::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 06/08/2015 )
आदरणीय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …
तक्रारकर्ते यांच्या मालकीची शेती अनुक्रमे गट क्र. 161/2, क्षेत्र 1 हे.63 आर व गट क्र. 161/2 मधील क्षेत्र 1 हे. 62 आर आहे. तक्रारकर्ते हे एकत्र कुटूंबामध्ये राहतात व त्यांच्या कुटंबाचे नरेश सुरेश काळे हे मुख्य कर्ता व्यक्ती आहेत. 2014 च्या खरीप हंगामामध्ये तक्रारकर्ते यांच्या मालकीच्या वर नमुद शेत जमीनीमध्ये पेरणी करण्यासाठी तक्रारकर्ते क्र. 1 चे पती व तक्रारकर्ते क्र. 2 चा मुलगा नरेश सुरेश काळे यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्याद्वारे निर्मित केलेले सोयाबिनचे जे.एस. 335 के.डी. ( कृषीधन) या वाणाच्या बियाण्यांची विरुध्दपक्ष क्र. 2 च्या दुकानातून प्रति बॅग 30 किलो वजनाच्या एकूण 9 बॅग बियाणे, लॉट नं. 1712911, 171313 व 171290 दि. 26.05.2014 रोजी रु. 2500/- प्रतिबॅग भावानुसार एकूण किंमत रु. 22,500/- ला विकत घेतले. त्याचा पावती क्र. एमआर 964 डी एम नं. 964 दि. 26/05/2014 आहे. सदर बियाणे पेरण्यापुर्वी तक्रारकर्ते यांनी शेताची नांगरणी व इतर मशागत योग्य प्रकारे केली आहे. त्यानंतर पेरणीयोग्य पाऊस पडल्यानंतर दि. 25/07/2014 रोजी वर नमुद शेतामध्ये पेरणी केली. परंतु शेतीची चांगली मशागत करुन व चांगला पाऊस आल्यानंतर 6 ते 7 दिवसांनी बियाणे अतिशय कमी प्रमाणात उगवले व 90 टक्के बियाणे उगविले नाही. त्यामुळे तक्रारकर्ते क्र. 1 व 2 यांचे वतीने नरेश सुरेश काळे यांनी पंचायत समिती कृषी अधिकारी अकोला यांच्याकडे दि. 04/08/2014 रोजी लेखी तक्रार दाखल केली. त्या तक्रारीला अनुसरुन तालुका स्तरीय तक्रार निवारण समीती अकोला यांनी दि. 20/08/2014 रोजी तक्रारकर्त्याच्या शेतास भेट देवून प्रत्यक्ष पाहणी केली. सदर तक्रार निवारण समितीमध्ये तज्ञ मंडळींचा समावेश होता. सदर चौकशी समितीने आपला अहवाल दिला असून, त्यांनी स्पष्टपणे निष्कर्ष काढला की, सदर वाणाचे बियाणे सदोष आहे. त्यानंतर तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्षाकडे नुकसान भरपाईची मागणी केली. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी बियाणे खरेदीची किंमत धनादेशाद्वारे परत करण्याचे आश्वासन दिले, परंतु झालेल्या नुकसानाची भरपाई करुन दिलेली नाही त्यामुळे तक्रारकर्ते यांनी प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्यांची तक्रार मंजुर करावी व विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी सदोष बियाणे उत्पादित केल्याबाबत व विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी सदोष बियाण्यांची विक्रीकेल्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी नुकसान भरपाईपोटी रु. 2,24,000/- तक्रारकर्त्याला देण्याचा आदेश व्हावा. तसेच न्यायिक खर्चापोटी रु. 10,000/- व मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु. 50,000/- देण्याचा आदेश व्हावा..
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 08 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा लेखीजवाब :-
2. सदर तक्रारीचे अनुषंगाने, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी आपला लेखीजवाब, शपथेवर दाखल केला त्यानुसार तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करुन असे नमुद केले आहे की,…
तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्षाकडून कोणतेही बियाणे खरेदी केलेले नाही, त्यामुळे ते ग्राहक नाही. तक्रारकर्त्यांकडे वेगवेगळी शेती आहे, त्यामुळे कोणत्या लॉटचे बियाणे किती क्षेत्रात पेरले तक्रारकर्त्याच्या कथनानुसार 9 बॅग सोयाबीन खरेदी केल्याचे नमुद आहे आणि चौकशी समिती 23 बॅग दोषयुक्त असल्याचा अहवाल देत आहे. या अहवालामध्ये तक्रारकर्त्याचे नाव नाही व तक्रारकर्त्याच्या शेतात कोणत्या कंपनीचे बियाणे उगवले नाही, असे कोठेच नमुद नाही, त्यामुळे चौकशी समितीचा अहवाल दोषपुर्ण आहे. अहवाल हा प्रथमदर्शनी पाहून दिलेला आहे. कृषी अधिकारी व तालुका तक्रार निवारण समिती यांनी बियाण्याबाबत तक्रार आल्यानंतर सदरचे बियाणे नमुना घेवून ते बिज प्रयोगशाळेत तपासण्याकरिता पाठविणे आवश्यक आहे, परंतु या प्रकरणात तसे झाले नाही. कृषी अधिकारी तसेच तालुका स्तरीय समिती यांनी बियाणे कायदा कलम 23-अ प्रमाणे कोणत्याही तरतुदीचे पालन केले नाही. उगवण शक्तीचा अहवाल देण्यापुर्वी त्या बियाण्याचे पुर्ण परिक्षण बिज परिक्षण प्रयोगशाळेद्वारे करुन त्या नंतरच अहवाल द्यायचा असतो. कारण उगवण शक्तीला तापमान, हवामान, पाण्याची आद्रता तसेच जमिनीचा दर्जा, पर्जन्यमान, पेरणीची पध्दत ह्या सर्व बाबी आवश्यक असतात. चौकशी समितीने दिलेला अहवाल दोषपुर्ण आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्र. 2 यांचा लेखीजवाब :-
सदर तक्रारीचे अनुषंगाने,विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी आपला लेखीजवाब, शपथेवर दाखल केला त्यानुसार तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करुन अधिकचे कथनात विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या जबाबाप्रमाणेच बचावाचे कथन केलेले आहे.
3. त्यानंतर तक्रारकर्त्यातर्फे प्रतिज्ञापत्राद्वारे पुरावा व प्रतिउत्तर, व लेखी युक्तीवाद दाखल केले. तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 तर्फे लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आला व दोन्ही पक्षांतर्फे तोंडी युक्तीवाद करण्यात आला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. तक्रारकर्त्याची तक्रार, दाखल दस्तऐवज, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचा स्वतंत्र लेखी जवाब, तक्रारकर्ते यांचे प्रतिउत्तर, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 ची पुराव्याबद्दलची पुरसीस, उभय पक्षांचा लेखी व तोंडी युक्तीवाद, तसेच दाखल केलेले न्यायनिवाडे यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देऊन पारीत केला तो येणे प्रमाणे –
तक्रारकर्ते यांचा युक्तीवाद असा आहे की, तक्रारकर्ते क्र. 1 व 2 यांच्या शेत जमीनीमध्ये, तक्रारकर्ते क्र. 3 यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्याद्वारे निर्मीत केलेले सोयाबीन जे. एस. 335 के.डी. (कृषीधन) या वाणाच्या बियाण्याची खरेदी, बिलाप्रमाणे केली व त्याची पेरणी करण्याकरिता तक्रारकर्ते यांनी त्यांच्या शेताची नांगरणी, नउफंटन व रोटर केले, तसेच शेणखत शेतात टाकून घेतले, तसेच बुरशी नाशकाचा वापर केला. त्यानंतर दि. 25/07/2014 रोजी वर खरेदी केलेल्या बियाण्याची पेरणी केली, परंतु बियाणे खुप कमी प्रमाणात उगविले, म्हणून त्याची तक्रार केली असता, तालुका स्तरीय तक्रार निवारण समीती, अकोला यांनी या समीतीतील तज्ञ मंडळीसोबत तक्रारकर्ते यांच्या शेताची पाहणी दि. 20/8/2014 रोजी प्रत्यक्ष भेट देवून केली व अहवाल दिला. त्यानुसार सोयाबीन जे.एस. 335 या वाणाचे अनुक्रमे लॉट क्रमांक बियाणे सदोष आहे, असे मत दिले. त्यामुळे प्रार्थनेतील नुकसान भरपाई द्यावी.
यावर विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्तीक लेखी युक्तीवाद दाखल केला तो येणे प्रमाणे
तक्रारकर्ते क्र. 1 याने विरुध्दपक्षाकडून कोणतेही बियाणे खरेदी केलेले नाही, त्यामुळे ते ग्राहक नाही. तक्रारकर्त्यांकडे वेगवेगळी शेती आहे, त्यामुळे कुणी कोणत्या लॉटचे बियाणे किती क्षेत्रात पेरले, याचा बोध तक्रारीमधुन होत नाही. तक्रारकर्ते यांनी मागीतलेली नुकसान भरपाई सिध्द केली नाही. तक्रारकर्ते यांनी सदर बियाण्याची पेरणी ट्रॅक्टरद्वारे केली असल्यामुळे बियाणे खोलवर पेरल्या जाते व त्यामुळे त्यांच्या उगवण क्षमतेवर परिणाम होतो. समीतीने एकूण 5 लॉटचा वेगवेगळया कंपनीचे बियाणे हे सदोष असल्याबाबत अहवाल दिला आहे. परंतु या अहवालात नेमके कोणत्या लॉटचे बियाणे कोणत्या शेतात पेरले व कोणत्या कंपनीच्या लॉटचे बियाणे हे सदोष आहे, हे नमुद नाही. तसेच अहवाल हा प्रथमदर्शनी पाहून दिलेला आहे. कृषी अधिकारी व तालुका तक्रार निवारण समिती यांनी बियाण्याबाबत तक्रार आल्यानंतर सदरचे बियाणे नमुना घेवून ते बिज प्रयोगशाळेत तपासण्याकरिता पाठविणे आवश्यक आहे, परंतु या प्रकरणात तसे झाले नाही. त्यामुळे परिक्षण अहवाल येईपर्यंत निश्चितपणे बियाण्यात दोष आहे, हे सांगता येत नाही. बियाणे उगवणीकरिता दुसरे इतर घटकही जबाबदार असतात. कृषी अधिकारी यांनी बियाणे कायदा कलम 23- अ प्रमाणे तरतुदीचे पालन केलेले नाही. त्यामुळे अहवाल दोषपुर्ण आहे.
या प्रकारे उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्यांच्या या प्रकरणात व तक्रारकर्ते यांची दुसरी शेत जमीन गट क्र. 18/2, यामध्ये सुध्दा सदोष बियाण्याबाबत तक्रार असल्यामुळे तालुका स्तरीय तक्रार निवारण समीती, अकोला यांच्या अहवालामध्ये त्या बाबत उल्लेख व निष्कर्ष आहे व तक्रारकर्ते यांनी शेत गट क्र. 18/2 बाबत वेगळी तक्रार केली आहे, म्हणून तक्रारकर्त्यांच्या दोन्ही प्रकरणात समीतीचा एकसारखा अहवाल दाखल आहे, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे.
या प्रकरणात सोयाबीन जे.एस. 335 KD Lot No 171291, 171313, 171290 चे बियाणे खरेदी पावती तक्रारकर्ते क्र. 3 च्या नावे आहे. तक्रारकर्ता क्र. 1, 2 व 3 हे एकत्र कुटूंबातील व्यक्ती आहेत, असे तक्रारकर्त्याचे कथन आहे. विरुध्दपक्षाचा आक्षेप, तक्रारकर्ते क्र. 1 व 2 हे ग्राहक होऊ शकत नाही, असा आहे. परंतु तक्रारकर्ते यांनी दाखल केलेला न्यायनिवाडा – AIR 2012 SC 1160, M/s National Seeds Corporation Ltd V/s Madhusudhan Reday & Others यातील निर्देशानुसार ग्राहक व्याख्या अशी नमुद आहे की, “The definition of Consumer contained in Sec 2(d) of Consumer Act is very wide. Sub –Clause (i) of the definition takes within its fold any person who buys any goods for consideration paid or promised and partly paid and partly promised, or under any system of deferred payment. It is also includes any person who uses the goods though he may not be buyer thereof provided that such use is with the approval of the buyer” म्हणजे तक्रारकर्ती क्र. 1 व 2 या बेनिफिशीअरी व ग्राहक या संज्ञेत बसतात. रेकॉर्डवरील दाखल दस्त, असे दर्शवितात की, तक्रारकर्ते क्र. 3 यांनी वरील खरेदी केलेले बियाणे 7/12 दस्ताप्रमाणे त्यांचे शेत जमीनीत पेरणी केल्यानंतर कमी प्रमाणात उगविले, अशी लेखी तक्रार पंचायत समीती, कृषी अधिकारी अकोला कडे दाखल केल्यामुळे, दि. 20/8/2014 रोजी तक्रारकर्ते यांच्या मालकीच्या गट क्र. 161/2 मधील क्षेत्राची तालुका स्तरीय तक्रार निवारण समीती, अकोला यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली होती. दाखल दस्त असे दर्शवितात की, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग अमरावती यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी, बुलढाणा / अकोला / वाशिम / अमरावती / यवतमाळ यांना नमुद पत्रानुसार असे कळविले आहे की, बियाण्यांच्या तक्रारीची संख्या पाहता तालुका कृषी अधिकारी यांनी तालुका स्तरीय समितीसह क्षेत्रीय पाहणी करुन अहवाल सादर करावा, त्यामुळे रेकॉर्डवरील हा अहवाल ज्यावर तालुका कृषी अधिकारी, विषयतज्ञ महाबीज, विषयतज्ञ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय, अकोला, सदस्य सचिव / कृषी अधिकारी पंचायत समीती अकोला यांच्या सह्या आहेत. त्यावरुन असा बोध होतो की, तक्रारकर्ते यांनी खरेदी केलेले सोयाबीन बियाणे वाण जे.एस.335, कंपनीचे नाव- कृषीधन, लॉट नं. 171291, 171313 व 171290, गट क्र. 161/2 मधील पेरणी क्षेत्र बाधीत असल्याचे समीतीच्या निदर्शनास आले होते, तसेच पेरणी झालेल्या क्षेत्रात योग्य वातावरण्, ओलावा दिसून आला, क्षेत्रीय गणती केली असता 10 टक्के बियाणे उगवले असल्याचे आढळले, त्यामुळे वरील नमुद बियाणे सदोष आहे, असे मत समीतीने व्यक्त केले. या अहवालात असेही नमुद आहे की, उपरोक्त लॉट मधील बियाणे उगवण शक्ती व शुध्दता तपासणी करीता प्रयोग शाळेत पाठविण्याची त्यांनी मागणी केली असता, शिल्लक नसल्याचे शेतक-याकडून सांगण्यात आले. या बद्दल मंचाला असे वाटते की, शेतक-याजवळ बियाणे सॅम्पल मिळू शकणार नाही, हे समजु शकतो परंतु विरुध्दपक्ष जेंव्हा सदर बियाणे हे प्रमाणित आहे, असे म्हणतात तर तसा प्रयोगशाळेतील अहवाल विरुध्दपक्षाने रेकॉर्डवर सादर का केला नाही ? त्यामुळे बियाणे तपासण्याचे Burden विरुध्दपक्षावर लादता येणार नाही, असे युक्तीवादात म्हणणे संयुक्तीक ठरणार नाही. तसेच समीतीचा अहवाल जरी प्रथमदर्शनी पाहून दिलेला आहे, तरी तो का बाजुला सारावा, ह्या बद्दलचा ठोस पुरावा विरुध्दपक्षाने दिलेला नाही. अहवाल जरी दोन शेत जमीनीचा एकत्र दिलेला आहे, तरी या प्रकरणातील लॉट क्रमांक ज्या शेतात वापरलेला आहे ते शेत गट नं. अहवालात वेगवेगळे नमुद आहे. क्षेत्र देखील वेगवेगळे आहे. त्यामुळे समीतीचा हा अहवाल मंचाने स्विकारलेला आहे.
दाखल शेतकी दस्तावरुन असे दिसते की, शेत गट क्र. 161/2 मध्ये तक्रारकर्ती क्र. 1 चे क्षेत्र 1.63 हे. व तक्रारकर्ती क्र. 2 चे क्षेत्र 1.62 हे. आहे व तलाठीचा दाखला असे दर्शवितो की, सन 2014-15 खरीप मध्ये या संपुर्ण क्षेत्रात सोयाबीन पिकाचा पेरा केला होता. बाजार भाव तक्ता तक्रारकर्ते यांनी दाखल केला नाही, परंतु वरील क्षेत्रानुसार अंदाजे एकरी 7 क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न व भाव रु. 3,000/- प्रति क्विंटल प्रमाणे तक्रारकर्ते यांचे अंदाजे नुकसान रु. 1,56,000/- इतक्या रकमेचे येते. तसेच पेरणीपुर्वीच्या खर्चाबद्दल कोणताही कागदोपत्री पुरावा तक्रारकर्ते यांनी दाखल केला नाही. त्यामुळे प्रार्थनेत मागणी केलेली नुकसान भरपाई मंचाला देता येणार नाही. म्हणून पिक नुकसान भरपाई रु. 1,56,000/- व प्रकरणाचा खर्च रु. 3000/- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे किंवा वेगवेगळे तक्रारकर्ते यांना दिल्यास ते न्यायोचित होईल, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. सबब अंतीम आदेश पारीत केला, तो येणे प्रमाणे…
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे किंवा वेगवेगळे तक्रारकर्ते यांना सदोष बियाणे उत्पादीत करुन विक्री केल्यामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी रु. 1,56,000/- ( रुपये एक लाख छप्पन हजार ) तसेच या प्रकरणाचा न्यायिक खर्च रु. 3000/- ( रुपये तिन हजार ) इतकी रक्कम तक्रारकर्ते यांना द्यावी.
- सदर आदेशाचे पालन निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावे अन्यथा उपरोक्त रक्कम, निकाल तारखेपासून प्रत्यक्ष रक्कम अदाईपर्यंत दरसाल दरशेकडा 8 टक्के दराने अदा करण्यास विरुध्दपक्ष जबाबदार राहतील.
4) सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.