निकालपत्र ( पारीत दिनांक :18/11/2013 ) ( द्वारा अध्यक्ष(प्रभारी) श्री.मिलींद भि.पवार(हिरुगडे) ) 01. अर्जदार यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये गैरअर्जदार यांच्या विरुध्द दाखल केली असून, तीद्वारे पुढील प्रमाणे मागण्या केलेल्या आहेत. 1. गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांच्या जवळ असलेले धनादेश क्र.702996, 702997 व 702998 तसेच ट्रॅक्टरची चावी अर्जदाराला परत करावी 2. मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रु.15,000/- 3. तक्रारीचा खर्च रु. 5000/- अर्जदाराच्या तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे आहे. अर्जदार यांनी सदर तक्रार अर्जामध्ये नमुद केले आहे की, अर्जदार क्र.2 यांनी त्यांचे पती अर्जदार क्र.1 यांच्या सहमालकीने गैरअर्जदार क्र.2 कडुन जॉन डिअर कंपनीचा एक ट्रॅक्टर विकत घेतला ज्याचा रजिस्ट्रेशन क्र.एम.एच.32 अ.7501 असा आहे. सदर ट्रॅक्टर हे गैरअर्जदार क्र.1 यांच्या कडुन कर्ज घेवुन घेतले होते. कर्ज घेतांनी गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांच्या सहीचे कोरे धनादेश ठेवुन घेतले होते. अर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, त्यांनी कर्जासे सर्व किश्ती वेळेवर भरल्यानंतर फायनांन्स कंपनीने स्वतः अर्जदार यांना कुठलीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र दिलेले आहे. अर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, ट्रॅक्टरसाठी घेतलेल्या सर्व कर्जाची परतफेड झाल्यानंतर त्यांनी गैरअर्जदार क्र.1 यांना त्यांच्या ताब्यात असलेल्या को-या धनादेशाची तसेच ट्रॅक्टरच्या चावीची मागणी केली असता त्यांनी देण्याची सहमती दर्शविली नाही व दिली नाही. अर्जदार यांनी वारंवार गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे कोरे धनादेश व ट्रॅक्टरची चावीची मागणी केली, परंतु आजगायता गैरअर्जदार क्र.1 यांनी कोरे धनादेश व ट्रॅक्टरची चावी अर्जदार यांना दिलेली नाही. त्यामुळे दिनांक 25/11/2011 रोजी अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना कायदेशीर नोटीस पाठवुन सदर बाबींची मागणी केली. परंतु गैरअर्जदार यांनी नोटीसला उत्तरही दिले नाही किंवा नोटीसमधील कुठल्याही मागणीची पुर्तता केलेली नाही. कर्ज रकमेची परतफेड केल्यानंतर कोर धनादेश व वाहनाच्या चाव्या न देणे ही बाब गैरअर्जदार क्र.1 यांच्या सेवेतील त्रृटी असुन त्यांनी अनुचित व्यापार प्रणालीचा अवलंब केलेला आहे, त्यामुळे अर्जदारांनी गैरअर्जदारां विरुध्द प्रस्तुत तक्रार मंचामध्ये दाखल केली आहे व वरीलप्रमाणे मागणी केली आहे. 02. गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपला लेखी जवाब दाखल केलेला आहे. त्यानुसार गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारीतील विपरित विधाने / आरोप अमान्य करुन पुढे असे नमुद केले की, ग्राहक सरंक्षण कायदा 1986 च्या कलम 2(1)(डी) नुसार सदर तक्रार ही ग्राहक या सज्ञेत बसत नाही. गैरअर्जदार क्र.1 यांचे वर्धा येथे कुठल्याही प्रकारचे कार्यालय किंवा शाखा नसल्यामुळे त्यांच्या विरुध्दची प्रस्तुतची तक्रार खारीज करण्यात यावी. गैरअर्जदार क्र.1 यांनी पुढे नमुद केले आहे की, अर्जदार हे त्यांच्या लोनचे हप्ते हे वेळेवर जमा करीत नव्हते तसेच त्यांनी घेतलेले ट्रॅक्टर हे स्वतःच्या उर्दनिर्वाहाकरीता नसुन फायदा कमविण्याकरीता घेतले होते. गैरअर्जदार क्र.1 यांनी नमुद केले आहे की, अर्जदार यांचे धनादेश त्यांच्याकडे आहे ही बाब खरी असली तरी कार्यालयीन प्रक्रीया पुर्ण झाल्यावरच ते परत केले जातात, कार्यालयीन प्रक्रीयेला थोडा वेळ होत असल्यामुळे अर्जदाराचे कोरे धनादेश त्याला परत करण्यास विलंब होत आहे याचा अर्थ ते अर्जदार यांच्या धनादेशाचा गैरउपयोग करेल असा होत नाही ही बाब त्यांनी अर्जदार यांना सुध्दा कळविली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी पुढे नमुद केले आहे की, अर्जदार यांनी प्रस्तुत तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे त्याच्या ट्रॅक्टरची 1 चावी त्यांच्याकडे आहे ही बाब साफ खोटी आहे, त्यांनी अर्जदाराच्या ट्रॅक्टरची चावी ठेवण्याचा कुठलाही प्रश्नच उद्भवत नाही. तसेच, गैरअर्जदार क्र.1 हे त्यांच्याजवळ असलेले अर्जदार यांचे कोरे धनादेश मा.मंच मागेल तेंव्हा किंवा 15 दिवसांच्या आंत मा.मंचासमक्ष सादर करण्यास तयार आहे. गैरअर्जदार क्र.1 यांच्या तर्फे कुठल्याही प्रकारची चुक झालेली नसल्यामुळे अर्जदाराची त्यांच्याविरुध्दची सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांच्या लेखी उत्तरा्द्वारे मा.मंचास केलेली आहे. 03. गैरअर्जदार क्र.2 यांचेवर नोटीस बजावल्यानंतर ते मा.मंचासमक्ष हजर झाले, परंतु वेळोवेळी म्हणणे सादर करण्याची परवाणगी देवुनही आजतागायत त्यांनी त्यांचे म्हणणे मा.मंचासमक्ष सादर न केल्यामुळे गैरअर्जदार क्र.2 यांच्या विरुध्द विना लेखी जबाब कार्यवाहीचा आदेश पारीत करण्यात आला. 05. अर्जदाराने प्रस्तुत तक्रार प्रतिज्ञापत्रावर दाखल केली असून, सोबत अर्जदार यांनी दिनांक 25/11/2011 रोजी गैरअर्जदार यांना पाठविलेला नोटीस व गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांना त्यांच्या कर्जा विषयी दिलेले नो डयु सर्टिफीकेटची छायांकत प्रत दाखल केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांचा लेखी जवाब प्रतिज्ञापत्रावर दाखल केला आहे. -: कारणे व निष्कर्ष :- अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2 कडुन एक ट्रॅक्टर खरेदी केले ज्याचा क्रमांक एम.एच.32/ए/7501 आहे व सदर वाहन खरेदी करण्याकरीता गैरअर्जदार क्र.1 यांनी कर्ज दिले होते याबाबत उभय पक्षांमध्ये वाद नाही. सदरचे गैरअर्जदार क्र.1 यांचे कर्ज अर्जदार यांनी फेडले नाही याबाबत सुध्दा वाद नाही. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 यांचे मध्ये जो वाद आहे तो म्हणजे सदर ट्रॅक्टरचे कर्ज फेडल्यानंतर सुध्दा गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांचेकडे असलेले अर्जदार यांचे कोरे धनादेश व वाहनाच्या चाव्या अर्जदाराला परत केल्या नाही याबाबत. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 यांचे कर्ज फेडल्यानंतर गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराला संपुर्ण कर्जाची परतफेड झाल्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे हे नि.क्र.2/2 वरुन दिसुन येते. गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांचे लेखी जबाबात अर्जदारांनी कर्ज घेते वेळी त्यांना दिलेले धनादेश त्यांच्याच ताब्यात असल्याबाबत कबुल केले आहे व ते देण्यास कार्यालयीन प्रक्रियेत उशिर झाल्याचेही मान्य केले आहे तसेच सदर धनादेश परत करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र सदर ट्रॅक्टरची चावी त्यांचे ताब्यात असल्याचे अर्जदाराचे म्हणणे अमान्य केले आहे. अर्जदार हे ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत ग्राहक होवु शकत नाही, कारण अर्जदारांनी घेतलेले ट्रॅक्टर हे त्यांच्या उदरनिर्वाहाकरीता घेतले नव्हते तर ते फायदा मिळविण्याकरीता घेतले होते, असा आक्षेत घेतला आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी दुषित सेवा दिली नाही त्यामुळे अर्जदार यांनी मानसिक व शारिरीक त्रासापोटी केलेली मागणी मिळण्यास अर्जदार पात्र नाही, व त्याकरीता गैरअर्जदार क्र.1 यांनी खालील न्यायनिवाडयाचा आधार घेतला आहे. Judgement of Hon’ble National Commission reported in 2012 (1) CPR (NC) 58, Punjab State Power Corp.Ltd…………….V/s……….. Shree Polyphase Meters (India) वरील न्यायनिवाडयानुसार नुकसान भरपाई केवळ प्रिझमशनचा आधारावर देता येत नाही असा बचाव घेतला आहे. गैरअर्जदार क्र.1 यांचा सदर आक्षेप खोडुन काढण्याकरीता अर्जदार यांनी कोणताही पुरावा या कामी दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी त्यांचे पुर्ण तक्रारीत सदर ट्रॅक्टर हेच त्यांचे उपजिविकेचे साधन आहे असे नमुद केले नाही, उलटपक्षी तक्रारीमधील टायटल वरुन अर्जदार हे नौकरी करतो हे दिसुन येते, त्यामुळे सदर ट्रॅक्टरचे उत्पन्न हेच उपजिविकेचे साधन होते असे म्हणता येणार नाही. तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर ट्रॅक्टरची चावी त्यांचे ताब्यात नाही असे कथन केले आहे. त्याबाबत सुध्दा अर्जदार यांनी कुठलाही पुरावा मंचासमक्ष सादर केला नाही की त्यांच्या ट्रॅक्टरची चावी ही गैरअर्जदार क्र.1 कडे आहे. तसेच अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचे कृती मुळे झालेला मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.15,000/- ची मागणी कुठल्या आधारे केली या विषयी कोणताही लेखी पुरावा अर्जदार यांनी सादर केला नाही किंवा मौखिक युक्तिवादाच्या वेळी मंचासमक्ष सांगण्यातसुध्दा आले नाही. गैरअर्जदार क्र.1 यांनी लेखी जबाब दाखल केल्यानंतर अर्जदार यांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल करणे आवश्यक होते. परंतु ते सुध्दा अर्जदारांनी दाखल केले नाही किंवा गैरअर्जदार क्र.1 यांनी केलेले आक्षेप खोडुन काढण्याकरीता पुरावा किंवा पुराव्याचे शपथपत्र दाखल केले नाही. त्यामुळे अर्जदार हे आपली तक्रारीतील मागणी पुरावेनिशी सिध्द करुन शकले नाहीत हे दिसुन येते. त्यामुळे अर्जदारांची गैरअर्जदारांविरुध्द केलेली नुकसान भरपाईची मागणी रु.15,000/- व ट्रॅक्टरची चावी परत करण्याची मागणी मान्य करता येवु शकत नाही असे मा.मंचाचे मत आहे. मात्र गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांचे लेखी जबाबत त्यांच्या ताब्यात असलेले अर्जदार यांचे कोरे धनादेश मंचाने आदेश दिल्यावर परत करण्याची तयारी दर्शविली आहे, त्यामुळे प्रस्तुत निकाल पारीत झाल्यानंतर व निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांच्या आंत गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांच्या ताब्यात असलेले अर्जदार यांचे कोरे धनादेश परत करावे तसेच सदरच्या धनादेशाचा दुरउपयोग करु नये असा आदेश करणे न्यायोचित ठरते. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2 यांचे कडुन फक्त ट्रॅक्टर खरेदी केल्याचे कथन केले आहे. मात्र संपुर्ण तक्रार अर्जात गैरअर्जदार क्र.2 यांचे विरुध्द काहीही तक्रार असल्याबाबतचे मुद्दे नमुद केलेले नाही, त्यामुळे अर्जदार यांची गैरअर्जदार क्र.2 यांचे विरुध्द काहीही तक्रार नाही हे सिध्द होते. म्हणुन गैरअर्जदार क्र.2 यांचे विरुध्द कुठलाही आदेश पारीत करण्यात येत नाही. एकंदरीत वरील सर्व कारणे व निष्कर्ष यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदाराला सेवा देण्यात न्युनता केली असल्याचे सिध्द करु शकले नाहीत त्यामुळे अर्जदारांची प्रस्तुतची तक्रार नामंजुर होण्यास पात्र आहे या निर्णयाप्रत वि.मंच आलेले असल्याने पुढील प्रमाणे आदेश पारित करीत आहे. // अंतिम आदेश // 1) अर्जदार यांची तक्रार नामंजुर करण्यात येते आहे. 2) गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांच्या ताब्यात असलेले अर्जदार यांचे कोरे धनादेश निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांच्या आंत अर्जदार यांना परत करावे तसेच सदरच्या धनादेशाचा दुरउपयोग करु नये 3) गैरअर्जदार क्र.2 विरुध्द काहीही आदेश नाही. 4) पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 5) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधीतांनी परत घेवुन जाव्यात. 6) निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधीत पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यात. |