घोषित द्वारा श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदारानी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या कंपनीचा गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडून कांदा पुना फूरसुंगी या जातीचे 500 ग्रॅम बियाणे दिनांक 3/10/2007 रोजी खरेदी केले. त्यानंतर हया बियाणाची त्यांनी 32 गुंठयात त्यांच्या स्वत:च्या जमिनीत लागवड केली. या बियाणाच्या लागवडीपूर्वी त्यांनी शेतीची योग्य ती मशागत केली तसेच खते, किटकनाशके, औषध फवारणी केली असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. पिकाची उगवण झाल्यानंतर तक्रारदारास कांदयाच्या पिकाबद्दल संशय आल्यामुळे त्यांनी पिकाची पाहणी करण्यासाठी कृषी विभाग, पंचायत समिती वैजापूर, यांना लेखी तक्रार करुन पिक पाहणी करण्यासाठी विनंती केली. त्यानुसार दिनांक 15/4/2008 रोजी पर्यवेक्षक कृषी विभाग पं.स.वैजापूर यांनी गावातील पंचासमक्ष तक्रारदाराच्या शेतात जाऊन पिकाची पाहणी करुन पंचनामा केला. त्यावेळेस त्यांना तक्रारदाराच्या शेतातील कांदयाचे पीक कांही लालसर व भूरकट रंगाचे आलेले आढळून आले. या अहवालानुसार हे सर्व भेसळयुक्त बियाणे वापरल्यामुळे झाले त्यामुळेच तक्रारदाराच्या उत्पन्नात घट झाली असे तक्रारदाराचे म्हणणे आहे म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून रु 1 लाख 18 टक्के व्याजदराने नुकसान भरपाई आणि इतर दिलासा मागतात. तक्रारदारानी तक्रारीसोबत शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी त्यांचा लेखी जवाब संयुक्तपणे दाखल केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदार क्रमांक 2 यांची नावाजलेली बियाण्याची कंपनी आहे. कंपनीने त्यांच्या बियाणाच्या पाकीटावर लागवडीबद्दलची माहिती व्यवस्थितपणे नमूद केली आहे. या माहितीपत्रकात एकरी किती बियाणे वापरावे हेही स्पष्ट केले आहे. त्यानुसार दोन एकर जमिनीमध्ये 500 ग्रॅम बियाणे वापरणेच आवश्यक आहे. तक्रारदारानी 500 ग्रॅम वजनाचे दोन पाकीटे खरेदी केल्याचे दिसून येते. याचाच अर्थ तक्रारदारानी एक किलो बियाणाची 33 गुंठे क्षेत्रात लागवड केल्याचे दिसून येते. माहिती पत्रकात एक एकर क्षेत्रासाठी (40 गुंठेसाठी) अडीच किलो कांदयाचे बियाणे वापरणे आवश्यक आहे. त्यानुसार एक गुंठयास साधारण 621.63 ग्रॅम बियाणे वापरणे आवश्यक आहे. तक्रारदारानी 33 गुंठेक्षेत्रामध्ये किमान 2 किलो म्हणजे प्रत्येकी 500 ग्रॅमचे 4 पॅकेट वापरणे आवश्यक होते. परंतु तक्रारदारानी 500 ग्रॅम बियाणे 33 गुंठे क्षेत्रात लागवड केली आहे. कांदा लागवडीच्या नियमानुसार 500 ग्रॅम बियाणामध्ये नियमाच्या चौपट क्षेत्रामध्ये 33 गुंठे कांदा लागवड होऊ शकत नाही. यावरुन गैरअर्जदार असे म्हणतात की, तक्रारदारानी खरेदी केलेले 500 ग्रॅम बियाणासोबतच इतर खाजगी बियाणे मिक्स करुन 33 गुंठे क्षेत्रात कांदा लागवड केलेली आहे. कंपनीच्या नियमानुसार एक किलो बियाण्यामध्ये जास्तीत जास्त 14 ते 15 गुंठे क्षेत्र कांदा लागवडीसाठी येऊ शकते. यासर्व प्रकारावरुन शेतक-यानी इतर जातीच्या बियाणाची भेसळ करुन जास्तीचे क्षेत्र लागवडीखाली आणले आहे. त्यामुळे गैरअर्जदारानी तक्रारदारास भेसळेयुक्त बियाणाचा पुरवठा केला हे तक्रारदाराचे म्हणणे खोटे आहे असे त्यांचे म्हणणे आहे. पंचनामा करताना प्रत्येक 10 कांदयाचा एक काऊंट याप्रमाणे तकारदाराच्या शेतातील वेगवेगळया ठिकाणच्या कांदयाचे 5 काऊंट घेण्यात आले होते. याप्रमाणे नंतर 50 कांदे तपासण्यात आले पैकी 17 कांदे हे भूरकट लाल म्हणजेच गैरअर्जदार कंपनीच्या बियाणाप्रमाणे होते मात्र उर्वरीत 33 कांदे हे लाल रंगाचे म्हणजेच भेसळयुक्त बियाणाचे असल्याचे आढळून आले. पिकाचा पंचनामा कृषी पर्यवेक्षक हे त्यांच्या समितीसोबत करतात ही पाहणी झाल्यानंतर ज्या शेतक-यांनी या कंपनीच्या बियाणाची खरेदी करुन लागवड केलेली आहे अशा दोन शेतक-यांच्या शेतात जाऊन त्यांच्या देखील पिकाची पाहणी केली यास समांतर पिक पाहणी असे म्हणतात. हा समांतर पिक पाहणी अहवाल शेतक-यानी दाखल केलेला नाही. पिक पाहणी अहवाल हा जिल्हा कृषी विकास अधिकारी यांच्याकडे पाठविला जातो. या अहवालानुसार तक्रारदाराच्या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास जिल्हा कृषी अधिकारी हे तक्रारदाराच्या प्लॉटची पाहणी करण्यास जातात. मात्र तक्रारीत तथ्य नसल्याचे अहवालावरुन दिसून आल्यास तक्रार निकाली काढतात. तक्रारीत तथ्य असल्याचे आढळल्यास शेतीची अंतिम पाहणी करतात आणि त्यावेळेस कंपनीचे प्रतिनिधी, अधिकारी, शेतकरी व इतर पंच यांची लेखी साक्ष व जवाब घेतला जातो. यासर्व बाबीनंतरच तक्रारदाराची तक्रार खरी असल्याचा अहवाल जिल्हा कृषी अधिकारी यांनी दिल्यानंतरच बियाणे उत्पादक कंपनी विरुध्द तक्रारदार रितसर तक्रार दाखल करु शकतो. प्रस्तुतच्या प्रकरणात सुध्दा समांतर पाहणी करण्यासाठी कृषी अधिकारी यांनी श्री रामदास माणिक मतसागर आणि भाऊसाहेब दादा कूहीले यांच्या शेतातील कांदयाच्या पिकाची पाहणी करुन त्यांच्यासमोर पाहणी पंचनामा केला. या पाहणीमध्ये कृषी अधिकारी यांना कंपनीचे बियाणे सदोष असल्याचे आढळले नाही. या दोन्हीही शेतक-यांनी, श्री मतसागर यांनी 28 गुंठयामध्ये 2 किलो बियाणे वापरले आणि भाऊसाहेब कूहीले यांनी 3 गुंठयामध्ये 2 किला 500 ग्रॅम बियाणे वापरल्याचे सांगितले. या दोन्हीही शेतक-यांची बियाणाबद्दल कुठलीही तक्रार नाही. गैरअर्जदार डॉ कि.ए.लवांडे ,संचालक, राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र, राजगूरु नगर, पुणे यांचा अभ्यासपूर्ण लेख लेखी जवाबासोबत दाखल केला आहे. वरील सर्व कारणावरुन तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती गैरअर्जदार करतात. गैरअर्जदारानी पंचगंगा बियाणे कांदा पुना फुरसुंगी याचे पाकीट दाखल केले आहे. दोन्हीही पक्षकारानी दाखल केलेल्या कागदपत्राची पाहणी मंचाने केली. तक्रारदारानी त्यांच्या शेतामध्ये गैरअर्जदार क्रमांक 2 पंचगंगा सिडसचे पुना फूरसुंगी हे कांदयाचे बियाणे त्यांच्या शेतातील 32 गुंठे जमिनीत लागवड केली. त्यांच्या म्हणण्यानुसार या बियाण्यापासून त्यांना कांही लाल व कांही भूरकट लाल असे भेसळयुक्त कांदयाचे उत्पन्न निघाले त्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला. तक्रारदारानी कोठारी कृषी सेवा केंद्र यांच्याकडून हे बियाणे खरेदी केले होते. पंचनाम्यामध्ये त्यांना लाल व भूरकट अशा दोन्हीही प्रकारचे कांदे आढळल्याचे म्हणतात. भूरकट लालचे 17 आणि लाल कांदयाचे 33 अशा प्रकारचा 10 गुंठयाचा एक काऊंट करुन त्यांनी पाहणी केली होती. कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांनी त्यांचा अहवाल दिला आहे त्यामध्ये भूरकट रंगाचे 34 टक्के व लाल रंगाचे 66 टक्के कांदा आढळून आला आहे. यावरुन सदर बियाणामध्ये भेसळ आढळून येते व बियाणामध्ये भेसळ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गैरअर्जदारानी त्यांच्या लेखी जवाबामध्ये विस्तृत पध्दतीने त्यांच्या बियाणाची माहिती दिलेली आहे. गैरअर्जदारांच्या म्हणण्यानुसार कृषी विकास अधिकारी यांनी समांतर पाहणी केलेला पंचनामा तक्रारदाराने दाखल केलेला नाही. परंतु तो गैरअर्जदारानी दाखल केलेला आहे. तक्रारदाराच्या शेतातील पिकाची पाहणी त्यांनी दिनांक 15/4/2008 रोजी केली आणि समांतर पाहणी पंचनामा दिनांक 17/4/2008 रोजी केला. समांतर पाहणी पंचनाम्यामध्ये तक्रारदारानी ज्या लॉटचा म्हणजेच लॉट क्रमांक 088 याच लॉटच्या कांदयाचे बियाणे लागवड त्यांच्या शेतात केली होती आणि मतसागर आणि कूहीले यांनी सुध्दा कांदा बियाणे पुना फूरसुंगी वाण पंचगंगा उत्पादनाचे लॉट क्रमांक 088 हे खरेदी केले होते. परंतु त्यांच्या शेतामध्ये भूरकट लाल हे 10 व एक किंवा दोन कांदे हे लाल दिसून आले. या दोन शेतक-यांनी आणि तक्रारदारानी एकाच लॉटचे बियाणे खरेदी केले परंतु तक्रारदारास भेसळयुक्त उत्पन्न आले. याच अर्थ तक्रारदारानी पुना फूरसुंगी या वाणासोबत दुस-या कुठल्यातरी वाणाची लागवड केली असावी. पंचगंगा बियाणाचे 500 ग्रॅम वजनाच्या पाकीटाची पाहणी करता त्यावर बियाणे एक एकर क्षेत्रामध्ये 2.5 किलो बियाणे वापरावे असे स्पष्टपणे नमूद केले आहे. तरी सुध्दा तक्रारदारानी त्यांच्या 38 गुंठयामध्ये फक्त 500 ग्रॅम बियाणाची लागवड केलेली दिसून येते. बाकीचे क्षेत्र भरुन काढण्यासाठी म्हणून कदाचित तक्रारदारानी दुस-या कंपनीचे बियाणाची लागवड केली असावी. तक्रारदारास पंचनाम्यावरुन कांदयाचे उत्पन्न निघाल्याचे दिसून येते. तक्रारदारानी त्यांना या बियाणापासून किती उत्पन्न मिळाले याबद्दल कुठलाही हिशोब व कागदपत्रेही दाखल केली नाहीत. कृषी विकास अधिकारी यांनी कांदे भूरकट रंगाचे 34 आणि लाल रंगाचे 66 टक्के असल्याचे आढळून आल्याचे म्हटले आहे. यावरुन तक्रारदारानी पंचगंगा पुना फुरसूंगी बियाणे खरेदी केले होते त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना केवळ 34 टक्केच उत्पन्न मिळालेले आहे. गैरअर्जदार म्हणतात त्याप्रमाणे तक्रारदारानी इतर वाणाचे बियाणे खरेदी केले या त्यांच्या म्हणण्याच्या पुष्ठयर्थ कुठलाही पुरावा दाखल केला नाही. तक्रारदारास 66 टक्के लाल कांदयाचे उत्पादन झाले आहे त्याचा बाजार भाव कमी असतो असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. परंतु सदरील कांदयास कांही तरी भाव आला असावा असे मंचाचे मत आहे. तक्रारदारानी 32 गुंठयात 500 ग्रॅमच्या बियाणची लागवड केली. त्यानुसार कंदयाचे उत्पन्न त्यांना मिहाले नाही. सदरील प्रकरणात, बियाणात भेसळ व सदोष असल्याचे कृषी अधिका-याचा अहवाल आहे. म्हणून मंच गैरअर्जदारास असा आदेश देतो की, त्यांनी तक्रारदारास रु 20,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रु 1,000/- द्यावेत. वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी या आदेशाच्या प्राप्तीपासून 6 आठवडयाच्या आत तक्रारदारास रक्कम रु 20,000/- व तक्रारीचा खर्च रु 1,000/- द्यावा. 3. गैरअर्जदार क्रमांक 1 विरुध्द आदेश नाही. (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |