(घोषित दि. 21.08.2014 व्दारा श्रीमती. नीलिमा संत, अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे जालना येथील रहिवासी असून त्यांची गट क्रमांक 32 व 38 अशी वडगाव वखारी ता.जि.जालना येथे शेत जमिन आहे. तक्रारदारांनी सन 2013 – 2014 च्या खरीम हंगामात वरील शेत जमिनीत सोयाबीनच्या सात बॅग बियाणाची लागवड केली. सदरचे बियाणे तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या दुकानातून खरेदी केलेले असून त्याचा पावती क्रमांक 2097 असा आहे. त्या पावतीवर सोयाबीन जे.एस. 337 (बसंत अॅग्रो टेक), व सोयाबीन जे.एस. 335 (एम.एस.एस.सी) असा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच वरील बियाणापैकी 3 बॅग गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी उत्पादीत केलेले बियाणे होते व 4 बॅग गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी उत्पादीत केलेले होते. अशा प्रकारे तक्रारदार हे गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 चे ग्राहक आहेत.
तक्रारदारांनी सदर बियाणाची लागवड त्यांच्या शेतामध्ये जून 2013 ला केली. परंतू सोयाबीनची उगवण फक्त 40 टक्के झाली व 60 टक्के बियाणे उगवले नाही. यामुळे तक्रारदारांचे अंदाजे 3,00,000/- रुपयांचे नुकसान झालेले आहे. तक्रारदारांनी लागवड केल्या नंतर योग्य प्रमाणात रोगप्रतिबंध औषधांची वेळोवेळी फवारणी केली होती. तसेच अंतर मशागत देखील केली होती. तक्रारदारांना बियाणे खरेदीसाठी रुपये 10,850/- अंतर मशागत व फवारणीसाठी रुपये 20,000/- असा खर्च सोसावा लागला.
तक्रारदारांनी बियाणाची उगवण निट न झाल्याबद्दल तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे तक्रार केली होती. तेंव्हा दिनांक 10.09.2013 रोजी वरील समितीकडून पिकाची प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामा करण्यात आला. त्यात देखील समितीने कमी लागवड झाल्याचा निष्कर्ष काढला आहे.
म्हणून तक्रारदार या तक्रारीव्दारे रुपये 3,00,000/- एवढी नुकसान भरपाई व रुपये 40,000/- एवढा मशागत, खत, औषधे इत्यादीसाठीचा खर्च अशी मागणी करत आहेत. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत त्यांच्या शेताचा 7/12 चा उतारा, तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने केलेला पंचनामा, गैरअर्जदार क्रमांक 1 यांची रुपये 13,590/- ची पावती, लक्ष्मी सिड्स यांची रुपये 9,000/- ची पावती व तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांना पाठविलेली कायदेशीर नोटीस, तिचे त्यांना आलेले उत्तर अशी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 मंचा समोर हजर झाले. त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या जबाबानुसार त्यांना तक्रारदारांनी त्यांचेकडून वरील प्रमाणे सोयाबीनचे बियाणे घेतले ही गोष्ट कबूल आहे. परंतू ते म्हणतात की, ते केवळ बियाणे व खते इत्यादींचे विक्रेते आहेत. त्यांनी बियाणाचे उत्पादन केलेले नाही. त्यामुळे बियाणातील दोषाबाबत त्यांना जबाबदार धरता येणार नाही. त्याच प्रमाणे तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने केलेला पंचनामा बघता त्यात सोयाबीन पिकाची वाढ न होणे, झाडे वाळणे, मुळे कुजणे या गोष्टी हुमणी या रोगाच्या प्रार्दुभावामुळे झाल्याचे दिसते असा उल्लेख केलेला आहे. अहवालात कोठेही बियाणे सदोष असल्याबाबत उल्लेख केलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या लेखी जबाबानुसार ते फक्त बिज प्रमाणिकरण यंत्रणा, महाराष्ट्र राज्य यांनी प्रमाणित केलेल्या बियाणांची विक्री करतात. त्यांनी सोयाबिन जे.एस.335 या वाणाचे बियाणे उत्पादीत केले त्याची संपूर्ण तपासणी करुन ते विक्रीसाठी योग्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र (Release Order) दिल्यानंतरच बियाणे विक्रीसाठी बाजारात आणले गेले. कोणत्याही बियाणाची उगवण शक्ती ही पाऊस, हवामान, जमिनीची प्रत, पेरणीची पध्दत, औषधांची मात्रा अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. तक्रारदारांनी केवळ औषधांची फवारणी केली असे नमूद केले आहे. परंतू बियाणाची हाताळणी त्यांनी कशी केली, पेरणी करतांना काय काळजी घेतली याचा खुलासा केलेला नाही. तसेच पेरणी नेमकी कधी केली हे देखील सांगितलेले नाही. तक्रारदारांनी दाखल केलेल्या अहवालानुसार उगवण शक्तीचे प्रमाण 66 टक्के असे दर्शविले आहे. तसेच कमी उगवण शक्तीचे कारण मूळ कुज व हुमणी रोग असे दर्शविले आहे. सबंध अहवालात कोठेही सदोष बियाणे होते असा उल्लेख नाही. तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 या दोघांनीही उत्पादीत केलेल्या बियाणाची पेरणी केली होती. परंतू नेमक्या कोणत्या बियाणाची उगवण कमी झाली हे तक्रारीतून स्पष्ट होत नाही. तक्रारदार शेत पाहणीच्या वेळेस हजर देखील नव्हता. तक्रारदारांनी या पुर्वी कधीही गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या जालना कार्यालयात बियाणा बाबत तक्रार केलेली नाही. तक्रारदार प्रामाणिकपणे मंचा समोर आलेले नाहीत. त्यामुळे तक्रारदारांचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा व गैरअर्जदार क्रमांक 2 यांना विशेष नुकसान भरपाई म्हणून रुपये 5,000/- द्यावेत असा आदेश व्हावा अशी विनंती गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी केलेली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्या जबाबानुसार तक्रारदारांनी विकत घेतलेले जे.एस. 335 हे बियाणे महाराष्ट्र राज्य बिज प्रमाणिकरण यंत्रणा यांनी प्रमाणपत्र क्रमांक 25164 अन्वये प्रमाणित केलेले आहे. शासकीय प्रयोग शाळेत बियाणाची उगवणशक्ती 72 टक्के होती. गैरअर्जदार क्रमांक 3 यांना त्या लॉटमधून कोणत्याही बियाणा बाबत इतर शेतक-यांची तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रारदारांनी दाखल केलेल्या पंचनाम्यानुसार कोठेही बियाणामध्ये दोष होता असा निष्कर्ष काढलेला नाही. समितीने पिकाची वाढ न होणे, झाडे वाळणे, मूळ कुजणे या गोष्टी हुमणी रोगाच्या प्रार्दुभावामुळे झाल्याचे नमूद केले आहे. बियाणाच्या कमी उगवण शक्तीची इतरही अनेक कारणे असतात. तक्रारदारांनी कोणत्या कंपनीचे बियाणे कोठे व किती क्षेत्रात पेरले याचा खुलासा केलेला नाही. तसेच मशागत, औषध फवारणी, खते जमिनीतील ओलावा याबाबत संपूर्ण माहिती दिलेली नाही.
तक्रारदार हे शेतकरी नसून वकीली व्यवसाय करतात. त्यांच्या अयोग्य नियोजनामुळे उत्पादनावर परिणाम झालेला दिसतो. तक्रारदारांनी ही बिनबुडाची तक्रार दाखल केली आहे. म्हणून तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात यावी व गैरअज्रदार क्रमांक 3 यांना रुपये 10,000/- नुकसान भरपाई देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती गैरअर्जदार क्रमांक 3 करतात.
त्यांनी आपल्या जबाबा सोबत दिनांक 17.04.2013 चा मुक्तता अहवाल तसेच तणनाशकाच्या वापराबद्दलचे माहिती पत्रक अशी कागदपत्रे दाखल केली.
तक्रारदारांची तक्रार गैरअर्जदारांचा जबाब व दाखल कागदपत्रे यावरुन मंचाने पुढील मुद्दे विचारात घेतले.
मुद्दे निष्कर्ष
1.गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांनी तक्रारदारांना
द्यावयाच्या सेवेत काही कमतरता केली आहे का ? नाही
2.गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना द्यायच्या
सेवेत कमतरता केली आहे का ? नाही
3.काय आदेश ? अंतिम आदेशा नुसार
तक्रारदार व त्यांचे वकील सातत्याने मंचासमोर गैरहजर आहेत म्हणून तक्रार गुणवत्तेवर निकाली करण्यात आली. गैरअर्जदार क्रमांक 1, 2 व 3 यांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला.
कारणमीमांसा
मुद्दा क्रमांक 1 साठी – तक्रारदारांनी दाखल केलेल्या 7/12 च्या उता-यांवरुन गट क्रमांक 32, 38 व 58 अशी शेतजमिन तक्रारदारांच्या नावावर होती असे दिसते. तालुका तक्रार निवारण समितीने केलेल्या पंचनाम्यानुसार गट क्रमांक 38 मध्ये गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी उत्पादित केलेले तर गट क्रमांक 39 मध्ये गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी उत्पादित केलेले बियाणे पेरलेले दिसते. परंतु गट क्रमांक 39 चा 7/12 चा उतारा मंचा समोर दाखल नाही त्यामुळे ती जमिन कोणाच्या नावावर आहे याचा उलगडा होत नाही.
पंचनाम्यात सोयाबिन पिकाची उगवण 66 टक्के एवढी झाल्याचे व कमी उगवण शक्तीचे कारण “पाणथळ जमिन, मूळ कुज व हुमणी रोगाच्या प्रार्दुभाव” असे असल्याचे निष्कार्षात तज्ञांच्या समितीने नमूद केलेले आहे. त्यात कोठेही बियाणे सदोष असल्याचा उल्लेख नाही. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेने त्यांनी उत्पादित केलेल्या JS 335 वाणाच्या लॉट क्रमांक 2382 च्या सोयाबिन बियाणाला दिलेले गुणवत्ता प्रमाणपत्र मंचात दाखल केलेले आहे. वरील विवेचना वरुन गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांनी उत्पादित केलेले बियाणे सदोष होते आणि गैरअर्जदार 2 व 3 यांनी सदोष बियाणे विकून तक्रारदारांना द्यायच्या सेवेत काही कमतरता केली आहे या गोष्टी तक्रारदार पुराव्यानिशी सिध्द करु शकलेले नाहीत.
मुद्दा क्रमांक 2 साठी – गैरअर्जदार क्रमांक 1 हे केवळ खते, बियाणे, कीटक नाशके यांची विक्री करतात. त्यांचे काम केवळ बियाणांची सीलबंद अवस्थेत विक्री करणे हे आहे. त्यामुळे बियाणातील दोषाबाबत त्यांना जबाबदार धरता येणार नाही. बियाणे सदोष होते ही बाब देखील तक्रारदारांनी सिध्द केलेली नाही. अशा परिस्थितीत गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना द्यायच्या सेवेत काहीही कमतरता केलेली नाही असा निष्कर्ष मंच काढत आहेत.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चाबद्दल आदेश नाही.