मंचाचे निर्णयान्वये - श्री. विजयसिंह राणे, अध्यक्ष. //- आदेश -// (पारित दिनांक – 17/01/2011) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत, त्यांनी गैरअर्जदाराकडून घेतलेल्या एकूण 7 प्लॉट्सचे विकीपत्र गैरअर्जदाराने करुन द्यावे याकरीता दाखल केलेली आहे. थोडक्यात तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, त्याने गैरअर्जदाराचे मौजा-पांजरा, प.ह.नं.53, मध्ये कार्तीक कॉलनी व रामनगर या नावाने असलेल्या लेआऊटमध्ये सात प्लॉट्स घेण्याचे ठरविले. सदर प्लॉटचे तपशिल खालीलप्रमाणे आहेत. अ.क्र. | प्लॉट क्र. | एकूण क्षेत्रफळ चौ.फु.मध्ये | किंमत | करारनामा | 1. | 11 | 2000 चौ.फु. | रु.1,00,000/- | 16.05.2007 | 2. | 90 | 2000 चौ.फु. | रु.70,000/- | 16.05.2007 | 3. | 108 | 2000 चौ.फु. | रु.70,000/- | 16.05.2007 | 4. | 183 | 2000 चौ.फु. | रु.50,000/- | 20.04.2007 | 5. | 184 | 2000 चौ.फु. | रु.50,000/- | 20.04.2007 | 6. | 185 | 2000 चौ.फु. | रु.50,000/- | 20.04.2007 | 7. | 186 | 2000 चौ.फु. | रु.50,000/- | 20.04.2007 |
तक्रारकर्त्याने सदर प्लॉटसच्या नोंदणीच्यावेळेस बयानादाखल काही रकमा गैरअर्जदाराला दिल्या व गैरअर्जदाराने त्याबाबत पावत्याही अदा केल्या. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार त्याने गैरअर्जदाराला करारनाम्याप्रमाणे वेगवेगळया हफ्त्यांमध्ये एकूण रु.1,84,200/- इतकी रक्कम दिलेली असून त्याच्या पावत्या गैरअर्जदाराने दिलेल्या आहेत. तक्रारकर्त्याच्या मते जेव्हा तो गैरअर्जदाराकडे सदर ले-आऊटच्या मंजूरीबाबत विचारणा करण्यास गेला असता गैरअर्जदाराने माहिती देण्यास टाळाटाळ केली व पुढे त्याने कार्यालयही बंद केले. त्यामुळे तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराची माहिती काढून कायदेशीर नोटीस बजावला असता गैरअर्जदाराने त्यास प्रतिसाद दिला नाही, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन उर्वरित रक्कम रु.2,55,800/- देण्यास तक्रारकर्ता तयार असून गैरअर्जदाराने सदर प्लॉटचे विक्रीपत्र करुन द्यावे, गैरअर्जदाराने नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चाची मागणी केलेली आहे. 2. सदर तक्रार मंचात दाखल झाल्यावर मंचाने गैरअर्जदारावर नोटीस बजावला असता गैरअर्जदाराला संबंधित विभागाने नोटीसबाबत सुचित करुनही गैरअर्जदार मंचासमोर हजर झाले नाही किंवा आपले लेखी म्हणणेही मंचासमोर दाखल न केल्याने मंचाने त्यांच्याविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.15.12.2010 रोजी पारित केला. 3. सदर प्रकरण मंचासमोर दि.07.01.2011 रोजी युक्तीवादाकरीता आल्यानंतर मंचाने तक्रारकर्त्याचा युक्तीवाद त्यांच्या वकील प्रतिनीधीमार्फत ऐकला. गैरअर्जदार गैरहजर. मंचाने सदर प्रकरणी तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या प्लॉटचे बयानापत्र, पावत्या, लेआऊट नकाशा, नोटीसची प्रत इ. चे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 4. सदर प्रकरणी तक्रारकर्त्याने प्लॉट क्र.11, 90, 108, 183, 184, 185 व 186 चे बयानापत्र व लेआऊट नकाशाचे अवलोकन केले असता मंचाचे निदर्शनास प्रामुख्याने ही बाब आली की, सदर विवादित प्लॉट्स हे जवळपास एकमेकालगतचे असून ते खरेदी करण्याकरीता तक्रारकर्त्याने फक्त दोन वेगवेगळया तारखांना घेण्याचा सौदा केलेला आहे. तक्रारकर्त्याने एकाच लेआऊटमध्ये 14,000 चौ.फु. जमिन ही खरेदी करण्याचा करार गैरअर्जदारासोबत करुन त्याबाबत काही रकमांचा भरणाही केलेला आहे. मंचाचे मते सदर प्लॉट्सच्या लेआऊटमधील वर्णनावरुन तक्रारकर्त्याने इतकी मोठी जमीन ही व्यावसायिक हेतूने व उद्देशाने घेतलेली असावी किंवा तक्रारकर्ता हा जमिन खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असावा. 14,000 चौ.फु. जमीन वाणिज्यीक प्रयोजनाकरीता घेतल्याने मालक हा ग्राहक म्हणून लाभधारक ठरु शकत नाही असे मंचाचे मत आहे. सकृतदर्शनी तक्रारकर्ता हा ग्राहक असल्याचे स्पष्ट होत नसल्याने तक्रारकर्त्याची तक्रार मंचासमक्ष चालविण्यायोग्य नसल्याचे मंचाचे मत आहे. मा. राज्य आयोगाचे IV (2010) CPJ 19, RAHUL PARIKH VS. SHELTER MAKERS (I) PVT. LTD. निवाडयावरुन व्यावसायिक उपयोगातून अधिकतम लाभांश मिळवितांना झालेल्या विवादाबाबतची तक्रार चालविण्याचे अधिकार मंचाला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचा सदर वाद हा मंचासमक्ष चालविण्यायोग्य नसल्याचे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याचा सेवा घेण्याचा मुळ हेतू हा व्यापारिक असल्याने तक्रारकर्त्याची तक्रार मंचाचे मते खारिज होण्यायोग्य आहे, म्हणून मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते. 2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च स्वतः सोसावा. (मिलिंद केदार) (विजयसिंह राणे) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |