जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 143/2010. तक्रार दाखल दिनांक : 29/03/2010. तक्रार आदेश दिनांक :20/04/2011. श्री. मधुकर जगन्नाथ भोसले, वय 38 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. कल्याणनगर भाग क्र.2, मजरेवाडी, जुळे सोलापूर, सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. कोटक महिंद्रा प्राईम लिमिटेड, सोहरब हॉल, चौथा मजला, ससून रोड, पुणे – 411 001. 2. रॉयल मोटर्स, शोरुम नं.4, प्रकाश टॉवर, सावस्कर हॉस्पिटलजवळ, होटगी रोड, सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : एन.डी. रोकडे विरुध्द पक्ष क्र.1 यांचेतर्फे अभियोक्ता : व्ही.एस. आळंगे व व्ही.व्ही. नागणे आदेश सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून रु.1,74,053/- कर्ज घेऊन मारुती व्हॅन रजि.नं. एम.एच.13/ए.सी.4794 विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून खरेदी केली आहे. नोंदणी फी व विम्यासह वाहनाची मूळ किंमत रु.2,54,000/- असून कर्ज रु.1,74,053/- वजा जाता उर्वरीत फरकाची मार्जीन मनी रक्कम तक्रारदार यांनी स्वत: भरणा केली आहे. प्रतिमहा रु.6,391/- प्रमाणे कर्जाची 35 हप्त्यांमध्ये परतफेड असून त्याकरिता त्यांनी 36 धनादेश विरुध्द पक्ष यांना दिले आहेत. माहे डिसेंबर 2009 पर्यंत त्यांनी 8 हप्त्यांद्वारे रु.51,128/- चा भरणा केला आहे. तक्रारदार यांची आर्थिक परिस्थिती अडचणीची होती आणि वाहनाचा अपघात झाल्यामुळे ते विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे दुरुस्तीसाठी टाकले. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी बरेच पार्ट जुने वापरले आणि दुरुस्तीसाठी खर्च रु.30,000/- मागणी केला. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी विमा कंपनीकडून मिळालेले रु.22,424/- स्वत:कडे ठेवून रु.8,000/- ची जादा मागणी करीत आहेत. तसेच त्यांनी वाहन तक्रारदार यांच्या ताब्यामध्ये दिलेले नाही. त्यांचे वाहन विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या ताब्यात दिले आहे. तक्रारदार यांचा एक हप्ता थकलेला असून तो देण्यास तयार असतानाही विरुध्द पक्ष यांनी संपूर्ण कर्ज रकमेची एकरकमेने व्याजासह मागणी करण्यात येत आहे. तसेच वाहन व्यवस्थित न ठेवल्यामुळे वाहनाचे नुकसान होत आहे. शेवटी त्यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे वाहन परत मिळण्यासह त्रासापोटी रु.75,000/- व तक्रार खर्च मिळावा, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांची तक्रार अमान्य केली असून तक्रारदार यांनी कर्ज रक्कम थकविली आहे. विरुध्द पक्ष क्र.2 व तक्रारदार यांच्या व्यवहाराशी त्यांचा संबंध नाही. कर्जाचे हप्ते देणे अशक्य झाल्यामुळे तक्रारदार यांनी स्वत: अर्ज देऊन वाहन जमा केले आहे. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे तक्रार रद्द करण्याची विनंती त्यांनी केली आहे. 3. विरुध्द पक्ष क्र.2 यांना उचित संधी देऊनही त्यांनी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या कैफियतीशिवाय तक्रार सुनावणीसाठी घेण्याचा आदेश करण्यात आला. 4. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 5. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून मारुती व्हॅन खरेदी करण्यासाठी वित्तसहाय्य घेतल्याविषयी विवाद नाही. प्रामुख्याने, तक्रारदार यांच्या अडचणीच्या आर्थिक परिस्थितीमुळे व वाहनाचा अपघात झाल्यामुळे कर्जाचे हप्ते भरु शकले नाहीत आणि विरुध्द पक्ष यांनी त्यांचे वाहन जप्त केल्याची त्यांची तक्रार आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्यानुसार कर्जाचे हप्ते देणे अशक्य झाल्यामुळे तक्रारदार यांनी स्वत: अर्ज देऊन वाहन जमा केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 6. तक्रारदार व विरुध्द पक्ष यांच्यामध्ये झालेले कर्जविषयक झालेले अग्रीमेंट रेकॉर्डवर दाखल नाही. तक्रारदार यांनी कर्ज हप्ते भरण्यामध्ये कसूर केल्याविषयी विवाद नाही. विरुध्द पक्ष यांनी दि.16/8/2008 रोजी टेम्पो ताब्यात घेतल्याविषयी विवाद नाही. 7. आमच्या मते, कोणत्याही वित्तीय संस्थेला त्यांच्या कर्जदाराकडून थकीत कर्ज रक्कम वसूल करण्याचा निर्विवाद कायदेशीर हक्क आणि त्याचबरोबर कर्जदाराने कर्जाची परतफेड करण्याचे त्यांचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. 8. निर्विवादपणे, तक्रारदार हे थकीत हप्त्यांचा भरणा करण्यास तयार आहेत. तक्रारदार यांच्या वाहनास अपघात झाल्यामुळेच निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींमुळे कर्ज हप्त्यांचा भरणा केलेला नाही, हे स्पष्ट आहे. नैसर्गिक न्यायाचे दृष्टीने तक्रारदार यांनी वाहनाचे थकीत हप्ते भरल्यास विरुध्द पक्ष क्र.1 यांनी टेम्पो परत करावा, या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 9. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. तक्रारदार यांनी या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे कर्जाचे थकीत हप्ते भरणा करावेत. थकीत हप्ते प्राप्त होताच विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांच्या टेम्पो तात्काळ परत करावा. 2. तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा.
(सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/11411)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |