निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार हे रामकिशन शंकर गायकवाड यांचे कायदेशीर वारसदार असून, मयताच्या नावे तांदुळजा गट क्र. 41 मध्ये 43 आर एवढी जमीन आहे. दि. 19/06/2011 रोजी संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतामध्ये वांग्यावर व मिरचीवर औषधांची फवारणी करताना त्यास विषबाधा झाल्याने त्यास सरकारी दवाखान्यात उपचाराकरीता एस.आर.टी.आर मेडीकल कॉलेज व सरकारी दवाखाना अंबाजोगाई येथे उपचारासाठी शरीक करण्यात आले. त्यांच्यावर उपचार चालू असताना दि. 20/06/2011 रोजी मयत झाले. सदरील घटना पिकावर औषधांची फवारणी करीत असताना विषबाधा झाल्यामुळे मयत रामकिशन शंकर गायकवाड यांचा मृत्यू आकस्मिक झालेला आहे. त्याची नोंद पोलीस स्टेशन मुरुड ता. जि. लातुर येथील पोलिसांनी तपास केला असून, त्याबाबतची तपास कामाची कागदपत्रे तयार केली, त्यानंतर अर्जदारांनी तपास कामाची कागदपत्रे तयार झाल्यावर प्रस्तावावर सहया करुन तो प्रस्ताव गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडे दिला. मयत हा शेतकरी असल्यामुळे तो शेतकरी जनता अपघात विम्यांतर्गत येणा-या पॉलीसीचा पॉलिसी धारक आहे. परंतु गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून गैरअर्जदारानी अर्जदारास रु. 1,00,000/- मृत्यूच्या तारखेपासुन द.सा.द.शे 18 टक्के व्याजाने दयावेत. शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- व दाव्याचा खर्च रु. 7,000/- दयावा.
तक्रारदाराने तक्रारी सोबत पोलीस निरीक्षक मुरुड यांना दिलेला तक्रार अर्ज, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, 7/12, वारसाचे प्रमाणपत्र, मयताचे ओळखपत्र, कायदेशीर नोटीस, पोस्टाच्या पावत्या इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 4 व 5 च्या म्हणण्याप्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदार क्र; 1 व 2 कडे कोणताही क्लेम प्रस्ताव पाठवलेला नाही. तसेच तो कोणत्याही इंन्शुरन्स कंपनीला देखील सदरचा प्रस्ताव मिळालेला नाही. त्यामुळे विमा कंपनीने सदरचा अर्ज निर्णय होण्याचा प्रश्नच उदभवत नाही. सदरचा तक्रार अर्ज हा कंपनीस रीतसर प्राप्त न झाल्यामुळे सदरची तक्रार ही प्रथमावस्थेत आहे. त्यामुळे खारीज करण्यात यावी. तसेच शवविच्छेदन अहवालातही विषबाधेमुळे मृत्यू असे आलेला आहे. व त्याचा Viscera preserve ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे सदरचे प्रकरण सिध्द होत नसल्यामुळे फेटाळण्यात यावे. तसेच दि. 15/08/2010 ते 14/08/2011 हा कालावधी विमा पॉलीसीचा आहे. अर्जदाराचा क्लेम फॉर्म दि. 14/11/11 पर्यंत यावयास हवा होता मात्र तो 90 दिवसानंतरही मिळाली नसल्यामुळे सदरची तक्रार ही खारीज करण्यात यावी.
डेक्कन इंन्शुरन्स कंपनीने आपल्या म्हणण्यात असे दिले आहे की, सदर प्रस्तावाची मुळ कागदपत्रे व प्रस्तावाबाबत कसलीही दावा सुचना आम्हाला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी लातुर यांच्याकडून आजतागायत मिळालेली नाहीत. जोपर्यंत आमच्याकडे जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाकडुन प्रस्ताव येत नाही. तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारची पुढील कार्यवाही करु शकत नाही.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? नाही
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? नाही
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून, अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 4 व 5 चा ग्राहक आहे. तो शेतकरी जनता अपघात विम्यांतर्गत येणा-या विमा पॉलीसीचा लाभधारक आहे. त्याला मौजे तांदुळजा येथे गट क्र. 41 मध्ये 43 आर एवढी जमीन आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर नाही असून, गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केलेली नाही. अर्जदाराने आपल्या मयत पतीचे सर्व कागदपत्रे काढून रितसर प्रस्ताव गैरअर्जदार क्र. 4 ते 5 यांच्याकडे पाठवलेला नाही असे डेक्कन इंन्शुरन्स कंपनी व गैरअर्जदार क्र; 4 व 5 सांगत आहे. याचा अर्थ सदरची तक्रार ही रितसर दाखल झालेली दिसुन येत नाही. जेव्हा अर्जदाराचा प्रस्ताव हा गैरअर्जदार क्र. 4 व 5 कडे पोहोचलेलाच नाही तेव्हा त्यांनी अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केल्याचे निष्पन्न होत नाही. तसेच अर्जदाराचा दि. 19/06/2011 रोजी 19.30 वाजता त्याचे शेतात वांग्यावर व मिरचीवर औषधाची फवारणी करताना त्यास विषबाधा झाल्याने त्यास दवाखान्यात नेण्यात आले. सरकारी दवाखान्याचा शवविच्छेदन अहवाल पाहता suspected poisoning pending till reports made available तसेच viscera has been preserved ठेवण्यात आलेला आहे. त्याच्या पोटात mild kerosene like small असा वास होता. त्यामुळे सदरची विषबाधा ही संशयित स्वरुपाची आहे. त्यामुळे अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा संशयी विषबाधा स्वरुपाचा आहे. पोलीस स्टेशन 174 crpc प्रमाणे घटनास्थळ पंचनामा केलेला दिसुन येतो. मात्र तहसीलदाराने तशी नोंद केलेली दिसुन येत नाही. तसेच 27 column नं. शवविच्छेदन अहवालात stomach and its contains contains 200 mg mg cowtish colores c mild kerosene like smelt present यावरुन अर्जदाराच्या पतीने रोगन हे औषध प्राशन केल्याचे दिसुन येते. ते शेतात फवारताना नाकातोंडा वाटे इतके रोगन औषध जाऊ शकत नाही. म्हणून सदरच्या केसमधील अर्जदाराने त्याची कागदपत्रे रीतसर गैरअर्जदार क्र. 1 ते 5 यांना पाठवलेली नाही. अर्जदार हा पुर्णत: आपली केस सिध्द करु शकला नाही. म्हणून अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात येत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
2) खर्चाबाबत काही आदेश नाही.