जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर
ग्राहक तक्रार क्रमांक : 107/2012 दाखल तारीख :07/09/2012
निकाल तारीख : 06/02/2015
कालावधी : 02 वर्षे 04 म.29 दिवस
गोविंद बालू राठोड,
वय 50 वर्षे, धंदा शेती,
रा. शिवाजीनगर तांडा तहत माळहिप्परगा,
ता. जळकोट जि. लातूर. ...तक्रारदार.
-विरुध्द-
1) कृषी पर्यवेक्षक , तालुका कृषि अधिकारी कार्यालय,
जळकोट, जांब जळकोट रोड जळकोट, ता.जळकोट जि. लातूर.
2) तालुका कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय,
जळकोट जांब-जळकोट रोड, जळकोट, ता. जळकोट जि. लातूर.
3) जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी , जिल्हा अधिक्षक कृषी
अधिकारी कार्यालय, लातूर ता. व जि. लातूर.
4) कबाल इंशुरन्स ब्रोकिंग सर्व्हीसेस प्रा.लि.
विनीत आठल्ये, राज अपार्टमेट , प्लॉट नं. 29, जी सेक्टर,
रिलायन्स फ्रेशच्या मागे, हॉटेल वर्षा इनच्या जवळ, टाऊन सेंटर,
औरंगाबाद 431003.
5) युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लि.
प्रादेशिक कार्यालय, अंबिका भवन क्र. 19,
तिसरा मजल, धरमपेठ एक्सटेंशन शंकरनगर चौक,
नागपुर 440010.
6) युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लि.
विभागीय कार्यालय , टिळक नगर मेन रोड, लातूर
ता. व जिल्हा लातूर. ..... गैरअर्जदार
कोरम : 1) श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
2) श्री.अजय भोसरेकर, सदस्य
3) श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे : अॅड. ए.पी.मेखले.
गै.अ.क्र.1, 2 व 4 : स्वत:
गै.अ.क्र.5 व 6 तर्फे : अॅड.एस.व्ही. तापडीया.
::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा:श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार गोविंद बालू राठोड हा मयत मोताबाई भ्र. गोविंद राठोड रा. शिवाजीनगर तांडा तहत माळहिप्परगा ता. तळकोट यांचा कायदेशीर पती आहे. मयत मोताबाई गोविंद राठोड हिचा मृत्यू दि. 08.05.2010 रोजी साप चावून अपघाती स्वरुपाचा झाला आहे. मयत मोताबाई गोविंद राठोड हीच्या नावे मौजे माळहिप्परगा येथे गट क्र. 247 क्षेत्र 0 हे. 60 आर आकार रु. 0-94 पैसे आणि जमीन गट नं. 245 क्षेत्र 0 हे. 30 आर आकार रु. 0-44 पैसे अशी जमीन आहे. महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शेतक-याचा शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गतचा विमा गैरअर्जदार नं. 5 यांच्याकडे दि. 15 ऑगष्ट 2009 ते 14 ऑगष्ट 2010 पर्यंत उतरविला होता.
दिनांक 07.05.2010 रोजी रात्री 9.30 वाजता गोविंद राठोड त्याची पत्नी मोताबाई व मुले सर्वजन मिळून जेवन करुन घराच्या समोरील अंगणात जमीनीवर झोपले होते. रात्री 11.30 वा. चे सुमारास मोताबाई राठोड झोपेतुन उठली व डाव्या दंडास काहीतरी चावले असल्या बाबत पती गोविंद रोठोड यास सांगीतली. त्यामुळे गोविंद राठोड यांनी तिच्या डाव्या हाताच्या दंडास पाहिले असता दंडावर सापानी चावल्या सारख्या दाताच्या
खुणा आढळुन आल्या. मोताबाई राठोड यांच्या दंडात फारच आग पडत असल्या बाबत सांगीतल्याने तिला पती गोविंद राठोड व तिच्या मुलाने खाजगी जीपने उपचार कामी सरकारी दवाखाना जळकोट येथे दाखल केले. दि. 08.05.2008 रोजी मध्यरात्री 12.40 वाजता जळकोट येथील दवाखान्यात पोहचले. तेथील डॉक्टरांनी मोताबाई हीस तपासले असता तिचा मृत्यू साप चावल्याने झाल्याचे सांगीतले. त्यानंतर सकाळी डॉक्टरांनी शवविच्छेदन केले व अहवालात मयत मोताबाई राठोडचा मृत्यू विषारी साप चावल्याने झाल्याचे मत नोंदविले. सदर घटनेची माहिती वैदयकीय अधिकारी जळकोट यांनी पोलीस स्टेशन जळकोट येथे दिल्यावरुन आकस्मीक मृत्यू नं. 9/2010 नोंदविण्यात आला व पुढील तपास तपासणीक अधिकारी अशोक जाधव यांच्याकडे दिला. त्यानंतर तालुका दंडाधिकारी जळकोट यांनी दंड प्रक्रिया संहिताचे कलम 174 प्रमाणे अंतिम आदेश दि. 30.12.2011 रोजी पारीत केला. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रु. 1,00,000/- मिळण्या करीता लागणा-या सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन विमा रककमेची मागणी केली असता, अदयाप दिलेली नाही. म्हणुन अर्जदाराने विमा दाव्याची रक्कम रु. 1,00,000/- अपघात तारखेपासुन 15 टक्के दराने व्याज देण्याचा आदेश करावा, तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 10,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 7000/- मिळण्याची मागणी केली आहे.
गैरअर्जदार क्र. 4 कबाल इंशुरन्सच्या म्हणण्याप्रमाणे मोटाबाई गोविंद राठोड यांचा अपघाती मृत्यू दि. 08.05.2010 रोजी झाला असून, त्याची तक्रार अर्ज दि.27.10.2010 रोजी अपु-या कागदपत्रांसहित मिळाला त्यात वयाचा पुरावा 6 ड (फेरफार) मृत्यूचा दाखला, दिलेला नव्हता म्हणुन अर्जदारास दि. 02.11.2010, 06.12.2010 रोजी स्मरणपत्रे दिली व अखेरीस सदरचा क्लेम दि. 21.12.2010 रोजी युनायटेड इंडिया कंपनी लि. नागपुर यांना पाठवला सदर कंपनीने त्याचा क्लेम बंद दि. 24.03.2011 रोजी केला. त्यानंतर अर्जदाराने दि. 30.03.2012 रोजी अर्जदाराने कागदपत्र पाठवली व ती कागदपत्रे विमा कंपनीस दि. 02.04.02012 रोजी पाठवले.
गैरअर्जदार क्र. 5 व 6 विमा कंपनीने आपल्या म्हणण्यात 90 दिवसानंतर क्लेम प्राप्त झाला म्हणुन फेटाळलेला आहे. तसेच अर्जदाराचा मृत्यू हा अपघाती नाही असेही त्यांचे म्हणणे आहे. विमा पॉलिसीचा कालावधी हा दि. 12.08.2009 ते 14.08.2010 असा आहे. अर्जदाराचा मृत्यू सर्पदंशान्र झाला ही बाब अर्जदाराने सिध्द करावी तसा कोणताही कागदोपत्री पुरावा आलेला नाही, म्हणुन सदर केस ही फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदार क्र. 2 तालुका कृषी अधिका-यांच्या म्हणण्यानुसार सदरचा प्रस्ताव त्रूटी पुर्ण करुन दि. 05.05.2011 रोजी जिल्हा कृषी अधिका-याकडे पाठवला आहे व प्रथम प्रस्ताव दि. 21.10.2010 रोजी आलेला आहे. असे म्हणणे कृषी अधिका-याने दि. 11.10.2010 रोजी दिलेले आहे.
मुद्दे उत्तर
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय .
- काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
मुद्दा क्र.1 चे उत्तर होय असून, अर्जदाराची मयत पत्नी ही गैरअर्जदाराची ग्राहक आहे व ती शेतकरी जनता अपघात विम्या अंतर्गत येणा-या पॉलिसीची हक्कदार आहे. अर्जदाराच्या पत्नीच्या नावे मौजे माळ हिप्परगा येथे गट क्र. 247 येथे गट क्र. 247 मध्ये क्षेत्र0 हेक्टर 60 आर व गट क्र. 245 क्षेत्र 0 हे. 30 आर एवढी जमीन होती, म्हणुन ती अपघातापुर्वी शेतकरी होती ही बाब सिध्द होते.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून, गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केल्याचे निष्पन्न होते. अर्जदाराच्या पत्नीचा मृत्यू हा साप चावुन झाला आहे. दि. 07.05.2010 रोजी रात्री 9.30 वाजाता गोविंद राठोड , त्याची पत्नी मोताबाई राठोड व मुले सर्वजन मिळून जेवन करुन घराच्या समोरील अंगणात जमीनीवर झोपले होते, रात्री 11.30 वाजताचे सुमारास मोताबाई राठोड झोपेतुन उठली व डाव्या हाताच्या दंडास काहीतरी चावल्याचे सांगीतले , गोविंद राठोड यांनी पाहिले असता त्यांना चावा घेतलेल्या दाताच्या खुणा दिसल्या , तसेच शवविच्छेदन अहवालात देखील डाव्या हाताच्या दंडाला चावा घेतल्याच्या खाणाखुणा असून त्वचा ही काळपट झालेली आहे, तसेच डॉक्टरांचे मत देखील सर्पदंशाने मृत्यू असेच आलेले असल्यामुळे सदरचा मृत्यू हा अपघाती विम्या अंतर्गत येत असल्यामुळे अर्जदाराचा अर्ज गैरअर्जदाराने फेटाळला ही बाब म्हणजे अर्जदाराच्या सेवेतील त्रूटी होय. म्हणुन शेतकरी अपघात विम्या अंतर्गत अर्जदाराने आपला प्रथम अर्ज दि. 27.10.2010 रोजी दिला, महाराष्ट्र शासनाच्या पॉलिसी नुसार अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीस प्रथम दि.27.10.2010 रोजी अर्ज देवुन सदर अपघाती मृत्यू व विम्या बाबतची माहिती दिली व कागदपत्रे दिलेया परिपत्रकानुसार IX claim documents should be intimated/ submitted to the insurance companies before expiration of the policy period . या नुसार अर्जदाराने स्वत: आपल्याकडून दि. 27.10.2010 रोजी कागदपत्रे देवुन विमा रक्कमेची मागणी केलेली आहे व जी कागदपत्रे अर्जदारास पाहिजे होती ती त्याने दोन वर्षांनी दिलेली आहेत, म्हणजेच दि. 30.03.2012 रोजी दिलेली आहेत. यावरुन अर्जदारास कागदपत्रे मिळण्यास उशीर झाला. परंतु सदरची कागदपत्रे त्याने विमा कंपनीस दिलेली आहेत तसेच कागदोपत्री पुराव्या वरुन शेतकरी अपघातांर्गत येणा-या सर्व कागदपत्रे त्यांनी तालुका कृषी अधिकारी यांना दि. 21.10.2010 रोजी दिली, तसेच दि. 20.04.2011 रोजी ईमेल द्वारे जिल्हा कृषी अधीक्षक, कबाल इंशुरन्स यांनी मागितलेली कागदपत्रे तालुका कृषी अधिका-यास मागीतलेली आहे. सदरचा ईमेल कबाल इंशुरन्स यांनी दि. 20.04.2011 रोजी पाठवलेला आहे व यानंतर म्हणजेच दि. 05.05.2011 रोजी तालुका कृषी अधिका-या कडून त्रूटीची पुर्तता करुन जिल्हा कृषी अधिका-यांना सदरची कागदपत्रे पाठवलेली आहेत. त्यामुळे सदरच्या अर्जदाराने दि. 05.05.2011 रोजीच म्हणजेच 15 दिवसात कागदोपत्री पुराव्याची पुर्तता केलेली असल्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केलेली आहे हे निष्पन्न होते. जेंव्हा दि. 05.05.2011 रोजी सदरची पुर्तता झाली व ती कागदपत्रे विमा कंपनीस दि. 30.03.2012 ला मिळाली यात अर्जदाराची काहीच चुक नाही.
तसेच गैरअर्जदाराने मागीतलेली कागदपत्रे अर्जदाराने दि. 30.03.2012 राजी पाठविली, त्या अगोदरच अर्जदाराचा प्रस्ताव विमा कंपनीने बंद केला होता, म्हणुन गैरअर्जदाराने अर्जदारास रु. 1,00,000/- दयावेत, मानसिक व शारीरीक त्रासापोटी रु. 3000/- , व दाव्याच्या खर्च रु. 3000/- देण्यात येतो.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार क्र. 5 व 6 विमा कंपनीने अर्जदारास विमा दाव्याची रक्कम रु. 1,00,000/- (रुपये एक लाख फक्त), आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.
- गैरअर्जदार क्र. 5 व 6 विमा कपंनीने आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न केल्यास, त्यावर तक्रार दाखल तारखे पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देणे बंधनकारक राहील.
- गैरअर्जदार क्र. 5 व 6 विमा कंपनीने अर्जदारास, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 3000/- व दाव्याच्या खर्चापोटी रु्. 3000/-, आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.
स्वा/- स्वा/- स्वा/-
(अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर.
**//राजूरकर//**