::: आ दे श :::
( पारित दिनांक : 30/01/2018 )
माननिय अध्यक्षा, सौ. एस. एम. ऊंटवाले, यांचे अनुसार : -
1) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे :-
तक्रारकर्तीचे पती मांगीलाल राठोड हे व्यवसायाने शेतकरी होते. दिनांक 08/05/2016 रोजी, तक्रारकर्तीचे पती व मुलगा नारायण राठोड हे दोघेही मोटार सायकलवर जात असतांना, त्यांच्या गाडीला जीप क्र. एमएच-37-इ-9701 चे चालकाने धडक दिली व त्या अपघातामध्ये तक्रारकर्तीचे पती मरण पावले.
तक्रारकर्तीचे पती आम आदमी विमा योजनेचे लाभार्थी असल्यामुळे व त्याचा विमा हप्ता महाराष्ट्र सरकारने भरलेला असल्यामुळे सदरहू विमा योजनेचा लाभ मिळण्याकरिता तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाकडे अर्ज केले होते. परंतु कोणताही लाभ मिळालेला नाही. या योजनेनुसार सदस्य अपघाती मरण पावल्यास रुपये 75,000/- नुकसान भरपाई पोटी मिळत असतात. तक्रारकर्तीच्या पतीच्या अपघाताचे काळात ही योजना चालू स्थितीत होती. हया योजनेचा लाभ मिळण्याकरिता तक्रारकर्तीने विरुध्द पक्षांकडे रितसर अर्ज केले आहेत, विरुध्द पक्षांकडून विमा रक्कम मिळाली नाही. तक्रारकर्तीचे पुढे असे म्हणणे आहे की, तिच्या मयत पतीची जन्मतारीख ही जि.प.कें. प्राथमिक शाळा, शेंदुरजना यांच्या रेकॉर्डनुसार दिनांक 05/07/1967 आहे व अपघात दिनांक 08/05/2016 चा आहे. म्हणजे ते 60 वर्षाच्या वर नव्हते. परंतु विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी दिनांक 02/03/2017 रोजी पत्र देवून, तक्रारकर्तीच्या पतीचे वय मृत्यूसमयी 60 वर्षाच्या वर असल्याने ते या विमा योजनेस पात्र नाही, असे कळविले. ही सेवा न्युनता आहे.
म्हणून, प्रस्तुत तक्रारअर्ज दाखल करुन, विमा रक्कम रुपये 75,000/- व त्यावर तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासुन द.सा.द.शे. 18 % दराने व्याज , तसेच शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 20,000/- व तक्रार खर्च रुपये 5,000/- विरुध्द पक्षाकडून मिळावेत, या व्यतिरिक्त योग्य ती दाद द्यावी, अशी विनंती केली. तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्ठयर्थ दस्तऐवज यादीप्रमाणे कागदपत्रे दाखल केलीत.
2) विरुध्द पक्ष क्र. 1 यांच्याविरुध्द विना लेखी जबाब आदेश दिनांक 09/10/2017 रोजी मा. सदस्यांनी पारित केला होता. परंतु विरुध्द पक्ष क्र. 1 यांच्या वकिलांनी कायदेशीर मुद्दयावर युक्तिवाद केला तो खालीलप्रमाणे.
आम आदमी विमा योजना ही केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाने चालविलेली आहे व त्याचे सदस्य भुमीहीन मजूर, ज्यांचे वय 18-59 आहे, त्यांचीच नोंदणी होते. सदर प्रकरणात नोडल ऑफीसर म्हणून विरुध्द पक्ष क्र. 2 तहसिलदार, मानोरा हे आहेत. जे सदस्यांचा पुर्ण डाटा विरुध्द पक्ष क्र. 1 यांना देतात. आम आदमी विमा योजने अंतर्गत नैसर्गीक मृत्यूमध्ये विमा रक्कम रुपये 30,000/- व अपघाती मृत्यूमध्ये रक्कम रुपये 75,000/- मिळते व ही जबाबदारी वयाच्या 60 वर्षापर्यंत असते. मयत विमाकृत सदस्य मांगीलाल सोमला राठोड यांची माहिती विरुध्द पक्ष क्र. 2 – नोडल एजन्सी यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 कडे पाठवली होती, त्यामध्ये त्याची जन्मतारीख दिनांक 17/04/1953 अशी दाखविली होती, ज्यानुसार त्याचे 60 वर्षे वय हे दिनांक 17/04/2013 रोजी संपत होते. म्हणून विम्याची मुदत देखील दिनांक 17/04/2013 ला संपत होती व त्यांचा मृत्यू दिनांक 08/05/2016 ला झाला असे दिसते. म्हणजे मृत्यू तारखेच्या आधी 60 वर्षाचे वय संपले होते. म्हणून तक्रारकर्तीचा क्लेम नाकारला होता. सदर तक्रारीत, तक्रारकर्तीने मयत विमाधारकाची जन्मतारीख जि.प. शाळा, शेंदुरजना यांच्या टी.सी. या दाखल्यावरुन दिनांक 05/07/1967 नमूद केली आहे. त्यामुळे सदर शाळेचे प्रमाणपत्र हे विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी साक्षांकित करुन विरुध्द पक्ष क्र. 1 कडे पाठवल्यास, विरुध्द पक्ष क्र. 1 हे क्लेम सेटल करतील. म्हणून यात विरुध्द पक्ष क्र. 1 चा हेतुपूरस्सर क्लेम न देण्याचा विचार नाही.
3) विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी मंचात हजर राहून, असे कळविले की, तक्रारकर्तीचा विमा दावा, मा. जिल्हाधिकारी, वाशिम (संगायो विभाग) यांच्या मार्फत विरुध्द पक्ष क्र. 1 कडे पाठवला असता, त्यांनी दिनांक 02/03/2017 रोजी खालील कारणामुळे दावा अपात्र ठरविला.
1) मृतक हा मृत्यूसमयी 60 वर्षाच्या वर होता.
2) मृतकाची जन्मतारीख 17/04/1953 आहे व मृत्यू दिनांक 09/05/2016
चा आहे. त्यामुळे त्याचे वय 60 वर्षाच्या वर असल्याने, दावा खारिज
करण्यात येत आहे.
विरुध्द पक्ष क्र. 2 चे असे कथन आहे की, मृत विमाधारकाची जन्मतारीख 17/04/1953 असल्याबाबतचा पुरावा, विरुध्द पक्ष क्र. 1 ने त्यांच्या कार्यालयास सादर केला नाही. ऊलट या कार्यालयाने मृत्यू दाव्यासोबत मृतकाचा शाळा सोडल्याचा दाखला जोडून पाठविला होता, ज्यामध्ये जन्मतारीख 05/07/1967 नमूद आहे.
4) अशाप्रकारे उभय पक्षांचा युक्तिवाद एैकल्यानंतर मंचाचे असे मत आहे की, सदर आम आदमी विमा योजना ही केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार यांनी चालविलेली योजना असल्यामुळे, विरुध्द पक्ष क्र. 2 व ईतर शासन अधिकारी या योजनेची नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. म्हणजे या सर्व नोडल एजन्सी मार्फत, विमाधारकाचा क्लेम पूर्ण माहितीसह जसे की, जन्मतारीख व वयाची माहिती घेवून, विरुध्द पक्ष क्र. 1 कडे सेटल करण्याकरिता दाखल होतो. सदर प्रकरणात मृत विमाधारकाच्या शाळेच्या प्रमाणपत्रावरुन(शाळा सोडल्याचा दाखला) त्याची जन्मतारीख ही 05/07/1967 नमूद आहे व सदर प्रमाणपत्र मंचाने अस्सल प्रमाणपत्रावरुन, व्हेरीफाय करुन घेतले आहे. सदर प्रमाणपत्रात नमूद असलेली जन्मतारीख कायद्याने ग्राहय धरणे आवश्यक आहे. परंतु सदर प्रकरणात विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करुन, चुकीची जन्मतारीख विरुध्द पक्ष क्र. 2 ने पाठवली असे विरुध्द पक्ष क्र. 1 चे म्हणणे आहे. विरुध्द पक्ष क्र. 2 ने जरी चुकीची जन्मतारीख कळविली तरी, तक्रारकर्ती विरुध्द पक्ष क्र. 2 ची ग्राहक होत नसल्याने त्यांच्याविरुध्दचे आक्षेप मंचाला तपासता येणार नाही. विरुध्द पक्ष क्र. 1 ची लेखी युक्तिवादातील कबुली पाहता, विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी हेतुपूरस्सर तक्रारकर्तीचा क्लेम नाकारला नाही, असे गृहीत धरुन, त्यांनी तक्रारकर्तीचा आम आदमी विमा दावा रुपये 75,000/- ईतक्या रक्कमेचा मंजूर करावा व प्रकरण खर्च रक्कम रुपये 5,000/- द्यावे, असे आदेश पारित केल्यास ते न्यायोचित होईल, असे मंचाचे मत आहे.
सबब, अंतिम आदेश खालीलप्रमाणे पारित केला.
- तक्रारकर्तीची तक्रार फक्त विरुध्द पक्ष क्र. 1 विरुध्द अंशतः मंजूर करण्यांत येते.
- विरुध्द पक्ष क्र. 1 – यांनी तक्रारकर्तीस आम आदमी विमा योजने अंतर्गत विमा रक्कम रुपये 75,000/- (अक्षरी – रुपये पंचाहत्तर हजार फक्त ) अदा करावे व प्रकरणाच्या न्यायिक खर्चापोटी रुपये 5,000/- ( अक्षरी – रुपये पाच हजार फक्त ) द्यावे.
- तक्रारकर्तीच्या इतर मागण्या फेटाळण्यांत येतात.
- विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी सदर आदेशाचे पालन 45 दिवसाचे आत करावे.
- उभय पक्षकारांना आदेशाची प्रत नि:शुल्क दयावी.
(श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri