42. वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे चुकीमुळे त.क.ला शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागलेला आहे परंतु त.क.सुध्दा काही अंशी दोषी आहे आणि म्हणून वि.प.क्रं 1 विरुध्द नुकसान भरपाई मंजूर करताना मंच ही बाब विचारात घेत आहे. 43. प्रस्तुत तक्रार वि.न्यायमंचा समक्ष दाखल झाली नसती तर या बाबीचा योग्य निर्णय लागलेलाच नसता कारण मूळ पॉलिसीमधील त.क.चे नावात झालेल्या चुकीमुळे त.क.चे मनीबॅक पॉलिसी अंतर्गत मिळणारी प्रथम क्लेमची रक्कम दुस-याच व्यक्तीला (वि.प.क्रं 3 ला ) मिळाल्या नंतर त.क.ने वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे पत्रव्यवहार करुन सुध्दा वि.प.क्रं 1 विमा कंपनीने प्रस्तुत तक्रार वि.जिल्हा न्यायमंचा समक्ष दाखल होई पर्यंत सुध्दा पॉलिसीतील त.क.चे नावात झालेली चुक दुरुस्त केलेली नाही त्यामुळे त.क.ला शेवटी न्यायमंचात तक्रार दाखल करावी लागली आणि म्हणून त.क.प्रस्तुत तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहे असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 44. वि.प.क्रं 3 ने प्रस्तुत प्रकरणात दाखल केलेल्या पावत्यां वरुन वि.प.क्रं 3 ने त.क.चे मनीबॅक पॉलिसीपोटी खालील प्रमाणे रक्कम जमा केलेली आहे. अक्रं | विमा हप्ता भरल्याचा दिनांक | डयू त्रैमासिक | दंडासह भरलेली एकूण रक्कम | प्रिमियमची रक्कम | दंडाची रक्कम | शेरा | 1 | 13.02.2007 | 01/2007 | 946/- | 946/- | 00 | | 2 | 25.07.2007 | 04/2007 | 959/- | 946/- | 13 | | 3 | 20.07.2007 | 07/2007 | 977/- | 946/- | | | 4 | अस्पष्ट | 10/2007 | 958.70 | 946/- | 12.70 | | 5 | 01.09.2008 | 04/2008 | 971.30 | 946/- | 25.30 | | 6 | 04.02.2009 | | 964.90 | 946/- | | | 7 | 10.06.2010 | | 6005/- | 5676/- | | | 8 | 02.08.2010 | Mis.Receipt | 75/- | 75/- | | | 9 | 02.09.2010 | 07/2010 | 952.30 | 946/- | 6.30 | | 10 | 22.10.2010 | 10/2010 | 946/- | 946/- | | | 11 | 28.01.2011 | 01/2011 | 946/- | 946/- | | | 12 | 18.04.2011 | 04/2011 | 946/- | 946/- | | | 13 | 13.07.2011 | 07/2011 | 946/- | 946/- | | | 14. | 20.10.2011 | 10/2011 | 946/- | | | | | | | एकूण प्रिमियमची भरलेली रक्कम | 16157/- | | |
45. वि.प.क्रं 3 ला चुकीने त.क.चे मनीबॅक प्रथम क्लेम अंतर्गत दिनांक 23.10.2008 रोजी मिळालेली रक्कम रुपये-9035/- ही, वि.प.क्रं 3 ने त.क.चे पॉलिसीपोटी भरलेल्या रकमे मधून समायोजित होण्यास पात्र आहे असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे.
46. अशाप्रकारे त.क.चे पॉलिसीपोटी, वि.प.क्रं 3 ने भरलेल्या विमा हप्त्याची रक्कम रुपये-16,157/- मधून, वि.प.क्रं 3 ला त.क.चे प्रथम मनीबॅक क्लेमची मिळालेली रक्कम रुपये-9035/- वजावट करता, शिल्लक राहिलेली रक्कम रुपये-7122/- ही वि.प.क्रं 3 ची आहे आणि या रकमेची योग्य विल्हेवाट कायदेशीररित्या करणे न्यायोचित राहिल असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 47. वरील सर्व विवेचना वरुन, प्रस्तुत प्रकरणात न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आ दे श 1) त.क.ची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) मनी बॅक विमा पॉलिसी क्रं-974147787 ही त.क.ची आहे असे मंच घोषीत करते. 3) वि.प.क्रं 1 विमा कंपनीने त.क.चा विमा प्रस्ताव स्विकारणे/पॉलिसी निर्गमित करण्या पासून ते विमा हप्ते स्विकारणे यामध्ये केलेली चूक व हलगर्जीपणा ही त.क.ला दिलेल्या सेवेतील न्युनता आहे असे मंच घोषीत करते. CC/54/2011 4) वि.प.क्रं 1 विमा कंपनीला निर्देशित करण्यात येते की, त्यांनी त.क.चे मनी बॅक विमा पॉलिसी त्याचे नावामध्ये योग्य त्या दुरुस्तीसाठी त.क.कडून अर्ज घेऊन विनामुल्य त्वरीत दुरुस्त करुन द्यावी. 5) मंच या पुढे ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 14(F) नुसार वि.प.क्रं 1 विमा कंपनीला निर्देशित करते की, विमा प्रस्ताव अर्ज स्विकारताना, पॉलिसी काढणा-याची संपूर्ण शहानिशा करुन ओळख घेऊन नंतरच पॉलिसी निर्गमित करावी. 6) वि.प.क्रं 3 ने केलेली कृती योग्य नाही. वि.प.क्रं 3 ने त.क.चे पॉलिसीपोटी उचल केलेली रक्कम रुपये-9035/- ही, वि.प.क्रं 3 ने त.क.चे विमा पॉलिसीपोटी भरलेल्या रकमेतून समायोजित करण्यात येते. 7) वि.प.क्रं 3 ने त.क.चे विमा पॉलिसीपोटी भरलेली उर्वरीत रक्कम, त.क.ने वि.प.क्रं 3 ला देय आहे. त्यापैकी त.क.ने रुपये-1000/- वि.प.क्रं 3 कडून नुकसान भरपाई दाखल स्वतः जवळ ठेवावे व रुपये-1000/- मंचातील कंझूमर लिगल हेड अकाऊंटला जमा करावे व असे हिशोबित केल्या नंतर (रु.16,157/-(-) रु 9035/-(-) रु.2000/-) उर्वरीत रक्कम रुपये-5,122/- वि.प.क्रं 3 ला त.क.ने सदर आदेश प्राप्त झाल्या पासून 30 दिवसाचे आत एकमुस्त डी.डी.द्वारे परत करावे. 8) वि.प.क्रं 1 विमा कंपनीने त.क.ला दिलेल्या दोषपूर्ण सेवेमुळे त.क.ला झालेल्या शारिरीक मानसिक त्रासा बद्यल नुकसान भरपाई म्हणून रु.-2000 /-(अक्षरी रु.दोन हजार फक्त ) तसेच प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-1000/-(अक्षरी रुपये-एक हजार फक्त) वि.प.क्रं 1 विमा कंपनीने त.क.ला देय करावे. 9) वि.प.क्रं 1 विमा कंपनीला असेही निर्देशित करण्यात येते की, मंचा समक्ष तक्रार चालू असताना पासून ते निकाल लागे पर्यंतचे काळात पॉलिसीपोटी त.क.कडून घेणे असलेल्या प्रलंबित विमा हप्त्यांच्या रकमेवर त्यांनी कोणतीही व्याजाची आकारणी करु नये. त.क.ने यापुढे पॉलिसीपोटी देय रकमा नियमित वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे भराव्यात. 10) उभय पक्षांनी आदेशाचे अनुपालन, निकालपत्र प्राप्त झाल्या पासून तीस दिवसांचे आत करावे अन्यथा वि.प.क्रं 1 द्वारे निकाल दिनांका पासून ते रकमेच्या अदायगी पावेतो देय रकमेवर द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज दयावे लागेल. 11) वि.प.क्रं 2 यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 12) उभय पक्षांना निकालपत्राची प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन द्यावी. CC/54/2011 13) उभय पक्षांनी प्रकरणात दाखल केलेले मूळ दस्तऐवज योग्य त्या सत्यप्रती प्रकरणात दाखल करुन मूळ दस्तऐवज घेऊन जावे व ते मिळाल्या बद्यल पोच द्यावी. 14) मंचामध्ये मा.सदस्यांकरीता दिलेले (ब) व (क) फाईल्सच्या प्रती तक्रारकर्त्याने घेवून जाव्यात. (रामलाल भ. सोमाणी) | | (मिलींद रामराव केदार) | अध्यक्ष. | | सदस्य. | जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, वर्धा |
| [HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi] Member[HONABLE MR. Shri Ramlal Bhavarlal Somani] PRESIDENT[HONABLE MR. Shri Milind R. Kedar] MEMBER | |