निकालपत्र ::
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष.)
(पारित दिनांक-03 मार्च, 2017)
01. उपरोक्त नमुद तक्रारदारानीं प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँक लिमिटेड, विरुध्दपक्ष क्रं-2) कोटक महिन्द्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं-3) जायका मोटर्स यांचे विरुध्द सेवेत कमतरता ठेवल्या बद्दल मंचा समक्ष दाखल केली. ही तक्रार विरुध्दपक्ष क्रं-2) कोटक महिन्द्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी विरुध्द तक्रारदारांनी त्यांचेवर तक्रारीची नोटीस योग्य ती संधी देऊनही न बजावल्यामुळे अगोदरच खारीज झालेली आहे.
02. तक्रारदारांची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती क्रं-1) कु.रक्षदा संजय मून (आज ती सज्ञान झालेली आहे) आणि तक्रारकर्ता क्रं-2) व क्रं-3) अनुक्रमे चि.हिमांशू संजय मून व चि.संघर्ष संजय मून हे मृतक श्री संजय मून यांची अज्ञान मुले आहेत, त्यांनी ही तक्रार त्यांचे काका तक्रारकर्ता क्रं-4) श्री वसंता तारानाथ मून मार्फतीने दाखल केली आहे तर तक्रारकर्ता क्रं-5) श्रीकृष्णा अंबादास पाटील हा मृतक संजय मूनने विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँक लिमिटेड कडून घेतलेल्या कर्ज करारा अंतर्गत जमानतदार आहे. मृतक संजय मूनने विरुध्दपक्ष क्रं-3) मे. जयका मोटर्स लिमिटेड यांचे कडून एक चार चाकी गाडी विकत घेतली होती, जिचा नोंदणी क्रं-MH-31-CQ/1724 असा आहे. सदर गाडीसाठी विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँकेने त्याला कर्ज दिले होते. गाडीची किम्मत विमा आणि आरटीओ नोंदणीशुल्क धरुन रुपये-3,04,734/- एवढी होती. विरुध्दपक्ष क्रं-1) बँकेनी त्यासाठी तक्रारकर्त्याला रुपये-2,59,678/- एवढया रकमेचे कर्ज दिले होते आणि या कर्जाची परतफेड दिनांक-01.09.2008 पासून 47 मासिक समान हप्त्यां मध्ये प्रतीमाह रुपये-7850/- प्रमाणे करावयाची होती. मृतक संजय मून याने, विरुध्दपक्ष क्रं-1) बँकेकडे 02 मासिक हप्ते भरलेत आणि तिसरा मासिक हप्ता रुपये-4000/- चा दिनांक-11.11.2008 रोजी दिला. विरुध्दपक्ष क्रं-1) बँकेनी वाहनासाठी कर्ज मंजूर करीत असताना, विरुध्दपक्ष क्रं-2) कोटक महिन्द्रा लाईफ इन्शुरन्स लिमिटेड या विमा कंपनी कडून कोटक ट्रॉन्सपोर्ट सुरक्षा नावाची विमा पॉलिसी मृतक संजय मुनचे नावे काढली होती, ती त्याच्या भविष्यातील कर्ज रकमेच्या हमीसाठी काढण्यात आली होती. सदर विमा पॉलिसी ही दिनांक-20.09.2008 ला देण्यात आली, ज्यामध्ये असे नमुद आहे की, जर कर्ज घेणा-या व सदर विमा पॉलिसीव्दारे विमाकृत असणा-या व्यक्तीचा काही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या मृत्यूच्या तारखे पर्यंत त्याचे कडून घेणे असलेली कर्जाची मूळ रक्कम (Principal Amount) प्राप्त करण्याचा अधिकार विमाकृत व्यक्तीचा असेल. सदर प्रपत्रातील नमुद बाब खालील प्रमाणे- “This life insurance cover under the policy contract is restricted to the outstanding principle loan amount as at the date of the death of the insured person”.
मृतक संजय मुनचा मृत्यू हा दिनांक-16.12.2008 रोजी झाला होता व त्याच्या एक दिवसा पूर्वी त्याच्या पत्नीचा सुध्दा मृत्यू झालेला होता. त्यानंतर तक्रारकर्ता क्रं-4) श्री वसंता मून याने, विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँकेला दिनांक-30/05/2009 ला लेखी पत्राव्दारे सुचित करुन उपरोक्त पॉलिसीची रक्कम मिळण्यासाठी योग्य त्या कागदपत्रांसह अर्ज केला तसेच संजय मूनचे मृत्यू नंतर, तक्रारकर्ता क्रं-4) श्री वसंता मून याने आणि विम्याची रक्कम मागण्या पूर्वी तक्रारकर्ता क्रं-1) ते क्रं-3) चे वतीने, विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँकेकडे दिनांक-29/12/2008 रोजी रुपये-11,700/- आणि दिनांक-12.01.2009 रोजी रुपये-7850/- चा हप्ता दिला होता, त्यावेळी तक्रारकर्ता क्रं-4) वसंता मून याला पॉलिसी बद्दल कल्पना नव्हती आणि ज्यावेळी त्याला विमा पॉलिसी बद्दल माहिती मिळाली त्यावेळी त्याने विमा पॉलिसी अंतर्गत मिळणारे लाभ मागण्यासाठी अर्ज केला. परंतु विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँकेने त्या अर्जावर कुठलीही दखल घेतली नाही. विरुध्दपक्ष क्रं-1) बँकेला संजय मूनचे मृत्यू बद्दल कल्पना होती, तरी पण विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँक ही तक्रारदारां कडून थकीत असलेल्या कर्जाची रक्कम मागीत आहे, जेंव्हा की विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती नुसार तक्रारदारानां थकीत असलेली मूळ कर्जाची रक्कम माफ करण्यासाठी किंवा समायोजित करुन मागण्याचा हक्क होता परंतु विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँक ही पॉलिसी अंतर्गत मिळणारा हक्कम देण्यास तयार नाही, जी विरुध्दपक्षाच्या सेवेतील कमतरता ठरते म्हणून तक्रारदारांनी ही तक्रार दाखल करुन करुन अशी विनंती केली की, विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँकेला आदेशित करण्यात यावे की, त्यांनी वाहन कर्ज माफ करुन ना-हरकत-प्रमाणपत्र तक्रारकर्ता क्रं-4) श्री वसंता मून ला द्दावे व तक्रारकर्ता क्रं-4) श्री वसंता मूनला दिलेले कर्ज वसुली संदर्भातील सुचनापत्र रद्द करुन त्याला हमीदार म्हणून मुक्त करण्यात यावे. तसेच तक्रारकर्ता क्रं-4) वसंता मूनने संजय मूनचे मृत्यू नंतर भरलेली कर्जाचे हप्त्यांची रक्कम रुपये-11,700/- व रुपये-7850/- या रकमा तक्रारकर्ता क्रं-1) ते 3) यांना परत कराव्यात. त्याशिवाय झालेल्या त्रासा बद्दल रुपये-1,00,000/’ व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-25,000/- ची मागणी केली आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँके तर्फे लेखी जबाब मंचा समक्ष दाखल करुन तक्रारीतील सर्व आरोप नाकबुल केलेत. पुढे असे नमुद केले की, तक्रारदार क्रं-1) ते 3) अनुक्रमे कु.रक्षदा, चि.हिमांशू आणि चि.संघर्ष संजय मून हे अज्ञान असल्यामुळे त्यांना तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही कारण हिंदू अज्ञान अवस्था व पालकत्व कायदा-1956 च्या तरतुदी नुसार अज्ञान मुलांचे नैसर्गिक पालक म्हणून त्याची आई किंवा वडील असतात आणि त्यांच्या गैरहजेरीत त्यांच्या मृत्यूपत्राव्दारे नियुक्त केलेली व्यक्ती किंवा सक्षम न्यायालयाने नियुक्त केलेली व्यक्ती पालक म्हणून राहू शकते. तक्रारकर्ता क्रं-4) वसंता तारानाथ मून ज्याने ही तक्रार, अज्ञान मुलांच्या वतीने दाखल केली आहे, त्याला अज्ञान व्यक्तींचा पालक म्हणून मृत्यूपत्राव्दारे किंवा सक्षम न्यायालयाने नियुक्त केलेले नाही. तसेच तक्रारकर्ता क्रं-5) श्रीकृष्णा अंबादास पाटील याला सुध्दा तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही.
विरुध्दपक्ष क्रं-1) ने पुढे असे नमुद केले की, विमा पॉलिसी ही विरुध्दपक्ष क्रं-2) कोटक महिन्द्रा लाईफ इन्शुरन्स लिमिटेडने दिलेली असल्याने संजय मूनच्या मृत्यू नंतर थकीत मूळ कर्जाची रक्कम कर्ज खात्यात समायोजित करण्यासाठी किंवा माफ करण्याची जबाबदारी ही फक्त विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीची होती. विमा पॉलिसीशी विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँकेचा काहीही संबध नाही आणि म्हणून विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग
झाला म्हणून विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँकेला जबाबदार धरता येणार नाही. तक्रारदारांची विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँकेशी दिनांक-26.07.2008 रोजी केलेल्या कर्जाच्या करारा प्रमाणे कर्जाऊ रकमेवरील व्याज व इतर शुल्क देण्याची जबाबदारी आहे. विरुध्दपक्ष कग्रं-1) बँकेच्या सेवेत कमतरता नाही किंवा त्यांनी कुठलाही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही असे नमुद करुन तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
04. अगोदर सांगितल्या प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-2) कोटक महिन्द्रा लाईफ इन्शुरन्स कंपनीचे विरुध्द मंचाची नोटीस तामील करण्यासाठी तक्रारकर्त्याला योग्य ती संधी देऊनही तामील केली नसल्याने विरुध्दपक्ष क्रं-2) विरुध्दची तक्रार खारीज करण्यात आली.
05. विरुध्दपक्ष क्रं-3) मे.जायका मोटर्स लिमिटेड तर्फे लेखी जबाब सादर करुन असे नमुद केले की, ही तक्रार विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँक लिमिटेड आणि विरुध्दपक्ष क्रं-2) कोटक महिन्द्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी विरुध्दची असून त्याचा तक्रारतील कुठल्याही आरोपाशी किंवा विमा कराराशी संबध नाही. तक्रारीत त्याचे विरुध्द कुठलीही मागणी नसल्याने त्याचे विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
06. प्रस्तुत तक्रारी मध्ये तक्रारदारां तर्फे वकील श्री संजय कस्तुरे तर विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँके तर्फे वकील श्रीमती नरड यांचा मौखीक युक्तीवाद ऐकला.
07. तक्रारदारांची तक्रार तसेच विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-3) चे लेखी उत्तर आणि उपलब्ध दस्तऐवजांच्या प्रतीं तसेच उभय पक्षकारांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
08. तक्रारदारानीं विमा पॉलिसी कव्हर नोटची प्रत अभिलेखावर दाखल केली आहे, त्या पॉलिसी नुसार मयत इसमाला थकीत मूळ कजाऊ रकमे एवढी परंतु रुपये-10,00,000/- पेक्षा जास्त नसलेल्या रकमे एवढी जीवन विमा पॉलिसी देण्यात आली होती. या विमा पॉलिसी नुसार मयत इसमाला त्याच्या मृत्यूच्या दिनांका पर्यंत जेवढी मूळ कर्जाऊ रक्कम (Principal Amount of Loan) थकीत असेल त्यासाठी सुरक्षा हमी दिली होती आणि मूळ कर्ज सोडून इतर थकीत रक्कम जर असेल तर ती कर्ज करारा प्रमाणे तक्रारकर्त्या कडून विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँकेला मागता येऊ शकते. त्यानुसार पहिला मुद्दा असा उपस्थित होतो की, दिनांक-16.12.2008 ला जेंव्हा संजय मून मरण पावला त्या दिवशी त्याचेवर किती रक्कम थकीत होती आणि त्यापैकी किती रक्कम मूळ कर्जाऊ रक्कम ( Principal Amount of Loan) होती या मुद्दावर दोन्ही पक्षां कडून पुरेसा पुरावा सादर करण्यात आलेला नाही.
09. विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँकेच्या म्हणण्या नुसार पॉलिसीच्या शर्ती नुसार सुरक्षा हमी ही केवळ मूळ कर्जाऊ रकमेपोटी मर्यादित होती, त्यामुळे उर्वरीत थकीत रक्कम जसे व्याज व इतर शुल्क देण्याची जबाबदारी तक्रारदारांची आहे, विरुध्दपक्ष क्रं-1) बँकेच्या या म्हणण्या मध्ये तथ्य दिसून येते. संजय मूनचा मृत्यू कर्ज घेतल्या नंतर एक वर्षाचे आतच झाला. कर्जाची परतफेड ही दिनांक-01.09.2008 पासून 47 मासिक समान हप्त्यां मध्ये करावयाची होती. थकीत रकमे पैकी किती रक्कम मूळ कर्जाची आहे ( Outstanding Principal Amount of Loan) आणि किती रक्कम कर्ज रकमे वरील व्याज व इतर शुल्काची आहे याचे विभाजन विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँकेनी करुन दाखविलेले नाही. विरुध्दपक्ष क्रं-2) कोटक महिन्द्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी विरुध्द तक्रारकर्त्याने नोटीस न बजावल्याचे कारणावरुन तक्रार अगोदरच खारीज झालेली आहे. या प्रकरणामध्ये आम्हाला विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँकेच्या सेवेत काही कमतरता आहे असे दिसून येत नाही कारण संजय मूनच्या मृत्यू नंतर पॉलिसी प्रमाणे मूळ कर्जाच्या रकमेची माफी किंवा समायोजन विरुध्दपक्ष क्रं-2) कोटक महिन्द्रा लाईफ इन्शुरन्स कंपनीला करावयाचे होते परंतु विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीने तसे केल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे ही तक्रार विरुध्दपक्ष क्रं-2) कोटक महिन्द्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी विरुध्द मंजूर होण्या लायक होती, जर ही तक्रार विरुध्दपक्ष क्रं-2) कोटक महिन्द्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी विरुध्द खारीज झाली नसती.
10. विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँकेनी या तक्रारीला काही आक्षेप घेतलेले आहेत, त्यांचे तर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, तक्रारदार क्रं-1) ते क्रं-3) हे अज्ञान असून, तक्रारकर्ता क्रं-4) श्री वसंता मून याने अज्ञान तक्रारदारांचा नैसर्गिक पालक या नात्याने ही तक्रार दाखल केली आहे परंतु तक्रारकर्ता क्रं-4) हा, तक्रारदार क्रं-1) ते 3) यांचा काका आहे. विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँकेच्या वकिलानीं आपल्या युक्तीवादात असे सांगितले की, तक्रारकर्ता क्रं-4) श्री वसंता तारानाथ मून हा, तक्रारदार क्रं-1) ते 3) चा नैसर्गिक पालक होऊ शकत नाही आणि जर त्याला नैसर्गिक पालक म्हणून तक्रार दाखल करावयाची असेल तर त्यासाठी त्याला सक्षम न्यायालया कडून तसा आदेश मिळविणे जरुरीचे आहे किंवा संजय मुनने जर त्याच्या मृत्यूपत्रात तसे नमुद केले असेल तर तक्रारकर्ता क्रं-4) श्री वसंता मून नैसर्गिक पालक म्हणून काम पाहू शकतो परंतु या पैकी कुठलीही गोष्ट आमचे समक्ष तक्रारकर्त्यां तर्फे सांगण्यात आली नाही आणि म्हणून तक्रारकर्ता क्रं-4) श्री वसंता मून याला अज्ञान तक्रारदार क्रं-1) ते 3) चे नैसर्गिक पलक म्हणता येणार नाही आणि तसेच ही तक्रार सुध्दा अज्ञान तक्रारदारां तर्फे दाखल करता येणार नाही.
11. विरुध्दपक्ष क्रं-1) तर्फे करण्यात आलेल्या उपरोक्त युक्तीवादास उत्तर देताना तक्रारदारांच्या वकिलानीं असे सांगितले की, ग्राहक तक्रार दाखल करण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहिता किंवा हिंदु अज्ञान पालकत्व कायद्दाच्या तरतुदी लागू होत नाहीत. पुढे असे नमुद केले की, तक्रारदार क्रं-1) ते 3) चे आई-वडील दोघेही हयात नसल्यामुळे त्यांचे काका म्हणजेच तक्रारकर्ता क्रं-4) श्री वसंता तारानाथ मून हेच त्यांचे नैसर्गिक पालक असून त्यांच्या तर्फे दखल करण्यात आलेली तक्रार ग्राहक मंचा समक्ष चालविता येऊ शकते.
