मंचाचे निर्णयान्वये - श्री. विजयसिंह राणे, अध्यक्ष. //- आदेश -// (पारित दिनांक – 17/02/2011) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, ते दोघे पती पत्नी असून तक्रारकर्ता क्र. 2 ह्यांनी त्याचे शेत मौजा सिनका (रिठी), स.क्र.82, ता. हिंगणा येथे आहे. जमिन तक्रारकर्ती क्र. 1 च्या नावे आहे आणि त्यावर ते उपजिविका करतात. गैरअर्जदार क्र. 1 ह्यांचेकडून अफ्रिकन मेरी गोल्ड या झेंडूच्या फुलाचे बी रु.750/- ला एकूण पाच पॅकेट विकत घेतले. सप्टेंबर 2008 मध्ये दुस-या हफ्त्यात रोप तयार केले आणि पुढे लागवड केली. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे ते नेहमी झेंडूच्या फुलाचे उत्पादन घेतात. पुढे नोव्हेंबर 2008 मध्ये फुले येण्यास सुरुवात झाली, तेव्हा सदर फुले अफ्रिकन मेरीगोल्ड या जातीचे नसून नवरंगाची आहेत असे आढळून आले. गैरअर्जदारांना याबाबत सांगितले असता त्यांनी नोकराच्या हातून चूकीने पॅकिंगच्या वेळेस नवरंग प्रकारचे बियाणे पॅक झालेले असल्याचे सांगितले. पुढे कृषि अधिकारी यांचेकडे तक्रार केली. 22.01.2009 रोजी कृषी अधिका-यांच्या समितीने शेतात येऊन तपासणी केली. पिकाची पाहणी केली आणि आपला अहवाल दिला. त्यांनी काढलेल्या निष्कर्षाप्रकाणे दोन एकर शेतात बियाणे लागवड केल्याचे दिसून येते आणि नवरंगाची फुले आलेली आहे गेंदयाची नाही असे स्पष्ट केलेले आहे. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, या फुलाचे योग्य बाजार भाव येत नाही, तो कमी आहे, म्हणून त्यांना एकरी 25 ते 30 हजार रुपयांचे नुकसान झाले. गैरअर्जदाराने चुकीचे बियाणे दिले आहे, ही अनुचित व्यापार प्रथा आहे आणि म्हणून त्यांच्याविरुध्द तक्रार दाखल केली व तीद्वारे दोन एकर जमिनीचे रु.60,000/- नुकसानीचे मिळावे, त्यावर 18 टक्के व्याज मिळावे, झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासाबाबत भरपाई व तक्रारीच्या खर्च अश्या मागण्या केलेल्या आहेत. 2. गैरअर्जदाराने आपल्या लेखी उत्तरात नमूद केले की, गैरअर्जदार क्र. 1 व 2 ह्यांचा या प्रकरणाशी संबंध नाही. त्यांच्या नावे कोणतेही दस्तऐवज नाही आणि गैरअर्जदार क्र. 2 जवळ शेत जमिन नाही. त्यामुळे ही तक्रार खारीज करावी. खरेदी केलेले बियाणे 250 ग्रॅम असून ते केवळ अर्धा एकर जमिनीकरीता वापरता येते. मात्र तक्रारकर्त्याने दोन एकरमध्ये लागवड केली व उरलेले रोप श्री. विष्णु भोले ह्यांना एक एकरमध्ये लागवडीकरीता दिले असे निवेदन 30.12.2008 ला दिले. यावरुनच तक्रारकर्त्याची तक्रार चुकीची आहे हे स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने उत्पादित दोषासंबंधी कोणताही अहवाल दिलेला नाही, म्हणून तक्रार खारीज व्हावी असा आक्षेप घेतला आहे. तक्रारकर्ता क्र. 1 हिच्या नावे 12 एकर शेत जमिन आहे ही बाब मान्य केली आहे. तक्रारकर्ता ठरत ग्राहक नाही असे नमूद करुन बियाणे तिचे पतीने खरेदी केल्याचे मान्य केले आहे. इतर सर्व विपरीत विधाने नाकबूल केलीत. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारकर्त्याने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ज्यावेळेस नवरंगाच्या झाडाला फुले येत नाही. अफ्रिकन मेरीगोल्ड फुले मोठया आकाराची असतात व नवरंगाची फुले लहान आकाराची असतात व दोन्ही झेंडू आहेत. तकारकर्त्याने लागवड केलेली जमीन ही अर्ध्या एकरापेक्षा जास्त आहे, म्हणून त्याची तक्रार चुकीची आहे हे स्पष्ट होते व तक्रारकर्त्याने जी खोटी तक्रार दाखल केलेली आहे, त्यावर सह्या एकाच व्यक्तीने केलेल्या आहेत. त्यामुळे त्याचेवर फौजदारी कारवाई करावी आणि तक्रार खारीज करावी असा उजर घेतला आहे. 3. सदर प्रकरण मंचासमोर युक्तीवादाकरीता दि.10.02.2011 रोजी आले असता मंचाने उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकला. तसेच उपलब्ध दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 4. तक्रारकर्ता क्र. 1 हिच्याजवळ शेत जमिन आहे. तक्रारकर्ता क्र. 2 हे तिचे पती आहेत. त्यांनी रु.750/- चे 5 पॅकेट बियाणे अफ्रिकन मेरीगोल्ड प्रत्येकी 50 ग्रॅमचे विकत घेतले ही बाब मान्य आहे. पुढे तज्ञांच्या अहवालावरुन असे स्पष्ट होते की, जेव्हा या शेतीची तपासणी करण्यात आली, तेव्हा त्याठिकाणी दोन एकर जमिनीत नवरंग लागवड झालेली असून ते गेंदयाऐवजी म्हणजे नवरंगाची फुले लागल्याचे दिसून आले. थोडक्यात तक्रारकर्त्यास विकण्यात आलेले बियाणे हे गेदयाच्या ऐवजी नवरंगाची विकण्यात आले होते हे स्पष्ट होते. यावरुन कृषी अधिका-यांनी दिलेला अहवाल हा चुकीचा आहे किंवा खोटा आहे असा निष्कर्ष काढता येणे शक्य नाही. थोडक्यात तक्रारकर्त्यास गैरअर्जदाराने दिलेले बियाणे हे ज्या वाणाचे म्हणून दिले, त्या वाणाचे नव्हते ही बाब मंचासमक्ष सिध्द झालेली आहे आणि तक्रारकर्त्याने योग्य पुराव्याद्वारे सिध्द केले नाही. 5. यामध्ये गैरअर्जदाराचा आक्षेप आहे की, तक्रारकर्ता क्र. 1 च्या नावाचे देयक नाही याला फारसे तथ्य नाही. कारण तक्रारकर्तीच्या पतीचे नावावर देयक आहे कारण एका कुटुंबातील कोणतीही व्यक्ती इतर सदस्याकरीता हे बियाणे विकत घेऊ शकते आणि ही सर्वसामान्य बाब आहे. तक्रारकर्ती क्र. 1 जवळ शेतजमीन आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे तक्रारकर्तीने पतीद्वारे बियाणे विकत घेतले, त्याचा वापर केला ती ग्राहक ठरते. थोडक्यात गैरअर्जदाराचे यासंबंधातील आक्षेप निरर्थक आहे. 6. मंचाचे मते सदर प्रकरणातील नुकसानीची वस्तुस्थिती तपासून पाहणे गरजेचे आहे. तक्रारकर्त्याने दस्तऐवज क्र. 2 जो 30.12.2008 चा तक्रार अर्ज आहे व कृषी अधिका-यांना दिलेला आहे, हा महत्वाचा दस्तऐवज आहे. यात तक्रारकर्त्याने असे नमूद केले आहे की, त्याने बियाण्याचे पाच पॅकेट घेऊन रोप तयार केले व त्याची लागवण दोन एकरमध्ये केली आणि उरलेले रोप विष्णु भोले ह्यांना दिले. त्यांनी एक एकरात लागवण केली. या संबंधीचा गैरअर्जदाराने डॉ.पंजाबराव देखमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी प्रकाशित केलेले ‘कृषि संवादिनी 2010’ चे काही पृष्ठ दाखल केलेले आहेत. या क्षेत्रातील ही महत्वाची शासकीय संशोधन करणारी अशी संस्था आहे. या संस्थेने प्रकाशित केलेल्या संवादिनीत झेंडू पीकाबाबतचे वर्णन केलेले आहे. त्याप्रमाणे अशा पीकास हेक्टरी बियाणे 750 ते 1250 ग्रॅम लागते. जेव्हा की, तक्रारकर्त्याने केवळ 250 ग्रॅम बियाणे घेतले आहे. त्यामुळे त्या बियाण्यांची लागवड तीन एकर शेतात होण अशक्य आहे. ती जास्तीत जास्त 0.33 हेक्टर एवढया जमिनीत जी जवळपास पाऊण एकर एवढया भागात होऊ शकते. तक्रारकर्त्याचे म्हणण्याप्रमाणे सदर झाडांना नवरंगाची फुले आली आहेत. तक्रारकर्त्याने असे म्हटले नाही की, सदर झाडे उपटून टाकली किंवा नवरंगाचे पीक घेतले नाही. तक्रारकर्त्याने अफ्रिकन गेंदयाचे बियाणे मिळाले नाही, त्यामुळे त्या फुलास मिळणारा जास्तीचा भाव मिळाला नसल्याने त्याला नवरंगाच्या फुलाचे उत्पादन मिळाले हे कथन आहे व असे उत्पादन झाल्याने त्यांना निदान रु.10,000/- प्राप्त झाले असावे असा निष्कर्ष काढणे चुकीचे होणार नाही, कारण गेंदयाचे उत्पादन एकरी रु.30,000/- येते असे त्यांचेच म्हणणे आहे. त्यामुळे पाऊण एकर जमिनीत तक्रारकर्त्यांना जवळपास रु.22,000/- चे गेंदयाचे फुलाचे उत्पादन झाले असते. त्यापैकी रु.10,000/- नवरंगाचे झालेले उत्पादन वजा करता तक्रारकर्त्यास जास्तीत जास्त रु.12,000/- चे नुकसान झाले असावे असा निष्कर्ष काढणे आमचे मते योग्य होईल. तक्रारकर्त्यास देण्यात आलेले चुकीचे बियाणे हे गैरअर्जदारातर्फे विकलेल्या बियाण्यातील दोष आहे हेही स्पष्ट आहे. वरील परिस्थितीचा विचार करुन खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदाराने, तक्रारकर्त्यास रु.12,000/- एवढी नुकसान भरपाई आणि तीवर तक्रार दाखल दिनांकापासून, म्हणजेच दि.21.12.2009 पासून प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याज यासह आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावे. न पेक्षा व्याज द.सा.द.शे. 9 टक्केऐवजी 12 टक्के व्याज अदा करावे. 3) तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाच्या क्षतिपूर्तीबाबत रु.5,000/- गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला द्यावे आणि तक्रारीच्या खर्चाबाबत रु.1,000/- द्यावे. 4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे. 5) फौजदारी कार्यवाहीसाठी गैरअर्जदार त्यांना गरज वाटल्यास स्वतंत्र प्रकरण दाखल करु शकतात.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |