तक्रार क्र. CC/ 12/ 71 दाखल दि. 29.08.2012
आदेश दि. 08.08.2014
तक्रारकर्ते :- श्री प्रकाश वल्द शंकर ब्राम्हणकर व इतर 21
सर्व रा.कोंढा सर्कल,ता.पवनी जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- 1. प्रादेशिक व्यवस्थापक,
कृषी विमा कंपनी लिमीटेड,
प्रादेशिक कार्यालय, 20 वा माळा,
बी.एस..ई. टॉवर, दलाल मार्ग
कोर्ट, मुंबई
2. शाखा व्यवस्थापक,
वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक, शाखा- अडयाळ
ता.पवनी,
3. प्रादेशिक व्यवस्थापक,
वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक,
भंडारा प्रदेश, भंडारा ता.जि.भंडारा
4. मुख्य व्यवस्थापक,
वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक,
मुख्य कार्यालय, गुरुकृपा संकुल, प्लॉट क्र.23,
नेहरु नगर,विजापुर रोड,सोलापुर
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी
मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक
मा.सदस्य हेमंतकुमार पटेरिया
उपस्थिती :- तक्रारकर्त्यातर्फे अॅड.नंदागवळी
वि.प.1 तर्फे अॅड.एच.एन.वर्मा व
वि.प.क्र.2 ते 4 तर्फे अॅड.सक्सेना
.
(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी )
-// आ दे श //-
(पारित दिनांक 08 ऑगस्ट 2014)
1. तक्रारकर्त्यांनी शेती पीक विम्याचे फरकाची नुकसान भरपाई रक्कम न मिळाल्यामुळे तक्रारकर्त्यांनी सदरहू तक्रार न्यायमंचात दाखल केली आहे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
2. तक्रारकर्ते क्र.1 ते 22 यांनी त्यांच्या शेतीचा पीक विमा सन 2008 मध्ये विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या मार्फत काढला होता. तक्रारकर्ते क्र.1 ते 22 यांना सन 2008 ते 2009 या वर्षात शेतीचे उत्पन्न झाले नव्हते. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी अडयाळ सर्कलच्या शेतक-यांना पीक विमा नुकसान भरपाई 71.49 टक्के दिली. कोंढा सर्कलच्या शेतक-यांना पीक विमा नुकसान भरपाई फक्त 5.33 टक्के या दराने देण्यात आली. त्यामुळे तक्रारकर्त्यांचे 2,26,012/- रुपयाचे नुकसान झाले.
3. तक्रारकर्त्यांनी नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्यामुळे त्यांनी दिनांक 9/8/2010 ला अॅड.काटेखाये यांच्यामार्फत नोटीस पाठविली. तसेच दिनांक 16/4/2012 ला तक्रारकर्ते यांनी अॅड.नंदागवळी यांच्या मार्फत विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांना नोटीस पाठविली. विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 हे तक्रारकर्त्याच्या शेतीचा पीक विम्याचे रुपये 2,26,012/- ही नुकसान भरपाईची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत. करीता तक्रारकर्त्यांनी सदरहू रक्कम 18 टक्के व्याजासह सन 2008 पासून मिळावी तसेच मानसिक व शारीरिक त्रासासाठी रुपये 1,000/- प्रत्येक तक्रारकर्त्यास देण्यात यावे व खर्चापोटी रुपये 5,000/- दयावे, अशी तक्रार न्यायमंचात दाखल केली आहे.
4. तक्रारकर्त्यांची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्षांना दिनांक 24/8/2012 ला नोटीस काढण्यात आल्या. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी आपले जबाबात असे म्हटले आहे की तक्रारकर्ते ग्राहक या संज्ञेत समाविष्ट होत नसल्यामुळे तसेच सदरहू प्रकरणामध्ये Cause of action define न केल्यामुळे सदरहू तक्रार खारीज करण्यात यावी. विरुध्द पक्ष क्र.1 हे एजन्सी आहे व ती NAIS National Agricultural Insurance Scheme प्रमाणे काम करते. तसेच ती Insurer Company नसल्यामुळे ती कुठलाही Claim अथवा नुकसान भरपाई देण्यासाठी जबाबदार नाहीत. पीक विमा योजनेद्वारे ज्या शेतक-यांनी पीक विमा काढला होता त्या भागातील कमी झालेल्या पिकाबद्दल तेथील विमाकृत शेतक-यांच्या संपुर्ण शेती समुहातील कमी आलेल्या पीकाचा Survey करुन त्यांना नुकसान भरपाई देण्यात येते. तक्रारकर्त्यांनी त्यांच्या शेतीचे जे Declaration दिले की त्यांची शेती कोंढा सर्कलमध्ये येते असे म्हटले त्यामुळै त्या चुकीच्या Declaration मुळे त्यांना नुकसानभरपाई ही कोंढा सर्कलच्या दराप्रमाणे दिली गेली. परंतु नंतर तक्रारकर्त्यांची शेती ही अडयाळ रेवेन्यु सर्कलमध्ये येत असल्याचे विरुध्द पक्ष क्र.4 यांनी कळविल्यामुळे तक्रारकर्त्यांच्या शेतीला झालेली नुकसान भरपाई ही अडयाळ रेवेन्यु सर्कलच्या दराप्रमाणे दिली असता तक्रारकर्त्यांना देण्यात येणारी संपुर्णरक्कम रुपये 2,65,686/- रुपये सर्व तक्रारकर्त्यांना विरुध्द पक्ष क्र.4 तर्फे त्यांच्या खात्यामध्ये जमा केल्यामुळे तक्रारकर्त्यांनी तक्रारीत नमुद केलेले संपुर्ण पैसे मिळाल्यामुळे तक्रारकर्त्यांची तक्रार खारीज करण्यात यावी.
5. विरुध्द पक्ष क्र.2 ते 4 यांनी आपला जबाब दिनांक 5/1/2013 ला दाखल केला आहे. विरुध्द पक्ष क्र.2 ते 4 यांनी आपले जबाबात असे म्हटले आहे की राजस्व विभागाच्या चुकीमुळे व तक्रारकर्त्यांचा चुकीचा अर्ज चुकीचा विभाग दाखवून भरल्यामुळे तक्रारकर्त्यांची नांवे कोंढा राजस्व मंडळामध्ये समाविष्ट करण्यात आली होती. त्यानंतर तक्रारकर्ते व राजस्व विभाग यांच्या लक्षात आले की तक्रारकर्त्यांची नांवे चुकीने कोंढा राजस्व मंडळामध्ये टाकण्यात आले. म्हणुन तक्रारकर्ते तसेच राजस्व विभाग यांनी सुध्दा विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे ही चुक दुरुस्त करुन त्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा केला. त्यांनतर विरुध्द पक्ष क्र.1 यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे 2,40,166.18 रुपये नुकसान भरपाई म्हणुन पाठविली. त्यापैकी 1,90,30/-रुपये तक्रारकर्त्यांना यापुर्वीच देण्यात आले होते व ते विरुध्द पक्ष क्र.1 ला परत करावयाचे असल्यामुळे ती रक्कम कापून विरुध्द पक्ष क्र.2 यांनी सर्व तक्रारकर्त्यांना रुपये 2,21,136.18 लगेच देण्यात आले. त्यामुळे या प्रकरणात विरुध्द पक्ष क्र.2 ते 4 यांच्याकडून कोणतीही निष्काळजी झालेली नाही. सर्व तक्रारकर्त्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिनांक 3/10/2012 ला मिळालेली असल्यामुळे सदरहू तक्रार खारीज करण्यात यावी.
6. तक्रारकर्त्याच्या वकिलांनी युक्तीवाद केला की तक्रारकर्ते हे शेतकरी असल्यामुळे त्यांनी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेअंतर्गत 22 तक्रारकर्ते शेतक-यांना पीक विम्याचे पैसे मिळावे याकरीता शासन परिपत्रकानुसार नुकसान भरपाई मिळावी म्हणुन अर्ज केला होता. तसेच दिनांक 22/5/2012 व दिनांक 9/8/2010 ला वकिलामार्फत नोटीस पाठविली होती. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यांना शेतीच्या पीक विम्याच्या फरकाची नुकसान भरपाई ही अडयाळ सर्कलच्या दराने न देता कोंढा सर्कलच्या दराने दिल्यामुळे आलेली फरकाची रक्कम रुपये 2,26,012 व्याजासह सर्व तक्रारकर्त्यांना देण्यात आली नाही. करीता तक्रारकर्त्यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी सदरहू तक्रारदाखल केली आहे व सदरहू प्रकरण त्यांच्या तर्फे निकाली काढण्यात यावे असा युक्तीवाद केला.