12. या बद्दल वाद नाही की, ग्राहक संरक्षण कायद्दा अंतर्गत दाखल केलेली तक्रार ही दिवाणी प्रक्रिया संहिता किंवा पुरावा अधिनियमा नुसार चालत नाही तर नैसर्गिक तत्वावर तक्रारीचा विचार केल्या जातो. तक्रारकर्ता क्रं-4) श्री वसंता तारानाथ मून याने स्वतःसाठी तक्रार दाखल केलेली नाही परंतु त्याने स्वतःचे नाव अज्ञान तक्रारदारांचा पालक म्हणूनच नाही तर एक स्वतंत्र तक्रारकर्ता म्हणून सुध्दा या तक्रारीत समाविष्ट केलेले आहे परंतु त्याची ही कृती कायद्दा नुसार योग्य नाही कारण तो पॉलिसी अंतर्गत विरुध्दपक्षाचा ग्राहक नाही किंवा लाभार्थी पण नाही. त्याशिवाय तक्रारकर्ती क्रं-1) ही आजच्या घडीला सज्ञान झालेली आहे परंतु तक्रारी मध्ये त्या प्रमाणे दुरुस्ती करण्यात आलेली नाही, या सर्व कारणास्तव ही तक्रार अयोग्य व सदोष आहे. तक्रारकर्ती क्रं-1) कु. रक्षदा संजय मून ही सज्ञान झाली असल्या कारणाने तिला तक्रारकर्ता क्रं-4) श्री वसंता तारानाथ मून मार्फत तक्रारीतील मागणी मागता येत नाही त्यामुळे तक्रारदारानीं या तक्रारीत योग्य ती दुरुस्ती करावयास हवी होती आणि त्यासाठी त्यांना पुरेसा वेळ व संधी पण देण्यात आली होती परंतु त्यांनी कुठलेही पाऊल उचललेले नाही.
13. तक्रारकर्ता क्रं-5) श्री कृष्णा अंबादास पाटील हा मृतक श्री संजय मून याचे कर्ज प्रकरणात जमानतदार असल्या कारणाने तो विरुध्दपक्षाचा ग्राहक होत नाही. विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँकेला, तक्रारकर्ता क्रं-1) ते 3) आणि क्रं-5) कडून थकीत रक्कम (मूळ कर्जाऊ रक्कम सोडून) व्याज व इतर शुल्क मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. या प्रकरणात जर काही कमतरता असेल तर ती विरुध्दपक्ष क्रं-2) कोटक महिन्द्रा लाईफ इन्शुरन्स कंपनीची आहे, ज्याने विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती नुसार कर्जाची मूळ रक्कम कर्ज खात्या मधून समायोजित (Adjusted) करावयास हवी होती परंतु ज्या अर्थी ही तक्रार विरुध्दपक्ष क्रं-2) कोटक महिन्द्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी विरुध्द अगोदरच खारीज झालेली आहे, त्याअर्थी या तक्रारीतील मागण्या विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँक आणि विरुध्दपक्ष क्रं-3) जायका मोटर्स यांचे विरुध्द मंजूर करता येत नाही. या प्रकरणात विरुध्दपक्ष क्रं-3) जायका मोटर्स याला नाहक प्रतिपक्ष म्हणून सामील करण्यात आलेले आहे कारण त्याचा कर्ज कराराशी कुठलाही संबध नाही, तो करार मयत श्री संजय मून आणि विरुध्दपक्ष क्रं-2) कोटक महिन्द्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी मध्ये झालेला असून इतर विरुध्दपक्षाचा त्याचेशी काहीही संबध नाही.
14. वरील कारणास्तव ही तक्रार विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँक किंवा विरुध्दपक्ष क्रं-3) जायका मोटर्स लिमिटेड विरुध्द मंजूर करणे शक्य दिसत नाही, सबब ती खारीज होण्यास पात्र आहे म्हणून खालील प्रमाणे तक्रारीत आदेश पारीत करण्यात येत आहे-
::आदेश::
(1) तक्रारकर्ती कु. रक्षदा संजय मून आणि इतर-04 यांची, विरुध्दपक्ष क्रं-1) कोटक महिन्द्रा बँक लिमिटेड (कमर्शियल व्हेईकल्स) नागपूर आणि इतर यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध
करुन देण्यात याव्यात.