(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 22.09.2011) अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 1. अर्जदाराने, गैरअर्जदारांच्या संस्थेत ‘दैनंदिन ठेव योजने’ अंतर्गत दि.18.9.2008 रोजी खाते उघडले होते व त्याचा खाता नंबर 4157 आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास पासबुक दिलेले आहे. अर्जदार हा दररोज रुपये 500/- खाते क्र.4157 मध्ये जमा करण्याकरीता, गैरअर्जदार क्र.1 चा अभिकर्ता, दिनेश समर्थ मानकर हा अर्जदाराचे बाबुपेठ, जुनोना चौक येथील दुकानामध्ये येऊन, रक्कम घेवून जात होता व दररोज रुपये 500/- मिळाल्याची पासबुकावर नोंद करुन सही करुन देत होता. सदर दैनिक ठेव योजनेची मुदत 12 महिण्याची होती व जमा रकमेवर द.सा.द.शे.6 % व्याज देण्याचे गैरअर्जदारांनी निश्चित केले होते. तसेच, पासबुकातील नोंदी प्रमाणे व्याजाची आकारणी करतांना प्रत्येक महिण्याच्या शेवटच्या दिवसाची बाकी ही पुढील महिण्यासाठी व्याजाच्या हिशोबासाठी धरली जाईल, असे ठरलेले होते. 2. अर्जदाराकडून, दररोज गैरअर्जदार क्र.18 ने रुपये 500/- गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे जमा केल्याबद्दल पासबुकावर नोंद केली आहे. एकूण रक्कम दि.15.8.2009 रोजी रुपये 1,58,500/- दर्शविली आहे. परंतु, गैरअर्जदार क्र.18 यांनी माहे जुलै 2009 मध्ये दि.12.7.09 ला रुपये 500/- नी कमी जमा हिशोबात घेतली आहे, म्हणून अर्जदाराची एकूण जमा रुपये 1,59,000/- गैरअर्जदाराकडे आहे. अर्जदाराने, भरलेल्या दैनिक ठेवीची मुदत दि.14.8.2009 ला संपली असल्याने, अर्जदाराने गैरअर्जदार क्र.18 यांना व्याजासह दि.19.9.2009 रोजी मागणी केली असता, ‘’सध्या संबंधीत कर्मचारी सुटीवर आहे, ते रुजु झाल्यानंतर मी तुमची रक्कम व्याजासह आणून देतो.’ असे सांगितले. एक महिना उलटुनही अर्जदाराची रक्कम गैरअर्जदारांनी परत केली नाही. म्हणून, अर्जदाराने, गैरअर्जदार क्र.17 कडे जावून जमा रकमेची व्याजासह मागणी केली, परंतु गैरअर्जदार क्र.17 यांनी कोणतेही कारण न सांगता जमा रक्कम व व्याज देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे, अर्जदाराने दि.23.7.2010 रोजी वकीलामार्फत रजिस्टर पोचपावतीसह नोटीस पाठवून जमा रकमेची मागणी केली. परंतु, गैरअर्जदारांनी नोटीस मिळून सुध्दा अर्जदाराची जमा रक्कम परत केली नाही. त्यामुळे, गैरअर्जदारांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या, अर्जदारास रुपये 1,96,099/- दि.28.2.2011 पर्यंतचे व्याज धरुन देण्याचा आदेश व्हावा. तसेच, मानसिक ञासापोटी रुपये 10,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 5000/- व नोटीस खर्च रुपये 1000/- गैरअर्जदारांनी संयुक्तीकरित्या व वैयक्तीकरित्या अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा, अशी प्रार्थना केली आहे. 3. अर्जदाराने नि.5 नुसार 4 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन, गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.14 ने हजर होऊन नि.10 व गैरअर्जदार क्र.8 ने नि.12 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गै.अ.क्र.10 ला सधी देवूनही लेखी उत्तर दाखल केले नाही, त्यामुळे गैरअर्जदार क्र.10 विरुध्द नो डब्लु.एस. चा आदेश, तसेच गैरअर्जदार क्र.18 ला नोटीस प्राप्त होऊनही हजर झाला नाही, त्यामुळे त्याचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर 13.5.2011 ला पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्र.1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9, 11, 12, 13, 15, 16, 17 व 19 यांनी नोटीस घेण्यास नकार दिला, त्यामुळे त्यांचे गैरहजेरीत प्रकरण पुढे चालविण्यात यावे असा आदेश नि.1 वर दि.13.5.11 ला पारीत झाला. 4. गैरअर्जदार क्र.14 ने लेखी उत्तरात नमूद केले की, गैरअर्जदार क्र.14 यांनी संस्थेने दिलेल्या पासबुक खाते क्र.4157 वर दररोज जमा नोंद रुपये 500/- ची केली आहे, हे म्हणणे खोटे असल्यामुळे अमान्य केले आहे. अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक नव्हता व कोणतीही रक्कम अर्जदारास या गैरअर्जदाराकडून घेणे नाही. गैरअर्जदार क्र.14 ने, अर्जदाराचे तक्रारीतील संपूर्ण कथन व प्रार्थना अमान्य केली आहे. अर्जदाराने, केसमध्ये गैरअर्जदार म्हणून समाविष्ट करुन विनाकारण शारीरीक व मानसीक ञास दिलेला आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराविरुध्द खोट्या आशयाची केस दाखल केली म्हणून कलम 26 अन्वये रुपये 10,000/- नुकसान भरपाई देण्याचा आदेश अर्जदाराविरुध्द पारीत करण्यात यावा.
5. गैरअर्जदार क्र.8 ने लेखी उत्तरात नमूद केले आहे की, अर्जदाराचे हे म्हणणे खोटे व नाकबूल आहे की, गैरअर्जदार क्र.8 वेळोवेळी संस्थेचे काम पाहणारे व नियमय करणारे संचालक आहे. सबब, महा.सह.अधिनियम 1960 नुसार सर्व संचालक वैयक्तीक व सामुहिकरित्या जबाबदार आहे, म्हणून गैरअर्जदार क्र.8, सभासदांना किंवा खातेदारांनी जमा केलेली रक्कम व्याजासह परत करण्यास वैयक्तीकरित्या जबाबदार आहे. गैरअर्जदार हा आदर्श नागरी सह.पत संस्था, चंद्रपूरचा संचालक नाही. अर्जदाराने कधीही गैरअर्जदाराला व्यक्तीशः नोटीस पाठवून रकमेची मागणी केली नाही. तसेच, गैरअर्जदाराकडून, अर्जदाराला कोणताही आर्थिक, मानसिक व शारीरीक ञास झालेला नाही. गैरअर्जदाराचा अर्जदार व त्याने दर्शविलेली संस्था व रक्कम या बाबींशी व्यक्तीशः काहीही संबंध नाही. अर्जदाराने केलेली प्रार्थना गैरअर्जदार क्र.8 ला कोणत्याही प्रकारे लागू होत नाही. अर्जदाराने केलेले गैरअर्जदार क्र.8 बाबतची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. 6. अर्जदाराने तक्रारीच्या कथना पृष्ठयर्थ नि.14 नुसार शपथपञ दाखल केले. गैरअर्जदार क्र.8 व 14 यांना पुरावा शपथपञ दाखल करण्यास संधी देवूनही सादर केला नाही. त्यामुळे प्रकरण गैरअर्जदार क्र.8 व 14 चे शपथपञाशिवाय पुढे चालविण्यात यावे, असा आदेश नि.1 वर दि.8..6.2011 ला पारीत केला. अर्जदार तर्फे युक्तीवाद ऐकण्यात आला. गैरअर्जदार क्र.14 यांनी लेखी बयानच युक्तीवाद समजण्यात यावा, अशी नि.16 नुसार पुरसीस दाखल केले. बाकी गैरअर्जदार यांचा सतत पुकारा केला, कोणीही हजर झाले नाही. सबब तक्रार उपलब्ध रेकॉर्डवरुन गुणदोषावर (Merits) निकाली काढण्याकरीता ठेवण्यात यावे, असा आदेश नि.1 वर दि.18.7.2011 ला पारीत केला. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ व अर्जदाराचे वकीलानी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. // कारणे व निष्कर्ष // 7. अर्जदाराने, गै.अ.क्र.19 आदर्श नागरी सह.पत संस्था मर्या., चंद्रपूर (यापुढे सक्षिंप्त ‘‘पत संस्था’’, असे संबोधण्यात येईल) येथे दैनदींन ठेव योजने अंतर्गत दि.18.9.08 रोजी खाते उघडले. सदर खात्यात रक्कम प्रती दिवस 500/- जमा करण्यात येत असून, त्याची नोंद गै.अ.क्र.18 पत संस्थेच्या अभिकर्ता याचे मार्फत स्वीकारुन, त्याची नोंद पासबुकात करण्यांत येते. अर्जदाराने, पत संस्थेकडून दिलेल्या पासबुकाची झेरॉक्स प्रत अ-4 वर दाखल केली आहे. दैनंदीन बचत खात क्र.4157 असा असून अर्जदाराच्या नावाने असून, खाता संपण्याचा दि.14.8.09 असा आहे. सदर दैनंदीन बचत खात्याचे पुस्तीकीचे अवलोकन केले असता, प्रती रोज 500/- प्रमाणे सप्टेंबर 2008 पासून ऑगष्ट 2009 पर्यंत रक्कम प्राप्त केल्याची नोंद केलेली आहे. सदर पासबुकात रुपये 1,58,500 शेवटी जमा झाल्याचे नोंद आहे. सदर पासबुकात पत संस्थेव्दारे पडताळणी केल्याचे नमूद आहे. अर्जदाराचे दैनंदीन बचत खात्याची मुदत संपल्यानंतर जमा रकमेची मागणी अभिकर्ता गै.अ.क्र.18 मार्फत मागणी केली. परंतु, ती रक्कम अर्जदारास मिळाली नाही. 8. प्रस्तूत तक्रारीत, अर्जदाराने पत संस्था मार्फत अध्यक्ष व पत संस्थेचे कार्यकारी मंडळ, यांना तक्रारीत पक्ष म्हणून केले आहे. अर्जदारानी, संचालक मंडळाला पक्ष केले असल्याने मंचा मार्फत नोटीस पाठविण्यात आले. परंतु, गै.अ.क्र.14 यांनी नि.10 नुसार लेखी उत्तर दाखल केला. तसेच, गै.अ.क्र.8 यांनी नि.12 नुसार लेखी उत्तर दाखल केला, बाकी सर्व गै.अ.ना नोटीस तामील होऊन ही लेखी उत्तर सादर केले नाही. त्यामुळे, उपलब्ध रेकॉर्डवरुन तक्रार गुणदोषावर निकाली काढण्याकरीता, ठेवण्यात आले. अर्जदाराने, दैनंदीन ठेव खात्यात जमा केलेली रक्कम रुपये 1,59,000/- आणि त्यावर 1 वर्षाचा 6 टक्के व्याजाप्रमाणे व्याज रुपये 5630/- ची मागणी केली आहे. अर्जदाराने, ऑक्टोंबर 2009 ते तक्रार दाखल करेपर्यंत 14 टक्के व्याजाप्रमाणे रक्कम मागणी केली आहे. परंतु, अर्जदाराने, केलेली मागणी पूर्णतः मंजूर करण्यास पाञ नाही. 9. अर्जदाराने, दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन एक बाब सिध्द होतो की, गै.अ.पत संस्था कडे दैनिक ठेव खाते काढले होते. परंतु, त्यास मुदत संपूनही दैनिक ठेव खात्याची रक्कम मिळाली नाही. अर्जदाराची मागणी ही गै.अ.नी ती रक्कम व्याजासह द्यावी, अशी मागणी केली. परंतु, ती गै.अ. पत संस्थेच्या व्यतीरिक्त इतर गै.अ.विरुध्द मंजूर करण्यास पाञ नाही. गै.अ.क्र.1 हा पत संस्थेचा अध्यक्ष असून, गै.अ.क्र.19 ही पत संस्था आहे. पत संस्थेला आपले म्हणणे मांडण्याकरीता संधी देण्यात आली. परंतु, त्यांनी आपले म्हणणे सादर केले नाही, त्यामुळे अर्जदाराचे म्हणणे, उपलब्ध रेकॉर्डवरुन ठोस पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास पाञ आहे. 10. अर्जदाराने, संचालक मंडळातील संचालकाकडून जमा केलेली रकमेची मागणी केली, परंतु पत संस्थेच्या कार्याकरीता, महाराष्ट्र सहकार अधिनियम 1960 च्या तरतुदी नुसार संचालक मंडळ जबाबदार राहील, अशी तरतूद आहे. परंतु, प्रस्तूत प्रकरणात अर्जदाराने, संचालक मंडळाची यादी सादर केली नाही. त्यामुळे, गै.अ.क्र.19 वगळता बाकी सर्व संचालक मंडळाचे संचालक आहेत, हे गृहीत धरता येणार नाही, त्यामुळे त्यांचे विरुध्द तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. परंतु, गै.अ.क्र.19 पत संस्थेचा अभिकर्ता गै.अ.क्र.18 यांनी पत संस्थेकरीता अर्जदाराकडून दैनिक ठेवीची रक्कम स्विकारली व ती पत संस्थेत जमा केली, त्यामुळे अर्जदारास दिलेल्या पासबुकाची तपासणी (Verified) केली आहे. त्यानुसार, जमा केलेली रक्कम पत संस्था देण्यास जबाबदार आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आलेले आहे. 11. अर्जदार यांनी, सर्व गै.अ.कडून रकमेची मागणी केली आहे. परंतु, ती मागणी मंजूर करण्यास पाञ नाही. गै.अ. पत संस्थाच्या, संचालक मंडळाने गैरव्यवहार केला, ही बाब अन्केक्षण अहवालात आढळून आली, असा ही, रेकॉर्ड अर्जदारानी दाखल केलेला नाही. त्यामुळे, संचालक मंडळाला पत संस्थेच्या कार्याकरीता जबाबदार धरता येणार नाही. प्रस्तूत, गै.अ. पैकी कोणते संचालक हे अर्जदाराने जमा केलेल्या दैनदीन ठेवीच्या कालावधीत होते याचाही पुरावा रेकॉर्डवर नाही, त्यामुळे पत संस्थे व्यतीरिक्त इतर गै.अ.कडून केलेली मागणी मंजर करण्यास पाञ नाही. मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट पिटीशन नं.117/2011 यात आपले मत दिले आहे. तसेच, मुंबई उच्च न्यायालय, बेंच औरंगाबाद यांनी सुध्दा आपले मत रिट पिटीशन नं.5223/2009 सौ.वर्षा रविंद इसाई-वि.- सौ.राजश्री राजकुमार चौधरी व इतर निकाल घोषीत दि.22 डिसेंबर 2010 या प्रकरणात मत दिले आहे. त्यात दिलेले मत या प्रकरणाला तंतोतंत लागू पडतो. 12. अर्जदाराने, तक्रारीत केलेली मागणी ही विना आव्हान असून, गै.अ.क्र.8 व 14 वगळता कोणीही आपले म्हणणे सादर केले नाही. परंतु, अर्जदाराने दाखल केलेल्या पासबुकावरुन पत संस्थेकडे जमा असलेले रुपये 1,58,500/- दैनदींन ठेव खात्याच्या व्याजदार 6 टक्के प्रमाणे मिळण्यास पाञ आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे.
13. अर्जदाराने, तक्रारीत मानसीक व शारीरीक ञासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5000/- आणि नोटीसचा खर्च रुपये 1000/- ची मागणी केली आहे. गै.अ. पत संस्थेला अर्जदाराने जमा रकमेची मागणी केली, परंतु मागणी करुनही मुदतीनंतर जमा रक्कम दिली नाही. अर्जदारास पत संस्थेकडून जमा रक्कम न मिळाल्यामुळे मानसीक, शारीरीक ञास सहन करावा लागला, तसेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले असल्याने, त्याची नुकसान भरपाई म्हणून गै.अ. पत संस्था उपलब्ध रेकॉर्डवरुन रुपये 5000/- देण्यास पाञ आहे. 14. एकंदरीत, उपलब्ध रेकॉर्डवरुन गै.अ. पत संस्थेने अर्जदाराची खाता क्र.4157 मध्ये दैनदींन जमा केलेली रक्कम मागणी करुन ही दिली नाही, ही त्याचे सेवेतील न्युनता असल्याची बाब सिध्द होत असल्याने, तक्रार मंजूर करण्यास पाञ आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 15. वरील कारणे व निष्कर्षावरुन अर्जदाराची तक्रार गै.अ.क्र.19 पत संस्थेचे विरुध्द मंजूर होण्यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यांत येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर. (2) गैरअर्जदार क्र.19 ‘‘पत संस्था’’ यांनी अर्जदारास रुपये 1,58,500/- दि.14.8.2009 पासून द.सा.द.शे.6 % व्याजदराने रक्कम पदरी पडेपर्यंत आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आंत द्यावे. (3) गैरअर्जदार क्र.19 यांनी मानसीक, शारीरीक ञासापोटी व आर्थिक नुकसानीपोटी अशी सर्व मिळून रुपये 5000/- , तसेच, तक्रार खर्चापोटी रुपये 1000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आंत द्यावे. (4) गैरअर्जदार क्र.1 ते 18 विरुध्द तक्रार खारीज. (5) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
| [HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member | |