7. विरुध्द पक्ष क्र.1 यांचे वकील अॅड.एच.एन.वर्मा यांनी युक्तीवाद केला की तक्रारकर्त्यांनी Declaration Form भरतांना केलेल्या चुकीमुळे तक्रारकर्त्यांची पीक विमा नुकसान भरपाई कोंढा सर्कलच्या दराप्रमाणे ठरविण्यात आली होती. परंतु तक्रारकर्ते व राजस्व विभाग तसेच विरुध्द पक्ष क्र.2 ते 4 यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी तक्रारकर्ते हे अडयाळ सर्कल मध्ये येत असल्यामुळे त्यांचा पीक विमा अडयाळ सर्कलच्या दराप्रमाणे आकारण्यात यावा अशी मागणी केल्यामुळे तक्रारकर्त्यांना नुकसान भरपाई अडयाळ सर्कलच्या दराप्रमाणे आकारण्यात आली व त्यांना नुकसान भरपाईचे संपुर्ण पैसे देण्यात आले. विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या वकिलांनी युक्तीवाद केला की सदरहू योजना ही Area Basis तत्वावर देण्यात येते. सदरहू नुकसान भरपाई ही एका सर्कलमधील Area ठरवून त्या त्या Area मधील संपुर्ण शेतक-यांच्या शेताला झालेले नुकसान या तत्वावर देण्यात येते. सदरहू योजनेत प्रत्येक शेतक-याला झालेली नुकसान भरपाई Individual Capacity या तत्वावर देण्यात येत नाही. Government Of India च्या दिनांक 16/7/99 च्या Notification द्वारे नुकसान भरपाई देण्यासाठी Notified Area घोषित केल्या जातो व त्या Area प्रमाणे तेथील शेतजमीन व तेथील पीक परिस्थिती यांचा अभ्यास करुन नुकसान भरपाई देण्याचे प्रमाणठरवून ती दिली जाते. राज्य शासनाकडून Yield Data मिळाल्यावर नुकसान भरपाई देण्याच्या सुत्रानुसार नुकसान भरपाई दिली जाते. सदरहू परिपत्रक तसेच National Agricultural Insurance Scheam(NAIS) च्या कलम 7 द्वारे तक्रारकर्त्यांचा विमा दावा हा ठरविण्यात आलेल्या दराप्रमाणे दिल्या जातो. तसेच एखादया शेतक-याला कुठल्याही चुकीमुळे जर नुकसान भरपाई मिळाली नसेल तर Nodal Bank, PACH, Branch या संस्था नुकसान भरपाई शेतक-यांना देतील असे करारात म्हटले आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 1 हे कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत. तक्रारकर्त्यांनी व राजस्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारकर्त्यांची शेती ही कोंढा सर्कल मध्ये येत नसून अडयाळ सर्कलमध्ये येते या सुधारित अर्जानुसार तक्रारकर्त्यांचा पीक विमा सुधारित दराप्रमाणे देण्यात आल्यामुळे सदरहू तक्रारीमधील तक्रारीचे कारण हे तक्रार दाखल करण्यापुर्वी संपुष्टात आल्यामुळे सदरहू तक्रार ही infractuous असल्यामुळे खारीज करण्यात यावी.
8. विरुध्द पक्ष क्र.2 ते 4 यांचे वकील अॅड.सक्सेना यांनी युक्तीवाद केला की तक्रारकर्त्यांना विरुध्द पक्ष क्र.2 चे मार्फत सन 2008-09 या वर्षात पीक विमा दिला होता. नापिकी असल्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या Survey and Calculation
द्वारे नुकसान भरपाई देण्यात येते. राजस्व विभाग व तक्रारकर्ते यांच्या चुकीमुळे तक्रारकर्त्यांना नुकसान भरपाईची रक्कम पुर्वी आकारण्यात आलेली रक्कम विरुध्द पक्ष यांनी Survey करुन पुन्हा दुरुस्त करुन संपुर्ण रक्कम म्हणजेच 2,21,136.18 व विरुध्द पक्ष क्र.1 यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे तक्रारकर्त्यांना देण्यासाठी पाठविले. सदरहू रक्कम विरुध्द पक्ष क्र.2 यांनी दिनांक 3/10/2012 ला तक्रारकर्त्यांना दिली. तक्रारकर्त्यांना तक्रारीमधील संपुर्ण रक्कम मिळाली त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.2 ते 4 यांनी सदरहू प्रकरणात कुठलाही निष्काळजीपणा न केल्यामुळे सदरहू प्रकरण खारीज करण्यात यावे, असे म्हटले आहे.
9. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत माहितीच्या अधिकाराअंतर्गत मिळालेली वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँकेची माहिती पान नं. 18 वर दाखल केली आहे. अडयाळ ब्रँचचे Crop Insurer चे परिपत्रक पान नं.19 वर दाखल केले आहे. अॅड.नंदागवळी यांचे मार्फत पाठविलेली दिनांक 16/4/2012 ची नोटीस पान नं.20 वर तसेच विरुध्द पक्ष क्र.2 ते 4 यांनी दिलेले नोटीसचे उत्तर पान नं.25 वर दाखल केले आहे.
10. तक्रारकर्त्याचा तक्रार अर्ज, तक्रारकर्त्याने तक्रारीत दाखल केलेले दस्त, विरुध्द पक्षांचे जबाब, तसेच दोन्ही पक्षाच्या वकिंलाचा युक्तीवाद यावरुन खालील मुद्दा उपस्थित होतो.
1. तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे का? – नाही.
कारणमिमांसा
11. तक्रारकर्त्यांनी त्यांच्या शेतीचे विमा लाभ क्षेत्र हे चुकीने कोंढा सर्कल लिहीलेले होते. परंतु त्यांना नंतर चुक लक्षात आल्यावर त्यांनी त्यांचे विमा लाभ क्षेत्र हे अडयाळ सर्कलमध्ये येत असल्याचा अर्ज तसेच तक्रारकर्ते व राजस्व विभाग यांच्या चुकीमुळे लाभ क्षेत्र हे कोंढा सर्कलमध्ये येते असे लिहिल्यामुळे विरुध्द पक्षांनी कोंढा सर्कलचा Survey केला. परंतु नंतर दिनांक 3/7/2010 ला तक्रारकर्ते व राजस्व विभाग यांनी तक्रारकर्त्यांचे लाभ क्षेत्र अडयाळ हे Notified area येत असल्यामुळे त्याप्रमाणे Survey करुन तक्रारकर्त्याचा Claim मंजुर करुन तो विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे पाठविला. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी आपल्या जबाबात असे म्हटले आहे की विरुध्द पक्ष क्र.1 यांनी पाठविलेले तक्रारकर्त्याचे विमा योजनेचे संपुर्ण पैसे म्हणजेच 2,21,136.18 दिनांक 3/10/2012 ला तक्रारीमधील सर्व तक्रारकर्त्यांना दिल्यामुळे व सदरहू प्रकरणामध्ये विरुध्द पक्षांनी Apperance होण्यापुर्वीच म्हणजे दिनांक 12/10/2012 च्या पुर्वी तक्रारीमधील तक्रारकर्त्यांना पीक विम्याचे संपुर्ण पैसे विरुध्द पक्षांनी सदरहु प्रकरणाचा जबाब दाखल करण्याच्या तारखेपुर्वी मिळाल्यामुळे सदरहू तक्रार infractuous झाल्यामुळे खारीज करण्यात येते. करीता खालील आदेश पारीत करीत आहे.
करीता आदेश पारीत.
अंतीम आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2. खर्चाबद्दल कुठलेही आदेश नाहीत.