निकालपत्र
(दिनाक 15-07-2015 )
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदार हा ट्रक चालवून स्वतः चा व कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवतो. अर्जदाराच्या विनंतीवरुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास ट्रक खरेदीसाठी कर्ज देण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे अर्जदाराने रक्कम रु. 21,80,000/- किंमतीचा ट्रक खरेदी करण्याचे ठरविले. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे डाऊन पेमेंट म्हणून रक्कम रु. 1,80,000/- भरले. गैरअर्जदार कंपनीने अर्जदारास रक्कम रु. 20,00,000/- लाखाचे कर्ज दिले. सदरील कर्जाचे एकूण 52 हप्ते ठरविण्यात आले. कर्जाचा प्रत्येक हप्ता हा प्रतिमहिना रु.51,950/- इतका होता. अर्जदाराने ‘अशोक लिलँड 3116’ कंपनीचा एक 12 चाकी ट्रक खरेदी केला ज्याचा नोंदणी क्र. एमएच-26/एडी-967 असा आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे दिनांक 29.12.2012 रोजी रु. 50,000/- तसेच दिनांक 10.1.2013 रोजी रु. 4,000/-, दिनांक 16.5.2013 रोजी रु. 51,700/-, दिनांक 10.6.2013 रोजी रु. 52,000/-, दिनांक 01.03.2013 रोजी रु.50,000/-, दिनांक 16.04.2013 रोजी रु.30,000/-, दिनांक 05.03.2013 रोजी रु. 20,000/-, दिनांक 08.07.2013 रोजी रु. 30,000/- दिनांक 23.08.2013 रोजी रु. 52,000/- व दुसरे दोन हप्ते जे की रु. 45,000/- व रु. 51,000/- च्या पावत्या गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिल्या नाहीत. याप्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे एकूण रु.4,35,700/- सदर कर्ज / फायनान्स पोटी जमा आहे. गैरअर्जदार यांच्याकडे अर्जदार ठरल्याप्रमाणे हप्ते भरत असतांना अचानकपणे अर्जदाराच्या ट्रकचा मोटारसायकलसोबत अपघात झाला. त्यामुळे अर्जदाराचा ट्रक पोलीस स्टेशन कामठी ता. मोहोळ, जि. सोलापूर यांनी मालासह जप्त केला. अर्जदाराचा ट्रक 15 दिवस पोलीस स्टेशनला उभा होता त्यामुळे अर्जदाराच्या व्यापारात नुकसान झाले. नाईलाजास्तव अर्जदार गैरअर्जदार विमा कंपनीचे 1,2 हप्ते भरु शकलेला नाही. तेव्हा गैरअर्जदार दिनांक 26.10.2013 रोजी अर्जदाराचा ट्रक जप्त केला तेव्हा अर्जदार गैरअर्जदार यांच्याकडे शिल्लक असलेल्या कर्जापोटीच्या हप्त्याची रक्कम घेवून गेला असता गैरअर्जदार यांनी थकीत हप्त्याची रक्कम स्विकारण्यास नकार दिला. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे हप्ते न स्विकारता बेकायदेशीरपणे अर्जदारास कोणतीही माहिती, कल्पना, सुचना, नोटीस न देता अर्जदाराचा ट्रक कमी किंमतीत म्हणजेच रक्कम रु. 8,75,000/- मध्ये परस्पर विक्री केला. दिनांक 20.08.2014 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदारास पत्र पाठवून सदर ट्रक विक्री केल्याचे कळविले व अर्जदाराकडूनच उलट पैशाची मागणी केली. अर्जदार आता सुध्दा ठरल्याप्रमाणे ट्रकचे उर्वरीत हप्ते भरण्यास व सदर ट्रक परत घेण्यास तयार आहे. परंतू गैरअर्जदाराने बेकायदेशीरपणे अर्जदाराचा ट्रक परस्पर जाणूनबुजून अत्यंत दुष्टहेतूने कमी किंमतीत विक्री केला त्यामुळे सदरील व्यवहार अर्जदारास मान्य नाही. अर्जदाराचे रक्कम रु. 10,25,000/- चे नुकसान गैरअर्जदार यांनी केलेले आहे. अर्जदार हा आज सुध्दा सदरील ट्रकचा मालक असून त्याच्या नावे आर.सी. बुक, विमा पॉलिसी इत्यादी कागदपत्रे आहेत. गैरअर्जदार यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला असून दिनांक 20.08.2014 रोजी अर्जदारास रक्कम रु. 11,15,578/- भरण्यास नोटीस पाठवली. सदर नोटीस चुकीची असल्याने रद्द करण्यात यावी. गैरअर्जदाराने अर्जदाराचा ट्रक विक्री केल्यामुळे अर्जदार त्याचा व्यवसाय करु शकलेला नाही त्यामुळे अर्जदारास नुकसान झालेले आहे. गैरअर्जदार यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन अर्जदाराच्या ट्रकची विक्री केल्यामुळे अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केलेली आहे व तक्रारीमध्ये अर्जदाराने गैरअर्जदार यांना आदेश देण्यात यावा की, अर्जदार यांचा ट्रक क्र. एमएच-26/एडी-967 हा बेकायदेशीररित्या जप्त करुन विक्री केल्यामुळे अर्जदार यांना गैरअर्जदार यांच्याकडून अर्जदाराने भरलेली डाऊन पेमेंटची रक्कम रु. 1,80,000/-, कर्जाच्या हप्त्यापोटी भरलेली रक्कम रु. 4,35,700/-, गाडीची बॉडी बनविण्यासाठी खर्च केलेली रक्कम रु. 3,00,000/- असे एकूण रक्कम रु. 9,15,000/- 18 टक्के व्याजासह परत देण्याबाबत अन्यथा ट्रकचा बेकायदेशीररित्या झालेला विक्रीचा व्यवहार रद्द करुन अर्जदाराचा ट्रक अर्जदारास परत करण्याचा आदेश पारीत करावा. अर्जदारास झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रु. 3,00,000/- गैरअर्जदार यांनी दयावेत तसेच अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 80,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 20,000/- गैरअर्जदार यांनी दयावेत अशी मागणी तक्रारीद्वारे अर्जदार यांनी केलेली आहे.
2. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस तामील होवूनही गैरअर्जदार मंचामध्ये हजर झालेले नाहीत त्यामुळे दिनांक 15.12.2014 रोजी त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारीत करण्यात आला.
3. अर्जदार यांनी आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
4. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडून ट्रक क्र. एमएच-26/एडी-967 खरेदी करण्यासाठी रक्कम रु. 20,00,000/- चे कर्ज घेतलेले असल्याचे दाखल कागदपत्रावरुन दिसून येते. अर्जदाराने तक्रारीमध्ये गैरअर्जदार यांच्याकडे ट्रकच्या कर्जाच्या परतफेडीपोटी नियमितपणे हप्ते भरत असल्याचे नमूद केलेले आहे. तसेच अर्जदाराच्या ट्रकचा अपघात झालेला असल्याने गैरअर्जदार यांच्याकडे काही हप्ते अर्जदार भरु शकलेला नाही ही बाबही अर्जदाराने तक्रारीमध्ये मान्य केलेली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या कर्ज परतफेडीच्या पावतीवरुन अर्जदाराने एकूण 07 हप्ते दिनांक 16.5.2013 पर्यंत भरलेले असल्याचे दिसते. अर्जदाराने तक्रारीसोबत कराराची प्रत किंवा रिपेमेंट शेडयुल दाखल केलेले नाही त्यामुळे अर्जदाराचे किती हप्ते थकलेले होते याचा बोध होत नाही. गैरअर्जदार यांनी दिनांक 20 ऑगस्ट, 2014 रोजी अर्जदारास नोटीस पाठवलेली आहे. सदर नोटीसचे अवलोकन केले असता गैरअर्जदार यांनी दिनांक 29.03.2014 रोजी अर्जदाराचा ट्रक रु.8,75000/- इतक्या रक्कमेस विकलेला आहे. त्यानंतरही गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडे रु. 11,15,578/- ची मागणी सदरील नोटीसद्वारे केलेली आहे. गैरअर्जदार हे नोटीस प्राप्त होवनही तक्रारीमध्ये हजर झालेले नसल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदारावर केलेले सर्व आरोप गैरअर्जदार यांना मान्य असल्याचे दिसते. त्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदारास वाहन जप्त करण्यापूर्वी नोटीस दिलेली नसल्याचे दिसून येते. अर्जदाराचे वाहन जप्त करुन विक्री करतांना गैरअर्जदार यांनी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केलेला नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे वाहन जप्त करुन विक्री करतांना कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न केल्यामुळे निश्चितच सेवेत त्रुटी दिलेली आहे असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे वाहन ताब्यात घेवून अर्जदारास संधी न देता वाहन विक्री केलेले आहे व उलट अर्जदारावर रक्कम रु. 11,15,578/- इतक्या रक्कमेची मागणी चुकीच्या पध्दतीने केलेली असल्याचे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार यांच्या वरील कृत्यामुळे अर्जदार यांना निश्चितच मानसिक त्रास झालेला आहे. अर्जदार यांचे वाहन गैरअर्जदार यांनी विक्री केलेले असल्याने सदरील वाहन अर्जदारास परत करावे असा आदेश देणे उचित ठरणार नाही.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदाराकडून कर्ज परतफेडीपोटी कुठल्याही रक्कमेची
भविष्यात मागणी करु नये.
3. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.