न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.
2. तक्रारअर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे -
तक्रारदार हे वि.प. बँकेचे ग्राहक असून त्यांनी दि. 09/07/2008 रोजी वि.प. बँकेमध्ये रक्कम रु.10,000/- ही 120 महिन्यासाठी मुदत ठेव म्हणून ठेवलेली होती. सदर ठेवीची मुदत दि.09/07/2018 रोजी पूर्ण झालेने तक्रारदार हे वि.प. बँकेत रक्कम मागणीसाठी गेले. परंतु वि.प. बँकेने सदरची रक्कम परत केलेली नाही. म्हणून तक्रारदारांनी वि.प. यांना वकीलामार्फत दि.19/7/2018 रोजी नोटीस पाठविली. परंतु तरीही वि.प. यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. तक्रारदारांचे मुलाचे अॅडमिशन के.आय.टी. इंजिनिअरिंग कॉलेज येथे केले आहे. त्याची फी भरणेकरिता तक्रारदारांनी नातेवाईकांकडून तसेच मित्र परिवाराकडून उसनी रक्कम घेतली होती. परंतु तक्रारदारास वि.प. यांचेकडून ठेवीची रक्कम न मिळाल्याने सदरची उसनी घेतलेली रक्कम परत करता आली नाही. त्यामुळे तक्रारदाराची मोठी मानहानी झाली आहे. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुतकामी ठेवीची व्याजासह होणारी रक्कम रु. 25,568.38 पैसे, मानसिक त्रासापोटी रु.1 लाख, पत्र व्यवहार व इतर खर्चापोटी रु. 10,000/- अशी एकूण रक्कम रु.1,35,568.38 पैसे देणेचा वि.प. यांना आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
4. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत शपथपत्र, कागदयादीसोबत ठेवपावती, तक्रारदाराचे मुलाची भरलेली फीची पावती, वि.प. यांना पाठविलेली नोटीस, सदरची नोटीसची पोहोचपावती इ. कागदपत्रे दाखल केली आहे. तसेच वि.प. बँकेस पाठविलेल्या नोटीसची पोहोच, वि.प. बँकेने तक्रारदारास पाठविलेले समरी स्टेटमेंट इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
5. प्रस्तुतकामी वि.प. यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले असून त्यामध्ये त्यांनी तक्रारदाराचे तक्रारीतील सर्व कथने नाकारली आहेत. कोणतीही मुदत ठेव मुदत संपलेवर परत करणेची वि.प. बँकेची स्वतःची कार्यपध्दती असून कोणत्याही ठेवीदाराची ठेव परत न करता त्याला नुकसान पोचविणेचे काम वि.प.बँक कधीही करत नाही. तक्रारदाराने ठेवलेल्या ठेवीची मुदत संपल्यानंतर तक्रारदारांचे पती श्री अरुण बापू आंबेकर हे वि.प.बँकेकडे गेले होते. त्यावेळी वि.प. बँकेने बँक प्रोसिजरप्रमाणे बँकेच्या सेंट्रल टर्म डिपॉझिट टीमकडून सदर ठेवीच्या व्याजासह रकमेचा चेक ठेवीदाराच्या रजिस्टर्ड पत्त्यावर पाठविणेत येतो, तो येईल व तो स्वीकारावा असे सांगितले होते. तदनंतर पुन्हा तक्रारदारांचे पती ठेव रकमेच्या मागणीसाठी वि.प. बँकेत आले असता वि.प. यांना असे आढळून आले की, सदर मुदत ठेवीच्या अंतिम रकमेच्या परताव्याचा चेक ठेवीदाराच्या नोंदीत पत्त्यावर पाठविणेत आला होता, तोच चेक ठेवीदार हा पत्त्यावर रहात नाही म्हणून परत आला आहे. अशा प्रकारे बदललेला पत्ता तक्रारदाराने बँकेला न कळविल्यामुळे चेक परत गेला. म्हणून वि.प. बँकेने सदरचा चेक हा त्यांचे टर्म डिपॉझिट ऑपरेशन डिपार्टमेंटकडून मागविला व वि.प. यांनी सदरचा चेक घेवून जाणेबाबत तक्रारदारास मोबाईलवरुन कळविले. परंतु तक्रारदाराने वि.प. यांचेकडे येवून सदरचा चेक स्वीकारला नाही किंवा बदललेला पत्ता कळविला नाही. तदनंतर वि.प. यांनी तक्रारदारास अगणित फोन केले परंतु तक्रारदाराने फोन घेणेचे बंद कले. त्यामुळे सदरचा चेक वि.प. बँकेकडेच पडून राहिला. अशा प्रकारे चेकची रक्कम न मिळणेस तक्रारदार स्वतःच जबाबदार आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदारास सेवा देण्यामध्ये कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. तक्रारदाराने दिलेल्या नोटीसीस वि.प. यांनी उत्तर दिलेले आहे. सबब, तक्रारअर्ज फेटाळणेत यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
