तक्रारदार यांचे वकील श्री एच आर यादव हजर.
आदेश
द्वारा मा. अध्यक्ष, श्री. एम. वाय. मानकर
वकीलांना तक्रार दाखलकामी सविस्तरपणे ऐकण्यात आले.
1. तक्रार व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे पाहिली. तक्रारदारांनी ही तक्रार सामनेवाले बॅंक व आरटीओ विरुध्द दाखल केलली आहे. तक्रारदारांनी सामनेवाले क्र. 1 बँकेकडून मोटर वाहन क्र. एम. एच. - 14 बीजे 9833 विकत घेण्याकामी अर्थसहाय्य घेतले होते व त्यानंतर तक्रारदारांनी त्यांच्या मालकीचे दोन वाहन क्र. एम. एच. 06- बीडी 1244 व एम. एच. 06 बीडी 1325 सामनेवाले क्र. 1 कडे गहाण ठेवून त्यावर कर्ज घेतले. तक्रारदार नियमितपणे हप्ते भरीत होते परंतु त्यांचेवर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे काही हप्ते भरु शकले नाही व सामनेवाले यांनी कर्जाकरीता तगादा लावला व तक्रारदारांची वाहने जप्त करुन ती विकण्यात आली. तक्रारदारांनी त्याबाबत विवीध मागण्यांकरीता तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारीच्या बाबींवरुन हे स्पष्ट होते की तक्रारदार हे वाहतूकीचा व्यवसाय करीत आहेत व त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त वाहने आहेत. व त्यामुळे ते हा व्यवसाय स्वतःच्या उपजिवीकेकरीता करीत आहेत ही बाब त्यांना लागू पडणार नाही. तक्रारदारांनी तक्रारीच्या शिर्षकामध्ये त्यांचा धंदा व्यापार म्हणून दाखविला आहे. या परिस्थितीमध्ये तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2 (1) (ड) प्रमाणे ग्राहक या व्याख्येमध्ये समाविष्ट होत नाहीत. त्यामुळे ही तक्रार या मंचात चालू शकत नाही.
3. तक्रारदारांनी सामनेवाले क्र. 1 यांच्याकडून घेतलेले अर्थसहाय्य / कर्ज हे रु. 40 लाखांपेक्षा जास्त होते. सबब, ग्राहक संरक्षण कायदा कलम 11 प्रमाणे तक्रार या मंचात चालू शकत नाही.
4. सामनेवाले क्र. 2 डेप्युटी आर.टी.ओ. हे तक्रारदारांचे सेवा पुरवठादार ठरु शकत नाहीत. सबब खालील आदेश
आदेश
1. तक्रार क्र. 174/2018 ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 (3) प्रमाणे फेटाळण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
3. आदेशाच्या प्रती उभयपक्षांना विनामूल्य टपालाने पाठविण्यात याव्यात.
4. तक्रारदार आपल्या हक्काकरीता त्यांची इच्छा असल्यास मा. दिवाणी न्यायालयाकडे दाद मागू शकतात.
5. तक्रारीचे अतिरिक्त संच तक्रारदारांना परत करण्यात यावेत.