न्या य नि र्ण य
(दि.14-02-2024)
व्दाराः- मा. श्री अरुण रा. गायकवाड, अध्यक्ष
1. प्रस्तुतचा तक्रार अर्ज सामनेवालांकडून गहाण ठेवलेला सोन्याचा दागिना कर्जाची रक्कम भरुन घेऊन परत मिळावा यासाठी दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथने थोडक्यात पुढील प्रमाणे-
तक्रारदार ही तक्रारीत नमुद पत्त्यावर राहात असून कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे आलेल्या आर्थिक संटकाचे निवारण करणेसाठी तक्रारदाराचे स्त्रीधन असलेले 11 ग्रॅमचे सोन्याचे गंठन सामनेवाला क्र.1 यांचेकडे दि.14/07/2020 रोजी रक्कम रु.31,000/- ला गहाण ठेवले. सदर कर्जखात्याचा क्र.3561 असा होता. सदर सोने तारण कर्जाची मुदत सहा महिने म्हणजे दि.13/01/2021 पर्यंत होती. परंतु लॉकडाऊन संपले नसलेने व तक्रारदाराची कर्ज फेडण्याची क्षमता झालेली नसलेने तक्रारदार हिने सामनेवाला क्र.1 चे शाखेशी संपर्क साधला असता तुमची आर्थिक परिस्थिती झाली की या, मग हिशोब पूर्ण करु असे तक्रारदारास तोंडी सांगितले. तक्रारदार हिने मुदत संपली आहे असे सांगितल्यावर सामनेवाला क्र1 चे अधिकारी यांनी दागिने सोडवण्या अगोदर एक दिवस कळवा, त्याला काही प्रॉब्लेम नाही असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार दि.14/12/2021 रोजी कर्ज फेडून आपले दागिने सोडविण्यासाठी सामनेवालाकडे गेली असता सामनेवाला क्र.1 चे अधिकारी यांनी सदर दागिन्याचा दि.23-10-2021 रोजी लिलाव करुन कर्ज फेडून घेतले असे तक्रारदारास सांगितले. सामनेवाला यांनी बेकायदेशीरपणे, तक्रारदाराला कोणतीही नोटीस न देता तक्रारदाराचा गहाण ठेवलेला गंठन हा सोन्याचा दागिना विकला होता. सदर सोने तारण कर्जाचा बॅलन्स किती झाला होता, दागिना किती रुपायाला विकला गेला, दागिना विकताना तक्रारदाराला नोटीस कधी व कशी दिली याबाबत कोणतीही माहिती सामनेवाला यांनी तक्रारदारास दिली नाही. त्याबाबत तक्रारदार हिने सामनेवाला यांना विचारले असता सामनेवाला क्र.1 चे अधिकारी यांनी आम्ही पेपर नोटीस दिली होती, तुम्हाला वेगळे कळवायची आवश्यकता नाही असे सांगितले. तसेच दि.14/07/2020 रोजीचे पावतीवर अकौन्ट क्लोज्ड म्हणून दि.14/12/2021 रोजी शिक्का मारला. त्यानंतर तक्रारदार हिने सामनेवाला यांना माहितीच्या अधिकारात दि.09/05/2022 रोजी हाती नोटीस देऊन दि.11/01/21 ते 27-10-21 या कालावधीत तक्रारदारास पाठविलेल्यानोटीसांचा तपशील, आवक-जावक रजिस्टरच्या प्रती, दि.27-10-21 रोजी सोन्याचा भाव काय होता व तक्रारदारा हिचे सोने किती रुपयाला विकले गेले, घसारा किती काढला वगैरे माहिती मागविली. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या नोटीसला उत्तर दिले नाही. त्यामुळे तक्रारदार हिने दोन महिने वाट पाहून सामनेवाला यांना रजिस्टर पोष्टाने नोटीस पाठविली परंतु सदरची नोटीस मिळूनदेखील सामनेवाला यांना तक्रारदाराच्या सदर नोटीसला उत्तर दिले नाही. ही सामेनवाला यांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे. सन-2022 मध्ये सोन्याचा दर हा रक्कमरु.50,000/- इतका होता. त्यामुळे तक्रारदार हिचे सोन्याचे गंठन मधील सोन्याची किंमत रक्कम रु.55,000/- इतकी होते. त्यावरील मजूरी व जी.एस.टी. याचा विचार करता तक्रारदारास आणखी सुमारे रक्कम रु.15,000/- खर्च होणार होता. या बाबींचा विचार करता सामनेवालांच्या तक्रारदाराच्या दागिन्याचा केलेल्या लिलावामुळे तक्रारदारास रक्कम रु.35,000/- चे नुकसान झालेले आहे. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.सबब सामनेवाला यांनी तक्रारदारास सोने तारण कर्ज खाते क्र.3561 चे कामी तारण ठेवलेले सोन्याचे गंठन दि.23/10/21 पर्यंत होणारे व्याज घेऊन परत देणेबाबत सामनेवालास आदेश व्हावा जर सदर गंठन परत देणे शक्य नसलेने तक्रारदारास रक्कम रु.35,000/- चे नुकसान भरुन देणेबाबत सामनेवालास आदेश व्हावा. सदर रक्कमेवर दि.23/10/21 पासून संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत द.सा.द.शे.14 टक्के प्रमाणे व्याज मिळावे. तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व तक्रार तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- सामनेवालाकडून वसुल होऊन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने त्यांचे तक्रारीत केली आहे.
2. तक्रारदाराने त्यांचे तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.6 कडे एकूण 6 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये नि.6/1 कडे सोने तारण कर्ज खाते क्र.3561 ची पावती, नि.6/2 कडे तक्रारदाराने दि.09/05/22 रोजी माहितीचे अधिकारात सामनेवालास हाती दिलेल्या पत्राची प्रत, नि.6/3 कडे तक्रारदार हिने सामनेवाला क्र.2 यांना दि.05/07/22 रोजी पाठविलेल्या रजि.ए.डी. नोटीसची प्रत, नि.6/4 कडे सामनेवाला क्र.2 यांना नोटीस मिळालेची पोष्टाची पोहोच पावती, नि.6/5 कडे सामनेवाला क्र.1 चे अधिकारी यांनी तक्रारदारास दिलेली जाहीर नोटीसची प्रत, नि.6/6 कडे तक्रारदार हिचे आधार कार्डची प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.16 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.17 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.22 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
3. सामनेवाला क्र.1 व 2 यांना नोटीस बजावणी झालेनंतर सामनेवाला हे त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी नि.14 कडे एकत्रित म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. सामनेवाला यांना तक्रार अर्जातील कोणताही मजकूर मान्य व कबूल नाही. सामनेवाला यांचे कथनानुसार, तक्रारदार हिने दि.14/07/2020 रोजी सामनेवालाकडे आर्थिक अडचण असलेने सोने तारण कर्ज मिळणेसाठी अर्ज दाखल केला व 11 ग्रॅम सोन्याचे गंठन अंदाजे किंमत रु.38,280/- तारण गहाण ठेवले. सदर सोन्याचे गंठन सामनेवाला यांनी चंद्रशेखर ग. सागवेकर या सोनाराकडून तपासुन घेतले. तक्रारदारास रक्कम रु.31,000/- द.सा.द.शे.12.5 टक्के व्याजाने कर्ज दिले. त्याबाबत तक्रारदाराने करारपत्र लिहून दिलेले आहे. तक्रारदाराने लिहून दिलेल्या करारपत्रामध्ये सदर कर्ज मी सहा महिन्याचे आत फेडीन व दागिने सोडवून नेईन, तसेच मुदतीत दागिने न सोडविल्यास मी तारण ठेवलेल्या दागिन्यात अखेर जिन्नसांची तुम्ही जाहीर लिलावाने विक्री करुन आपली रक्कम वसुल करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, तसेच मला नोटीस न देताही मी तारण दिलेले दागिने विकुन तुमची रक्कम वसुल करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे असे लिहून दिलेले आहे. संस्थेचे नियम व सोने तारण कर्जाचे नियम वाचून पाहिले आहेत व त्याप्रमाणे मी कराराने बांधली गेली आहे आणि या व्यवहाराचे बाबतीत कोणत्याही त-हेची बाधा निघाल्यास त्याचा निकाल करुन घेण्यास मी कोटात जाणार नाही असे करारपत्रात लिहून दिलेले आहे. त्यामुळे तक्रारदार हिला नोटीस न देता तिचे तारण ठेवलेल्या दागिन्यांचा लिलाव केला अशी तक्रार करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार राहिलेला नाही.
सामनेवाला त्यांचे म्हणणेत पुढे कथन करतात, असे असतानाही सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.15/01/2021 दि.25/01/21 व 08/02/21 रोजी नोटीस पाठवून तक्रारदाराने घेतलेल्या सोने तारण कर्जाची दि.08/02/21 अखेर व्याजासह एकूण रक्कमरु.33,229/- मात्र झालेली आहे. त्यामुळे सदरप्रमाणे रक्कम अधिक व्याज व इतर अनुषंगिक खर्च संस्थेत भरुन दागिना सोडवून घेण्याची व्यवस्था करावी अन्यथा तारण ठेवलेला ऐवज चालू बाजारभावाने जाहीर लिलावाने विकुन रक्कमेची वसुली करणे संस्थेस भाग पडेल अशी नोटीस दिली होती. परंतु तक्रारदार हिने सदर नोटीसीची कोणतीही दखल घेतली नाही.
तक्रारदार हिने सामनेवालाकडून दि.14/07/20 रोजी कर्ज घेतलेनंतर कर्जाचा कोणताही हप्ता अगर कर्जफेडी संबंधी कोणतीही रक्कम सामनेवाला संस्थेत भरलेली नाही किंवा त्याबाबत कोणतीही चौकशी केलेली नाही. सामनेवाला यांनी रत्नागिरी जिल्हयातील सर्वात जास्त खपाचे रत्नागिरी टाईम्स यास दैनिकात दि.17/10/21 रोजी जाहिर नोटीस देऊन पतसंस्थेकडून वेळोवेळी नोटीसा पाठवूनसुध्दा आपण आपले दागिने सर्व व्याज व मुददल भरुन सोडवून नेलेले नाहीत तरी आपण आपले दागिने दि.23/10/21 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत व्याजासह मुद्रदल भरुन सोडवून न्यावेत अन्यथा आपल्या दागिन्यांचा लिलाव दि.27/10/21 रोजी तीन वाजता संस्थेचे कार्यालयात करण्यात येईल असे जाहिररित्या कळविले होते. तरीसुध्दा तक्रारदार हिने त्यांचे दागिने सोडवून नेले नाहीत. म्हणून तक्रारदाराचे दागिन्याचा लिलाव करुन रक्कम रु.46,464/- ला विक्री करुन तक्रारदाराचे कर्जखात्यामध्ये रक्कम रु.31,000/- मुद्दल व रु.6,350/- व्याज असे एकूण रक्कम रु.37,350/- वसुल करुन घेऊन उर्वरित रक्कम रु.9,114/- तक्रारदाराचे बचत खात्यामध्ये जमा करुन ठेवले आहेत. कायदयाप्रमाणे आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करुनच सामनेवालाने तक्रारदाराकडून आपले कर्ज वसुली केलेली आहे. यामध्ये तक्रारदार हिची कोणतीही फसवणूक सामनेवालांनी केलेली नाही. त्यामुळे तक्रारदार हिची तक्रार खर्चासह फेटाळून तक्रारदाराकडून सामनेवालांना नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.5,000/- देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती सामनेवाला यांनी केली आहे.
4. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेसोबत नि.18 वर सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.20 कडे एकूण 6 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये नि.20/1कडे दि.14/07/20 रोजीचा तक्रारदाराचा सोनेतारण कर्ज मागणीचा अर्ज व त्यासोबतचे करारपत्र, नि.20/2 ते 20/4 कडे तक्रारदारास पाठविलेल्या दि.15/01/21, 25/01/21 व 08/02/21 रोजी पाठविलेल्या नोटीसची प्रत दाखल केली आहे. नि.20/5 कडे दै.रत्नागिरी टाईम्स या वृत्तपत्रातील जाहीर लिलावाची नोटीसचे कात्रण, नि.20/6 कडे तक्रारदाराचे सोनेतारण कर्जाचा खातेउतारा इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.21 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.23 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. नि.25 कडे सामनेवाला पतसंस्थेच्या आदर्श उपविधीची प्रत दाखल केली आहे. नि.27 कडे एकूण 5 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये नि.27/1 कडे सामनेवाला पतसंस्थेचे दि.14/12/21 रोजीचे सभेचे प्रोसिडींग, नि.27/2 कडे सामनेवालाचे जावक रजिस्टर ची प्रत, नि.27/3 कडे सोन्यावरील जीएसटी दर दर्शविणारा तक्ता, नि.27/4 कडे दि.17/10/21 रोजीच्या दै.रत्नागिरी टाईम्स या वृत्तपत्रातील जाहीर नोटीसीचा अंक, नि.27/5 कडे तक्रारदाराने सामनेवाला यांना दि.22/10/22रोजी पाठविलेल्या नोटीसची प्रत दाखल केली आहे.
5. वर नमुद तक्रारदार यांचा तक्रार अर्ज व दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे म्हणणे, दाखल कागदपत्रे व उभयतांचा लेखी व तोंडी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन करता सदर आयोगाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ खालील मुददे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय |
2 | सामनेवाला यांनी तक्रारदारास सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून नुकसान भरपाई व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमुद आदेशाप्रमाणे |
-विवेचन-
6. मुददा क्र.1 :– तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्थेकडून कोरोना काळात आर्थिक अडचण असलेने गंठन हा सोन्याचा दागिना ठेवून रक्कम रु.31,000/- इतके सोने तारण कर्ज घेतले होते हे तक्रारदार यांनी नि.6/1 कडे दाखल केलेल्या सामनेवाला यांचेकडील पावतीवरुन स्पष्ट होते. तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेल्या नि.14 कडील म्हणणेमध्ये सदरची बाब मान्य केलेली आहे. तसेच सामनेवाला यांनी नि.20/1 कडे दाखल केलेले सोने तारण कर्जाच्या अर्जाचे अवलोकन करता त्यावर तक्रारदाराचे नांव असून दागिन्याचे वर्णनमध्ये सोने गंठन- 11 ग्रॅम व अंदाजे किंमत रु.38,240/- असे नमुद आहे. तसेच करारपत्रवर तक्रारदाराचे नांव आहे. त्यामुळे तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
7. मुददा क्र.2 :– तक्रारदार यांनी कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे आलेल्या आर्थिक संकटाचे निवारण करणेसाठी तक्रारदाराचे स्त्रीधन असलेले 11 ग्रॅमचे सोन्याचे गंठन सामनेवाला क्र.1 यांचेकडे दि.14/07/2020 रोजी सोने तारण कर्जखाते क्र.3561 अन्वये रक्कम रु.31,000/- ला सहा महिन्याच्या मुदतीकरिता गहाण ठेवला होता. सदरची पावती तक्रारदाराने नि.6/1 कडे दाखल केली आहे. त्यानंतर तक्रारदार दि.14/12/2021 रोजी कर्ज फेडून आपले दागिने सोडविण्यासाठी सामनेवालाकडे गेली असता सामनेवाला क्र.1 चे अधिकारी यांनी सदर दागिन्याचा दि.23-10-2021 रोजी लिलाव करुन कर्ज फेडून घेतले असे तक्रारदारास सांगितले. सामनेवाला यांनी तक्रारदाराला कोणतीही नोटीस न देता बेकायदेशीरपणे तक्रारदाराचा गहाण ठेवलेला 11 ग्रॅमचा गंठन हा सोन्याचा दागिना विकला. त्याबाबतची सामनेवाला यांनी दै.रत्नागिरी टाईम्स या वृत्तपत्रामध्ये दि.17/10/21 रोजी जाहीर लिलावाबाबत दिलेली जाहिरात दाखल केली आहे. सदर जाहिरातीचे अवलोकन करता त्यामध्ये अ.क्र.7 ला तक्रारदार हिचे नांव खाते नंबर-3561 व पत्ता नमुद असलेचे दिसून येते. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.15/01/21, दि.25/01/21 व दि.08/02/21 रोजी पाठविलेल्या नोटीसची प्रत दाखल केली आहे. परंतु सदरची नोटीस तक्रारदारास मिळाली असलेबाबतचा कोणताही पुरावा सामनेवाला यांनी सदर कामी दाखल केलेला नाही. सदरची नोटीस तक्रारदारास रजि.पोष्टाने पाठविली होती किंवा हस्ते दिली होती याबाबत कुठेही उल्लेख केलेला नाही. तसेच सामनेवाला यांनी नि.20/5 कडे दाखल केलेल्या तक्रारदाराचे कर्जखाते उता-याचे अवलोकन केले असता जाहीर लिलाव दि.27/10/21 रोजी होऊन तक्रारदाराचा दागिना त्याचदिवशी विक्री झाला होता तर त्यानंतर तक्रारदाराचे कर्ज रक्कमेवर दि.31/10/21 रोजी रक्कम रु.383/- दि.30/11/21 रोजी रक्कम रु.374/- व दि.14/12/21 रोजी रक्कम रु.177/- असे व्याज का लावले याबाबत सामनेवाला यांनी कोणताही खुलासा दिलेला नाही. तसेच जाहीर लिलावात तक्रारदाराच्या विकलेल्या दागिन्यातून आलेल्या रक्कमेतून कर्जरक्कम वजा जाता उर्वरित रक्कम रु.9611/- तक्रारदाराचे बचत खातेमध्ये जमा केलेचे कथन केले आहे. परंतु सदरची जादाची रक्कम तक्रारदाराचे बचत खातेमध्ये जमा केलेबाबत तक्रारदारास सामनेवाला यांनी नोटीस अथवा पत्र देऊन कळविलेबाबत कोणताही पुरावा याकामी सामनेवालांनी दाखल केलेला नाही. त्याबाबतची माहिती मिळणेसाठी तक्रारदाराने दि.09/05/2022 रोजी माहितीचे अधिकारात दिलेल्या पत्राची प्रत नि.6/2 कडे दाखल केली आहे. सदर पत्राला सामनेवाला यांनी कोणतेही प्रतिउत्तर दिलेले नाही. त्यानंतर तक्रारदाराने सामनेवाला यांना दि.05/07/2022 रोजी नोटीस पाठविली होती. त्याची प्रत नि.6/3कडे दाखल केलेली आहे. सदर तक्रारदाराने पाठविलेल्या नोटीसलादेखील सामनेवाला यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. सामनेवाला यांनी नि.27/5 कडे तक्रारदाराने पाठविलेली नोटीस प्रत दाखल केली आहे की त्या नोटीसीप्रमाणे तक्रारदार यांना वर्तमानपत्रातील जाहीर लिलावाच्या जाहिरातीबदृल माहिती होती. मात्र तक्रारदाराचे म्हणणे दि.22/10/2022 रोजीची नोटीस तक्रारदाराने पाठविली नाही त्या नोटीसीवर तक्रारदाराची सही नाही. त्यामुळे ती नोटीस तक्रारदाराने पाठवली असे गृहीत धरता येणार नाही. सामनेवाला यांनी वर्तमानपत्रामध्ये जाहीरात दिली होती की, दि.27/10/21 रोजी दागिन्यांचा लिलाव केला जाईल. पण सामनेवाला यांनी त्या दागिन्यांचा लिलाव दि.14/12/21 रोजी केला असा पुरावा नि.27/1 कडे लिलावाचे प्रोसिडींग सादर केले आहे. लिलावाची जाहीर नोटीस दि.27/10/21 असताना प्रत्यक्ष लिलाव हा त्या तारखेला न करता तो दि.14/12/21 रोजी केला. त्यासंदर्भातसुध्दा सामनेवाला यांनी तक्रारदारास कळविले नाही व लिलावाची तारीख का बदलली याचे स्पष्टीकरण सामनेवाला यांनी दिलेले नाही. तसेच असे या आयोगाचे मत आहे. सबब ही सामनेवाला यांचे सेवेतील त्रुटी असलेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
वरील सर्वबाबींचा विचार करता,सामनेवाला यांचा निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा दिसून येतो. त्याकारणाने मुददा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
8. मुददा क्र.3 :– तक्रारदाराने त्यांचे तक्रारीमध्ये सन-2022 मध्ये सोन्याचा दर हा रक्कमरु.50,000/- इतका होता. त्यामुळे तक्रारदार हिचे सोन्याचे गंठन मधील सोन्याची किंमत रक्कम रु.55,000/- इतकी होते. त्यावरील मजूरी व जी.एस.टी. साठी रक्कम रु.15,000/- खर्च होणार होता. या बाबींचा विचार करता सामनेवालांनी तक्रारदाराच्या दागिन्याचा केलेल्या लिलावामुळे तक्रारदारास रक्कम रु.35,000/-चे नुकसान झालेले आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारास तारण ठेवलेले सोन्याचे गंठन दि.23/10/21 पर्यंत होणारे व्याज घेऊन परत देणेबाबत सामनेवालास आदेश व्हावा जर सदर गंठन परत देणे शक्य नसलेने तक्रारदारास रक्कम रु.35,000/- व त्यावर दि.23/10/21 पासून संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत द.सा.द.शे.14 टक्के प्रमाणे व्याज मिळावे अशी विनंती केली आहे. परंतु तक्रारदाराने सन-2022 मध्ये सोन्याचा दर रक्कम रु.50,000/- होता व त्यावरील मजूरी व जीएसटी याबाबतचा कोणताही पुरावा याकामी दाखल केलेला नाही. सबब तक्रारदारांनी गहाण ठेवलेल्या सोन्याचेगंठनचे वजन त्याची होणारी किंमत व कर्जापोटी घेतलेली रक्कम यांचा विचार करता, तक्रारदाराची मागणी अंशत: मान्य करत हे आयोग सामनेवालाने तक्रारदारास त्याचे झालेल्या नुकसानीपोटी रक्कम रु.5,000/- तसेच तक्रारदाराचे बचत खातेवर जमा असणारी रक्कम रु.9,114/- अदा करावी या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच तक्रारदाराने मागणी केलेली मानसिक त्रासापोटीची रक्कम रु.20,000/- अवाजवी असलेने मान्य करता येणार नाही. मात्र तक्रारदार मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- सामनेवाला यांचेकडून मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
मुददा क्र.4 :– वरील विवचेनास व कारणमिमांसेस अनुसरुन हे आयोग खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- आ दे श -
(1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
(2) सामनेवाला यांनी तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.5,000/- (रक्कम रु.पाच हजार फक्त) तसेच तक्रारदाराचे सामनेवालांकडील बचत खातेवरील जमा रक्कम रु.9,114/- (रक्कम रु. नऊ हजार एकशे चौदा फक्त) तक्रारदारास अदा करावेत.
(3) तक्रारदार यांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (र.रुपये पाच हजार मात्र) तसेच तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/-(र.रुपये दोन हजार मात्र) सामनेवाला यांनी अदा करावेत.
(4) वरील आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी सदरहू आदेश पारीत झालेच्या दिनांकापासून 45 दिवसांचे आत करणेची आहे.
(5) सदर आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी वरील मुदतीत न केल्यास तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा कलम 71 व 72 प्रमाणे सामनेवाला विरुध्द दाद मागू शकेल.
(6) उभय पक्षकारांना निकालपत्राच्या सत्यप्रती विनामुल्य पुरवाव्यात.