6. वि.प. यांनी कागदयादीसोबत तक्रारदारांना देण्यासाठी काढलेला चेक, मुदत ठेव पावती, तक्रारदारास पाठविलेली उत्तरी नोटीस तसेच सदर नोटीस तक्रारदार व त्यंचे वकीलांना पाठविल्याची पोस्टाची पावती, सदर नोटीस मिळाल्याची पोचपावती, कुरिअर कंपनीने वि.प. यांना दिलले पत्र, टर्म डिपॉझिट अॅडव्हाईस, तक्रारदार यांचे नावचा डी.डी., तक्रारदार यांचा बँक रेकॉर्डवरील तपशील, कुरिअर कंपनीकडून आलेला मेल, तक्रारदारांचा वि.प. बँकेकडे असलेला पत्ता इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
7. तक्रारदारांची तक्रार व त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे तसेच वि.प. यांचे म्हणणे व दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रारअर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार वि.प. यांचेकडून ठेवीची व्याजासह होणारी रक्कम व आर्थिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे |
वि वे च न –
8. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांनी वि.प. बँकेत ठेव म्हणून रक्कम रु. 10,000/- ठेवलेली होती. सदर ठेवीचा टर्म डिपॉझिट पावती नं. 06923640000217 असा असून कालावधी दि. 9/7/08 ते 09/07/18 असा आहे. सदर ठेवपावती तक्रारदाराने याकामी दाखल केलेली आहे. सदरची ठेवपावती वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये मान्य केली आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत या निष्कर्षापत हे मंच येत आहे.
9. तक्रारदाराचे कथनानुसार, प्रस्तुत ठेवीची मुदत संपलेनंतर तक्रारदाराने वि.प.कडे सदर ठेवीच्या रकमेची मागणी केली, परंतु वि.प. ने तक्रारदाराची रक्कम देण्यास टाळाटाळ केली व तक्रारदाराला रक्कम अदा केली नाही असे तक्रारदाराचे कथन आहे. याउलट वि.प. यांनी त्यांचे म्हणणेमध्ये, वि.प. बँकेने बँक प्रोसिजरप्रमाणे बँकेच्या सेंट्रल टर्म डिपॉझिट टीमकडून सदर ठेवीच्या व्याजासह रकमेचा चेक ठेवीदाराच्या रजिस्टर्ड पत्त्यावर पाठविणेत येतो, तो येईल व तो स्वीकारावा असे सांगितले होते. तदनंतर पुन्हा तक्रारदारांचे पती ठेव रकमेच्या मागणीसाठी वि.प. बँकेत आले असता वि.प. यांना असे आढळून आले की, सदर मुदत ठेवीच्या अंतिम रकमेच्या परताव्याचा चेक ठेवीदाराच्या नोंदीत पत्त्यावर पाठविणेत आला होता, तोच चेक ठेवीदार हा पत्त्यावर रहात नाही म्हणून परत आला आहे. अशा प्रकारे बदललेला पत्ता तक्रारदाराने बँकेला न कळविल्यामुळे चेक परत गेला. म्हणून वि.प. बँकेने सदरचा चेक हा त्यांचे टर्म डिपॉझिट ऑपरेशन डिपार्टमेंटकडून मागविला व वि.प. यांनी सदरचा चेक घेवून जाणेबाबत तक्रारदारास मोबाईलवरुन कळविले. परंतु तक्रारदाराने वि.प. यांचेकडे येवून सदरचा चेक स्वीकारला नाही किंवा बदललेला पत्ता कळविला नाही. तदनंतर वि.प. यांनी तक्रारदारास अगणित फोन केले परंतु तक्रारदाराने फोन घेणेचे बंद कले. त्यामुळे सदरचा चेक वि.प. बँकेकडेच पडून राहिला. अशा प्रकारे चेकची रक्कम न मिळणेस तक्रारदार स्वतःच जबाबदार आहे असे वि.प. यांचे कथन आहे. सदर कथनाचे पुष्ठयर्थ वि.प. यांनी तक्रारदाराचे नावे काढलेल्या चेकची प्रत, कुरियर कंपनीचे पत्र, तक्रारदारास पाठविलेली उत्तरी नोटीस यांच्या प्रती दाखल केल्या आहेत. वि.प. यांनी दाखल केलेल्या सदर कागदपत्रांचे अवलोकन करता, वि.प.बँकेने तक्रारदाराचे ठेवीची मुदत संपल्यानंतर तक्रारदारास चेक पाठविल्याचे व तो, तक्रारदार नमूद पत्त्यावर रहात नसल्याचे कारण नमूद करुन, परत आल्याचे दिसून येते. परंतु वि.प. यांनी सदरचा चेक तक्रारदारास पाठविल्यानंतर त्याबाबत तक्रारदारास मोबाईलवरुन संदेश पाठविणे आवश्यक होते. वि.प. बँक ही अत्याधुनिक संगणकीकृत बँक आहे. आजच्या काळात प्रत्येक बँक ही ग्राहकाच्या बँकींग व्यवहारांचे एस.एम.एस. ग्राहकांच्या मोबाईलवर पाठवित असतात. काही प्रसंगी ग्राहकाला मोबाईलवर कॉल करुन कळविले जाते. परंतु प्रस्तुत प्रकरणामध्ये वि.प. बँकेकडून अशा प्रकारचा कोणताही मोबाईलद्वारे संदेश अथवा कॉल तक्रारदारास केल्याचे दिसून येत नाही. जर तक्रारदारास त्याचा चेक पाठविल्याबद्दल मोबाईलवरुन कळविले असते तर कदाचित तो चेक स्वीकारण्याबाबत त्याने योग्य ती काळजी घेतली असती. परंतु वि.प. बँकेने तसा कोणताही प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. चेक परत आल्यानंतरसुध्दा वि.प. बँकेने तक्रारदारास त्वरित याबाबत संपर्क साधून कळविल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे तक्रारदारास त्याचे मुलाचे अॅडमिशनसाठी पैसे उपलब्ध होवू शकलेले नाहीत. ठेवीची मुदत संपल्यानंतर ठेवरक्कम स्वतःकडे ठेवण्याचा वि.प. बँकेस कोणताही अधिकार नाही. परंतु प्रस्तुत प्रकरणामध्ये वि.प. यांनी ठेवीची मुदतीनंतरची रक्कम ठेवीची मुदत संपल्यानंतर तक्रारदार यांना अदा करणेसाठी योग्य ती पुरेशी कार्यवाही केलेली नाही ही बाब स्पष्टपणे दिसून येते. सबब, तक्रारदाराने आपली तक्रार पूर्णतया शाबीत केलेली असून वि.प. यांनी तक्रारदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
10. सबब, वर नमूद मुदतठेवीची रक्कम व्याजासह मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत व सदरचे रकमेवर संपूर्ण रक्कम हातात पडेपावेतो व्याज मिळणेसही तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. जर सदर आदेश पारीत होणेपूर्वी वि.प. यांनी तक्रारदारास वर नमूद ठेवीपोटी काही रक्कम अदा केली असेल तर ती वळती करुन घेण्याचा वि.प. यांचा हक्क अबाधीत ठेवण्यात येतो.
11. तक्रारदाराने मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- ची मागणी केली आहे. परंतु सदरची मागणी अवाजवी व अवास्तव आहे. तक्रारदारास निश्चितच नमूद रकमेच्या उपभोगापासून वंचित रहावे लागलेमुळे ते मानसिक त्रासापोटी रु.1,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु.1,000/- मिळणेस पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, सदरकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. यांनी तक्रारदार यांना ठेवपावती क्र. 06923640000217 ची मुदतीनंतर देय झालेली रक्कम रु.25,568.38 पै. अदा करावी व सदर ठेवीच्या मूळ रकमेवर ठेवीची मुदत संपले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम तक्रारदाराच्या हातात पडेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) वि.प. यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु. 1,000/- अदा करावा.
5) वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6) वर नमूद आदेशाची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 व 27 अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
7) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.