तक्रारदार : वकील श्री. बळीराम कांबळे हजर.
सामनेवाले : गैरहजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री. स. व. कलाल , सदस्य, ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. तक्रारदार यांनी सा.वाले यांचे विरुध्द परदेश सहली संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब या सबबीखाली ग्राहक तक्रार निवारण कायदा 1986 अंतर्गत या मंचापुढे तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी 13 दिवसाच्या परदेश सहलीत कुटुंबासोबत जाण्यासाठी सा.वाले यांचेकडे संपर्क केला व दक्षिणपूर्व आशिया खंडातील थायलंड, हॉंगकॉंग, मलेशिया, व सिंगापूर येथील सहलीसाठी तक्रारदाराने सा.वाले यांचेकडे एकूण 5 व्यक्तीच्या सहली खर्चापोटी रु.2,59,000/- इतक्या रक्कमेचा धनादेश, रु.15,000/- रोखीने व 5,600/- अमेरीकन डॉलर प्रवासी चेकव्दारे अदा केलेत. सदर रक्कम सा.वाले यांना आगाऊ प्राप्त त्यामध्ये व्हिसा खर्चाचा समावेश असुन देखील सा.वाले यांनी तक्रारदारास सहलीसाठी व्हिसा दिला नाही. त्यामुळे तक्रारदार बँकॉक येथे पोहचल्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर तक्रारदार यांनी व्हिासा प्राप्त करण्यासाठी 5000 थायलंड चलनात खर्च करावा लागला. तसेच विमान प्रवासाठी स्पेशल मलेशियन एअर लाईन्स ऐवजी कमी व साधारण दराच्या एअर आशिया या कंपनीची प्रवास तिकिटे खरेदी केलीत. त्यामुळे प्रवासात भोजन, पाणी, या सुविधेसाठी तक्रारदारास अतिरिक्त खर्च करावा लागला. या व्यतिरिक्त सहली दरम्यान हॉटेलात वास्तव्यासाठी ठरल्याप्रमाणे सुविधा दिल्या गेल्या नाहीत. तसेच परकीय चलन 5545 अमेरिकन डॉलर ऐवजी 5600 अमेरिकन डॉलर इतकी रक्कम तक्रारदाराकडून घेतली. अशा प्रकारे सा.वाले यांनी तक्रारदार यांचे सोबत परदेश सहली बाबतच्या व्यवहारात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब कला असल्याने तक्रारदाराने या मंचापुढे सा.वाले यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.
3. तक्रारदार यांनी सा.वाले यांचे कडून परदेश सहली दरम्यान सेवा सुविधा पुरविण्यात कसुर व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याने रु.4,50,000/- इतक्या रक्कमेची नुकसान भरपाईची 18 टक्के व्याजासह मागणी केली आहे. तसेच मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चासाठी रु.20,000/- इतक्या रक्कमेची मागणी केली आहे.
4. या उलट सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल करुन तक्रारदार यांची तक्रार खोटी व लबाडपणाची असल्याचे नमुद करुन तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्याची विनंती केली आहे. सा.वाले यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांना परदेश सहली दरम्यान सर्व सेवा सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सा.वाले यांचे कडून कोणतीही सदोष सेवा देण्यात आलेली नाही. तसेच तक्रारदाराने सहलीच्या तारखे आधी केवळ 04 दिवस अगोदर सहलीच्या खर्चाची रक्कम भरणा केली अशा वेळी केवळ 04 दिवस व्हिसा घेणे शक्य नसल्याचे तक्रारदारास सांगण्यात आले होते व सहलीच्या खर्चात व्हिसा घेण्याचा खर्च समाविष्ठ नाही असे तक्रारदाराने परिशिष्ट ‘ ब ’ वर लावलेल्या माहिती पत्रकात नमुद केले आहे. तसेच मलेशियासाठी व्हिसा तक्रारदार क्र. 1 यांना नाकारण्यात आली ही बाब असत्य आहे. तक्रारदार यांना व्हिसा नाकारला असता तर त्यांची मलेशियाची सहल पूर्ण होऊ शकली नसती. तसेच रात्री शयन व्यवस्था त्यांनी आरक्षित केल्याप्रमाणे तक्रारदार यांना पुरविण्यात आली होती. तक्रारदार क्र. 1 यांनी अमेरीकन डॉलर 5545 च्या रक्कमेसाठी प्रवासी चेक व्दारे 5600 अमेरिकन डॉलरचा भरणा केला होता. सा.वाले यांना जादा 55 अमेरिकन डॉलर स्वरुपात रक्कम परत करणे शक्य नसल्याने त्यांनी 55 अमेरिकन डॉलर भविष्यातील प्रवास/सहलीसाठी व्हावचर देऊन परत केली आहे. एकंदरीत तक्रारदारास प्रवासा संबंधी आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा पुरेशा प्रमाणात सा.वाले यांनी पुरविल्या आहेत. त्यामुळे सा.वाले यांनी कोणत्याही प्रकारची सेवा सुविधा पुरविण्यात कसुर वा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. म्हणून तक्रारदारांची तक्रार रद्द करणे बाबत विनंती केली आहे.
5. प्रकरणात उभय पक्षकारांनी आपले पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, दाखल केला आहे. अभिलेखातील दाखल तक्रार, कैफीयत, व पुराव्या संबंधी कागदपत्रांचे अवलोकन करुन प्रकरणात पुढील प्रमाणे न्यायनिर्णय करण्यात आला आले.
6. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार त्यांना बँकॉक येथे पोहचल्यानंतर व्हिसा नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांनी सा.वाले यांचेकडे सहलीसाठी भरणा केलेल्या रक्कमेत व्हिसा खर्चाचा समावेश असुन देखील तक्रारदार यांना थायलंडच्या चलनानुसार 5000 थायलंड चलन व्हिसा घेण्यासाठी भरावे लागले. या बाबत सा.वाले यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सहली संबंधीच्या माहीती पत्रकात सहल प्रवास खर्चात व्हिसा खर्चाचा समावेश नसल्या बाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे सदरचा खर्च तक्रारदाराने सहन करणे अपेक्षित आहे. सदर माहिती पत्रकाची प्रत तक्रारदार यांनी अभिलेखात दाखल केलेली आहे. परंतु तक्रारदार यांनी सहलीला जाण्यापूर्वी सदर सहलीच्या खर्चाबाबतचे कोटेशन ई-मेलव्दारे सा.वाले यांचेकडून घेतले होते. सदर ई-मेलची प्रत तक्रारदार यांनी अभिलेखात दाखल केलेली आहे. सा.वाले यांनी दिनांक 28.04.2011 रोजी दुपारी 1.45 वाजता तक्रारदार यांना ई-मेलव्दारे सहलीचे कोटेशन दिल्याबाबत ई-मेलची प्रत अभिलेखात पृष्ठ क्र.27 वर दाखल आहे. सदर ई-मेल नुसार 13 दिवसाच्या पॅकेजच्या सहलीच्या खर्चात व्हिसाचा खर्च समाविष्ट असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे तक्रारदार यांना बँकॉक येथे पोहचल्यानंतर व्हिसासाठी करावा लागलेला अतिरिक्त खर्च व व्हिसा नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला ही बाब सेवासुविधा पुरविण्यात कसुर व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब या सदरात मोडते असे मंचाचे मत आहे.
7. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सहली दरम्यान त्यांना हॉंगकॉंग ते कुल्लमपुर या हवाई प्रवासासाठी मलेशियन एअर लाईन्स या कंपनीच्या विमान प्रवासाची तिकिटे देण्याचे वचन दिले होते. परंतु प्रत्यक्षात या प्रवासासाठी सा.वाले यांनी तक्रारदार यांना एअर आशिया या कंपनीची स्वस्त दरातील तिकिटे दिलीत. त्यामुळे तक्रारदार यांना या हवाई प्रवासाच्या दरम्यान चहा,पाणी,जेवळ वगैरेसाठी रु.12,000/- इतका अतिरिक्त खर्च करावा लागला. या बाबत सा.वाले यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांच्या हॉंगकॉंग ते कुल्लमपुर या हवाई प्रवासाच्या वेळी मलेशियन एअर लाईन्सची तिकिटे शिल्लक नसल्यामुळे सा.वाले यांनी एअर आशिया या कंपनीच्या विमानाची तिकिटे खरेदी केली. या ठिकाणी सा.वाले यांनी मान्य केले आहे की, त्यांना मलेशियन एअर लाइन्स कंपनीची तिकिटे जादा बुकिंगमुळे मिळू शकली नाहीत. त्यामुळे त्यांनी एअर आशिया या कंपनीच्या विमानाची तिकिटे घेतली. सदरच्या विमान प्रवासामुळे तक्रारदारास जेवळ वगैरेसाठी रु.12,000/- इतका जादा खर्च करावा लागला. तसेच या विमान प्रवासामुळे तक्रारदार यांना गैरसोईच्या ठिकाणी उतरावे लागले व त्यामुळे तक्रारदारांना बरेच अंतर पायी चालत जाणे भाग पडले. यामुळे तक्रारदार क्र. 2 हे स्थुल असल्याने त्यांना अत्यंत शारिरीक त्रास सहन करावा लागला व त्यासाठी त्यांना जवळपास रु. 37,500/- इतकी रक्कम वैद्यकीय उपचार करुन घेण्यासाठी खर्च करावी लागली. सदर मुद्याबाबत तक्रारदार यांना जेवणाचा अतिरिक्त खर्च रु.12,000/- व वैद्यकीय खर्च झाल्याबाबत कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. त्यामुळे पुराव्या अभावी तक्रारदार यांचे म्हणणे ग्राहय धरता येणार नाही. परंतु या बाबत एक मुद्दा स्पष्ट होतो की, सा.वाले यांना मलेशियन एअर लाईन्सची तिकिटे उपलब्ध न झाल्याने त्यांनी एअर आशिया या कंपनीची तिकिटे तक्रारदारांसाठी घेतली व ही बाब सा.वाले मान्य करतात. अशा परिस्थितीत मलेशियन एअर लाईन्स व एअर आशिया या दोन कंपनीच्या विमान प्रवासातील तिकिटातील फरकाची रक्कम सा.वाले यांनी तक्रारदारास परत करणे अपेक्षित आहे असे मंचाचे मत आहे. कारण प्रवास स्वस्त दरातील तिकिटाने झालेला आहे. सा.वाले यांनी तक्रारदारांना तिकिट फरकाची रक्कम परत केली नाही ही बाब सेवासुविधा पुरविण्यात कसुर व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब या सदरात मोडते असे मंचाचे मत आहे.
8. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सहली दरम्यान त्यांना वचन दिल्या प्रमाणे शयनगृहाची व्यवस्था झाली नाही. या बाबत तक्रारदार यांनी पुरावे दाखल केलेले नाहीत. त्यामुळे तक्रारदारांचे म्हणणे ग्राहय धरता येणार नाही असे मंचाचे मत आहे.
9. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सा.वाले यांनी त्यांचेकडून 5545/- $ अमेरिकन डॉलर ऐवजी 5600/-$ अमेरिकन डॉलर इतकी रक्कम घेतली. म्हणजे 55/- $ अमेरीकन डॅालर इतकी जादा रक्कम घेतली. या बाबत सदर बाब सा.वाले मान्य करतात व त्यांनी जादा 55/- $ अमेरिकन डॉलरची जादा घेतलेली रक्कम तक्रारदारास भविष्यातील सहल/प्रवासासाठी व्हाऊचर स्वरुपात परत केली असे सा.वाले यांचे म्हणणे आहे. परंतु सा.वाले यांनी जादा घेतलेली 55/- $ अमेरिकन डॉलरची रक्कम तक्रारदारास रोख स्वरुपात अदा करावी जेणे करुन भविष्यात तक्रारदार कधी परदेश प्रवास करतील व तो सा.वाले यांचे कंपनी मार्फत करतील किंवा कसे याची शाश्वती नसल्याने सदरची रक्कम रोख स्वरुपात सा.वाले यांनी तक्रारदारास परत करावी असे मंचाचे मत आहे.
10. वरील विवेचन लक्षात घेता मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. आरबीटी तक्रार क्रमांक 517/2011 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सा.वाले यांनी तक्रारदार यांना त्यांच्या परदेश सहलीच्या सेवेबाबत
सेवासुविधा पुरविण्यात व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे
जाहीर करण्यात येते.
3. सा.वाले यांनी तक्रारदारास बँकॉक येथे व्हिसा घेण्यासाठी झालेल्या
खर्चाची रक्कम 5000/- थायलंड चलनाचे मुल्य भारतीय चलनाच्या
मुल्यात परिवर्तन करुन परत करावी.
4. तक्रारदार यांचा हॉंगकॉग ते कुल्लमपुर या हवाई प्रवासासाठी
मलेशियन एअरलाईन्स व एअर अशिया या कंपन्यांच्या प्रवास
तिकीटातील तफावतीची रक्कम तक्रारदार यांना हे आदेश प्राप्त
झाल्यापासून 30 दिवसात अदा करावी.
5. सा.वाले यांना तक्रारदारांकडून प्राप्त झालेली जादा 55/- $ अमेरिकन
डॉलरची रक्कम हे आदेश प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसात रोख
स्वरुपात अदा करावी.
6. तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या
खर्चापोटी रु.3,000/- इतकी रक्कम सा.वाले यांनी हे आदेश प्राप्त
झाल्यापासून 30 दिवसात अदा करावी.
7. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 05/01/2017