निकालपत्र
(पारित दिनांक 27/01/2017)
(मा. सदस्या, श्रीमती स्मिता एन.चांदेकर यांच्या आदेशान्वये)
तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
- तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात असा की, तक्रारकर्ती क्रं. 1 ही मृतक प्रकाश पारिसेची विधवा पत्नी असून त.क.क्रं.2 हा मयत प्रकाश पारिसेचा मुलगा आहे. तर तक्रारकर्ती क्रं. 3 ही मृतक प्रकाश पारिसे हयाची आई आहे. मयत प्रकाश पारिसे हा जिल्हा परिषद शाळा हडसी, ता. हिंगणघाट, जि. वर्धा येथे शिक्षक पदावर कार्यरत होता. त.क. 1 चे माहेर मंदार जि. यवतमाळ येथे असून त.क. 1 ही बाळंतपणासाठी माहेरी होती. प्रकाश पारिसे हे हा नियमितपणे त.क. क्रं. 1 व 2 यांना पाहण्याकरिता त.क. 1 च्या माहेरी जात होता.
- त.क. ने पुढे असे नमूद केले की, दि. 06.08.2007 रोजी प्रकाश पारिसे हा मंदार वरुन हडसी येथे आपल्या दुचाकी वाहनाने परत येत असतांना मध्यंतरी लघुशंका करण्याचे कारणाने त्याने आपले दुचाकी वाहन रस्त्याच्या बाजुने उभे केले व रस्ता लगतच्या नाल्याकडे लघुशंकेकरिता गेला असता तो सदर नाल्यामध्ये पडला व त्यामुळे त्याच्या डोक्याला जखम झाली आणि तो घटनास्थळावर बेशुध्दा अवस्थेत पडला. सदर घटनेबाबत अज्ञात इसमाने संबंधित पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस त्वरितच घटनास्थळावर आले आणि तपासा अंती मृतक प्रकाश याचा मृत्यु आकस्मिक अपघाती मृत्यु असल्याची नोंद करण्यात आली. मृतक प्रकाश याच्या शरीरावर शवविच्छेदन करण्यात आले व तसा अहवाला सुध्दा डॉक्टरांनी पोलिसांना दिला. सदर शवविच्छेदन अहवालात मृतक प्रकाश हयाचा मृत्यु त्याच्या डोक्याला झालेल्या जखमेमुळे तसेच पाण्यात पडल्यामुळे श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत अवरोध निर्माण झाल्यामुळे झाला असे नमूद केले आहे.
- मृतक प्रकाश जिल्हा परिषद शाळा हडसी , जि. वर्धा येथे शिक्षक म्हणून कार्यरत असतांनाच त्याने वि.प. कडून खालीलप्रमाणे पॉलिसी काढल्या होत्या.
विमा प्रस्ताव क्रं. विमा रक्कम
1. 972548728 रुपये 25,000/-
2 972497951 रुपये 20,000/-
3. 972549440 रुपये 50,000/-
4. 972549427 रुपये 1,00,000/-
उपरोक्त पॉलिसीचा विमा हप्ता मृतक प्रकाश नियमितपणे भरणा करीत होता किंवा त्याच्या मासिक वेतनातून विमा हप्त्याची रक्कम कपात होत होती. उपरोक्त सर्व पॉलिसीमध्ये दुप्पट लाभ अर्जीत करण्याची व्यवस्था होती. म्हणजेच विमा पॉलिसीच्या अंतर्गत कालावधी संपल्यानंतर मिळणा-या लाभा व्यतिरिक्त जर प्रस्तावक याचा मध्यंतरी अपघाती मृत्यु झाल्यास पॉलिसीमध्ये देय रक्कमेच्या दुप्पट रक्कम पॉलिसी धारकास विमा कंपनीने देण्याचे मान्य केले होते. मृतक प्रकाश हयाचा मृत्यु अपघाती असल्यामुळे निश्चितच सदर पॉलिसीबाबत देय विमा रक्कमेच्या व्यतिरिक्त दुप्पट लाभ मिळण्यास तक्रारकर्ती हक्कदार आहे असे त.क.ने तक्रार अर्जात कथन केले आहे.
- त.क. ने पुढे असे ही नमूद केले की,मृतक प्रकाश हयाचे मृत्युनंतर त.क. ने सदर पॉलिसी अंतर्गत अर्जित संपूर्ण लाभ मिळण्याकरिता वि.प. विमा कंपनीकडे दावा दाखल केला. परंतु वि.प. ने सदर पॉलिसीमधील अर्जित दुप्पट लाभ देण्याऐवजी पॉलिसी अंतर्गत मिळणारी नियमित रक्कम केवळ त.क.ला दिली. त्यामुळे त.क.ने परत दुप्पट लाभ मिळण्याकरिता वि.प.कडे विनंती अर्ज सादर केला असता वि.प.ने दि. 25.03.2010 द्वारे कोणतेही सबळ कारण न दाखविता त.क.हयांची दुप्पट लाभ (डी.ए.बी.) मिळण्याची मागणी नामंजूर केली. त्यामुळे त.क. हयांनी दि.15.10.2010 रोजी वि.प. यांना वकिलामार्फत पंजिकृत डाकने नोटीस पाठविली व उपरोक्त नमूद मृतक प्रकाश हयांचे विमा पॉलिसी अंतर्गत दुप्पट लाभ (अपघात)(डी.ए.बी.) ची रक्कमेची मागणी केली. सदर नोटीस वि.प. विमा कंपनीला दि. 18.10.2010 ला प्राप्त होऊन ही त्यांनी मागणीची पूर्तता केली नाही. म्हणून तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार मंचासमोर दाखल करुन दुर्घटना हित लाभ अंतर्गत मिळणारी रक्कम व्याजासह, शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल रुपये 10,000/- प्रत्येकी व तक्रारीचा खर्च मिळण्याची विनंती केली आहे.
- विरुध्द पक्षाने त्याचा लेखी जबाब नि.क्रं. 9 वर दाखल केला असून तक्रार अर्जास सक्त विरोध केला आहे. तो जिल्हा परिषद वर्धा येथे शिक्षक म्हणून कार्यरत होता व त्याने वि.प.कडून पॉलिसी काढल्या होत्या हे मान्य केले आहे . तसेच प्रकाश पारिसे हयाचा दि.06.08.2007 रोजी मृत्यु झाल्याचे मान्य केले असून इतर माहिती अमान्य केली आहे. वि.प.ने लेखी उत्तरात पुढे असे नमूद केले आहे की, मृतक प्रकाश पारिसे हा मंदार गांवावरुन हडस्ती येथे मोटरसायकले जात असता त्याला खैरी गांवाजवळ लघवी लागल्याने त्याने आपले वाहन रस्त्याच्या बाजुने उभे केले व रस्ता लगतच्या नाल्याकडे लघुशंकाकरिता असता त्याला चक्कर आली व ते नालीचे पाण्यात पडले, त्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला आणि त्याचे नाक तोंड पाण्यात बुडाल्याने गुदमरुन मरण पावला. त.क. यांनी त्यांच्या तक्रारीत केलेले विधान की, मृतक आधि खाली पडला व त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे तो बेशुध्द झाला हे पोलिस रिपोर्टशी विसंगत आहे. वि.प.ने असे ही नमूद केले की, पोलिस रिपोर्ट 'अकस्मात मृत्यु समरी बुक' दि. 01.12.2007 घटनाक्रमात मृतक प्रकाश पारिसे हा रस्त्याच्या बाजुला 'लघवी करीत असता त्याला चक्कर आली' व ते नालीचे पाण्यात बुडाल्याने गुदमरुन मरण पावले. या घटनाक्रमात नमूद असून त्यानुसार असे स्पष्ट होते की, प्रकाश पारिसे हयाला लघवी करतांना आधि चक्कर आली आणि तो खाली पडून त्याच्या डोक्याला मार लागला आणि त्याचे नाक व तोंड पाण्यात बुडाल्यामुळे गुदमरुन त्याचा मृत्यु झाला. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणातील मृतकाचे मृत्युचे प्राथमिक कारण चक्कर येणे हे असून नंतरची घटना खाली पडून डोक्याला मार लागणे व त्याचे नाक व तोंड नालीचे पाण्यात बुडाल्याने गुदमरुन मृत्यु झाला हे स्पष्ट होते. त्यामुळे पोलिसांनी जरी अकस्मात मृत्यु झाल्याची नोंद केली असली तरी त्यातं अपघाती मृत्यु अशी नोंद नाही असे वि.प. चे म्हणणे आहे.
- वि.प. ने पुढे असे ही नमूद केले की, त.क.ने सादर केलेले मृत्यु मर्ग समरी क्रं. 26/07 दि. 17.05.2008 यांत उपविभागीय अधिकारी केळापूर यांनी मृतक प्रकाश मारोतराव पारिसे यांचा मृत्यु दि. 06.08.2007 ला झालेला अकस्मात मृत्यु समजण्यास मंजुरी दिली आहे. वि.प. च्या म्हणण्याप्रमाणे पॉलिसीतील अपघाती मृत्यु लाभ मिळण्यास अपघाताच्या व्याख्येप्रमाणे प्रथम अपघात होणे ही महत्वाची घटना असून अपघातात झालेल्या शारीरिक जखमेमुळे, कोणतेही इतर कारण न घडता मृत्यु झाल्यास अपघाती लाभ देय असतो. सदर प्रकरणात घटनाक्रमाप्रमाणे मृतक पॉलिसीधारकाचा अपघात झाला नाही. मृतकाचे मृत्युचे प्राथमिक कारण अपघात नसून चक्कर येणे हे आहे. त्यामुळे अकस्मात मृत्यु असा अभिप्राय उपविभागीय अधिकारी यांनी देऊन त्यास मंजुरी दिली आहे. मृत्युचे प्राथमिक व मुळ कारण चक्कर येणे हे आहे व ते अपघात या व्याख्येत वि.प.च्या पॉलिसीतील अटी व शर्तीप्रमाणे अपघात या सदरात मोडीत नाही. त्यामुळे अपघाती मृत्यु लाभ मिळण्यास त.क. पॉलिसीच्या अटीप्रमाणे पात्र नाही.
- वि.प. यांनी पुढे असे ही नमूद केले आहे की, वि.प. यांनी मृतक पॉलिसीधारकाच्या तक्रारीत नमूद चारही पॉलिसीची मुळ रक्कम इतर लाभासह दिली आहे. परंतु अपघाती मृत्यु लाभाची रक्कम पॉलिसीच्या अटी व शर्तीप्रमाणे देय नाही. त्यामुळे वि.प. यांनी त्यांचे दि.25.03.2010 चे पत्राद्वारे कळविले आहे. त.क. ने अधिवक्ता मार्फत दि.15.10.2010 च्या नोटीसला दि.26.05.2011 रोजी उत्तर दिले असून त्यात अपघाती लाभ न देण्याचे सविस्तर कारण ही दिले आहे. विरुध्द पक्ष कंपनीने पॉलिसीतील अटी व शर्तीनुसारच अपघाती मृत्यु हितलाभ देय नसल्यामुळे तो नाकारला आहे. अशा पध्दतीने विरुध्द पक्षाने सेवेत कुठलीही त्रृटी केलेली नाही, म्हणून तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
- तक्रारकर्तीने तिच्या कथनाच्या पृष्ठयर्थ वर्णनयादी नि.क्रं. 3 वर एकूण 10 दस्त दाखल केले आहे. वि.प.ने वर्णनयादी नि.क्रं. 10 नुसार एकूण 4 कागदपत्र वर्णनयादी नि.क्रं. 24 वर एकूण 4 दस्त दाखल केलेली आहे. त.क. ने नि.क्रं. 20 वर शपथपत्र दाखल केले असून नि.क्रं.25 वर लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. तसेच विरुध्द पक्षाने नि.क्रं. 26 वर लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.
- वरीलप्रमाणे तक्रारकर्ती व विरुध्द पक्ष यांचे परस्पर विरोधी विधानावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ काढून त्यावरील कारणमिमांसा पुढील प्रमाणे आहे.
अ.क्रं. | मुद्दे | उत्तर |
1 | विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस मृतक प्रकाश पारिसे याचा विमा पॉलिसीप्रमाणे अपघाती हितलाभ न देऊन सेवेत त्रुटीपूर्ण व्यवहार व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय ? | होय |
2 | तक्रारकर्ती मागणीप्रमाणे लाभ मिळण्यास हक्कदार आहे काय ? | होय |
3 | अंतिम आदेश काय ? | तक्रार अंशतः मंजूर |
-: कारणमिमांसा :-
- मुद्दा क्रं.1 ,2 व 3 बाबत , ः- तक्रारकर्ते 1 ते 3 हे मृतक प्रकाश पारिसे याचे कायदेशीर वारसदार आहेत हे वादातीत नाही. त्याचप्रमाणे मृतक प्रकाश पारिसे याने त्याचे हयातीत
विमा प्रस्ताव क्रं.
1. 972548728 रुपये 25,000/-
2 972497951 रुपये 20,000/-
3. 972549440 रुपये 50,000/-
4. 972549427 रुपये 1,00,000/-
नुसार पॉलिसी काढल्या होत्या व सदर पॉलिसीचे हप्त्याची रक्क्म मय्यत प्रकाश याचे पगारातून कपात होत होती. सदर सर्व पॉलिसीमध्ये दुप्पट लाभ अर्जित करण्याची व्यवस्था होती. म्हणजेच विमा पॉलिसीचे अंतर्गत कालावधी संपल्यानंतर मिळणा-या लाभा व्यतिरिक्त जर पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यु झाला तर पॉलिसीमध्ये देय रक्कमेच्या दुप्पट रक्कम पॉलिसीधारकाचे वारसदारांस देण्याचे वि.प.ने मान्य केले हे देखील वादातीत नाही.
- त्याचप्रमाणे त.क.च्या म्हणण्यानुसार मृतक प्रकाश याचा दिनांक 06.08.2007 रोजी तो त्याचे वाहन रस्त्याच्या बाजुने लावून लघुशंकेकरिता गेला असता नाल्यामध्ये पडला व त्यामुळे त्याचे डोक्याला जखम झाली व तो बेशुध्दअवस्थेत पाण्यात पडल्यामुळे श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत अवरोध निर्माण झाल्यामुळे मृतक हा घटनास्थळी मरण पावला. त्यामुळे मृतक प्रकाश याचा मृत्यु हा अपघाती मृत्यु असून त्याचे मृत्यु पश्चात तक्रारकर्ते हे त्याचे कायदेशीर वारस या नात्याने पॉलिसी अंतर्गत अर्जित संपूर्ण लाभ मिळण्याकरिता वि.प.कडे विमा दावा दाखल केला असता वि.प. कंपनीने सदर पॉलिसीमधील अर्जित दुप्पट लाभ देण्याऐवजी केवळ पॉलिसीची नियमित रक्कम तक्रारकर्त्यांना दिली. मृतक प्रकाश हयाचा मृत्यु अपघाती असल्यामुळे त्यांना वादातीत पॉलिसीच्या अंतर्गत दुप्पट लाभ मिळण्यास त.क. पात्र आहे असे त.क.चे म्हणणे आहे.
- या उलट वि.प. च्या म्हणण्यानुसार मृतक प्रकाश हयास लघवी करतांना चक्कर आल्यामुळे तो रस्त्यालगतच्या नालीत पडला तेव्हा त्याच्या मृत्युचे प्राथमिक कारण चक्कर येणे हे असून नंतरची घटना खाली पडून डोक्याला मार लागणे व त्याचे नाक व तोंड नालीचे पाण्यात बुडाल्याने गुदमरुन मृत्यु झाला हे स्पष्ट होते. त्यामुळे पोलिसांनी जरी ''अकस्मात मृत्यु झाल्याची नोंद केली असली तरी त्यात अपघाती मृत्यु अशी नोंद नाही. म्हणून मृतक प्रकाश हयाचा मृत्यु पॉलिसीतील अटीनुसार अपघात या सदराखाली येत नसल्यामुळे वि.प.च्या म्हणण्यानुसार तक्रारकर्ते हे विम्याच्या दुप्पट लाभास पात्र नाही
- त.क.ने वर्णनयादी नि.क्रं. 3(3) व मृतक प्रकाश पारिसे याचा शवविच्छेदन रिपोर्ट दाखल केला आहे. सदर रिपोर्टचे अवलोकन केले असता मृतकाचे मेंदूमध्ये रकतस्त्राव झाल्याचे आढळून आल्याचे नमूद केलेले आहे. तसेच मृतकाचे मृत्युचे कारण हे त्याचे मेंदूत रक्तस्त्राव होवून (Subarachnoid haemarrhage) पाण्यात बुडाल्याने झाला असे स्पष्ट नमूद केलेले आहे. त्याचप्रमाणे नि.क्रं. 3 नुसार पान क्रं. 20 वर अकस्मा मृत्यु समरीची छायांकित प्रत दाखल केली आहे. सदर समरीमध्ये चौकशी अंती मृतक प्रकाश पारिसे याचा मृत्यु नालीचे पाण्यात पडून डोक्याला मार लागून मृतकाचे नाक, तोंड पाण्यात बुडाल्याने गुदमरुन मरण पावल्याचा अभिप्राय देण्यात आला असून उपविभागीय दंडाधिकारी केळापूर, पांढरकवडा यांनी सदर अकस्मात मृत्यु समरीस दि. 17.05.2008 रोजी मंजुरी दिल्याचे अभिलेखावरुन स्पष्ट होते. वरील दोन्ही कागदपत्रांचे अवलोकन केले असता हे स्पष्ट होते की, मृतक हा चक्कर येऊन नाल्यात पडल्यामुळे त्याचे डोक्याला मार लागला व पाण्यात बुडून त्याचा मृत्यु झाला. वि.प.ने मात्र सदर मृत्यु हा अपघात या सदरात बसत नाही असे कथन केले आहे. त्याकरिता वि.प.ने तयाचे लेखी उत्तरात खालीलप्रमाणे अपघाताची व्याख्या नमूद केली आहे.
10 Death of Life Assured
To pay an additional sum equal to sum Assured under the Policy, if the life assured before the expiry of the period during which the premium is payable shall sustain any bodily injury resulting solely and directly from the accident caused by outward, violent and visible means and such injury shall within 120 days of its occurance solely, directly and independantly of all other causes result in the death of the life assured.
- वि.प. च्या म्हणण्यानुसार सदर प्रकरणामध्ये विमाधारकाचा अपघात झाला नाही परंतु त्याला लघवी करतांना चक्कर आली, त्यामुळे तो पडला व त्याच्या डोक्याला दुखापत होऊन त्याचे नाक,तोंड पाण्यात बुडल्यामुळे त्याचा गुदमरुन मृत्यु झाला. त्यामुळे मृत्युचे प्राथमिक कारण अपघात नसून चक्कर येणे हे आहे, अपघात नाही. त्याचप्रमाणे वि.प.ने त्याचे लेखी उत्तरात असे नमूद केले आहे की, शवविच्छेदन अहवालात मृतक प्रकाश पारिसे याचे मृत्युचे कारण Sub arachnoid haemorrhage with drawing (atypical) due to above haemorrhage असे नमूद आहे. त्यानुसार मृतकास चक्कर आल्याने तो नालीत पडला व त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे रक्तस्त्राव होऊन नालीचे पाण्यात त्याचे नाक व तोंड बुडल्यामुळे गुदमरुन त्याचा मृत्यु झाला आहे. वि.प.चे म्हणण्यानुसार चक्कर येणे हेच मृत्युचे कारण असले तरी प्रकरणात दाखल कागदपत्राचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, मृतक हा दुचाकी स्वतः चालवित होता. तो गाडी रस्त्याचे कडेला लावून लघुशंकेकरिता गेला असता चक्कर येऊन पडला व त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे पाण्यात पडून गुदमरुन त्याचा मृत्यु झाला. अभिलेखावरील कागदपत्रावरुन असे ही दिसून येते की, सदर घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार कोणीही नाही.त्यामुळे मृतक हा चक्कर येऊन पडला किंवा इतर कोणत्या कारणामुळे पडला हे स्पष्ट होत नाही. तरी प्रकरणात दाखल पोलीस चौकशी कागदपत्रानुसार मृतक हा चक्कर येऊन पडला असे नमूद आहे. परंतु केवळ चक्कर आल्याने मृतकाचा मृत्यु झाला असे म्हणता येणार नाही. कारण कागदपत्रानुसार मृतका हा चक्कर येऊन पडल्यावर डोक्याला मार लागला व पाण्यात गुदमरुन (बुडून) मृत पावला. त्यामुळे झालेल्या दुखापतीमुळे पाण्यात पडून श्वासोच्छवास अवरोध झाल्याचे अभिलेखावरुन स्पष्ट होते.
- वि.प. यांनी त.क.ने पाठविलेल्या नोटीसला दिलेल्या उत्तरात मृतकाचा मृत्यु हा पोलीस Final Summary (समरी रिपोर्ट) नुसार Vertigo (चक्कर आल्यामुळे) झाला असून विम्यातील अपघाताचे व्याखेत बसत नसल्यामुळे त.क.चा Double claim नामंजूर केल्याबाबत कळविले आहे. परंतु पोलिस समरीनुसार मृतकाचा मृत्यु केवळ चक्कर आल्यामुळे झाला नसून त्यामुळे डोक्याला दुखापत होऊन पाण्यात बुडाल्यामुळे झाल्याचे नमूद केले असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे मृतकास Vertigo चा त्रास होता किंवा तो त्या आजाराने त्रस्त होता हे दाखविणारे कोणतेही कागदोपत्री पुरावा अभिलेखावर नाही. त्याचप्रमाणे चक्कर आल्यामुळे जर मृतक हा पाण्यात पडला नसता तर त्याचा गुदमरुन मृत्यु झाला नसता असे ही म्हणता येणार नाही.
- विरुध्द पक्षाने नि.क्रं. 27 वरील पुरसीस सोबत आकस्मिक व अॅक्सीडंट या दोन शब्दाचे डिक्शनरीनुसार अर्थ दाखविण्याकरिता कागदपत्र दाखल केले असून त्यानुसार Accident म्हणजे अपघात किंवा दुर्घटना असा नमूद केला आहे. तसेच आकस्मिक शब्दाचा अर्थ sudden, unexpected, unforeseen इत्यादी दिलेला आहे. त्यामुळे मृतक हा लघुशंकेकरिता गेला असता चक्कर येणे व डोक्याला मार लागणे हे आकस्मिक असून सदर घटना ही अपघात या सदरात मोडते असे मंचाचे स्पष्ट मत आहे. कारण मयत हा लघुशंकेकरिता गेला असता त्याला चक्कर आली हे अनपेक्षितपणे घडले आहे व पडल्यामुळे मृतकाला डोक्याला मार लागला व रक्तस्त्राव झाला. त्यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यु झाला असून सदर घटना ही क्षणार्धात घडल्याचे दिसून येते. त्यामुळे मृतकाचा मृत्यु हा अपघाती मृत्यु या सदरात मोडते या निष्कर्षा प्रत मंच पोहचते.
- विरुध्द पक्षाने त्याच्या कथनाच्या पृष्ठर्थ 2016 (1) CPR 546 (NC) United India Insurance Company Limited Vs. Smt. B. Purnamma हा मा. राष्ट्रीय आयोगाचा न्यायनिवाडा दाखल केला असून सदर प्रकरणातील घटना ही हातातील प्रकरणा पेक्षा वेगळी असून त्यामध्ये 'खून' ही घटना अपघातात मोडते किंवा नाही हे विचारार्थ घेतले आहे. सदर प्रकरणाचे तथ्य व त्यातील घटनाक्रम संपूर्णता वेगळा असल्यामुळे हातातील प्रकरणास लागू होऊ शकत नाही असे मंचाचे मत आहे.
- त्याचप्रमाणे तक्रारकर्तीने तिच्या तक्रारीच्या पृष्ठर्थ मा. राष्ट्रीय आयोगाचा न्यायनिवाडा III (2015) CPJ 313 (NC) GANGA RAM RAI VS. LIFE INSURANCE CORPORATION & ANR व III (2008) CPJ 120 (NC) MAYA DEVI Vs. LIFE INSURANCE CORPORATION & ANR दाखल केले असून सदर न्यायनिवाडयात मा. राष्ट्रीय आयोगाने 'अपघात' या शब्दाचा अर्थ खालीलप्रमाणे विश्लेषित केलेला आहे.
" 9. Further, in England law on the subject is settled. In Halsbury's Laws of England Vol. 25 page 307 para 569, 4th Edition (2003 reissue), as to the meaning of the word 'accident', it is stated as under: "569. Meaning of 'accident'. The event insured against may be indicated in the policy solely by reference to the phrase 'injury by accident' or the equivalent phrase 'accidental injury', or it may be indicated as 'injury caused by or resulting from an accident'. The word 'accident', or its adjective 'accidental' is no doubt used with the intention of excluding the operation of natural causes wuch as old age congenital or insidious disease or the natural progression of some constitutional physical or mental defect ; but the ambit of what is included by the word is not entirely clear. It has been said that what is postulated is the intervention of some acuse which is brought into operation by chance so as to be fairly describable as fortuitous. The idea of something haphazard is not necessarily inherent in the word; it covers any unlooked for mishap or an untoward event which is no expected or designed, or any unexpected personal injury resulting from any unlooked for mishap or occurrence.
तसेच तक्रारकर्तीने मा. राष्ट्रीय आयोगाचा Revision Petition No. 1270/2016 National Insurance Co. Ltd. Vs. Mousumi Bhattacharjee & tow other मधील पारित न्यायनिवाडयाची प्रत दाखल केली असून त्यातील तथ्य प्रस्तुत प्रकरणास लागू होते.
- वरील सर्व विश्लेषणावरुन मंच या निष्कर्षा प्रत पोहचते की, प्रस्तुत प्रकरणात मयत प्रकाश पारिसये याचा मृत्यु हा अपघाती मृत्यु या सदरात मोडतो. त्यामुळे तक्रारकर्ती ही मृतकाची वारस या नात्याने पॉलिसीमधील अर्जित दुप्पट लाभ (Double Benefit) मिळण्यास पात्र आहे. तक्रारकर्तीला विम्याचा दुप्पट लाभाची रक्कम न देऊन विरुध्द पक्ष कंपनीने सेवेत त्रुटी केली आहे. विमा कंपनीने चुकिच्या कारणावरुन तक्रारकर्तीचा Double Benefit विमा दावा नाकारल्यामुळे तक्रारकर्तीस मंचासमक्ष सदर तक्रार दाखल करावी लागली. याकरिता निश्चितपणे तक्रारकर्तीला मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे सदर त्रासा पोटी तक्रारकर्तीला रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 3000/- देणे उचित राहील या निष्कर्षा प्रत मंच येते .
सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
1 तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2 विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला तिचे पती प्रकाश पारिसे यांच्या मृत्युबाबत तक्रार अर्जातील परिच्छेद क्रं. 4 मध्ये नमूद एकूण 4 ही पॉलिसीची (Double Benefits)अपघात दुप्पट विमा हितलाभाची रक्कम रुपये 1,95,000/- (अक्षरी रुपये एक लाख पंच्यान्नव हजार) व त्यावर तक्रार दाखल तारखेपासून तर प्रत्यक्ष रक्कम तक्रारकर्तीला मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजसह द्यावी.
3 विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 3,000/- द्यावे.
वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत विरुध्द पक्षाने करावी.
4 मा.सदस्यांच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात.
5 निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात.