::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 18.06.2016 )
आदरणीय अध्यक्ष श्री. व्ही.आर.लोंढे यांचे अनुसार
तक्रारदार श्री आशीष अनंत अमृतकर, यांनी सदरहू तक्रार ग्राहक संरक्षण् कायद्याच्या कलम 12 अंतर्गत, विरुध्दपक्ष यांनी सदोष टीव्ही विक्री करुन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे हे जाहीर करुन मिळण्यासाठी व सदरहू टीव्ही बदलून देण्याबाबत तसेच नुकसान भरपाई मिळण्याकरिता दाखल केली आहे.
तक्रारदार यांनी तक्रार थोडक्यात येणे प्रमाणे आहे.
तक्रारकदार हे अकोला येथील राहीवशी असून ते व्यवसायाने प्रगतीशिल शेतकरी आहेत. तक्रारकदार यांना शेती उत्पादनाशी निगडीत तंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत व्हावे व कृषी विषयक माहीती माध्यमाद्वारे मिळावी, याकरीता तक्रारदाराने नामांकित कंपनीचा टीव्ही खरेदी करण्याचे ठरविले. विरुध्दपक्ष 1 हे इलेक्ट्रानिक्स वस्तुंचे उत्पादन करणारी कंपनी आहे व विरुध्दपक्ष क्र. 2 हे विरुध्दपक्ष क्र. 1 ने उत्पादीत केलेल्या वस्तुंचे अधिकृत विक्रेते आहेत.
तक्रारदाराने दि. 24/10/2013 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 च्या दुकानाला भेट दिली. विरुध्दपक्ष क्र. 2 ने तक्रारदारास वेगवेगळया कंपनीचे टीव्ही संच दाखविले. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारदारास विरुध्दपक्ष क्र. 1 ने उत्पादित केलेला टीव्ही अत्यंत चांगला असून पाच वर्षापर्यंत विनाशुल्क सेवा पुरविण्याची हमी दिली. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रादारास LG LED 32LN541B (Sr No 308PLBL105269) हा अत्यंत चांगला टीव्ही आहे, असे सांगीतले व तो घेण्याबाबत आग्रह केला. तक्रारदारने विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्यावर विश्वास ठेवून दि. 24/10/2013 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी उत्पादित केलेला, वादातील टीव्ही विकत घेतला. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी सदर टीव्ही तक्रारदाराच्या घरी, घरपोच पोहचविला. विरुध्दपक्ष क्र. 1 चे स्थानिक सर्व्हीस इंजिनिअर यांनी तक्रारदाराच्या घरी सदर टीव्ही बसवून चालू करुन दिला. तक्रारदाराने सदरहू टीव्ही संच खरेदी केल्यानंतर तो टीव्ही दोन महिन्याच्या आंत मधुन मधुन बंद पडत होता. या बाबत तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्या दुकानात जाऊन या बाबत तोंडी सांगीतले. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी वातावरणातील बदल व विद्युत प्रवाहामुळे असे होत असते, असे सांगितले. तसेच काही अडचण आली तर ते ठिक करुन देतील, असे सांगितले दि. 3/7/2015 रोजी सदरहू टीव्ही सकाळी बंद केला व दुपारी कार्यक्रम पाहण्यासाठी टीव्ही सुरु केला असता तो चालु झाला नाही. तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 1 च्या सर्व्हीस सेंटरला या बाबत कळविले व टोल फ्रि नंबरवर तक्रार नोंदविली. दि. 4/7/2015 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 चे सर्व्हीस इंजिनिअर दळवी यांनी घरी येऊन संचाची तपासणी केली व पावर कॉर्ड बदलून देतो असे सांगितले. दि. 6/7/2015 रोजी पावर कॉर्ड बदलवून पाहीला असतांना देखील टीव्ही संच सुरु झाला नाही. टीव्ही संचाची तपासणी केली असता पॅनल सदोष असल्याचे सांगितले. तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्या दुकानात जाऊन सदोष टीव्ही विक्री केल्याबद्दल तक्रार केली. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 चे इंजिनिअर हरीष यांचा मोबाईल नंबर दिला व त्या मोबाईलवरुन तक्रारदारास कॉल येईल, असे सांगितले. फोन आल्यानंतर तक्रारदाराकडून माहिती घेण्यात आली व वरीष्ठांशी बोलून टीव्ही संच दुरुस्त करुन देतो, अशी हमी दिली. त्यानंतर सर्व्हीस मॅनेजर यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तक्रारदाराने फोनवर संपर्क साधला असता, तक्रारदाराचा टीव्ही वारंटीमध्ये नसल्याचे सांगितले व पॅनलसाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. तक्रारदारास पाच वर्षापर्यंत विनाशुल्क सेवा पुरविण्याची हमी विरुध्दपक्षाने दिली होती. एका वर्षाची कोणतीही वारंटी दिली नव्हती, असे तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 2 ला सांगितले. तसेच ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्याबाबत देखील सांगितले. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी खरेदी बिलावरील बाजुस असलेल्या कंपनीच्या स्टीकरचे फोटो काढून तक्रारदाराने संपुर्ण माहीती विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या सर्व्हीस मॅनेजरला व्हाट्सॲपद्वारे पाठविण्याची विनंती केली. त्याप्रमाणे दि. 8/7/2015 रोजी तक्रारकर्त्याने संपुर्ण माहीती विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या सर्व्हीस मॅनेजर श्री हरीष यांना मोबाईलवर पाठविली. विरुध्दपक्ष क्र. 1 चे सर्व्हीस मॅनेजर यांनी दि. 11/7/2015 रोजी, सांगितले की, त्यांनी तक्रारकर्त्याने पाठविलले सर्व दस्तऐवज त्यांच्या वरीष्ठांना पाठविले व त्यांच्या निर्णयानंतर पॅनल बदलून देण्याची हमी दिली. त्यानंतर त्यांच्याकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. मात्र दि. 16/7/2015 रोजी श्री हरीष यांनी तक्रारकर्त्यास फोन करुन टीव्ही पॅनलच्या किंमतीत 30 टक्के सुट देत असल्याचे सांगितले, मात्र तक्रारकर्त्याने ही ऑफर नाकारली व निशुल्क टीव्ही दुरुस्त करुन देण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारकर्त्याने दि. 15/7/2015 रोजी वकीलामार्फत विरुध्दपक्ष क्र. 1 यांना, त्यांनी दिलेल्या पत्तयावर नोटीस पाठविली. परंतु सदर नोटीस लेफ्ट असा शेरा मारुन परत आली. विरुध्दपक्ष क्र. 2 यांना दि. 15/7/2015 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली व त्यांनी उत्तर देवून सेवा देण्यास नकार दिला. तक्रारकर्त्याने परत दि. 30/7/2015 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 यांना नोटीस पाठविली, सदर नोटीस विरुध्दपक्ष क्र. 1 यांना मिळाली आहे. अशा प्रकारे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी सेवा देण्यास न्युनता दर्शविली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे. तक्रारदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन प्रार्थना केली आहे की, तक्रारदाराची तक्रार मंजुर करण्यात यावी व विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी पुरविलेला सदोष टीव्ही बदलून देण्याबाबत आदेश विरुध्दपक्ष यांना देण्यात यावा. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांच्या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारकर्त्यास झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून रु. 1,00,000/- व मानसिक शारीरिक त्रासापोटी रु. 30,000/- तक्रारदाराला देण्याचा आदेश व्हावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 11 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष 1 यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी त्यांचा जबाब दाखल केला असून, आरोप नाकबुल करीत असे नमुद केले की, तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार ही बनावटी स्वरुपाची आहे. तक्रारदाराने कोणत्याही प्रकारच्या वॉरंटी / गॅरंटी कार्डचा उल्लेख केला नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 कंपनीचा सदरच्या टीव्ही संचाची वारंटी फक्त 1 वर्षापर्यंत दिली आहे. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार त्याने सदर टीव्ही संच हा दि. 24/10/2013 ला विरुध्दपक्ष क्र. 2 कडून खरेदी केला व दि. 3/7/2015 रोजी सदर टीव्ही संच सकाळी बंद केला, मात्र दुपारी 3.00 वाजता स्वीच ऑन केल्यानंतर टीव्ही चालु झाला नाही, हे तक्रारकर्त्याचे म्हणणे खोटे आहे. सदर टीव्ही संच खरेदी केल्यापासून दि. 3/7/2015 पर्यंत एक वर्ष 8 महिने 21 दिवस एवढा कालावधी झाला आहे व या कालावधीत तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 1 कडे कुठल्याही प्रकारची सदर टीव्ही संचाबाबत तक्रार केली नाही. तक्रारदाराच्या तक्रारीवर वेळोवेळी मार्गदर्शन करुन सेवा पुरविण्याची तत्परता विरुध्दपक्षाने दाखविली आहे. दि. 4/7/2015 रोजी सर्व्हीस इंजिनिअर श्री दळवी हे तक्रारदाराच्या घरी गेले व टीव्ही संचाची पाहणी करुन त्यातील पॅनल बदलावे लागेल, असे सांगितले. परंतु तक्रारदाराने पॅनल बदलण्यासाठी कुठलही तयारी दर्शविली नाही. तक्रारदाराचे असे म्हणणे होते की, सदर टीव्हीसाठी येणारा सर्व खर्च विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी करावा. परंतु ते शक्य नसल्याने व तक्रारदाराच्या तयारी अभवी सदर टीव्ही संचाची दुरुस्ती करण्यात आली नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 चे सर्व्हीस मॅनेजर यांनी तक्रारदारास फोनद्वारे सांगितले की, तुमचा टीव्ही वारंटीमध्ये नसल्यामुळे पॅनल बदलून देण्याकरिता पैसे द्यावे लागतील, परंतु तक्रारदाराची, स्वत: खर्च करुन टीव्ही दुरुस्त करुन घेण्याची मानसिकता नव्हती. तरी सुध्दा विरुध्दपक्ष क्र. 1 हा नेहमी सदर टीव्ही संच दुरुस्त करण्यास तयार होता. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 कडून सेवा पुरविण्यास कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा झालेला नाही. तक्रारदाराने त्याची तक्रार जेंव्हा नोंदविली तेंव्हा सदर टीव्ही संचाची वॉरंटी संपलेली होती. वरील सर्व कथनांचा विचार करुन तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात यावी.
विरुध्दपक्ष 2 यांचा लेखीजवाब :-
विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी त्यांचा स्वतंत्र लेखी जबाब दाखल केला असून, त्यातील मजकुर हा विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या जबाबातील मजकुरासारखाच असल्यामुळे त्याची पुनरावृत्ती टाळली आहे. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी, त्यांनी सेवा पुरविण्यास कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा किंवा अकार्यक्षमता दाखविली नाही, असे नमुद करुन तक्रारदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
3. त्यानंतर तक्रारदाराने प्रतिज्ञालेख व प्रतिउत्तर दाखल केले, तसेच उभय पक्षांनी तोंडी युक्तीवाद केला.
4. उभय पक्षांचा युक्तीवाद व दाखल केलेले कागदपत्रे यांचे बारकाईने अवलेाकन केले असता खालील मुद्दे मंचाने विचारात घेतले.
अ) विरुध्दपक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली
आहे काय ? ……… होय
ब) तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय?…अंशत: होय
क) आदेश काय ? … अंतीम आदेशाप्रमाणे
// कारणमिमांसा //
05. मुद्दा क्र.. 1 व 2 करिता
तक्रारदार यांचे वकील श्री आर.टी.विटनकर यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्यावर विश्वास ठेवून वादातील टीव्ही विकत घेतला आहे. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी वादातील टीव्ही हा अत्यंत चांगच्या प्रकारचा आहे, त्याची पाच वर्षापर्यंत कोणतीही तक्रार येणार नाही, तसेच पाच वर्षापर्यंत विनाशुल्क सेवा देण्यात येईल, अशी हमी दिली. तक्रारदार यांनी दि. 24/10/2013 रोजी टीव्ही खरेदी केला. विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या सर्व्हीस इंजिनिअर यांनी तो तक्रारदाराच्या घरी बसवून दिला. सदरील टीव्ही हा दोन महिन्यांच्या आंतच मधुन मधुन बंद पडत होता. या बाबत तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष यांना कल्पना दिली. दि. 3/7/2015 रोजी सदरहू टीव्ही सकाळी बंद केला व दुपारी कार्यक्रम पाहण्यासाठी टीव्ही सुरु केला असता तो चालु झाला नाही. याबाबत सर्व्हीस स्टेशनशी संपर्क साधल्यानंतर तपासणी केल्यानंतर वादातील टीव्हीचा पॅनल सदोष असल्याचे आढळून आले. सदरहू टीव्ही हा वॉरंटी कालावधीत नादुरुस्त झाल्यामुळे तो दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष यांची होती. असे असतांनाही विरुध्दपक्ष यांनी तक्रारदार यांना पॅनलचे पैसे द्यावे लागतील असे सांगितले व द्यावयाच्या सेवेत टाळाटाळ केली. तक्रारदाराने विरुध्दपक्षांना नोटीस पाठवून सदोष सेवेबद्दल व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याबद्दल विरुध्दपक्षास कळविले. असे असतानाही विरुध्दपक्षाने कोणतीही दखल घेतली नाही व म्हणून तक्रारदारास सदरहू तकार दाखल करावी लागली. विरुध्दपक्षास सदोष टीव्ही बदलून देण्याबाबत आदेश व्हावेत तसेच तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
विरुध्दपक्ष यांचेतर्फे त्यांचे वकील ॲङ अे.एम देशमुख यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदाराच्या वादातील टीव्ही मध्ये वारंटी कालावधीत कोणताही दोष निर्माण झालेला नाही. तक्रारदाराने जेंव्हा जेंव्हा तक्रार केली तेंव्हा तेंव्हा विरुध्दपक्ष यांचे सर्व्हीस इंजिनिअर यांनी तक्रारदारास सेवा दिली आहे व आजही सेवा देण्यास तयार आहेत. विरुध्दपक्षाचे वकीलांनी पुढे असा युक्तीवाद केला की, तक्रारदाराच्या वादातील टीव्हीचा पॅनल नादुरुस्त झाला होता व तो मागवून टीव्हीमध्ये बसवून देण्यास विरुध्दपक्ष तयार होता व आजही तयार आहे. विरुध्दपक्ष यांनी द्यावयाच्या सेवेमध्ये कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही.
तक्रारदार व विरुध्दपक्ष यांनी दाखल केलेले दस्तऐवज यांचे निरीक्षणक केले, तसेच शपथपत्राचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष 1 यांनी उत्पादित केलेला टीव्ही विरुध्दपक्ष विरुध्दपक्ष क्र. 2 च्या दुकानातून विकत घेतला आहे, ही बाब उभय पक्षांना मान्य आहे. वादातील टीव्हीमधील पॅनल नादुरुस्त झाल्याचे विरुध्दपक्षाच्या सर्व्हीस इंजिनिअरला आढळून आल्यानंतर त्यांनी सदर पॅनल बदलून देण्याची तयारी दर्शविली, परंतु सदर पॅनलची किंमत तक्रारदारास द्यावी लागेल, असे तक्रारदारास सांगितले. तक्रारकर्त्याने जे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे त्याचे अवलेाकन केले असता, विरुध्दपक्ष यांनी टीव्ही मधील पॅनल विनामुल्य बदलून देण्याबाबत कथन केले आहे व विरुध्दपक्षाच्या पुराव्याचे अवलोकन केले असता, त्यांचे मुख्य कथन आहे की, वादातील टीव्ही वारंटी कालावधीत नसल्यामुळे पॅनल बदलून देण्याकरिता तक्रारदारास पैसे द्यावे लागतील. सदर टीव्हीवर पाच वर्षाची वॉरंटी असल्याचे तक्रारकर्त्याने केवळ तोंडी कथन केले आहे. परंतु सदर बाब सिध्द करणारे कुठलेही दस्त मंचासमोर दाखल केलेले नाही. मात्र विरुध्दपक्षाने सदर टीव्हीवर केवळ एक वर्षाची वॉरंटी होती, हे सिध्द करण्यासाठी पृष्ठ क्र. 62 वर वॉरंटी कार्ड दाखल केले असल्याने, सदर टीव्हीचा वॉरंटी कालावधी संपलेला होता, असे स्पष्ट दिसून येते. परंतु दि. 21/01/2016 रोजी तक्रारकर्त्यातर्फे श्री अनंत नारायणराव अमृतकर यांनी प्रतिज्ञालेख दाखल केला. सदर प्रतिज्ञालेखात विरुध्दपक्षाचे कर्मचारी व प्रतिनिधीशी झालेल्या दुरध्वनीवरील संभाषण सविस्तरपणे, टेलिफोन नंबर व विरुध्दपक्षाच्या नावानिशी उल्लेख करुन, नमुद केलेले आहे. तसेच विरुध्दपक्षाच्या कर्मचाऱ्याशी झालेल्या वरील संभाषण मोबाईल मध्ये ध्वनीमुद्रीत केले असल्याचे प्रतिज्ञार्थीचे म्हणणे आहे. विरुध्दपक्षाने सदर बाब केवळ तोंडी युक्तीवादात नाकारलेली आहे. सदर प्रतिज्ञार्थीच्या म्हणण्याची सत्यता तपासण्यासाठी प्रतिज्ञार्थीचा उलट तपास घेतला नाही अथवा सदर संभाषण झालेच नसल्याचे कुठलाही सबळ पुरावा मंचासमोर दाखल न केल्याने तक्रारकर्त्याने दाखल केलेला प्रतिज्ञालेख ग्राह्य धरुन विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला सदर टीव्ही पॅनल विनामोबदला नवीन बदलून देण्याचे दुरध्वनीवरील संभाषणात कबुल केल्याचे मंच ग्राह्य धरीत आहे. परंतु तक्रारकर्त्याने त्याचा टीव्ही नादुरुस्त झाल्याचे कळवल्याबरोबर विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्याला तात्काळ सेवा दिल्याचे दाखल दस्तांवरुन दिसून येत असल्याने विरुध्दपक्षाने सेवा देण्यात त्रुटी केली नसल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.
सर्व पुराव्यांचे व कागदपत्रांचे अवलेाकन केल्यानंतर मंचाचे मत असे आहे की, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वादातील टीव्ही संचाचे पॅनल विना मोबदला बदलून द्यावे व तक्रारदाराचा वादातील टीव्ही पुर्ववत सुरु करुन द्यावा. तक्रारदारास सदरहू तक्रार मंचात दाखल करावी लागली त्यामुळे तक्रारीचा खर्च रु. 1000/- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 कडून घेण्यास तक्रारदार पात्र आहे,
म्हणून अंतीम आदेश खालील प्रमाणे
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना असा आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदाराच्या वादातील टीव्ही संचातील पॅनल आदेश प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आंत बदलून, नविन पॅनल विनामोबदला टाकून, तो पुर्ववत सुरु करुन द्यावा.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तपणे तक्रारदारास तक्रारीच्या खर्चापोटी रु. 1000/- ( रुपये एक हजार फक्त) आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आंत द्यावे.
सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.