निकालपत्र :- (दि.20/07/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला वकीलांमार्फत सदर मंचापुढे उपस्थित राहिले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. तक्रारदार स्वत: व सामनेवालांचे वकील यांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार सामनेवाला फायनान्स कंपनीने योग्य सेवा न दिल्याने दाखल केलेली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- अ) तक्रारदार त्यांचे पत्नीसह 1133 साईक्स एक्स्टेंशन कोल्हापूर येथे गेली 16 वर्षापासून रहात असून त्यांना विरेंद्रसिंह वय 15 व गायत्री वय 12 अशी दोन मुले आहेत. दोघेही पती-पत्नी वैद्यकीय व्यवसाय करतात. सामनेवाला ख्यातनाम फायनान्स कंपनी असून त्यांचे कोल्हापूर येथे कार्यालय आहे तर मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. सामनेवाला हे घर बांधणेसाठी कर्ज पुरवठा करतात. तक्रारदाराने सामनेवालांकडून कर्ज घेतलेने तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत. तक्रारदाराने सामनेवालांनी घर बांधणीसाठी दि.04/02/2006 रोजी रक्कम रु.2,95,000/- इतके तारणकर्ज घेतले होते. त्याचा लोन अकौन्ट नं.47006669 आहे. सदर कर्जासाठी फ्लोटींग व्याजदर होता. कर्जाची मुदत 20 वर्षे व मासिक हप्ता रु.2,376/- इतका होता. उभय पक्षकारांत करार देखील झालेला होता. दि.20/07/2007 रोजी कर्जफेडीची मुदत 10 वर्ष इतकी करुन देणेबाबत तसेच व्याजदर वाढलेमुळे असणारी फरकाची रक्कम भरणेची तयारी लेखी अर्जाव्दारे दर्शविली होती. दि.26/07/2007 रोजी कर्जफेडीची मुदत वाढवून दि.01/12/2049 म्हणजेच तक्रारदाराचे वय वर्षे 84 पर्यंत करण्यात आली असून ही मुदत वाढ आरबीआय चे नियमानुसार अन्यायकारक आहे. तसेच हप्ता वाढवून रु.2,521/- इतका प्रतिमाह केला. पैकी 0.98पैसे मुद्दलपोटी रु.2520 व्याजापोटी आकारले जात होते. तदनंतर कर्जफेड मुदत ऑक्टोबर-2037 इतकी वाढवण्यात आली. तक्रारदाराने सामनेवालांकडून दि.14/07/2005 रोजी रु.11,90,000/- इतके स्थावर तारण कर्ज घेतले होते. त्याचा लोन अकौन्ट नं.47006477 असा होता. सदर कर्जाची लिक्विडेशन डेट सन 2045 करणेत आली तसेच हप्ता वाढवून कर्जफेडीची मुदत कमी करणेसाठी फेरकरार(Re Agreement) करणेत आला. मुळचा ईएमआय वाढवून रक्कम रु.12,930/- चा एसीएस सामनेवाला यांना दिला.
ब) सामनेवालांनी तक्रारदार व त्यांच्या पत्नीकडून दहा को-या प्रॉमिसरी नोटस वर सहया घेतल्या होत्या. त्यावर लोन अकौन्ट नंबर व तारीख नमुद केली नव्हती. व्याजदरातील फरक म्हणून घेण्यात आलेल्या रक्कमांवर प्रीक्लोजर पेनल्टी चार्जेस लावणेत आले व सदरची रक्कम मुद्दल म्हणून जमा करणेत आली. त्याबाबत विचारणा केली असता पैसे कुठे जमा करावयाचे हयाचा अधिकार सामनेवाला यांना आहे. त्याबाबत तुम्ही तक्रार करावयाची नाही अन्यथा तुम्हाला डिफॉल्टर ठरवून तुम्ही सहया केलेल्या प्रॉमिसरी नोटसवर आम्ही संपूर्ण कर्जाची रक्कम टाकून त्या बॅकेत हजर करुन तुमचेवर कायदेशीर कार्यवाही करु अशी धमकी दिली. क) दि.04/12/2007 रोजी चेक क्र.8095 कमर्शिअल को-ऑप बँक,शाहूपुरी कोल्हापूर रक्कम रु.2,950/- चे पेमेंट तक्रारदाराचे डोळयादेखत सामनेवालांनी कॉम्प्युटरवरुन डिलीट केले व तक्रारदार हा डिफॉल्टर आहे असे दाखवायचा कट केला. तसेच दि.28/12/2007 रोजी फरकाची रक्कम म्हणून रु.51,000/- भिती दाखवून भरणेस भाग पाडले. सदर रक्कम repayment Statement मध्ये नोंदवलेली नाही. केवळ आऊटस्टँडींग रक्कम रु.2,84,459/- वरुन कमी करुन ती रु.2,33,096/- इतकी दाखवणेत आली आहे. ड) दि.17/02/2010 रोजी सदर बाब सध्याचे शाखा व्यवस्थापक श्री संतोष गोखले यांचे निदर्शनास आणून दिलेवर त्यांनी दि.04/12/2007 ची रु.2,950/- व दि.28/12/2007 ची रु.51,000/- ची नोंद कॉम्प्युटरवर करुन व तसे स्टेटमेंट तक्रारदारास देऊन आपले सहका-याने केलेल्या गुन्हयावर पांघरुन घातले आहे. दि.22/01/2008 रोजी पावती क्र.235488 रक्कम रु.20,000/-वसुल केले. तदनंतर दि.23/01/008 रोजी पावती क्र.235526 रक्कम रु.14,000/- भरणेस भाग पाडले. तदनंतर फरकाची रक्कम लोन अकौन्ट नं.47006669 वर रक्कम रु.40,000/- (पावती क्र.172740) तक्रारदाराकडून वसुल करणेत आले. दि.27/05/2008 रोजी पावती क्र.172845 रु.10,000/- भरणेस भाग पाडले. वरील काळात तक्रारदाराकडून मासिक हप्ता ही वसुल करणेत येत होता. प्रॉमिसरी नोटच्या आधारे भिती दाखवून सामनेवालांचे या अन्यायकारक व निर्दय वागणूक सहन करणे तक्रारदारास भाग होते. कारण तक्रारदार व त्यांची पत्नी व्यवसायाने डॉक्टर असून जर तक्रारदारास डिफॉल्टर ठरवले तर त्याची नाहक बदनामी होऊन त्याचा त्यांच्या वैद्यकीय व्यवसायावर परिणाम झाला असता तक्रारदारास जादा व्याजदराने सावकाराकडून कर्ज घेऊन सामनेवांलांची फरकाची रक्कम भरणे भाग पडले. इ) खाजगी सावकार व नातेवाईकांकडून तक्रारदाराने घेतलेले पैसे परत करणेसाठी तगादा लागल्याने तक्रारदाराने पत्नीचे वंश व परंपरेने चालत आलेले पूर्वजांचे दागीने हे गजानन नागरी पत संस्थेत दि.29/04/009 रोजी लो अकौन्ट नं.8749 व्दारा गहाणवट ठेवून रक्कम रु.1,00,000/- (रु.एक लाख फक्त) इतके कर्ज काढून सदर कर्जाच्या रक्कमांची परतफेड करावी लागली. तसेच मुलीच्या लग्नासाठी तयार केलेले संपूर्ण दागिने दि.14/5/2009 रोजी कर्ज क्र.8795 व्दारा गहाणवट ठेवून रु.1,40,000/- इतके कर्ज काढले व सदर रक्कम पावती क्र.0361515 अन्वये सामनेवालांकडील कर्जखाते क्र.47006669 वर चार तासाच्या आत भरले. त्यामुळे तक्रारदारास अपराधीपणाची भावना निर्माण होऊन प्रचंड प्रमाणात मानसिक दडपण आले आहे. ई) नमुद गजानन पत संस्थेचे कर्ज दि.21/04/2010 पूर्वी फेडले नाही तर पत संस्था दागिण्यांचा लिलाव करणार असलेने तक्रारदारावर दडपण आले आहे. दि.29/04/2010 पूर्वी सदर दागिने सोडवून घेतले नाहीत तर तो तक्रारदाराचे आयुष्यातील निश्चितच शेवटचा दिवस असणार आहे. त्यास सामनेवाला जबाबदार आहेत. प) केवळ तक्रारदाराने लोन अकौन्ट नं.47556477 संदर्भात फेरकराराची प्रत मागितल्यामुळे व सदर कराराचा भंग केल्याचे निदर्शनास आणून दिलेने सामनेवालांनी ही कृती केली आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदाराचे लोन अकौन्ट नं.47006477 चे दि.26/07/2007 रोजी केलेले फेरकरारपत्र, तक्रारदाराने सामनेवाला यांना दिलेला दि.27/07/2007 रोजीचा अर्ज, तक्रारदारचा लोन अकौन्ट नं.47006477 व 47006669 संदर्भात सामनेवाला यांनी घेतलेल्या प्रॉमिसरी नोटस मंचात हजर करणेचा आदेश व्हावा तसेच लोन अकौन्ट नं.47006669 वर सामनेवाला यांनी भरुन घेतलेली रक्कम रु. 2,62,000/- त्यावरील व्याजासहीत मिळावेत. तसेच दि.01/01/2007 पासून ते ऑक्टोबर-2007 पर्यंत रु.28,133/- चे सर्व ई.एम.आय. व्याजासहीत परत मिळावेत, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,00,000/-व लोन प्रिक्लोजर पेनाल्टी चार्जेस सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत सामनेवाला यांना दिलेला दि.20/07/2007 रोजीचा अर्ज, लोन अकौन्ट नं.470066969 चे दि.26/7/2007, 09/01/2007, 28/12/07, 22/01/08, 23/01/08, 23/05/08, 27/05/08चे दिलेले स्टेटमेंट, लोन अकौन्ट नं. 47006477 चे दि.26/07/2007, 03/01/09, 08/04/09, 14/05/09 रोजीची स्टेटमेंट, तक्रारदाराने सामनेवाला यांना दि.27/07/2007 रोजी दिलेला अर्ज, तक्रारदार यांनी गजानन नागरी पत संस्थेत सोने तारण ठेवले विषयीच्या पावत्या, सामनेवाला यांनी दिलेली लोन अकौन्ट नं.47006669 चे दि.14/05/09 ची रिसीट तसेच दि.12/01/2010 रोजी लोन अकौन्ट नं.47006477 ची दिलेली रिसीट, तक्रारदारांचे मेडिकल रिपोर्टस, तक्रारदाराने सामनेवाला यांना दिलेले अर्ज, प्रॉमिसरी नोटस इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. दि.02/06/2010 रोजी तक्रारदाराने तक्रारदाराचा खातेउतारा, कमर्शिअल को-ऑप बँकेचा खातेउतारा, दि.19/12/2009 रोजी सामनेवाला यांनी दिलेल्या खाते उता-याची प्रत, दि.14/05/2009 रोजी दिलेल्या रिसीटची झेरॉक्स प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या आपल्या लेखी म्हणणेनुसार-अ) तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. तक्रारीतील कथने मान्य व कबूल नसल्याचे प्रतिपादन केले आहे. वास्तविक तक्रारदाराचे लोन अकौन्ट नं.47006477 हे तक्रारदाराने अॅक्सेस बॅंकेकडे वर्ग केलेनंतर तसेच लोन अकौन्ट नं.47006669 कर्ज पूर्णफेड केलेनंतर सामनेवालांनी सदर दोन्ही कर्जासाठी घेतलेल्या एकूण 8 प्रॉमिसरी नोटस तक्रारदारास परत केल्या आहेत. तसेच तदअनुषंगिक सर्व कागदपत्रे परत केले आहेत. तसेच ’’ नो डयुज ’’ सर्टीफिकेट दिले आहे. तक्रारदाराने स्वेच्छेने सदरचे कर्जखाते मुदतीपूर्वी प्रिक्लोजर चार्जेस भरुन संपूर्ण फेड करुन कर्जखाते बंद केले आहे. सबब तक्रारदार आता सामनेवालांचे ग्राहक नाहीत तक्रारदारस सामनेवालाविरुध्द तक्रार दाखल करणेचा हक्क व कायदेशीर अधिकार उरलेला नाही. सबब तक्रारदाराचा अर्ज खर्चासहीत फेटाळणेत यावा ब) यातील तक्रारदार व त्यांची पत्नी रुपाली हिम्मतराव शिंदे यांनी सामनेवाला यांचेकडून नवीन घर बांधणीकरिता रक्कम रु.2,95,000/- इतके कर्जाची गृहप्रकाश या स्कीम अंतर्गत मागणी केली. त्यावेळी तक्रारदार व त्यांचे पत्नीने व्याज दर हा फ्लोटींग मागितला व कर्ज फेडीची मुदत ही 20 वर्षाची मागितली. सामनेवाला कंपनीने तक्रारदार व त्यांचे पत्नीस दि.04/02/2006 रोजी अटी व शर्तीचे लोन ऑफर लेटर दिले. त्यानंतर लोन अॅग्रीमेंटही तक्रारदार व त्यांचे पत्नीने सामनेवाला यांना दि.10/02/2006 रोजी रु.300/- च्या फ्रॅकींग पेपरवर करुनही दिले व त्याच दिवशी तक्रारदार व त्यांचे पत्नीने सामनेवाला यांचे नांवे सि.स.नं.1133 ई क्षेत्र 2852 चौ.फुट व त्यावरील 2700 चौ.फु. क्षेत्राचे बांधकामासह च्या मिळकतीबाबतचे कधीही रद्द न होणारे वटमुखतयारही करुन दिले व ते त्याच दिवशी अॅड.सौ.गिता टी.भूमकर यांचेकडून नोटराईज्ड ही करणेत आले व तसेच दोन प्रॉमिसरी नोटसही तक्रारदार व त्यांचे पत्नीने सामनेवाला यांना लिहून दिल्यास तसेच त्यानंतर तक्रारदार व त्यांचे पत्नीने सामनेवाला यांना दिलेले दि.04/02/2006 रोजीचे अटी व शर्तीचे लोन ऑफर लेटर मधील अटी व शर्ती तक्रारदार यांना मान्य व कबूल असलेने तक्रारदार व त्यांचे पत्नीने त्या स्विकृत करुन त्यावर स्विकृतीच्या सहया दि.13/02/2006 रोजी केल्या सदर लेटर मधील अटी व शर्ती तसेच नमुद केलेल्या लोन अॅग्रीमेंटमधीलज अटी व शर्ती तक्रारदार व त्यांचे पत्नीवर बंधनकारक आहेत. तक्रारदार यांनी मागितलेल्या 20 वर्षे मुदतीप्रमाणे तक्रारदार यांची कर्जाची मुदत ही लिक्विडेशन डेट ही दि.04/02/2026 होती व त्यावेळी असलेल्या 7.50 टक्के व्याजदराप्रमाणे ई.एम.आय. हा रक्कम रु.2,376/- इतका होता. तक्रारदार व त्यांचे पत्नीस सदरचे रक्कम रु.2,95,000/- चे कर्ज दि.22/02/2006 रोजी वितरीत केले. त्यामुळे Date of Sanction and Date of disbursement या मधल्या कालावधीमुळे ई.एम.आय. हा रु.2,378/- इतका झाला. त्यानंतर तक्रारदार व त्यांचे पत्नीने सामनेवाला यांना सदरचा ई.एम.आय. दरमहा रक्कम रु.2,378/- चा हप्ता चेकव्दारे अदा केला आहे. मात्र त्यानंतर व्याज दर हा अनुक्रमे दि.01/02/2007 रोजी 9.50 टक्के, दि.30/04/2007 रोजी 9.45 टक्के इतका वाढला त्याचवेळी दि.20/07/2007 रोजी तक्रारदार व त्यांचे पत्नीने सामनेवाला यांचेकडे 20 वर्षाची टर्म बदलून ती कमी करुन 10 वर्षाची करणेबाबत व ई.एम.आय. वाढवून देणेबाबत अर्ज केला. सामनेवाला यांनी तक्रारदार व त्यांचे पत्नीचा अर्ज व त्यांचे मागील तीन वर्षाचे IT Return R.O.Office कडे स्पेशल केस अंतर्गत पाठविले तक्रारदार व त्यांचे पत्नीचे मागील तीन वर्षाचे IT Return व तक्रारदार व त्यांची पत्नी व सामनेवाला यांचे दरम्यानचे मंजूर कर्ज व त्यातील अटी व शर्ती विचारात घेऊन ई.एम.आय. हा रु.2,950/- इतका वाढविणेत आला. मात्र कर्जाच्या 20 वर्षाच्या टर्ममध्ये कोणताही बदल करणेत आला नाही. तक्रारदार यांना वाढविलेला रक्कम रु.2,950/- हा ई.एम.आय. तक्रारदार यांना मान्य व कबूल असलेनेच त्यांनी सामनेवाला यांना रक्कम रु.2,950/- या ई.एम.आय. चे नोव्हेंबर-2007 पासूनचे पोस्ट डेटेड चेक्स सप्टेंबर-2008 पर्यंतचे दिले व त्यांनतर Electronic Clearnace System व्दारे EMI चे पेमेंट करणेस सुरुवात केली. तक्रारदार यांचेच कृतीमुळे त्यांनी सामनेवाला यांनी ठरवून दिलेला रक्कम रु. 2,950/- चा EMI मान्य व कबूल होता हे स्पष्ट होते. त्याचे मागे आता तक्रारदार यांना जाता येणार नाही त्यास पुराव्याचा कलम 115 Rule of Estopple ची बाधा येते. तसेच यातील सामनेवाला यांनी तक्रारदार व त्यांचे पत्नीस EMI व्यतिरिक्त Principal Amount मध्ये जास्तीची रक्कम जमा करणेची असलेस Loan Offer Letter च्या अटी व शर्तीप्रमाणे 2 टक्के Levey changes भरुन Principal Amount मध्ये जास्तीची रक्कम भरता येईल असे सांगितले होते त्याप्रमाणे तक्रारदार व त्यांचे पत्नीने दि.28/01/2007 रोजी रक्कम रु;50,000/- व दि.22/01/2008 रोजी रक्कम रु.19,607.80पै. व दि.23/05/2008 रोजी रक्कम रु.13,725.50पै.दि.27/05/2008 रोजी रु.39,215.70 पै; व दि.27/05/08 रोजी रक्कम रु.9,803/- व त्यानंतर दि. 14/05/2009 रोजी रक्कम रुपये 1,25,428.05 पै. Principal Amount मध्ये हे त्यावर लागणा-या 2 टक्के Levey changes देऊन त्या त्या वेळेस भरल्या आहेत व सदरच्या रक्कमा ज्या त्या वेळेस Out Standing loan चे रक्कमेतून वजाही करणेत आल्या आहेत. त्यानंतर तक्रारदार व त्यांचे पत्नीने सदरचे कर्जाची उर्वरित संपूर्ण रक्कम मुदतीपूर्व भरली व कर्ज खाते पूर्णफेड केले असलेने सामनेवाला यांनी नियमाप्रमाणे Preclosure Penality Charges तक्रारदार यांचेकडून भरुन घेतले. क) वस्तुत: सामनेवाला यांनी, तक्रारदार व त्यांचे पत्नीचे IT Return व लोन ऑफर लेटर यांचा मेळ घालून EMI ची रक्कम वाढवून ती रु.2,950/- इतकी केली होती. त्यामध्ये सामनेवाला यांची कोणतीही व कसलेही चुकी नव्हती व नाही तसेच सामनेवाला यांनी तक्रारदार यांना देण्यात येणा-या सेवेमध्ये कोणतीही त्रुटी ठेवलेली नव्हती व नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासहीत फेटाळणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत तक्रारदाराचे व त्यांचे पत्नीचे सन 2001-02, 2002-03, 2005-06 चे इन्कमटॅक्स रिर्टनची प्रत, 2003-04 चे उत्पन्नाचे इन्कमटॅक्स रिर्टनची प्रत, सामनेवाला यांचे रजि. सर्टीफिकेट व नियम व शर्ती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच दि.28/04/2010 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदाराचे कर्जासंबंधी अटी व शर्तीचे लोन लेटर, तक्रारदाराने सदर कर्जाच्या अटी व शर्ती मान्य असलेबाबतचे दिलेले पत्र, तक्रारदारने सामनेवाला यांना दिलेला कर्जाचा खातेउतारा, तक्रारदार व सामनेवाला यांचे दरम्यान झालेले कर्जाचे करारपत्र व तक्रारदार यांनी सामनेवाला यांना दिलेले वटमुखत्यारपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे, तक्रारदार व सामनेवाला यांचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? --- होय-अंशत: 2) काय आदेश? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1:- तक्रारदाराने सामनेवालांकडून दि.14/07/2005 रोजी रक्कम रु.11,90,000/- इतके स्थावर तारण कर्ज अकौन्ट नं.47006477 घेतले होते. त्याचा मासिक हप्ता रु.9,627/- व मुदत 20 वर्षाची होती. मात्र लिक्विडेशन डेट सन 2045 इतकी दिसून येते. ईएमआय वाढवून कर्जफेडीची मुदत कमी करणेबाबत फेर करार केलेला आहे इत्यादीबाबतची स्वतंत्र तक्रार क्र.30/2010 तक्रारदाराने केलेली आहे. प्रस्तुत तक्रारीत पुन्हा तेच मुद्दे उपस्थित केलेले आहेत. सबब तक्रार क्र.30/2010 ही तक्रार लोन अकौन्ट नं.47006477 निर्णित करणेत आली असल्यामुळे पुन्हा प्रस्तुत तक्रारीत उपस्थित नमुद कथनांचा विचार करता येणार नाही असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदाराने वर नमुद कर्जाबरोबर सामनेवाला यांचेकडून दि.04/02/2006 रोजी रक्कम रु.2,95,000/- इतके स्थावर तारण कर्ज घेतले होते. सदर कर्जाचा अकौन्ट नं.47006669 असून व्याजदर फ्लोटींग होता. कर्ज फेडीची मुदत 20 वर्ष होती व मासिक हप्ता रु.2,376/- होता व त्याप्रमाणे उभय पक्षांमध्ये करारही झालेला होता. दि.20/07/2007 रोजी नमुद कर्जापोटी मुद्दलापोटी कमी व व्याजापोटी जास्त रक्कम सामनेवाला हे जमा करुन घेत असलेने हप्त्याची रक्कम वाढवून कर्ज फेडीची मुदत 10 वर्षे करणेसाठी विनंती अर्ज दिलेला होता व सदरचा अर्ज निशा मनवाडकर यांनी सही शिक्क्यानिशी स्विकारलेचे दाखल कागदपत्रावरुन दिसून येते. तसेच त्याबाबत फेर करार झालेचे तक्रारदाराने नमुद केलेले आहे. मात्र फेरकराराबाबत कोणताही स्वयंस्पष्ट पुरावा प्रस्तुत कामी दाखल नाही. नमुद कर्जाची लिक्विडेशन डेट ही सन 2037 होती. सदरची तारीख तक्रारदाराचे संमत्तीशिवाय वाढवणेत आली होती. त्याची सुचना सामनेवाला यांना दिलेली होती. त्यावेळी सदर गोष्ट ही करारातील अटीचा भंग व आरबीआय चे कर्ज फेडीच्या वयोमर्यादेचे उल्लंघन करत असलेबाबत कळवले तसेच सामनेवालांनी तक्रारदार व त्यांची पत्नीकडून 10 को-या प्रॉमिसरी नोटस घेतलेचे व सदर प्रॉमिसरी नोटसचा वापर करुन कायदेशीर कारवाई करणेची धमकी दिली याबाबत तक्रारदाराने स्वयंस्पष्ट कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तसेच नमुद कर्ज दबावापोटी फेड करणेबाबतही भाग पाडले याबाबतचा कोणताही स्वयंस्पष्ट पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही. तक्रारदाराकडे सदर कथनाखेरीज अन्य कोणताही पुरावा प्रस्तुत कामी दाखल नसल्यामुळे तक्रारदार ही बाब सिध्द करु शकलेले नाहीत. तसेच दि;28/12/2007 रोजी रु.51,000/- नमुद कर्जखातेपोटी भरुनही त्याची रिपेमेंट स्टेटमेंटमध्ये जाणीवपूर्वक नोद केली नसलेचे तक्रारदाराने नमुद केले आहे. मात्र तक्रारदार स्वत: तक्रारीत नमुद करतात की कर्ज रक्कम रु.2,84,459/- वरुन रु.2,33,096/- इतकी दाखवली आहे. तसेच तक्रारदारांना डिफॉल्टर दाखवणेसाठी दि.04/12/2007 रोजी भरलेला ईएमआय हा तक्रारदाराचे डोळयादेखत कॉम्प्युटरवरुन डिलीट केला व खोटा पुरावा निर्माण करुन बदनामी करुन तक्रारदाराचे आर्थिक शोषण केले. याचा विचार करता तक्रारदाराने भरलेल्या रक्कमा दि.28/12/2007 रोजी रक्कम रु.51,000/-,दि.22/01/2008रोजीरु.20,000/-, दि.23/01/2008रोजीरु.14,000/-,दि.23/05/2008रोजी रु.40,000/- दि.27/05/2008 रोजी रु.10,000/- अशा रक्कमा भरलेचे दिसून येते. मात्र दाखल केलेल्या नमुद स्टेटमेंटमध्ये रु.51,000/- च्या रिसीटबाबत नोंद नाही. मात्र दाखल असलेल्या रिसीटवर आऊट स्टँडींग बॅलन्स कमी दाखवलेला आहे. रु.51,000/- ची नोंद तक्रारदाराच्या खातेउता-यावर केलेली नाही ही सामनेवालांची सेवात्रुटी आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच तक्रारदाराने दि.16/12/2009 रोजी सामनेवाला कंपनीने वेळेवर हप्ते भरुनही आर्थिक नुकसान केलेमुळे कर्ज ट्रान्सफर करणेचे असून त्यासाठी लागणारे चार्जेस भरणेस तयार असलेचे तक्रारदाराने कळवलेले आहे. तसेच दि.12/01/2010 व 25/01/2010 रोजी फेर करारपत्राच्या सत्यप्रतीची मागणी केलेली आहे. तसेच माहितीच्या अधिकारात कर्जखातेसंदर्भात ईएमआय व्याजदर इत्यादीबाबत मागणी केलेली आहे. सामनेवालांनी आपल्या म्हणणेमध्ये तक्रारदारास अथवा त्यांचे पत्नीस कधीही डिफॉल्टर ठरवलेले नव्हते व नाही अथवा कर्ज खाते बंद करणेबाबत कधीही सांगितले नव्हते व नाही. खरोखरच अशी घटना घडली असती तर सामनेवालांकडून तक्रारदारास तुम्ही थकबाकीदार आहात त्यामुळे खाते बंद करा अथवा कर्ज एकरक्कमी फेड करा अशी पत्रे पाठवली असती. तक्रारदाराचे म्हणणेप्रमाणे सामनेवाला यांनी असे कृत्य केले असते तर त्याबाबतचा तक्रारदाराने पुरावा सदर कामी दाखल करावयास हवा होता तो केलेला नाही. सबब तक्रारदाराचे सदर कथनास कोणताही कायदेशीर अर्थ नाही. तक्रारदाराने स्वेच्छेनेच वेळोवेळी मुद्दलापोटी लेव्ही चार्जेस भरुन रक्कमा भरलेल्या आहेत. एकीकडे तक्रारदार वाढीव हप्ता मागून कर्जफेडीची मुदत कमी करणेबाबत विनंती करतात तर दुस-या बाजूस त्यांचे पत्नीचे पूर्वपंरापरांगत चालत आलेले दागिने व मुलीच्या लग्नासाठीचे दागिने गजानन नागरी सह.पत संस्थेत गहाणवट ठेवून नमुद कर्जाची परत फेड केलेचे प्रतिपादन केले आहे व त्याबाबतचे कागदपत्र कामात दाखल आहेत. मात्र सदर कृत्य करणेस तक्रारदारास सामनेवालांनी भाग पाडले ही बाब तक्रारदार सिध्द करु शकलेले नाहीत.
नमुद कर्जप्रकरणातील करारपत्र सामनेवाला यांनी दाखल केलेली आहेत व सदर करारपत्राच्या क्लॉज 2(6)(v) प्रमाणे व्याजदरातील फरकामुळे मासिक हप्ता वाढवता अथवा कमी करता येत असलेचे नमुद केले आहे व सदर क्लॉजनुसार व्याजदर वाढल्याने ईएमआय वाढवला आहे व वेळोवेळी वाढीव व्याजदराच्या फरकाच्या रक्कमा जमा करुन घेतलेचे प्रतिपादन केले आहे. तसेच तक्रारदाराने स्वेच्छेने स्वत:चे कर्ज खाते क्र.47006477 अॅक्सिस बँकेकडे वर्ग केले आहे. तसेच लोन खाते क्र.47006669 ची कर्जाची रक्कम मुदतीपुर्व भरलेने नमुद कर्जाचे प्रिक्लोजर चार्जेस तक्रारदाराकडून भरुन घेऊन त्यांना नो डयूज सर्टीफिकेट दिलेले आहे. तसेच 8 प्रॉमिसरी नोटस तक्रारदारास परत केलेल्या आहेत. सबब नमुद कर्जप्रकरणा बाबत सामनेवाला यांनी उभय पक्षामध्ये झालेल्या कराराप्रमाणे कार्यवाही केली असल्यामुळे याबाबत सामनेवाला यांची सेवात्रुटी दिसून येत नाही. मात्र तक्रारदाराने दि.28/12/2007 रोजी रु.51,000/- भरुनही सदरची नोंद तक्रारदारचे कर्ज खातेस दिसून येत नाही. तसेच दि.14/05/2009 रोजी रु.1,27,936/- या एकाच रक्कमेच्या दोन रिसीट प्रस्तुत प्रकरणात दाखल आहेत. पैकी रिसीट नं.0361516 वर सही दिसून येते व रिसीट नं.0361515 वर सही नाही. या दोन्ही रिसीटच्या सत्यप्रती तक्रारदाराने दाखल केलेल्या आहेत. रक्कमा भरुनही रक्कमांची कर्ज खातेवर नोंद न करणे एकाच रक्कमेच्या दोन रिसीट देणे. लिक्विडेशन डेट नोंदीबाबत वारंवार दोष निर्माण होणे या सामनेवालांच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहेत. सामनेवाला यांनी सेवेत अंशत: त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदाराने प्रॉमिसरी नोटस घेतलेले असून ते हजर करणेविषयी विनंती केलेली आहे. मात्र सामनेवालांनी आठ प्रॉमिसरी नोट परत दिलेचे प्रतिपादन केलेले आहे. तक्रारदाराचे काही कागदपत्र सामनेवालांकडे असतील तर ते तक्रारदारास परत करावीत अशी अपेक्षा हे मंच व्यक्त करीत आहे. मुद्दा क्र.2 :- सामनेवाला यांचे कॉम्प्युटर दोषामुळे तक्रारदाराच्या मनामध्ये संम्रभावस्था निर्माण झाली व लिक्विडेशन डेट कॉम्प्युटर दोषामुळे नोंदली गेलेचे मान्य करुन त्याबाबतचा खुलासा सामनेवाला यांनी केलेला आहे. नैसर्गिक न्यायतत्वाच्या दृष्टीने सदरची चुक क्षमायोग्य आहे. मात्र रक्कमा भरुनही खातेउता-यावर नोंद न करणे एकाच रक्कमेच्या दोन रिसीट देणे तक्रारदाराने माहिती विचारुनही त्याचे तक्रारीचे निराकरण न करणे यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास झालेला आहे. सबब तक्रारदार मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत. तक्रारदाराच्या अन्य मागण्या मान्य करता येणार नाहीत. सदर कर्ज प्रकरणामुळे तक्रारदारास आरोग्याच्या अडचणी निर्माण झाल्या ही बाब हे मंच ग्राहय धरु शकत नाही. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) सामनेवालांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-(रु. पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |