तक्रारदार स्वत: हजर. त्यांचेतर्फे त्यांचे
पती श्री. वामन श्रीपाद गाडगीळ यांना
दिनांक 7/3/2011 रोजी दिलेल्या
अधिकाराने युक्तीवाद ऐकला.
जाबदेणार क्र 1 तर्फे अॅड गांधी हजर.
युक्तीवाद ऐकला.
जाबदेणार क्र 3 तर्फे अॅड राऊत हजर.
युक्तीवाद ऐकला.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा – मा. श्री. श्रीकांत एम. कुंभार, सदस्य यांचे नुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 7 मार्च 2013
प्रस्तुतची तक्रार तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे दाखल केलेली आहे. तक्रारदार यांच्या तक्रारीतील कथने खालील प्रमाणे-
1. तक्रारदार यांनी जाबदेणार क्र 2 यांनी उत्पादित केलेली व जाबदेणार क्र 2 यांचे विक्रेते असलेली जाबदेणार क्र 1 यांचेकडून होंडा युनिकॉन मोटार सायकल नंबर एम एच 12, ईयु 821 ही दिनांक 15/4/2008 रोजी रक्कम रुपये 60,877/- रुपययांना खरेदी केली होती. जाबदेणार क्र 1 याने अत्यंत सर्वाथाने चांगली स्थिती असलेली मोटार सायकल तक्रारदार यांना दिली आहे या विश्वासाने तक्रारदार यांनी वर नमूद मोटार सायकल घरी आणली व दुसरे दिवशी सदर गाडीचा वापर चालू केला असता सदर मोटार सायकल ही चालविण्यास हाताळण्यास सुलभ नाही असे तक्रारदारांना आढळून आले. सदर मोटार सायकलचे चालविण्यामध्ये सहज सुलभता नाही, ती चालविण्यास अत्यंत त्रास होतो असे तक्रारदार हीस आढळून आले. तक्रारदार हिने सदर बाब त्यांचे पती श्री. वामन गाडगीळ यांचे निदर्शनास आणली की, सदर मोटार सायकल मध्ये प्राधान्याने दोष, खराबी आहेत व ते बहुतांश मोटार सायकल निर्मीतीमधील आहेत व याबाबत पुढील उपाययोजना करण्याबाबत त्यांनी पतीस सांगितले व अशात सदर मोटार सायकलचे पहिले सर्व्हिसींग जाबदेणार क्र 1 यांचे वाकडेवाडी युनिट मध्ये दिनांक 27/5/2008 सर्व्हिसींग पावती नं 76396 केले. त्यावेळी प्रथमत: तक्रारदार यांचे पतीनी सर्व्हिसींग करणा-याना वाहनामध्ये आढळले दोषांची / उणिवांची / वाहनाची तक्रार याबाबत लेखी माहिती दिली व त्यांनी वाहन ठेवून घेतले. त्याप्रमाणे सदर मोटार सायकल मध्ये खालील दोष होते -
A. न्यूट्रलमध्ये हिरवा दिवा लागतो व गाडी गिअरमध्ये राहते.
B. पुढील शॉकऑबझर्व्हर हेडलाईट हाऊसिंग मधून गाडी छोटयाशा खडडयातुन गेलेवर सुध्दा खडखड आवाज येतो.
C. पुढील चाक आऊट असेल प्रमाणे 40 स्पीडला गाडी डावी उजवीकडे झुकते, ओढ घेते.
D. 40 च्या स्पीडला इंजिनमधून शिट्टी वाजले सारखा आवाज येतो.
E. चौथ्या विशेषत: तिस-या गिअरमध्ये गाडी घेतांना घासल्याचा आवाज येतो.
F. सेकंड गिअरला गाडी पिक अप घेत नाही गाडी धक्का बसून बंद पडते.
G. मुख्य ब्रेक मधून ब्रेक लावल्यावर आवाज येतो.
H. गाडी मिसफायर होते.
I. किक मारलेवर ती परत जागेवर येत नाही.
J. क्लच गिअर मध्ये दोष आहे
K. वाहनाचा वेग कमी होताना गिअर अडकतात.
L. वाहनाच्या सायलेन्सरमधून निळा धून व ऑईल येते
चार दिवसांनी तक्रारदार यांनी त्यांचे मोटार सायकल मधील सर्व दोष / उणिवा यांचे निराकरण करुन वाहन तयार आहे का व ते ताब्यात घेवून चालवून पाहिले असता मोटार सायकल मध्ये कोणताही बदल झाल्याचे दिसले नाही. सर्व दोष तसेच होते. त्यानंतर तक्रारदार यांनी संबंधित श्री. रन्जीश नायर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की वाहनातील वरील सर्व दोष तक्रारदार यांनी वाहनचा वापर चालू केलेस दूर होतील. परंतू तक्रारदार यांनी तेही करुन पाहिले. परंतू वाहनातील दोषामुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेवून तक्रारदार यांनी त्याचे प्रमाण कमी केले. परंतू वाहन चालवूनही त्यातील दोष कमी झाले नाही. दुस-या व तिस-या सर्व्हिसिंग मध्ये सुध्दा सदर मोटार सायकल मधील दोष तसेच राहिले. त्यामध्ये कोणताही बदल झाला नाही, वाहनातील दोष / उणिवा दूर झाल्या नाहीत व दिनांक 31/8/2008 रोजी या तक्रारदारांनी जाबदेणार 1 कडे जॉब कार्डची प्रथम मागणी केली परंतू मागणी करुनही जाबदेणार क्र 1 यांनी जॉब कार्ड तक्रारदार यांना दिले नाहीत व सापडत नाहीत, मिळून येत नाहीत असे सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी जाबदेणार क्र 2 यांना दिनांक 29/9/2008 रोजी जाबदेणार क्र 1 यांच्या कार्यपध्दतीबद्यल त्यांनी वाहनाती निर्मीती दोष काढून दिला नाही याबद्यल रजिस्टर्ड नोटीसने कळविले. त्यास त्यांनी उत्तर दिले नाही व तक्रारदार यांचे मागणीप्रमाणे दोषपूर्ण गाडी बदलून दिली नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी जाबदेणार क्र 1 यांना दिनांक 19/11/2008 रोजी रजिस्टर्ड पोस्टाने नोटीस पाठवून वाहन खरेदी पोटी घेतलेले पैसे तक्रारदार यांना व्याजासह परत करावेत किंवा सदोष मोटार सायकल घेऊन दुसरी नवी मोटार सायकल दयावी असे कळविले व नंतर दिनांक 12/12/2008 रोजी तक्रारदार यांनी जाबदेणार क्र 1 यांना ई मेल पाठविले. परंतू जाबदेणार यांनी त्यास कोणतेही प्रत्युतर दिले नाही व रजिस्टर्ड नोटीसीतील मागणीप्रमाणे सदोष मोटार सायकल बदलून दिली नाही वा त्याची किंमत रुपये 60,877/- परत केली नाही व उत्तर दिले नाही. म्हणून नाईलाजाने तक्रारदार हिने जाबदेणार यांच्या सदोष सेवेबाबत अनफेअर ट्रेड प्रॅक्टीस बाबत या मंचात जाबदेणार यांचे विरुध्द तक्रार दाखल करुन जाबदेणार यांचेकडून मोटार सायकल खरेदी पोटी घेतलेले रुपये 60,877/- द.सा.द.शे 25 टक्के रक्कम पेड होईतो होणार व्याजासह मिळावेत, शारिरीक मानसिक त्रासापोटी रुपये 15,000/- मिळावेत, मोटार सायकल ज्या उद्येशासाठी घेतली तो तक्रारदार यांचा उद्येश पूर्ण न झाल्याने झालेल्या नुकसानी पोटी रुपये 15000/- व अर्जाचा खर्च रुपये 5000/- मिळावेत अशी मंचाकडे मागणी केली आहे.
2. सदर प्रकरणातील जाबदेणार यांना नोटीस बजावण्यात आली. व ते सर्व त्यांचे प्रतिनिधी वकीलामार्फत हजर होऊन त्यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीस हरकत घेणारी कैफियत व त्यासोबत शपथपत्र दाखल केलेली आहेत. त्याचप्रमाणे तक्रारदार यांच्या प्रत्येक अर्जास त्यांनी वेळोवेळी त्यास जादा म्हणणे देवून त्याचा प्रतिवाद केला आहे. जाबदेणार यांनी जॉबकार्ड वगैरे कागदपत्रे त्यांच्या कथनापुष्टयर्थ दाखल केली आहेत. वरील जाबदेणार यांनी दाखल केलेले म्हणणे, शपथपत्र, लेखी व तोंडी युक्तीवाद व तक्रारदार यांचा युक्तीवाद, तक्रारीतील कथने, त्यासोबत दाखल कागदपत्रे व तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्या प्रत्येक कथनांचा शपथपत्रासह केलेले खंडन पाहता त्या सर्व बाबींचा विचार करुन गुणवत्तेवर निर्णय देण्यात येत आहे-
3. उभय तक्रारदार व जाबदेणार यांनी केलेला अंतिम युक्तीवाद दाखल पुरावा, कथने, कागदपत्रे विचार करता खालील मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदर मुद्ये व त्यावरील निष्कर्ष खालील प्रमाणे -
मुद्ये निष्कर्ष
1. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सदोष
मोटार सायकल विकून त्यांच्या मधील निर्मीती
पासून असलेले गंभीर दोष दूर करुन न देवून
किंवा त्याबदली चांगली निर्दोष मोटार सायकल न
देवून सदोष सेवा दिली आहे का ? होय
2. जाबदेणार हे तक्रारदार यांच्या मागणीप्रमाणे
बदली वाहन किंवा त्याची व्याजासह किंमत
व नुकसान भरपाई देण्यास जबाबदार
आहेत का ? होय
3. अंतिम आदेश काय ? अंशत: मंजूर
कारणे -
प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदार यांनी दिनांक 15/4/2008 रोजी रक्कम रुपये 60,877/- किंमतीस जाबदेणार क्र 2 यांनी तयार केलेली व सदर जाबदेणार क्र 2 यांच्या उत्पादित होंडा मोटार सायकल कंपनीचे अधिकृत डिलर विक्रेते जाबदेणार क्र 1 यांचे कडून हिरो होंडा युनिकॉर्न मोटार सायकल क्र एम एच 12 ईयु 821 खरेदी केली. सदर गाडी खरेदी केल्या नंतर तक्रारदार यांना सदर वाहनामध्ये कलम 1 मध्ये ए टू एल अखेर नमूद केलेले दोष आढळून आले व गाडी नवीनच घेतली असल्याने सदर दोष हे गाडी निर्मीती पासूनच असल्याचे दिसले. त्यामुळे तक्रारदार यांनी याबाबत जाबदेणार क्र 1 यांना येवून वॉरंट कालावधीत दोष दूर करुन मागितले व दिनांक 18/8/2008 रोजी व 25/8/2008 रोजी सर्व्हीसिंग करुनही जाबदेणार क्र 1 यांच्याकडून गाडीतील दोषाचे निराकरण झाले नाही. जाबदेणार यांना तक्रारदार यांनी वाहनातील दोषांची लेखी यादी दिली होती. या वाहन दोषाबाबत तक्रारदार यांनी 18/5/2008, 18/8/2008, 31/8/2008 रोजी लेखी तक्रार करुनही आवश्यक ती दखल जाबदेणार 1 यांनी घेतली नाही व त्यांना वरील कालावधीत वाहनातील दोष दूर करुन देता आले नाहीत असे स्पष्ट दिसते. त्यानंतर नाईलाजाने तक्रारदारांनी यातील जाबदेणार क्र 2 यांना दिनांक 29/9/2008 व 12/12/2008 रोजी स्मरणपत्र पाठवून, नोटीस पाठवून त्याना जाबदेणार क्र 1 यांनी विकलेल्या वाहनात निर्मीती वेळेसच गंभीर दोष असल्याचे सिध्द झाले असून ते बदलून वाहना बदली वाहन दयावे अथवा वाहनाची घेतलेली किंमत परत करावी असे कळविले व त्याच आशयाची नोटीस जाबदेणार क्र 1 यांना रजिस्टर्ड ए.डी ने दिनांक 14/11/2008 रोजी पाठविली. दिनांक 19/11/2008 रोजी ई मेल केला परंतू जाबदेणार यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही वा वरील निर्देशित केलेले वाहनातील निर्मीती दोष काढून वाहन निर्दोष करुन दिले नाही किंवा त्या वाहनाची किंमत परत दिली नाही किंवा वाहनापोटी वाहन दिले नाही व अशा प्रकारे जाबदेणार यांनी तक्रारदार यांच्या बाबतीत अत्यंत टोकाचा बेजबाबदारपणा दाखवला. तक्रारदार यांना आवश्यक ती सेवा तत्परतेने व प्रभावीपणे दिली नाही. त्यामुळे नाईलाजाने तक्रारदार यांनी यातील जाबदेणार यांचे विरुध्द मंचात तक्रार दाखल केली. तक्रारदार यांची तक्रार, त्यातील कथने, शपथपत्र, जाबदेणार यांनी या प्रकरणी दाखल केलेली कैफियत, त्यातील सर्व मुद्ययांचे तांत्रिकदृष्टया व तौलनिकदृष्टया पॅरावाईज दिनांक 8/1/2010 रोजी शपथपत्रासह केलेले खंडन, त्याचप्रमाणे जाबदेणार क्र 2 यांची कैफियत, शपथपत्र यामधील प्रत्येक मुद्याचे वरील तक्रारदार यांनी केलेले मुद्येसूद खंडन, विवेचन व तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्रावरील श्रीकांत दामले या दोन चाकी वाहनांच्या रिपेअरींग, सर्व्हीसिंग करणार यांचा 42 वर्षाचा अनुभव असणा-यांकडून वादातीत वाहन तपासून त्याचा रिपोर्ट मंचाकडे शपथपत्रासह दाखल केला आहे. त्यास जाबदेणार क्र 1 व 2 यांनी दिनांक 6/4/2010 रोजी म्हणणे दिले त्या सर्वास प्रतिम्हणणे शपथपत्रासह तक्रारदार यांनी दिनांक 28/8/2010 रोजी सादर करुन त्याचे मुद्येसूद, तर्कशुध्द खंडन करुन म्हणणे व शपथपत्र देवून केले आहे. वरील सर्व कागदपत्रांचे व इतर सर्व कागदपत्रांचे त्यातील विवेचनाचे अवलोकन केले असता तक्रारदारांच्या वाहन निर्मीती दोषांचे खंडन व प्रतिवाद जाबदेणार खोडून काढू शकले नाहीत. त्यांचे प्रतिपादन हे तकलादू व मुळ विषयास बगल देणारे आहे असे स्पष्ट जाणवते व वाहनाचे जॉबकार्ड प्रथम सापडत नाही असे सांगणारे जाबदेणार यांचे 2003 चे तक्रारीनंतर अचानक 19/1/2011 रोजी मंचात ते दाखल करतात. त्या सर्व जॉबकार्डवरील नोंदी तक्रारदार यांनी नाकारलेल्या आहेत. त्या जाबदेणार यांनी पुराव्यानिशी, वा त्यावरुन वाहन दोष संपलेचे आढळून येत नाही, सिध्द केलेल्या नाही. त्याचप्रमाणे जाबदेणार यांनी तक्रारदार यांना टेस्टिंगसाठी बोलावले, गाडीचे पार्ट बदलले किंवा बदल केलेले पार्ट याबद्यल मंचामध्ये कोणताही ठोस पुरावा जाबदेणार यांनी दाखल केलेला नाही.
त्याचप्रमाणे तक्रारदार यांच्या तक्रारीस दाखल अर्जातील कथने यांना जाबदेणार यांनी फक्त म्हणणे देवून नाकारलेले आहे. परंतु वाहनातील निर्मीती दोषा बाबत त्यांच्या तज्ञाकडून तपासून दुषित वाहनाचे खरे सत्य पुराव्याने पुढे आणले नाही. नि:संशयरित्या तक्रारदारांचे बाबतीत व सदोष वाहनाचे बाबतीत जाबदेणार हे बेजबाबदारपणे वागले असून त्यांनी तक्रारदार यांना सदोष वाहन विक्री करुन सदोष सेवा दिली आहे व सदोष वाहन निर्दोष करुन दिले नाही हे नि:संशयरित्या सिध्द होते असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे हे जाबदेणार सेवा दोषरहित करुन देण्यास जबाबदार आहेत.
तक्रारदारांचे वाहनातील निर्मीती दोष निघाले नाहीत व तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, तक्रार, तक्रारीतील कथने व जाबदेणार यांनी विनापुरावा त्याचा केलेला तकलादू प्रतिवाद व त्यांची कथने पाहता असे दिसून येते की तक्रारदार यांनी मागणी केलेल्या मागण्या या योग्य व कायदेशिर आहेत व संपूर्ण प्रकरणी तक्रारदार यांना जाबदेणार यांच्या सदोष सेवेने मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास झालेला आहे हे स्पष्ट दिसून येते असे मंचास वाटते. त्यामुळे तक्रारदार हे जाबदेणार यांच्याकडून होंडा युनिकॉर्न गाडीची किंमत रुपये 60,877/- त्यावर द.सा.द.शे 9 टक्के व्याज त्यांच्या झालेल्या नुकसानी पोटी रुपये 10,000/- गाडी अभावी व्यवसायाचे झालेले नुकसानीपोटी रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रुपये 3000/- मिळण्यास पात्र आहेत.
सबब खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
:- आदेश :-
[1] तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
[2] असे जाहिर करण्यात येते की जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सदोष निर्मीती दोष असलेली हिरो होंडा युनिकॉर्न मोटार सायकल विक्री करुन ती निर्दोष करुन दिलेली नाही. त्यामुळे सदोष सेवा देवून सेवेत कमतरता केलेली आहे.
[3] जाबदेणार यांना असे आदेश देण्यात येतात की त्यांनी तक्रारदारांना मोटार सायकलची किंमत रुपये 60,877/- व त्यावर दिनांक 15/4/2008 पासून द.सा.द.शे 9 टक्के दराने रक्कम फिटेपर्यन्त होणारे व्याजासह आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून एक महिन्याचे आत अदा करावी.
[4] तक्रारदार यांनी जाबदेणार यांना त्यांचे दोषपूर्ण वाहन परत करुन वाहन दिल्याची पोहोच घ्यावी.
[5] जाबदेणार यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाई पोटी रुपये 10,000/- वाहना अभावी व्यवसायाचे झालेले नुकसानी पोटी रुपये 5000/- व अर्जाचा खर्च रुपये 3000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून एक महिन्यात दयावा. आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून एका महिन्यात न केल्यास तक्रारदार सदर रकमेवर द.सा.द.शे 9 टक्के दराने रक्कम व्याज मिळण्यास पात्र आहेत.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.
ठिकाण – पुणे
दिनांक – 07/03/2013