न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे कलम 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारदार यांची यळगूड ता हातकणंगले येथे मोठया प्रमाणात शेतजमीन आहे. दि. 20/5/2021 रोजी तक्रारदार यांनी वि.प. क्र.4 कडून सोयाबीन 441 कृषीधन वाणाचे वि.प. क्र.1 कृषी धन सीड्स प्रा.लि. या कंपनीने उत्पादित केलेले बियाणाचा प्लॉट घेवून बियाणे स्वतःच्या वापरासाठी एकूण 111 किलो प्रतिकिलोस रक्कम रु.130/- या प्रमाणे रक्कम रु.14,330/- वि.प. यांना अदा करुन त्यांच्या यळगूड येथील गट न. 933 मध्ये पेरा करणेसाठी खरेदी केले. जून 2021 च्या पहिल्या आठवडयात सदर बियाणे पेरले व पीक चांगले येणेसाठी आवश्यक ती औषधे व खते दिली. मात्र वि.प.क्र.1 कंपनीने जे बियाणे उत्पादित केले होते, ते भेसळ व दूषित असलेमुळे आवश्यक त्या प्रमाणात पीक आले नाही. भेसळ बियाणे असल्यामुळे तक्रारदार यांनी यातील वि.प. क्र.1 ते 4 यांचेकडे भेसळयुक्त बियाणाच्या बद्दल तक्रार केली होती. मात्र तपासणी अहवाल येवूनही तक्रारदार यांना नुकसानीची रक्कम दिली गेली नसलेने सदरचा तक्रअर्ज दाखल करणे तक्रारदारास भाग पडले.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांची गट नं. 933 यळगूड, ता हातगणंगले जि. कोल्हापूर येथे क्षेत्र 3 एकर ही एक त्यापैकी जमीन आहे व तक्रारदार हे सदर जमीनीत ऊस भूईमूग व सोयाबीन आलटून पालटून पिके घेत असतात. वि.प. क्र. 1 ही कपंनी कायद्यानुसार नोंद असणारी प्रा.लि. कंपनी आहे. सदर कंपनीचे नियंत्रण वि.प. क्र.2 कार्यकारी संचालक व वि.प. क्र.3 अध्यक्ष तसेच इतर संचालक करत असतात. सदर कंपनीचा मुख्य व्यवसाय हा सुधारित जातीची शेतीसाठीची निरनिराळे बियाणे उत्पादन करणे व त्याची विक्री करणे असा आहे. हा व्यवसाय मोठया प्रमाणात चालू आहे. वि.प. क्र.4 हा महाराष्ट्र सहकार कायद्यानुसार नोंद असणारा सहकारी संघ आहे. सदर संघाचा कोल्हापूर जिल्हयात मोठया प्रमाणात खते व बियाणे उत्पादन करणे व त्याची विक्री करणे असा व्यवसाय आहे व संघाच्या कोल्हापूर जिल्हयात मोठया शाखाही आहेत. त्या शाखांपैकी एक शाखा ही शेती विकास केद्र नं. 1 या नावाने शाहुपुरी व्यापारी पेठ येथे चालू आहे. तक्रारदार यांनी सन 2021 च्या खरीप हंगामात वर नमूद असणा-या त्यांच्या शेतीमध्ये सोयाबीन बीज उत्पादनासाठी प्लॉट विकसीत केला होता. त्या प्लॉटमध्ये त्यांनी वि.प. क्र.1 यांनी उत्पादित केलेले सोयाबीन 441 लॉट नं./बॅच नं.ATK201016-7598 या जातीचे बियाणे दि. 20/5/2021 रोजी वि.प.क्र.4 च्या कृषी केंद्रातून 111 किलो इतके खरेदी केले होते. सदरचे बियाणे रक्कम रु.14,430/- या किंमतीस खरेदी केले होते व गट क्र. 933 मध्ये जूनच्या पहिल्या आठवडयात ते पेरले. सदर जातीचे सोयाबीन पीक हे 90 दिवसांचे असताना बियाणे पेरल्यानंतर तक्रारदार यांनी सदर पीक बियाणासाठी घेतले असलेने काळजीपूर्वक मशागत केलेल्या जमीनीत सदरचे पीक घेतले. तथापि, बियाणे हे भेसळयुक्त असलेने त्याची उगवण नीट झाली नाही. काही रोपे चांगल्या प्रकारे उगवली तर काही रोपे भेसळयुक्त बियाणांची असल्याने नीट उगवली नाहीत व उगवलेल्या रोपांना म्हणावे त्या प्रमाणात शेंगा आल्या नाहीत. खराब शेंगाचे प्रमाणे 40.74 टक्के इतके होते. त्यामुळे तक्रारदार यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. सदरच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी त्यांनी कृषी अधिकारी, पंचायत समिती ता.हातकणंगले यांचेकडे दि. 23/8/21 रोजी तक्रार केली व शाखा व्यवस्थापक शेतकरी सहकारी संघ यांचेकडेही तक्रार केली होती. तक्रारदार यांच्या तक्रारीची चौकशी करणेसाठी तालुका कृषी अधिकारी हातकणंगले दि.26/8/201 रोजी विभागीय कृषी अधिकारी, कोल्हापूर तथापि तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समिती यांना पत्र देवून तक्रारदार यांचे कृषीधन कंपनीकडून उत्पादीत सोयाबीन 441 लॉट नं./बॅच नं.ATK201016-7598 यांनी तक्रारदार यांचे तक्रारीवरुन दि.26/8/21 रोजी प्लॉटला भेट देवून प्रत्यक्ष पाहणी केली व त्यांचे पाहणीत खालील बाबी निदर्शनास आल्या.
- प्लॉटमध्ये सोयाबीन 441 पीक पक्वतेच्या अवस्थेत असल्याचे दिसून आले.
- प्लॉटमध्ये 441 या वाणाव्यतिरिक्त इतर वाणची रोपे एकूण प्लॉटमध्ये 40.74 टक्के प्रमाणात आढळून आली.
- प्लॉटमधील इतर वाणांची रोपे 441 पेक्षा जास्त उंचीचे असल्याचे दिसून आले.
- इतर वाणाच्या शेंगाची अवस्था शेगा भरण्याच्या अवस्थेत होती. या शेंगा व रोपे हिरव्या (कच्च्या) असल्याची आढळून आली तर 441 या वाणाची रोपे पक्वतेच्या अवस्थेत आढळून आली.
- 441 वाणाच्या रोपांची काढणी वेळेत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
-
3. वर नमूद केलेप्रमाणे दि. 9/9/2021 रोजी ठरल्याप्रमाणे तक्रारदार यांचे बियाणे प्लॉटला भेट दिली व सदर अहवालात त्यांनी वि.प. क्र.1 कंपनीने वि.प. क्र.4 मार्फत विक्री केलेले बियाणे सदोष असल्याचे नमूद केले व मुख्य वाणांची रोपे व इतर भेसळीच्या वाणांची रोपे यांची मोजणी केली. यामध्ये मुख्य वाणाची रोपे 32 व भेसळीची रोपे 22 असल्याचे निदर्शनास आले. भेसळीची रोपे 40.74 इतकी असल्याचे व तक्रारदार यांचे नुकसान होत असल्याचे सदर अहवालात स्पष्टपणे नमूद केलेले आहे. सबब, असे असूनही तक्रारदार यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही. याकरिता तक्रारदार यांचे नुकसान झालेली रक्कम रु.4 लाख व दूषीत बियाणांमुळे तक्रारदार यांचे झालेल्या नुकसानीची रक्कम रु.3,90,000/- इतकी मिळणेसाठी सदरचा अर्ज तक्रारदार यांना दाखल करणे भाग पडले. शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु. 1,50,000/- व तक्रारअर्जाचा खर्चाची रक्कम रु.30,000/- ची मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
4. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत सोयाबीन खरेदी केलेचा इन्व्हॉईस, सोयाबीनचे लॉट दर्शविणारे लेबल, तक्रारदार यांनी कृषी अधिकारी, हातकणंगले यांना दिलेल्या तक्रारीची प्रत, तक्रारदार यांनी शेतकरी संघाकडे केलेल्या तक्रारीची प्रत, तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे केलेल्या तक्रारीची प्रत, कृषी अधिकारी हातकणंगले यांनी तालुका स्तरीय तक्रार निवारण समिती यांना दिलेले पत्र, वि.प. शेतकरी संघ यांचे पत्र, अध्यक्ष तालुका स्तरीय बियाणे तक्रार निवारण समिती हातकणंगले यांना लॉटची पाहणी करणेसाठी येणार असलेचे कळविले पत्राची प्रत, बियाण तक्रार निवारण समितीचा अहवाल, तक्रारदार यांचे शेतजमीनीचा 7/12 उतारा इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
5. वि.प.क्र.1 ते 5 यांना या आयोगाची नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत व त्यांनी आपले म्हणणे दाखल केले नाही. सबब, वि.प.क्र.1 ते 5 यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश करण्यात आला.
6. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे पुरावा व युक्तिवाद यावरुन आयोगासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
7. वि.प. क्र.1 यांनी उत्पादित केलेले सोयाबीन 441 लॉट नं./बॅच नं.ATK201016-7598 या जातीचे बियाणे दि. 20/5/2021 रोजी वि.प.क्र.4 च्या कृषी केंद्रातून 111 किलो इतके खरेदी केले होते. सदरचे बियाणे रक्कम रु.14,430/- या किंमतीस खरेदी केले होते. तक्रारदार यांनी सोयाबीन बियाणे खरेदी केलेचा इन्व्हॉईस कागदयादीसोबत अ.क्र.2 ला दाखल आहे. सबब, तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये सेवा घेणार व देणार हे नाते निर्माण झाले आहे. याकरिता तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
8. तक्रारदार यांनी आपल्या गट नं. 933 क्षेत्र 3 एकर यां जमीनीत माहे जूनच्या पहिल्या आठवडयात वर नमूद सोयाबीनचे पीक घेणेसाठी बियाणे पेरले. मात्र त्याची उगवण नीट झाली नसलेने व उगवलेल्या रोपांना म्हणावे त्या प्रमाणात शेंगा आल्या नसल्याने यामध्ये खराब शेंगांचे प्रमाणे 40.74 टक्के इतके होते. त्यामुळे तक्रारदार यांचे मोठे नुकसान झाले व या नुकसानीची भरपाई मिळणेसाठी तक्रारदार यांनी कृषी अधिकारी, पंचायत समिती, हातकणंगले यांचेकडे दूषित बियाणेबद्दल केलेला दि. 23/8/2021 चा तक्रारअर्ज तसेच शेतकरी संघाच्या सेवा केंद्राकडे तक्रार केलेला त्याच दिवशीचा अर्ज तसेच कृषी अधिकारी, पंचायत समिती, हातकणंगले व तालुका कृषी अधिकारी, हातकणंगले यांनी उपविभागीय कोल्हापूर तथा तालुका स्तरीय बियाणे तक्रार निवारण समिती, हातकणंगले यांना दि. 26/8/2021 रोजीचे दिलेले पत्र हा पत्रव्यवहार दाखल केलेला आहे. तसेच शेतकरी संघ यांनी उपविभागीय कृषी अधिकारी, कोल्हापूर यांना दि. 2/9/2021 रोजी तक्रारदार यांचे तक्रारीचे संदर्भात पाठविलेले पत्रही दाखल केलेले आहे व अध्यक्ष, तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समिती, हातकणंगले यांना व इतर संबंधीतांना दि. 9/9/2021 रोजी प्लॉटची पाहणी करण्यासाठी येणार असलेचे पत्र दाखल केलेले आहे व त्यानुसार दि. 4/10/2021 रोजी अध्यक्ष, उपविभागीय कृषी अधिकारी, कोल्हापूर यांनी पत्र देवून वादातील दूषित बियाण्याच्या संदर्भात केलेल्या पाहणीचा अहवाल देणेसाठी दिलेले पत्र व त्यासोबतचा अहवाल दाखल केलेला आहे. सदरचे अहवालानुसार तक्रारदार यांचे प्लॉटची पाहणी केलेनंतर गट क्र. 933 मधील तक्रारदार यांच्या सोयाबीन पिकाची व सदरचे बियाणाच्या वाणाच्या गुणधर्माची रोपांची उंची, रोपांची वाढ व पानांचा आकार यावरुन प्लॉटमध्ये वापरलेले बियाणे हे याच वाणाचे असलेचे समिती समोर मान्य केलेले आहे. तथापि कृषीधन 441 वाणाच्या रोपांव्यतिरिक्त जी रोपे या वाणांच्या रोपांपेक्षा जास्त उंचीची होती तसेच शेंगांमध्ये दोन व काही शेंगामध्ये तीन बियाणे असलेने तर काही रोपांच्या शेगांच्या वर केसाळ वाढ असलेली अशी रोपे समितीचे निदर्शनास आली. ही सर्व रोपे मुख्य वाणातील रोपांमधील भेसळींची रोपे असलेचे कंपनी प्रतिनिधीने समितीसमोर मान्य केले व या भेसळींच्या रोपांमध्ये दोन बी असलेल्या शेंगा तसेच 2 व 4 बियाणे असलेल्या शेंगा अशा दोन प्रकारची भेसळ रोपे आढळून आली तर मुख्य पीक पक्वतेच्या अवस्थेत होते व काही भेसळ रोपेही पक्वतेच्या अवस्थेत होती. मात्र तीन बिया असलेली भेसळ रोपे ही उंचीने जास्त असून सदरचे उगवणीस वेळ लागणार असलेचेही निदर्शनास आले. तसेच सोयाबीन 441 या मुख्य वाणाची एकूण रोपे 32 तर भेसळ रोपांची संख्या 22 असल्याचेही सदरचे अहवालामध्ये नमूद आहे. सबब, प्लॉट मधील मुख्य सोयाबीन कृषीधन 441 च्या प्लॉटमध्ये 40.74 टक्के इतकी भेसळीची रोपे असलेचे व त्यामुळे शेतक-याचे नुकसान होत असलेचे समितीच्या निदर्शनास आले. सदरचे अहवालावर उपविभागीय कृषी अधिकारी, कोल्हापूर तसेच विस्तार कृषी विद्यावेत्ता विभाग, विभागीय विस्तार केंद्र कोल्हापूर यांच्या सहयाही आहेत. यावरुन तक्रारदार यांचे सदरचे प्लॉटमध्ये भेसळ बियाणेही होते हे दाखल अहवालावरुन सिध्द होते. वि.प. यांनी आयोगाची नोटीस लागू होवून देखील या आयेागासमोर आपले म्हणणे दाखल केलेले नाही व तक्रारअर्जातील कथने खोडूनही काढलेली नाहीत. याकरिता वि.प. यांना सदरचे तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील कथने मान्य आहेत याही निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, तक्रारदार यांनी दाखल केलेला कृषी अधिकारी, कोल्हापूर यांचा अहवाल व आयोगाने वर नमूद केलेला निष्कर्ष यावरुन तक्रारदार यांची तक्रार मंजूर करणेवर हे आयेाग ठाम आहे. सबब, तक्रारदार यांनी तक्रारअर्जात मागितलेल्या मागण्या अंशतः मंजूर करणेचे निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.
9. तक्रारदार यांनी मागितलेली दूषित व भेसळयुक्त बियाणांमुळे तक्रारदार यांचे प्रत्यक्षात झालेले नुकसान रक्कम रु.3,90,000/- इतके मागितलेले आहेत. तक्रारदार यांनी या संदर्भात प्रत्यक्षात एकरी 6 क्विंटलप्रमणे एकूण 18 क्विंटलचे सोयाबीनचे उत्पादन झाल्यामुळे तक्रारदार यांचे 30 क्विंटलचे म्हणजेच 3000 किलो इतके उत्पादन घटलेले आहे असे नमूद केलेले आहे. त्यांचे कथनाप्रमाणे जर बियाणात भेसळ नसती तर तीन एकरी 16 क्विंटलप्रमाणे 48 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाले असते असे नमूद केलेले आहे. मात्र कथनाव्यतिरिक तसा कोणताही कागदोपत्री पुरावा या आयोगासमोर तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही. तथापि सदरची कथने वि.प. यांनीही आयोगासमोर हजर राहून खोडून काढलेली नाहीत. या करिता सरासरी रक्कम रु. 3,00,000/- इतके दूषित बियाणांमुळे तक्रारदार यांचे नुकसान झालेले आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच तक्रारदार यांचे पीक न घेता आले नसलेने झालेले नुकसानीकरिता रक्कम रु.50,000/- व शारिरिक व मानसिक त्रासाच्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.3,000/- देण्याचे निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे. याकरिता वि.प. यांना वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार धरणेत येते. सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. वि.प. यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना रक्कम रु. 3,00,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
3. वि.प. यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
4. वि.प. यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना पीक घेता न आले नसलेने नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 50,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
5. वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
7. जर यापूर्वी वि.प. यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची वि.प. यांना मुभा राहील.
8. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.