निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 12/06/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 15/06/2012
तक्रार निकाल दिनांकः- 11/09/2013
कालावधी 01वर्ष. 02महिने. 27दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
खय्युम मौला मोहम्मद पिता मौला मो. आझमी. अर्जदार
वय 32 वर्षे. धंदा.शेती. अॅड.मो.जकी.एकबाल.
रा.142 सिंधखाना, मानवत ता.मानवत, जि.परभणी.
विरुध्द
1 एल.अॅंड टी. फायनान्स, एल.अॅंड टी.हाऊस. गैरअर्जदार.
एन.एम.मार्ग, बल्लार्ड इस्टेट, मुंबई- 400 001.
तर्फे शाखा कार्यालय, नारायण चाळ, विसावा कॉर्नर, परभणी
2 सहारा मोटर्स,
अधिकृत विक्रेता, वसमत रोड, परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मालकीचे वाहन अॅपे पॅजीओ दुरुस्तीसाठी दिले असता गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदारास वापस न करुन सेवेत त्रुटी दिली आहे. या बद्दलची अर्जदाराची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यांत तक्रार अशी आहे की, अर्जदाराने व्यापारासाठी गैरअर्जदार क्रमांक 2 कडून गैरअर्जदार क्रमांक 1 चे फायनान्स घेवुन पॅजीओ अॅपे (ऑटो) खरेदी केला होता.ज्याचा इंजिन नंबर ई.ई.08 सी. 9041903, चेसीस नंबर एन.व्ही.जे.सी. 544233 असा आहे. सदचे वाहन अर्जदाराने 01/08/2009 रोजी 88,000/- रुपये जमा करुन विकत घेतले.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरचे वाहन खरेदी करतांना अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडून 1,90,000/- रुपये कर्ज घेतले होते व सदरच्या कर्जाची परतफेड 36 हप्त्यामध्ये प्रती हप्ता 6,950/- रुपये ठरले होते. सदरची कर्जफेड दिनांक 10/07/2012 पर्यंत करण्यांचे ठरले होते.व त्या दरम्यान अर्जदाराने हमीपोटी जिल्हा मध्यवर्ती बॅंक बॅंक मानवत यांचे 36 कोरे धनादेश गैरअर्जदार 1 यांना दिले.
अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, सदरचे वाहन खरेदी केल्यावर कांही दिवसच व्यवस्थीत चलले नंतर बंद पडले, म्हणून दोनदा गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे दुरुस्तीसाठी दिले, परंतु दुस-यांदा दुरुस्तीसाठी दिल्यावर अर्जदाराचे वाहन गैरअर्जदार क्रमांक 2 ने परत केले नाही, अर्जदाराने सदर वाहन परत मागीतले असता ऊडवाऊडवीचे उत्तरे दिली. अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे हप्त्यापोटी एकुण 1,38,000/- रुपये भरले अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, वाहनाची कागदपत्रे, रु.88,000/- ची पावती व सर्व्हिसींग जॉबकार्ड हे गैरअर्जदार क्रमांक 2 च्या ताब्यात आहेत. व तसेच करुन त्याने सेवेत त्रुटी दिली आहे. म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार मंजूर करुन गैरअर्जदारास असा आदेश व्हावा की, त्याच्या मालकीचे अॅपे पॅजीओ अर्जदारास परत करावे व तसेच आर्थीक नुकसानी बाबत 38,000/- रुपये 18 टक्के व्याजाने 22/02/2010 पासून अर्जदारास द्यावे.व तसेच मानसिक त्रासापोटी 10,000/- रुपये व खर्चापोटी 5,000/- रुपये अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा अशी मंचास विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 5 वर 4 कागदपत्रांच्या यादीसह 4 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यामध्ये गैरअर्जदार क्रमांक 1 ने दिलेली 7,000/- च्या दोन पावत्या, रु.20,000/- व रु. 14,000/- च्या पावत्या इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या, सदर नोटीसा गैरअर्जदारास तामिल होवूनही गैरअर्जदार मंचासमोर हजर झाले नाही. म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यांत आला, व सदरची तक्रार मंचाने मेरीटवर निकाली काढण्याचे ठरवले.
अर्जदाराच्या कैफियतीवरुन व दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी अर्जदारास सेवेत त्रुटी
दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा अॅपे पॅजीओ इंजीन नंबर ई.ई.08 सी. 9041903, चेसीस नंबर एन.व्ही.जे.सी. 544233 चा मालक आहे. त्याबाबतच अर्जदाराने कोणताही ठोस कागदोपत्री पुरावा व तसेच सदर वाहनाचे आर.सी. बुकचा पुरावा मंचासमोर आणला नाही. तसेच अर्जदाराने सदरचे वाहन गैरअर्जदार क्रमांक 1 कडून 1,90,000/- रुपये फायनान्स वर घेतले होते, या बाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा अर्जदाराने मंचासमोर आणला नाही व तसेच सदरचे वाहन अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 कडे दुरुस्तीसाठी दिला होता व ते वाहन गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या ताब्यांत आहे या बाबतचा कोणताही विश्वासार्ह पुरावा अर्जदाराने मंचासमोर दाखल केला नाही, सदर कथन केलेल्या कारनावरुन मंचास असे वाटते की, गैरअर्जदारांनी अर्जदारास सेवेत त्रुटी दिली नाही. व अर्जदारास त्याचे वाहन गैरअर्जदारा कडून परत देण्यांत यावे असा आदेश योग्य त्या पुराव्या अभावी देण्यास मंचास योग्य वाटत नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच पूढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.अध्यक्ष.