तक्रारकर्त्यातर्फे :- स्वत:
::: आ दे श प त्र :::
मा. सदस्य, श्री कैलास वानखडे यांनी निकाल कथन केला :-
ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अन्वये तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे :-
तक्रारकर्त्याने माइक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल दिनांक 10-05-2014 रोजी विरुध्दपक्ष क्रमांक 1 कुणाल इलेक्ट्रॉनिक्स यांचेकडून रु. 6,400/- मध्ये विकत घेतला होता. मोबाईल विकत घेतेवेळी विरुध्दपक्षाने ही चांगली कंपनी आहे व तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळणार आहे असे तक्रारकर्त्याला आश्वासन दिले. सदर मोबाईलचा मॉडेल क्रमांक ए-71 असून IMEI 911335850512417 व 911335850512425 असून रंग पांढरा आहे. तक्रारकर्त्याने ग्रहदशाच्याप्रमाणे पंडित यांच्या सल्ल्यानुसार सदर मोबाईल पांढ-या रंगाचा घेतला.
काही माहिने वापरल्यानंतर सदर मोबाईलमध्ये तांत्रिक बिघाड आढळला. हा पिस फॉल्टी आहे हे लक्षात आल्यानंतर तक्रारकर्ता सर्व्हिस स्टेशन विरुध्द पक्ष क्रमांक 2 ला दिनांक 18-10-2014 रोजी भेट घेतली व मोबाईलमधील बिघाड विरुध्दपक्षाला लक्षात आणून दिला. विरुध्दपक्षाने जॉबशिट क्रमांक WO 31722 – 1014 – 12855289 दिनांक 18-10-2014 रोजी तक्रारकर्त्याला दिले आणि मोबाईल नागपूरकडे सुधारण्याकरिता पाठवतो, असे सांगून मोबाईल विरुध्दपक्ष क्रमांक 2 ने स्वत:जवळ ठेवला व दहा पंधरा दिवसानंतर मोबाईल दुरुस्त करुन मिळेल, असे आश्वासन तक्रारकर्त्याला दिले.
तक्रारकर्ता 20 दिवसानंतर परत विरुध्दपक्ष क्रमांक 2 चे सर्व्हिस स्टेशनला गेला असता हा मोबाईल दुरुस्त होत नाही आणि वॉरंटी कालावधीमध्ये असल्यामुळे तुम्हाला नवीन मोबाईल देऊ, असे विरुध्दपक्ष क्रमांक 2 ने सांगितले. तक्रारकर्ता त्यानंतर सतत जवळपास 3 महिने 15 दिवस वारंवार आपला कामधंदा सोडून विरुध्दपक्ष क्रमांक 2 व 3 च्या संपर्कामध्ये होता. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाच्या मोबाईलवर संपर्क साधला असता 2-4 दिवसात मोबईल येत आहे, असे उत्तर मिळाले. विरुध्दपक्ष क्रमांक 2 ने काळया रंगाचा एक जुना मोबाईल अत्यंत दयनिय स्थितीचा मोबाईल तक्रारकर्त्याला बदलून देण्याचा प्रस्ताव दिला. तक्रारकर्त्याने सदर प्रस्ताव नाकारुन पांढ-या रंगाचा चांगला मोबाईल देण्याची विनंती केली. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाच्या सर्व मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला, परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. सबब, तक्रारकर्त्याची विनंती की, 1) तक्रारकर्त्याची तक्रार मान्य करावी तसेच तक्रारकर्त्यास नवीन मोबाईलची किंमत ₹ 6,400/-, तसेच मोबाईल, टेलिफोन व वाहन खर्च रक्कम ₹ 5,00/- मानसिक, शारिरीक त्रासापोटीची रक्कम ₹ 12,000/- व कोर्ट खर्च ₹ 3,000/- अशी एकूण रक्कम ₹ 21,900/- विरुध्दपक्षाकडून तक्रारकर्त्याला देण्यात यावी, ही विनंती.
सदर तक्रार शपथेवर दाखल केली असून त्यासोबत एकंदर 06 दस्तऐवज पुरावा म्हणून दाखल केलेले आहेत.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांना नोटीस बजावल्यानंतर देखील विरुध्दपक्ष क्रमांक 1 गैरहजर असल्याने सदर प्रकरण विरुध्दपक्ष क्रमांक 1 च्या विरुध्द एकतर्फी चालविण्याचे आदेश या न्यायमंचाने दिनांक 14-07-2015 रोजी पारित केले.
विरुध्दपक्ष क्रमांक 2 व 3 यांना नोटीस बजावल्यानंतर देखील विरुध्दपक्ष क्रमांक 2 व 3 गैरहजर असल्याने सदर प्रकरण विरुध्दपक्ष क्रमांक 2 व 3 च्या विरुध्द एकतर्फी चालविण्याचे आदेश या न्यायमंचाने दिनांक 03-08-2015 रोजी पारित केले.
का र णे व नि ष्क र्ष
सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्रमांक 1, 2 व 3 यांच्याविरुध्द मंचाने एकतर्फी आदेश केल्याने फक्त तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार व दस्त यांचा सखोल अभ्यास करुन मंचाने खालीलप्रमाणे निष्कर्ष काढला तो येणेप्रमाणे.
तक्रारकर्ता यांच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्ता यांनी दिनांक 10-05-2014 ला विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडून माईक्रोमॅक्स कंपनीचा मॉडेल क्रमांक ए-71 IMEI No. 911335850512417 व 911335850512425 पांढ-या रंगाचा रक्कम ₹ 6,400/- रुपयात विकत घेतला. त्याची पावती सोबत जोडली आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक आहे हे सिध्द् होते. सदर मोबाईल चार महिने व्यवस्थित चालल्यानंतर सदर मोबाईलमध्ये बिघाड निर्माण झाला. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 18-10-2014 ला विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांच्याकडे तो जमा केला. विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्त्याला जॉबशिट दिली आहे, ते दस्त क्रमांक 6 वरुन दिसून येते. जॉबशिट वर 5301 Charging/Battery no charging असे लिहिलेले आहे. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी सदर मोबाईल दुरुस्तीसाठी नागपूर येथे पाठवावे लागेल, त्यामुळे तक्रारकर्त्याला 10 ते 15 दिवसांचा वेळ लागेल, असे सांगितले व मोबाईल जवळ ठेवून घेतला. त्यानंतर तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडे 30 दिवसानंतर गेला असता, विरुध्दपक्ष क्रमांक 2 ने तक्रारकर्त्याला असे सांगितले की, मोबाईल दुरुस्त होत नाही, त्या बदल्यात दुसरा मोबाईल आम्ही तुम्हाला परत देवू, असे आश्वासन दिले. जॉबशिटवर असलेल्या मोबाईल नंबरवर तक्रारकर्त्याने वारंवार फोन करुन पत्र पाठवून विचारणा केली तरी सुध्दा विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला नवीन मोबाईल दिला नाही अथवा जुना मोबाईलही दुरुस्त करुन दिला नाही. त्यामुळे, नाईलाजाने तक्रारकर्त्याला सदर प्रकरण ग्राहक मंचामध्ये दाखल करावे लागले. तक्रार दाखल केल्यानंतर विरुध्दपक्ष क्रमांक 1, 2 व 3 यांना मंचाची नोटीस मिळाल्यानंतर देखील विरुध्दपक्ष मंचात हजर झाले नाही. त्यामुळे मंचाने त्यांच्याविरुध्द एकतर्फी आदेश पारित केलेले आहेत.
सदर प्रकरणात तिनही विरुध्दपक्ष मंचासमोर हजर झाले नाही. त्यामुळे केवळ तक्रारकर्त्याची तक्रार व त्याने दाखल केलेल्या दस्तावरुन सदर प्रकरणात आदेश करण्यात आले. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या जॉबशिटवरुन व तक्रारीवरुन तक्रारकर्त्याचा मोबाईल अदयापही विरुध्दपक्ष क्रमांक 2 च्या ताब्यात असल्याचे मंचाच्या निदर्शनास येते. तसेच तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्त्याचा मोबाईल दुरुस्त होऊ शकत नसल्याने त्याबदल्यात नवीन मोबाईल देण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. त्यानुसार, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाशी पत्रव्यवहार केल्याचे दिसून येते. सदर पत्रांना विरुध्दपक्षाने कुठलेही उत्तर दिलेले नाही अथवा मंचासमोर येवून तक्रारकर्त्याचे सदर म्हणणे खोडून काढले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचा मोबाईल दुरुस्त होऊ शकत नसल्याने विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी नवीन मोबाईल देण्याचे आश्वासन तक्रारकर्त्याला दिले होते हे ग्राहय धरण्यात येते. परंतु, प्रकरणात तक्रारकर्त्याने विनंती अर्ज करुन त्याला नवीन मोबाईल ऐवजी मोबाईलची संपूर्ण रक्कम मिळावी असे मंचास कळवले होते. तक्रारकर्त्याच्या सदर मागणीचा विचार करुन विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्याला त्याच्या मोबाईलची किंमत ₹ 6,400/- दयावी असे आदेश सदर मंच देत आहे. विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांनी निर्मित केलेला सदोष मोबाईल विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्त्याला विकला व विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी नवीन मोबाईल देण्याचे आश्वासन देऊनही नवीन मोबाईल दिला नाही म्हणून तक्रारकर्त्याला शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान भरपाई पोटी तक्रारकर्त्याला शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान झाले, त्याची भरपाई म्हणून विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी संयुक्तरित्या व वैयक्तिकपणे ₹ 3,000/- व प्रकरणाचे खर्चापोटी ₹ 2,000/- तक्रारकर्त्याला दयावे असे आदेश सदर मंच पारित करत आहे.
अं ति म आ दे श
1) तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी वैयक्तिकपणे व संयुक्तरित्या तक्रारकर्त्याने मागणी केल्याप्रमाणे मोबाईलची रक्कम ₹ 6,400/- ( अक्षरी रुपये सहा हजार चारशे फक्त ) परत करावी. शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसानीपोटी व प्रकरणाचा खर्च रक्कम ₹ 5,000/- ( अक्षरी रुपये पाच हजार फक्त ) तक्रारकर्त्याला दयावे.
3) विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी वरील आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत करावे.
4) उभयपक्षकारांना आदेशाची प्रमाणित प्रत विनामुल्य देण्यात यावी.