(घोषित दि. 17.11.2014 व्दारा श्रीमती. नीलिमा संत, अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे मौजे देऊळझरी ता.जाफ्राबाद जि.जालना येथील रहिवाशी आहेत. तक्रारदार क्रमांक 1 यांच्या नावावर गट क्रमांक 179 व 171 मध्ये शेत जमीन आहे. तर तक्रारदार क्रमांक 2 यांच्या नावावर गट क्रमांक 203 मध्ये शेत जमीन आहे. वरील जमीन हिंदू एकत्र कुटूंबाची आहे व तक्रारदार क्रमांक 1 हे कुटूंबाचे कर्ता आहेत.
सन 2013 मध्ये मध्ये गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी Plant care agro Industries यांच्या तर्फे एक योजना आणली त्या व्दारे ते विशिष्ट तंत्रज्ञानावर आधारीत रासायनिक खते, कीटक नाशके यांचा कमीत कमी वापर करुन जास्त उत्पन्न देणारे तंत्रज्ञान राबवत होते. त्यासाठी वरील तंत्रज्ञाना अंतर्गत रुपये 8,000/- प्रति एकर अशी किंमत ऊस लागवडीसाठी बुकींग अमाऊंट म्हणून घेत. गैरअर्जदार क्रमांक 3 हे गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे प्रतिनिधी असून औरंगाबाद विभागासाठी काम करतात. गैरअर्जदार क्रमांक 1 हे गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे विक्रेते आहेत.
तक्रारदारांनी त्यांच्या सुमारे 5 एकर जमीनीमध्ये ऊस लागवड करण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडून Plant care तंत्रज्ञान बुकींग योजना या अंतर्गत गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्या मार्गदर्शनाखाली बुकींग केले व त्या आधारे दिनांक 14.11.2013 रोजी पावती क्रमांक 1790, 1795, 1792 व 1341 या पावत्याव्दारे वेगवेगळे साहीत्य उदा. Plant care, Thaio care, Gold Care व इतर सर्व गोष्टी गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडून खरेदी केल्या. वरील सर्व रसायने कंपनीने ऊस बेण्यावरील प्रक्रियेसाठी उपलब्ध करुन दिली.
दिनांक 25.11.2013 ते 10.12.2013 या कालावधीत दोनही अर्जदारांनी ऊसाच्या बेण्यावर गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्या मार्गदर्शनाखाली Plant care तंत्रज्ञानाने प्रक्रिया केली. त्या प्रक्रियेत बियाणाची उगवणक्षमता वाढवण्यसाठी ते विशिष्ट रसायनांमध्ये 15 ते 20 मिनिटे बुडवले जाते व नंतर सुकवून लागवड केली जाते. त्यासाठी त्यांनी ऊस बेणे रमेश भोपळे यांचेकडून विकत घेतले. तक्रारदारांनी वरील प्रमाणे ऊसाची लागवड करुनही त्यांची उगवण अत्यंत अल्प झाली. बेणे आतून सडले, त्याला बुरशी लागली तसेच उगवलेले बेणे जळत होते.
गैरअर्जदारांनी तक्रारदारांना प्रति एकर 80 टन उत्पादन येईल अशी हमी दिली होती. त्यानुसार त्यांना सुमारे 400 टन उत्पादन अपेक्षीत होते. वरील प्रमाणे उत्पादन न आल्यामुळे त्यांचे सुमारे 10,00,000/- चे नुकसान झाले आहे व बेणे लागवड बुकींग अमाऊंट असे सर्व मिळून रुपये 1,17,000/- एवढा खर्च झाला तो देखील वाया गेला.
योग्य उगवण न झाल्याने तक्रारदार क्रमांक 1 यांनी दिनांक 02.01.2014 रोजी कृषी अधिकारी जाफ्राबाद, तहसील कार्यालय, जाफ्राबाद यांना तक्रार अर्ज दिला. दिनांक 15.01.2014 रोजी तालुका कृषी अधिकारी जाफ्राबाद व इतर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा केला तेंव्हा गैरअर्जदार क्रमांक 3 हजर होते त्यांची पचनाम्यावर सही आहे. त्यात कृषी महाविद्यालय, बदनापूर येथील प्राध्यापक व इतर अधिकारी हजर होते. वरील पंचनामा झाल्यावर तालुका तक्रार निवारण समितीने गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या तंत्रज्ञानाने प्रक्रिया केल्यामुळेच उगवणशक्तीवर परीणाम झाल्याचा निष्कर्ष काढलेला आहे.
अपेक्षीत उत्पन्न न आल्यामुळे तक्रारदारांची जमीन पुर्ण वर्षभर नापीक राहीली व त्यांचे वर्ष वाया गेले. त्यामुळे तक्रारदारांचे वरील प्रमाणे रुपये 10,00,000/- चे नुकसान झाले आहे. या बाबत तक्रारदारांनी दिनांक 26.02.2014 रोजी सर्व गैरअर्जदारांना कायदेशीर नोटीस पाठविली. त्याचे गैरअर्जदार यांनी खोटे उत्तर दिले. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारी अंतर्गत ते उत्पन्नाचे झालेले नुकसान रुपये 10,00,000/-, मानसिक त्रासाची भरपाई रुपये 50,000/- व इतर खर्च मिळून रुपये 1,57,000/- अशी मागणी करत आहेत.
तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत त्यांनी दिलेले तक्रार अर्ज, तालुका तक्रार निवारण समितीचा पंचनामा, अहवाल, तलाठयाने केलेला पंचनामा, समितीने तक्रारदारांचा घेतलेला जबाब, गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना दिलेली पावती, गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे योजनेचे माहितीपत्रक, तक्रारदारांच्या नावाचा 7/12 चा उतारा, त्यांनी गैरअर्जदारांना पाठविलेली नोटीस, तिचे आलेले उत्तर अशी कागदपत्र दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 नोटीस मिळूनही मंचा समोर हजर झाले नाहीत. त्यामुळे मंचाने दिनांक 03.11.2014 रोजी त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत केला.
तक्रारदार यांचे तर्फे विव्दान वकील श्री.एस.ई.खटकळ यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यावरुन खालील मुद्दे स्पष्ट होतात.
- तक्रारदारांनी दाखल केलेला तालुका तक्रार निवारण समितीचा अहवाल (नि.4/2) त्यांनी केलेला पंचनामा (नि.4/3) तलाठयांनी केलेला पंचनामा (नि.4/5) या कागदपत्रांवरुन व 7/12 च्या उता-यावरुन दोनही तक्रारदारांची मिळून सुमारे 5 एकर शेत जमीन होती व त्या जमीनीत डिसेंबर 2013 मध्ये तक्रारदारांनी ऊसाची लागवड केली होती असे दिसते.
- गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या Plant care agro Industries च्या ऊस अॅडव्हान्स बुकींग स्कीम 2013 चे माहितीपत्रक तक्रारदारांनी (नि.4/10) वर दाखल केले आहे. त्यात गैरअर्जदार क्रमांक 2 “रासायनिक खते, कीटक नाशके, बुरशी नाशके कमीत-कमी मात्रेत वापरुन भरघोस उत्पन्न देणारे तंत्रज्ञान” विकसीत केले आहे व त्यानुसार ऊसाचे पीक घेतले तर प्रतिकुल हवामानात देखील जास्त उत्पन्न येईल असे त्यांनी म्हटले आहे. त्यासाठी बुकींग शुल्क रुपये 8,000/- प्रति एकर आहे व त्यासाठी एरीया मॅनेजर म्हणून त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 3 ऋषीकेश पाटील यांचे नाव दिले आहे असे दिसते.
- गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या पावतीवर Plant care तंत्रज्ञानाचे बुकींग योजने नुसार प्रति एकर 8,000/- रुपये प्रमाणे 5 एकर साठी तक्रारदारांनी बुकींग केले व त्यानुसार काही माल खरेदी केला ही गोष्ट स्पष्ट होते. (नि.4/7 ते 4/9)
- तालुका तक्रार निवारण समितीने केलेल्या पंचनाम्यावर (नि.4/3) अनेक शेती विषयक तंज्ञाच्या स्वाक्ष-या आहेत. तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 यांची देखील Area Manager Plant care agro Industries म्हणून स्वाक्षरी आहे. तक्रार निवारण समितीच्या अहवालात (नि.4/2) कृषी तंत्रज्ञानी वरील प्रमाणे तक्रारदारांच्या जमिनीत ऊस लागवड केली होती. ऊस बेण्यावर त्यांनी क्रांती कृषी सेवा केंद्र जालना यांच्या मार्फत खरेदी करुन Plant care agro Industries, Thane यांच्या ऊस लागवड तंत्राज्ञाना नुसार प्रक्रिया केली होती असे नमुद केले आहे. पुढे दिनांक 15.01.2014 रोजी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता बहुतांश बेणे आतून कुजले त्यावर हिरव्या बुरशीचा प्रार्दुभाव झाला. काही बेणे सडके व लाल झालेले दिसते. ऊसाची लागवड योग्य खोलीवर केली होती तरीही ऊसाची उगवण फक्त 10 ते 15 टक्के झाल्याचे दिसते व उगवलेला ऊस देखील जळत असल्याचे दिसते असे नमुद केले आहे. तसेच ऊस बेणे जेथून खरेदी केले तो ऊस बेणे मळा निरोगी होता व वरील गट नंबरच्या आजु-बाजूला उपरोक्त तंत्रज्ञानाचा वापर न करता लागवड केलेल्या ऊसाची चांगली उगवण झालेली दिसते असे म्हटले आहे व यावरुन Plant care agro Industries, Thane यांच्या तंत्रज्ञानानुसार प्रक्रिया केल्यामुळेच बेण्याच्या उगवण शक्तीवर परिणाम झाल्याचे निष्पन्न होते असा निष्कर्ष काढला आहे. तक्रारदारांनी ऊस पिकाची लागवड, तंत्रज्ञानाचा खर्च, बेणे खर्च, मिळून रुपये 1,17,000/- चा खर्च आल्याचे देखील त्यात म्हटले आहे.
- वरील पंचनाम्याच्या वेळी गैरअर्जदार क्रमांक 3 हे हजर होते. त्यामुळे त्यांना तक्रारदारांच्या तक्रारी बद्दल जाणीव होती. तक्रारदार यांनी दिलेल्या कायदेशीर नोटीसच्या उत्तरात गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी ऋषीकेश पाटील (गैरअर्जदार क्रमांक 3) यांच्या मार्फत तक्रारदारांनी वरील तंत्रज्ञान व अनुषंगीक सल्ला घेतल्याचे मान्य केले आहे.
- स्थानिक वर्तमानपत्रकात जाहीर प्रकटन देऊनही गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 मंचा समोर हजर झालेले नाहीत व त्यांनी तक्रारदाराचे कोणतेही कथन नाकारलेले नाही अशा परिस्थितीत तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या Plant care agro Industries ऊस तंत्रज्ञाना नुसार उत्पादने वापरुन व प्रक्रिया करुन ऊसाची लागवड केल्यामुळे ऊसाच्या उगवण शक्तीवर परिणाम झाला व केवळ 10 ते 15 टक्के एवढी अल्प उगवण झाली. त्यामुळे तक्रारदारांच्या लागवडीवरील व तंत्रज्ञानावरील सर्व खर्च वाया गेला असा निष्कर्ष मंच काढत आहे.
- तक्रारदार तक्रारीत म्हणतात की, त्यांनी गैरअर्जदारांना एकरी सुमारे 80 टन उत्पादनाची हमी दिली होती व त्यानुसार त्यांना 400 टन उत्पादन अपेक्षीत होते व बाजारभावचा विचार करुन त्यांचे 8 ते 10 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. परंतू नि.4/10 वरील माहितीपत्रकात कोठेही गैरअर्जदारांनी एकरी 80 टन उत्पादनाची हमी दिल्याचे दिसत नाही. त्याच प्रमाणे तक्रारदारांनीच दिलेल्या जबाबात त्यांनी दुबार लागवड करावी लागेल त्यामुळे लागवडीस 2 महिने उशीर होईल व त्यांच्या उत्पादनात घट होईल असे म्हटले आहे. म्हणजेच तक्रारदाराची जमीन सन 2013-2014 मध्ये संपूर्ण हंगामासाठी पडीक राहीली नाही व त्यांनी त्यावर दुबार पेरणी केली ही गोष्ट स्पष्ट होते. तक्रारदाराचे उत्पन्नाचे एकुण सुमारे 8 ते 10 लाखाचे नुकसान झाले ही बाब तक्रारदार पुराव्यानिशी सिध्द करु शकलेले नाहीत असे मंचाला वाटते.
- तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन त्यांनी वरील Plant care agro Industries तंत्रज्ञान व अनुषंगीक उत्पादने घेण्यासाठी एकरी रुपये 8,000/- प्रमाणे 5 एकरसाठी रुपये 40,000/- एवढा खर्च केला. त्याच प्रमाणे ऊस बेण्यासाठी रुपये 20,000/- खर्च केला असे दिຆसते. तक्रारदार म्हणतात की, त्यांना मशागत व लागवड यासाठी रुपये 50,000/- इतका खर्च आला होता. हे दर्शविणारा काहीही पुरावा मंचा समोर नाही. म्हणून मंच मशागती पोटी तक्रारदारांना सुमारे 25,000/- रुपये खर्च आला असे गृहित धरते. अशा प्रकारे एकुण पिकाची लागवड व तंत्रज्ञान, बेणे मिळून तक्रारदारांना एकुण रुपये 85,000/- खर्च आला व वरील खर्च गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडून वसुल करण्यासाठी तक्रारदार पात्र आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी केवळ गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या उत्पादनाची विक्री केली आहे व गैरअर्जदार क्रमांक 3 हे गैरअर्जदार क्रमांक 2 चे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांना तक्रारदारांना नुकसान भरपाई देण्यासाठी जबाबदार धरणे न्याय्य ठरणार नाही असा निष्कर्ष मंच काढत आहे.
- गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी विकसीत केलेले तंत्रज्ञान व इतर अनुषंगिक उत्पादने खराब निघाल्याने तक्रारदारांच्या ऊस पिकाचे नुकसान झाले त्यांना कालांतराने दुबार लागवड करावी लागली त्यामुळे तक्रारदारांना शारिरीक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागला याची नुकसान भरपाई म्हणून गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडून रुपये 25,000/- तसेच तक्रार खर्च रुपये 3,000/- मिळण्यासही तक्रारदार पात्र आहेत असा निष्कर्ष मंच काढत आहे.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- गैरअर्जदार क्रमांक 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना आदेशा पासून 60 दिຆवसांच्या आत एकत्रित रक्कम रुपये 85,000/- (अक्षरी रुपये पंच्याएैंशी हजार फक्त) द्यावे. वरील रक्कम विहित मुदतीत अदा न केल्यास त्यावर 9 टक्के व्याज द्यावे.
- गैरअर्जदार क्रमांक 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना रुपये 3,000/- (अक्षरी रुपये तिन हजार फक्त) तक्रार खर्च म्हणून द्यावे.
- गैरअर्जदार क्रमांक 1 व 3 यांचे विरुध्द आदेश नाहीत.