जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
मा.अध्यक्षा- सौ.व्ही.व्ही.दाणी
मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – ९१/२०१२
तक्रार दाखल दिनांक – ०४/०५/२०१२
तक्रार निकाली दिनांक – १७/०२/२०१४
सुशिल लालचंद पोपली ----- तक्रारदार
वय ४६ वर्ष, कामधंदा-व्यापार
रा.दिगंबर पाडवी हौसिंग सोसायटी,
साक्रीरोड,धुळे
विरुध्द
कोटक महिंद्रा बॅंक लि. ----- सामनेवाले
शेती कर्ज विभाग,रुम नं.४१८-४२४,
४ था मजला,शोरब हॉल,२१,ससुन रोड,
पुणे ४११००१
(नोटीस बजावणी व्यवस्थापक यांचेवर व्हावी)
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी )
(मा.सदस्य: श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकिल श्री.एस.वाय.शिंपी)
(सामनेवाले तर्फे – वकिल श्री.एस.आर.पंडीत)
------------------------------------------------------------------
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदार यांनी, सामनेवाले यांनी बेकायदेशीर रित्या जादा कर्ज वसूली करुन सेवेत त्रुटी केली म्हणून नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी सदर तक्रार या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून कर्ज घेतले होते. त्याप्रमाणे तक्रारदारांनी सामनेवाले यांच्या दि.०८-०६-२०१० रोजीच्या पत्रान्वये सदर कर्जाचा भरणा केलेली रक्कम रु.३२,६७,४२८-१९ पैसे त्यात अतिरिक्त घेण्यात आलेली रक्कम रु.२,११,४२२-४६ पैसे इतकी रक्कम बेकायदा वसूल करण्यात आलेली आहे. वरील रक्कम भरणा केल्यानंतरही सामनेवाले यांनी अतिरिक्त मागणी करण्यात आलेली रक्कम रु.७४,४८०-०० जादा अर्जदाराने भरणा केली आहे. सामनेवाले यांनी एकूण बेकायदा वसूल केलेली रक्कम यामध्ये इएमआय नंतरची रक्कम, धनादेश वटला नाही त्याची रक्कम, ओव्हर डयू व्याज, सेटलमेंट कामी, अंतिम सेटलमेंटच्या रकमा भरणा केल्यानंतरही अतिरिक्त केलेली मागणी अशी एकूण बेकायदेशीर रक्कम रु.२,११,४२२-४६ पैसे सामनेवाले यांनी वसूल केली आहे. त्या अनुषंगाने सामनेवाले यांनी सदोष सेवा दिलेली आहे. त्यामुळे सदर रक्कम वसूल केल्यापासून आज तागायत व्याजासह मिळण्यासाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदारांची विनंती अशी आहे की, सामनेवाले यांनी सदोष सेवा दिली असे जाहीर होऊन, बेकायदा वसूल करण्यात आलेली रक्कम रु.२,११,४२२-४६ पैसे वसूल केल्याचे तारखे पासून १२.७५ व्याजदराने मिळावी, तसेच मानसिक, शारीरिक त्रास व अर्जाचा खर्च मिळावा.
(३) तक्रारदारांनी नि.नं.२ वर शपथपत्र दाखल केले असून, नि.नं.४ सोबत एकूण सहा कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत. यामध्ये खाते उतारा, नोटीस इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे.
(४) सामनेवाले यांनी त्यांचा लेखी खुलासा नि.नं.९ वर दाखल केला असून, तक्रारदारांचा तक्रार अर्ज नाकारला आहे. त्यांचे असे म्हाणे आहे की, तक्रारदार हे या सामनेवालेंचे कर्जदार आहेत. परंतु तक्रारदार यांनी सदर कर्जाची पूर्ण परतफेड केलेली असल्याने तक्रारदार व सामनेवाले यांच्यामध्ये कोणतेही नाते अस्तीत्वात राहिले नसून तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक नाहीत. तक्रारदारांनी उपस्थित केलेल्या वादाचे स्वरुप हे कर्ज खात्याच्या हिशोबा करिता व त्यातील तथाकथित चुकांसंदर्भात आहे. अशा परिस्थितीत सदर तक्रार चालविण्याचे न्यायक्षेत्र या मंचास नाही. केवळ दिवाणी न्यायालयात अशा स्वरुपाच्या तक्रारीची दखल घेता येते. त्यामुळे सदर तक्रार प्रथमदर्शनी फेटाळण्यात यावी,
तक्रारीत नमूद केलेली सामनेवाले यांची शाखा पुणे येथे आहे. तक्रारीचे कारण देखील पुणे येथेच घडलेले आहे. त्यामुळे धुळे येथील ग्राहक मंचास सदर तक्रार चालविण्याचे न्यायक्षेत्र नाही. तक्रारदार यांना कर्ज हे नफेखोरीच्या व्यवसायाकरिता दिलेले व्यावसायीक कर्ज आहे. त्यामुळे तक्रारदार ग्राहक या संज्ञेत मोडत नाही. तक्रारदार यांनी अनेक महत्वपूर्ण कागदपत्र व घडामोडी मंचापासून लपवून ठेवल्या आहेत. सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याकडून कोणतीही बेकायदेशीर रक्कम वसूल केलेली नाही. तक्रारदार हे केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सबब सामनेवाले यांनी सदोष सेवा दिलेली नसून, सदरची तक्रार दंडासह रद्द करण्याची शेवटी विनंती केली आहे.
(५) सामनेवाले यांनी नि.नं.१० वर शपथपत्र, तसेच कर्ज करारनामा व पत्रव्यवहार अशी कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत.
(६) सदर प्रकरणी दाखल कागदपत्रे पाहता तसेच उभयपक्षांच्या विद्वान वकीलांचा युक्तिवाद ऐकला असता, आमच्यासमोर खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्दा : | निष्कर्षः |
(अ)सदर तक्रार अर्ज या न्यायमंचात दाखल करुन घेण्यास पात्र आहे काय ? | : नाही. |
(ब)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(७) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी सामने वाले कोटक महिंद्रा पूणे या शाखेकडून कर्ज पुरवठा घेतलेला आहे. यावरुन असे स्पष्ट होते की, सामनेवाले यांचे कार्यालय पुणे येथे असून तक्रारदार यांनी पुणे शाखेकडून कर्ज पुरवठा घेतला आहे. या कर्जाची परतफेड तक्रारदार यांनी कर्ज परतफेडीच्या अंतीम तारखेपूर्वी सेटलमेंट करुन केलेली आहे. या कर्जफेडीच्या हिशोबामध्ये तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे तथाकथीत दोष आहे. याचा विचार होता, तक्रारीचे कारण हे पुणे शाखेमध्ये घडलेले आहे. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम ११ प्रमाणे ज्या ठिकाणी सामनेवाले हे त्यांचा व्यवसाय करतात किंवा ज्या ठिकाणी त्यांची शाखा कार्यरत आहे, ज्या ठिकाणी तक्रारदार यांनी व्यवहार केलेला आहे, त्या कार्यक्षेत्रातील मंचात तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर तक्रार धुळे ग्राहक मंचाच्या कार्यक्षेत्रामध्ये या कायद्याप्रमाणे येत नाही, असे आमचे मत आहे.
(८) तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून रक्कम रु.४५,००,०००/- कर्ज घेतले व त्याची परतफेड सामनेवाले यांना कर्ज खाते सेटलमेंट करुन परत केलेली आहे. सदर कर्ज पुरवठा परतफेड करतांना सामनेवाले यांनी जास्तीची रक्कम रु.२,११,४२२-४६ पैसे ही वसूल केली आहे. ती रक्कम व्याजासह परत मिळण्याची तक्रारदाराची मागणी आहे. या तक्रारदारांच्या मागणीचा विचार करता, तक्रारदार यांनी जे कर्ज घेतले आहे ते कर्ज फेडण्याच्या अंतिम तारखेपुर्वी सेटल केले असून त्या हिशोबाप्रमाणे कर्जफेड करुन, सामनेवाले यांनी जादा इएमआय, धनादेश वटणेकामीची रक्कम, सेटलमेंट करणे कामीची रक्कम इत्यादीकामी जास्तीची मागणी करुन रक्कम वसूल केली आहे. या रकमेची तक्रारदार हे हिशोब करुन सामनेवाले यांच्याकडून व्याजासह मागणी करीत आहेत. यावरुन असे स्पष्ट होते की, तक्रारदार हे त्यांनी कर्ज फेडलेल्या हिशोबाची मागणी करुन मागत आहेत व त्यामध्ये तथाकथीत ज्या चुका झाल्या आहेत त्या हिशोबामधील दुरुस्ती करुन मिळण्याची मागणी करीत आहेत. यावरुन असे स्पष्ट होते की, तक्रारादारांची सदर तक्रार ही हिशोब दुरुस्तीकामी दाखल केली आहे. हिशोबाची दुरुस्ती करणे व हिशोबामधील वाद या बाबत निर्णय घेण्याचा या मंचास अधिकार नाही. या बाबतची कोणतीही तक्रार असल्यास त्याबाबत दिवाणी न्यायालयात दाद मागणे आवश्यक आहे. याचा विचार होता सदरची तक्रार या मंचाच्या अधिकार क्षेत्रात नाही, असे आमचे मत आहे.
(९) तक्रारदार यांनी सामनेवाले यांनी सदोष सेवा दिली आहे असे जाहीर होऊन मिळणेकामी विनंती कलमात मागणी केली आहे. सदरच्या मागणी प्रमाणे तक्रारदार हे सामनेवाले यांच्याकडून सेवेमध्ये दोष आहे हे ठरवून व जाहीर (Declaration ) होऊन मिळावे अशी विनंती करीत आहेत. या विनंती कलमाचा विचार होता, सदर तक्रार ही दिवाणी स्वरुपाची आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे अशी मागणी जाहीर करुन देणे या मंचाच्या अधिकारक्षेत्रात नाही. ही मागणी मागण्याकरिता तक्रारदार यांनी दिवाणी न्यायालयात न्याय मागणे आवश्यक आहे. या मागणीचा विचार होता सदरची तक्रार या मुद्यावर कायदेशीर रित्या रद्द होण्यास पात्र आहे, असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(१०) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – उपरोक्त सर्व कायदेशीर मुद्यांचा विचार होता, तक्रारदारांची तक्रार अधिकार क्षेत्राच्या बाहेर असल्याने नामंजूर करणे योग्य व क्रमप्राप्त होईल. सबब न्यायाचे दृष्टीने खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांकः १७/०२/२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे. (महाराष्ट्र राज्य)