द्वारा - श्री.शि.भि.धुमाळ : मा.अध्यक्ष
1. ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणे -
तक्रारदारांची मयत पत्नी सलमा एफ. नाईक हिने सामनेवाला यांचेकडून लाईफ इन्शुरंन्स पॉलिसी नं.906378796 दि.01/02/1991 रोजी घेतली होती. सदरची विमा पॉलिसी 25 वर्षाच्या कालावधीसाठी होती. सदर पॉलिसीमध्ये तक्रारदारांनी एकमेव नॉमिनी/असाय्नी असल्याचे नमूद केले आहे. तक्रारदारांची पत्नी श्रीमती सलमा हिचे मुंबई येथे दिनांक 26/11/2005 रोजी निधन झाले. तक्रारदार हे वर नमूद पॉलिसीमध्ये नॉमिनी असल्यामुळे त्यांना पॉलिसीची रक्कम मिळणे आवश्यक होते. मूळची विमा पॉलिसी ही तक्रारदारांचे सासरे म्हणजेच मयत श्रीमती सलमा एम्.नाईक हिच्या वडिलांच्या ताब्यात होती. तक्रारदारांनी दि.30/08/2006 रोजी वकीलामार्फत सामनेवाला यांना पत्र पाठवून त्यांना विमा पॉलिसीची रक्कम द्यावी अशी मागणी केली. त्यानंतर दि.09/10/2006 रोजी तक्रारदारांचे वकीलांनी सामनेवाला यांचे शाखा कार्यालय क्र.919, मुंबई येथे स्वतः चौकशी केली असता त्यांना विमा पॉलिसीची रक्कम सामनेवाला यांनी यापूर्वीच दिलेली आहे असे सांगितले. तक्रारदारांचे वकीलांनी सामनेवाला यांना दि.08/11/2006 रोजी पत्र पाठविले असता त्यास सामनेवाला यांनी दि.06/01/2007 रोजी उत्तर पाठवून तक्रारदारांनी श्रीमती सलमा यांना तलाक दिला होता व त्या तलाकनाम्याचे पत्र सामनेवाला यांना देण्यात आल्यानंतर विमा पॉलिसीची रक्कम देण्यात आल्याचे सांगितले. तक्रारदारांनी कथाकथीत तलाकनाम्याची प्रत सामनेवाला यांचेकडे मागितली. तक्रारदारांनी तथाकथीत तलाकनाम्यावर कधीही सही केलेली नव्हती. सदरचा तलाकनामा हा खोटा व बनावट असल्यामुळे सामनेवाला यांचेकडून विम्याची रक्कम मागितली. तथापि, सामनेवाला यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही सबब तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दाखल करुन त्यांची मयत पत्नी श्रीमती सलमा हिच्या विमा पॉलिसीतील संपूर्ण रक्कम त्यावर 18 टक्के व्याजासहित सामनेवाला यांनी द्यावी अशी तक्रारदारांनी मागणी केली आहे. तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून नुकसानभरपाई दाखल 50,000/- व या अर्जाच्या खर्चाच्या खर्चापोटी रक्कम रु.10,000/- ची मागणी केली आहे.
2) सामनेवाला यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्य केली आहे. तक्रारअर्ज खोटा असून सामनेवाला यांना मुद्दाम त्रास देण्यासाठी दाखल केला असल्यामुळे तो खर्चासहित रद्द करणेत यावा असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे.
3) सामनेवाला यांनी श्रीमती सलमा एफ.नाईक यांना विमा पॉलिसी नं.906378796 दि.01/02/1991 रोजी दिलेली होती व सदर विमा पॉलिसीमध्ये श्रीमती सलमा नाईक यांनी तिचे पती यांना नॉमिनी म्हणून व तिचा मुलगा शाबाझ याची अल्टरनेट नॉमिनी म्हणून नेमणूक केली होती. वरील पॉलिसीची छायांकित प्रत सामनेवाला यांनी कैफीयतसोबत नि.1 ला दाखल केली आहे. विमाधारक श्रीमती सलमा यांचे दि.26/11/2005 रोजी निधन झाले. त्यानंतर विमाधारकाच्या मुलाने म्हणजेच शाबाझ फजल नाईक याने क्लेम पेपर्स विमा नं.3783, डिस्चार्ज फॉर्म, कॉपी ऑफ तलाक-इ-बेन तारीख 15/10/2005 रु.100/-च्या नॉन ज्युडिसिअल युनायटेड एमिरेटस् स्टॅम्प पेपरवर तयार केलेला, तसेच विमाधारकाचे मृत्यु पत्र, मृत्यकारण बाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र, इन्डीम्नीटी बॉंण्ड, इत्यादी कागदपत्रे दाखल केली. सदर कागदपत्रांच्या प्रती सामनेवाला यांनी नि.2 ला सादर केल्या. तलाकनाम्यातील मजकूरामध्ये तक्रारदारांनी त्यांचे मयत पत्नीच्या स्टॅण्डर्ड व जंगम मालमत्तेवरील सर्व हक्क सोडून दिले आहेत असे स्पष्ट लिहिले आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता व दरम्यानच्या काळात अल्टरनेट नॉमिनी शाबाझ एफ.नाईक हा सज्ञान झाल्यामुळे व त्याने आवश्यक ते कागदपत्रे सादर केल्यामुळे सामनेवाला यांनी विमा पॉलिसीची सर्व रक्कम शाबाझ एफ.नाईक याला दि.08/05/2006 रोजी दिली.
4) तक्रारदारांच्या वकीलांतर्फे नोटीस मिळाल्यानंतर सामनेवाला यांनी दि.11/11/06 रोजी पत्राने त्याचे वरिष्ठ अधिका-यांसमोर त्यांची केस मांडली असल्याचे त्यांना कळविले. त्यानंतर दि.06/01/07 रोजी सामनेवाला यांनी या पूर्वीच विमा पॉलिसीची रक्कम शाबाझ एफ.नाईक यांना दिल्याचे कळविले. असे असताना तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज मुद्दामहून दाखल करुन सामनेवाला यांचेकडून विमा पॉलिसीची रक्कम त्यावर व्याज इत्यादींची मागणी केली आहे. तक्रारदारांची सदरची मागणी चुकीची असून सामनेवाला तक्रारदारांना कोणतीही रक्कम देणे लागत नाही त्यामुळे सदरचा तक्रारअर्ज खर्चासहित रद्द करण्यात यावा असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे. तक्रारदारांनी तक्रारअर्जाच्या पुष्टयर्थ त्याचे शपथपत्र दाखल केले आहे तसेच तक्रारअर्जासोबत यादीप्रमाणे कागदपत्रे दाखल केले आहेत. सामनेवाला यांनी कैफीयतसोबत विमा पॉलिसीची छायांकित प्रत, तलाकनाम्याची छायांकित प्रत, मयत विमा पॉलिसीधारकाच्या मृत्युच्या दाखल्याची प्रत, शाबाझ एफ.नाईक यांनी विमा पॉलिसीची रक्कम मिळण्यासाठी सादर केलेले कागदपत्रे, इत्यादी कागदपत्रे दाखल केले आहेत.
5) याकामी तक्रारदारांनी लेखी युक्तिवाद दाखल केला तसेच सामनेवाला यांनीही लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदारांचे वतीने वकील श्री.एम्.ए.खान तसेच सामनेवाला यांचे वकील श्री.निवीनकुमार या दोघांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यात आला व सदर प्रकरण निकालासाठी ठेवण्यात आले.
6) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात -
मुद्दा क्र.1 - तक्रारदार हे सामनेवाला यांचे सेवेत कमतरता आहे हे सिध्द करतात काय ?
उत्तर - नाही.
मुद्दा क्र.2 - तक्रारदारांना तक्रारअर्जात नमूद केल्याप्रमाणे विम्याची रक्कम, व्याज, नुकसानभरपाई इत्यादी सामनेवाला यांचेकडून मागता येईल काय ?
उत्तर - नाही.
कारणमिमांसा
स्पष्टीकरण मुद्दा क्र.1 - खालील गोष्टी उभयपक्षकारांना मान्य आहेत -
तक्रारदारांची मयत पत्नी सलमा एफ.नाईक हिने सामनेवाला यांचेकडून लाईफ इन्शुरंन्स पॉलिसी नं.906378796 दि.01/02/1991 रोजी 25 वर्षाच्या कालावधीसाठी घेतली होती. सदरची पॉलिसीची छायांकित प्रत सामनेवाला यांनी कैफीयतसोबत नि.1 ला दाखल केली आहे. सदर पॉलिसीमध्ये तक्रारदारांना एकमेव नॉमिनी/असाय्नी लिहिण्यात आले आहे. तसेच विमाधाकारचा मुलगा मास्टर शाबाझ एफ.नाईक यांचे नांव अल्टरनेट नॉमिनी म्हणून लिहिले आहे ही गोष्ट उभयपक्षकारांच्या वकीलांनी युक्तिवादाचे वेळी मान्य केली आहे. विमा पॉलिसीधारक श्रीमती सलमा एफ.नाईक यांचे निधन मुंबई येथे दि.26/11/2005 रोजी झाले. तिच्या मृत्युच्या दाखल्याची छायांकित प्रत सामनेवाला यांनी दाखल केली आहे. विमाधारकच्या मृत्युनंतर सामनेवाला यांनी मयत श्रीमती सलमा यांचे अल्टरनेट नॉमिनी शाबाझ एफ.नाईक यांना दि.08/05/2006 रोजी विमा पॉलिसीची रक्कम दिली असे सामेनवाला यांचे म्हणणे असून सामनेवाला यांनी शाबाझ एफ.नाईक यांनी विमा पॉलिसीचे पैसे मिळण्यासाठी दाखल केलेला व अर्ज व त्यासोबतची कागदपत्रे सादर केली आहेत.
तक्रारदारांचे म्हणण्याप्रमाणे सामनेवाला यांनी विमा पॉलिसीची रककम चुकीने व बेकायदेशीरपणे मयत विमाधारकाचा मुलगा शाबाझ एफ.नाईक यांना दिली आहे व ती सामनेवाला यांचे सेवेतील कमतरता आहे. तक्रारदार हे व्यावसायानिमित्ताने दुबई येथे राहतात. तक्रारदारांची मयत पत्नी तिच्या वडिलांकडे नवी मुंबई येथे राहात होती व सदर विमा पॉलिसीचे कागदपत्रे तिने तिच्या वडिलांकडे दिले होते. पत्नीच्या निधनानंतर तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून विमा पॉलिसीचे पैसे मिळावे म्हणून सामनेवाला यांचेकडे मागणी केली असता त्यास सामनेवाला यांनी यापूर्वीच दि.08/05/2006 रोजी विमा पॉलिसीचे पैसे विमाधारकाचे अल्टरनेट नॉमिनी शाबाझ एफ. नाईक यांना दिले असल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी त्यांचे वकीलांमार्फत सामनेवाला यांना नोटीस पाठविल्यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या मुलाने दाखल केलेल्या तलाकनाम्याच्या आधारे शाबाझ नाईक यांना पैसे दिले असल्याचे सांगितले. तक्रारदारांच्या वकीलांच्या म्हणण्याप्रमाणे तलाकनामा हा बनावट दस्तऐवज असून तक्रारदाराने त्यांची मयत पत्नी श्रीमती सलमा हिला कधीही तलाक दिलेला नव्हता तसेच तथाकथीत तलाकनाम्यावर कधीही सही केली नव्हती. सामनेवाला यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा पॉलिसीचे पैसे शाबाझ एफ. नाईक यांना दिले व सदर घेतलेला निर्णय हा चुकीचा असल्यामुळे विमा पॉलिसीपोटी देय असणारी रक्कम तक्रारदार हे नॉमिनी असल्यामुळे तक्रारदारांना देण्याचा सामनेवाला यांना आदेश करणेत यावा अशी विनंती तक्रारदारांतर्फे करण्यात आली. सामनेवाला यांचे वकील श्री.नवीनकुमार यांनी विमा पॉलिसीची छायांकित प्रत निदर्शनास आणली. त्यामध्ये तक्रारदारांचे नांव नॉमिनी म्हणून लिहिलेले आहे तसेच मयत विमाधारक श्रीमती सलमा हिने तिचा मुलगा मास्टर शाबाझ एफ. नाईक याचे नांव अल्टरनेट नॉमिनी म्हणून लिहिलेले आहे. विमाधारकाचा मृत्यु झाल्यानंतर शाबाझ याने विमा पॉलिसीपोटी पैसे मिळण्यासाठी सामनेवाला यांचेकडे अर्ज दाखल केला व त्यासोबत विमाधारकास तक्रारदाराने दिलेल्या तलाकनाम्याची छायांकित प्रत इ. कागदपत्रे दाखल केले. सामनेवाला यांचेकडे दाखल करण्यात आलेला तलाकनामा 100/- रुपयांच्या नॉन ज्युडीशिअल स्टॅम्प पेपरवर तयार करण्यात आला असून त्यावर तक्रारदारांनी युनायटेड अरब अमिरेटस येथे सही केल्याचे दिसून येते. तलाकनाम्यातील मजकूर विचारात घेवून तसेच मयत विमाधारक श्रीमती सलमा हिने तिच्या मुलाचे नांव अल्टरनेट नॉमिनी म्हणून नोंदविले असल्याचे तसेच त्यांने दाखल केलेल्या इतर कागदपत्राची पूर्तता केल्यामुळे विमाधारकाचा मुलगा शाबाझ एफ. नाईक यांना पैसे दिल्याचा घेतलेला निर्णय योग्य व कायदेशीर आहे. मयत विमा पॉलिसीधारक श्रीमती सलमा हिचे निधन दि.26/11/2005 रोजी झाल्यानंतर प्रथमतः दि.30/08/2006 तक्रारदारांनी वकीलांमार्फत सामनेवाला यांना पत्र पाठवून विमा पॉलिसीची रक्कम मागितली. तथापि, त्यापोटी सामनेवाला यांनी मयत विमाधारकाचा मुलगा शाबाझ यांना विमा पॉलिसीपोटी देय असणारी रक्कम दि.08/05/06 रोजी दिलेली होती. सामनेवाला यांनी विमा पॉलिसीपोटी देय असणारी रक्कम मयत विमाधारकाचा मुलगा शाबाझ यांचे नांव विमा पॉलिसीमध्ये अल्टरनेट नॉमिनी म्हणून असल्यामुळे तसेच त्याने विमाधारकाचा मृत्यु झाल्यानंतर विम्याचे पैसे मिळण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे सहा महिन्यांमध्ये दिलेली आहेत. सामनेवाला यांनी मयत विमाधारकाचा मुलगा शाबाझ यांना विमा पॉलिसीची रक्कम देण्याचा घेतलेला निर्णय योग्य व कायदेशीर असल्यामुळे ती सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता आहे असे म्हणता येणार नाही.
उपलब्ध कागदपत्रांवरुन असे दिसून येते की, तक्रारदार हे त्यांचे पत्नीचे निधन होण्यापूर्वीपासून व्यावसायानिमित्त दुबईत येथे राहतात. तक्रारदारांची मयत पत्नी नवी मुंबई येथे तिच्या वडिलांच्या घरी राहत होती. मयत सलमा हिने सामनेवाला यांचेकडून जी विमा पॉलिसी सन् 1991 मध्ये घेतली होती त्यामध्ये तक्रारदारांचे नांव नॉमिनी व तिचा मुलगा शाबाझ यांचे नांव अल्टरनेट नॉमिनी म्हणून नमूद केलेले आहे. विमाधारक सलमा हिचा मृत्यु झाल्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून क्लेमबाबत प्रथमतः ऑगस्ट, 2006 मध्ये चौकशी केल्याचे दिसते तथापि, त्यापूर्वीच सामनेवाला यांनी विमाधारकाचा मुलगा शाबाझ यांना विमा पॉलिसीपोटी देय असणारी रक्कम दि.08/05/2006 रोजी दिलेली होती. सामनेवाला यांचेकडे शाबाझ एफ. नाईक याने विमा पॉलिसीची रक्कम मिळण्यासाठी केलेला अर्ज व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे सामनेवाला यांनी दाखल केली आहेत. सदर कागदपत्रामध्ये दि.15/10/2006 रोजी मयत सलमा एफ. नाईक हिला तक्रारदारांनी दिलेल्या तलाकनाम्यावर युनायटेड अरब अमिरेटस् येथे तक्रारदारांची सही केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. तक्रारदारांनी मयत सलमा यांना कधीही तलाक दिलेला नव्हता. वर नमूद केलेला तलाकनामा हा बनावट व बेकायदेशीर आहे असे तक्रारदारांनी योग्य त्या न्यायालयाकडून अद्यापही ठरवून घेतलेले नाही. दरम्यानच्या काळात तक्रारदार दुबई येथे राहत असताना व विमा पॉलिसीमध्ये अल्टरनेट नॉमिनी म्हणून शाबाझ यांचे नांव लिहीलेले असताना व त्यांनी दाखल केलेल्या कागपत्रांचा विचार करुन विमा पॉलिसीचे पैसे सामनेवाला यांनी शाबाझ यांना देण्याचा घेतलेला निर्णय समर्थनिय वाटतो. अशा त-हेने वरील परिस्थीतीत विमा पॉलिसीपोटी देय असणारी रक्कम सामनेवाला यांनी विमाधारकाचा मुलगा शाबाझला दिल्यामुळे सामनेवाला यांचे सेवेत कमतरता आहे असे म्हणता येणार नाही. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
स्पष्टीकरण मुद्दा क्र.2 - तक्रारदारांना सामनेवाला यांचे सेवेत कमतरता आहे हे सिध्द करता आले नाही. विमा पॉलिसीपोटी देय असणारी संपूर्ण रक्कम सामनेवाला यांनी मयत विमाधारकाचा मुलगा शाबाझ एफ. नाईक ज्यांचे नांव विमा पॉलिसीमध्ये अल्टरनेट नॉमिनी म्हणून नमूद करण्यात आले आहे त्यास दि.08/05/2006 रोजी दिलेली आहे. त्यामुळे तक्रारदारांना सामनेवाला यांचेकडून विमा पॉलिसीची रक्कम, व्याज व नुकसानभरपाई किंवा या अर्जाच्या खर्च मागता येणार नाही सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर नाकारार्थी देणेत येते.
वर नमूद कारणास्तव तक्रारअर्ज रद्द होणेस पात्र आहे. सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे -
अं ति म आ दे श
1.तक्रार क्रमांक 118/2007 खर्चासहित रद्द करणेत येत आहे.
2. सदर आदेशाची प्रमाणित उभय पक्षकारांना देणेत यावी.