नि का ल प त्र:- (श्री. संजय पी. बोरवाल, अध्यक्ष) (दि . 29-05-2015)
(1) प्रस्तुतची तक्रार तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे वि. प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेमुळे नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
प्रस्तुत तक्रार अर्ज स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प. 1 ते 4 व 5 ते 7 यांनी वकिलामार्फत मंचापुढे उपस्थित राहून म्हणणे दाखल केले. उभय पक्षकारांचे वकिलांचा तोंडी युक्तीवाद ऐकला.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
कोल्हापूर शहर बी वॉर्ड, मंगळवार पेठ येथील भूमापन क्र. 2608/4,2607/ए, एकूण क्षेत्र 85000.3 चौ.मी. ही मिळकत वि.प. नं. 1 कोल्हापूर स्पोर्टस असोसिएटस, कोल्हापूर या धर्मादाय संस्थेच्या मालकीची आहे. सदरची मिळकत खेळ मैदानासाठी विकसित करणेसाठी व मैदानाचे सभोवती व्यापारी संकुल बांधणेसाठी ट्रस्टने वि.प. नं. 2 करण असोसिएटस यांचेबरोबर रजि. विकसन करारपत्र दि. 16-12-1997 रोजी केलेले होते. तसेच वरील मिळकतीचे व्यापारी तत्वावर बांधकाम करुन त्याची खरेदी विक्री करणेचे अधिकार वि.प. नं. 1 यांनी दि. 16-12-1997 रोजी रजि. वटमुखत्यार वि.प. यांना देवून सर्वाधिकार दिलेले होते. वि.प. नं. 2 ते 7 हे मिळकती मालकांकडून विकसन करारपत्राव्दारे घेऊन विकसित करुन घरे, दुकानगाळे, व्यापारी संकुले, तळघरे अशी बांधकामे अॅडव्हान्स रक्कम घेवून ग्राहकांना विक्री करणेचा व्यवसाय करुन सेवा देतात. त्याप्रमाणे वि.प. यांनी संबंधित महानगरपालिकेकडून फायनल व रिवाईज ले-आऊट मंजूर करुन त्याप्रमाणे नकाशा तयार करुन ग्राहकांकडून मोबदला स्विकारुन लेखी व तोंडी करार करुन खरेदी करणेचे प्रस्ताव देणेत आला होता. तक्रारदार यांचे त्यांचे व्यवसायासाठी शिवाजी स्टेडीयम रोडचे बाजूचे तळमजल्यावरील उत्तर-पश्चिम कोप-यातील नियोजित इमारतीमधील गाळा व बेसमेंटची आवश्यकता होती. त्याप्रमाणे तक्रारदार वि.प. नं. 1 व 2 यांचेमध्ये खरेदीचे करारपत्र झाले. दि. 25-10-2002 रोजी तक्रारदार व वि.प. नं. 1 ते 4 यांचे दरम्यान रजि.दस्त नं.4894/2002 चे अॅग्रीमेंट टू सेल प्रमाणे श्री शाहू स्टेडियम कमर्शिअल कॉम्प्लेक्समधील दि. 3-07-2000 चे पत्र एस/आर/बी/321/98-99 चे मंजूर व रिवाईज नकाशाप्रमाणे उत्तर-पश्चिम कोप-यातील 50 चौ.मी. तळमजल्यावरील दुकानगाळा 538 चौ. फूट एकूण रक्कम रु. 4,51,100/- इतक्या किमंतीस तक्रारदार यांना विकत देणेचे ठरविले. त्याप्रमाणे वि. प. नं. 1 ते 4 यांना तोंडी ठरल्याप्रमाणे वेळोवेळी रक्कम रु. 1,44,100/- चेकने दिले. त्यानंतर दि. 25-10-2002 रोजी रजिस्टर करारपत्राचा दस्त नं. 4894/2002 केला व उर्वरीत रक्कम बांधकामाचे प्रगतीप्रमाणे व खरेदीपत्रावेळी देण्याचे ठरले होते. सदर रजिस्टर करारपत्रापूर्वी वि.प. नं. 1 ते 4 यांनी तक्रारदार यांना दुकान गाळयाखालील बेसमेंटची गोडावूनची गरज असल्याने तशी चर्चा केली. त्याबाबत वि.प यांनी बेसमेंटमधून दुकान गाळयात येण्यासाठी सिमेंट क्रॉंकीटचा जीना करुन गाळयास इंटर व औटर बिल्डींगमधून जो 20 फूट रुंदीचा रस्ता सोडला आहे त्याचे बाजूस लोखंडी शटर बसवून देण्याचे ठरले आहे. तक्रारदारांने 1000 चौ.फू. दुकान गाळयाखालील बेसमेंटची किंमत प्रति चौरस फूटास रु. 400/- प्रमाणे एकूण किंमत रु. 4,00,000/- ठरवून त्याचा तोंडी करार करुन त्या बेसमेंटचे( तळमजल्यावरील) संचकार रक्कम रु.1,05,000/- ठरल्याप्रमाणे रोखीने वि.प. यांना दिली. त्याबाबत वि.प. नं. 1 ते 4 यांनी रक्कम पोहचलेचे दि. 22-05-2002 रोजी फर्मचे लेटरपॅडवर रक्कम पोहचलेचे लिहून दिलेले आहे.
तक्रारदार त्यांचे तक्रारीत पुढे नमुद करतात की, वि.प. यांनी तक्रारदारास शाहू स्टेडियम कमर्शियल कॉम्प्लेक्समधील उत्तर-पश्चिम कोप-यातील आऊटर बिल्डींगमधील तळमजल्यावरील उत्तर-पश्चिम कॉर्नरवरील गाळा नं. 1 बुकींग गाळयाबद्दल पर्यायी शाहू स्टेडियम कमर्शिअल कॉम्प्लेक्स, मुख्य इमारत मधील शिवाजी स्टेडियम रोड बाजूकडील लोअर ग्राऊंड गाळा नं. 19 हा तुर्तास वापरास दिलेला आहे. तक्रारदार व वि.प. 1 ते 4 यांचेमध्ये झालेल्या करारपत्राप्रमाणे वि.प. यांनी बांधकाम चालू केले नाही. त्याबाबत तक्रारदारांनी वि.प. कडे तोंडी विचारणा करुन दि. 27-12-2010 व 14-09-2011 रोजी लेखी पत्रे पाठविली. वि.प. यांनी त्यास उत्तर न देता आर्थिक अडचणीमुळे असमर्थता दाखविली. वि.प. 1 ते 4 यांनी तुर्तास वापरास शाहू स्टेडियम कमर्शियल कॉम्प्लेक्स मुख्य इमारतीमधील शिवाजी स्टेडियम रोड बाजूकडील लोअर ग्राऊंड गाळा नं. 21 वापरास दिलेला आहे. तक्रारदारांनी बुकींग केलेली मिळकतीचा बांधकाम पूर्ण करुन कब्जा व खरेदीपत्र करुन दिलेनंतर वि.प. यांनी तक्रारदारांना तुर्तास वापरास दिलेले लोअर ग्राऊंड गाळा नं. 19 व 21 चा कब्जा सोडून देणेचे ठरले. त्यानंतर वि.प. नं. 1 ते 4 यांनी आर्थिक अडचणीमुळे वि.प. नं. 5 ते 7 यांना विक्री करणेचे ठरविले. वि.प. नं. 1 ते 4 यांनी वि.प. नं. 5 ते 7 यांचेबरोबर दि. 19-03-2012 रोजी खरेदीचा व्यवहार पूर्ण केला. तदनंतर तक्रारदार व वि. प. नं. 1 ते 4 यांनी जे करार केले होते त्या कराराची पूर्तता करणेचे वि.प. नं. 5 ते 7 यांनी मान्य व कबूल केले होते. वि.प. यांनी तक्रारदारांना करारप्रमाणे दुकानगाळा व बेसमेंट बांधून रितसर खरेदीपत्र करुन देणेचे वि.प. यांनी टाळलेले आहे. दि. 25-10-2002 व 22-05-2002 चे अॅग्रीमेंट टू सेल चे करारपत्राने वि.प. यांनी बांधकाम पूर्ण केले नाही. त्यामुळे तक्रारदाराने समक्ष विचारले व तक्रारदाराने स्वत: दि. 27-12-2010 व 14-09-2011 रोजी लेखी स्मरणपत्र पाठविले. तदनंतर तक्रारदारांनी दि. 3-05-2012 व 21-05-2012 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली. वि.प. 1 ते 4 यांनी नोटीस स्विकारली नाही. वि.प. नं. 5 ते 7 यांनी नोटीस स्विकारुन नोटीसीस उत्तर दिले. वि.प. नं. 5 ते 7 यांनी नोटीसीस खोडसाळपणे उत्तर देऊन कराराप्रमाणे पुर्तता करणेस नकार दिला. वि.प. यांनी तक्रारदार यांचे करारापत्राप्रमाणे ठरलेप्रमाणे बांधकाम पूर्ण करुन खरेदीपत्र पूर्ण करुन दिलेले नाही. सबब, तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये ठरलेप्रमाणे दि. 25-10-2002 रोजीचे रजि.दस्त.नं. 4894/2002 रोजीचे करारपत्राप्रमाणे, नमूद दुकानगाळा बांधकाम पूर्ण करुन देवून, करारप्रमाणे खरेदीची उर्वरीत रक्कम रु. 3,07,000/- स्विकारुन तक्रारदार यांना नोंद खरेदीपत्र पूर्ण करुन द्यावे. व तक्रार अर्ज कलम- अ मधील दुकानगाळयाखालील दि. 22-05-2002 रोजीचे तोंडी करारपत्राप्रमाणे बेसमेंटचे बांधकाम पूर्ण करुन, कराराप्रमाणे उर्वरीत रक्कम रु.2,95,000/- वि.प. यांनी स्विकारुन तक्रारदार यांना नोंद खरेदीपत्र पुर्ण करुन द्यावे. तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी व नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 1,00,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदारांनी केली आहे.
(3) तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत एकूण 13 कागदपत्रे दाखल केली आहेत. अ.क्र.1 कडे तक्रारदार व वि.प. यांचेमधील र.द.नं. 4894/02 चे लेखी संचकारपत्र दि. 25-10-2002, अ.क्र. 2 कडे तोंडी संचकाराप्रमाणे रक्कमा मिळालेची पावती दि. 22-05-2002, अ.क्र. 3 कडे तक्रारदार यांनी वि.प. यांना पाठविलेले लेखी स्मरण दि. 2-12-2010, अ.क्र. 4 कडे स्मरणपत्र पाठविलेची यु.पी.सी. पोहच दि. 27-12-2010, अ.क्र. 5 कडे तक्रारदार यांनी वि.प. यांना पाठविलेले दुसरे स्मरणपत्र दि. 14-09-2011, अ.क्र. 6 कडे स्मरणपत्र रजि. ए.डी.ने. पाठविलेची रक्कम भरलेची पावती दि. 14-09-2011, अ.क्र. 7 व 8 कडे तक्रारदार यांनी वि.प. यांना पाठविलेली कायदेशीर नोटीस दि. 3-05-2012 व 21-05-2012, अ.क्र. 9 कडे वि.प. यांनी नोटीस Not Claim ची प्रत दि. 23-05-2012, अ.क्र. 10 कडे वि.प. नं. 2 यांना नोटीस मिळालेची पावती दि. 23-05-2012, अ.क्र. 11 कडे वि.प.नं. 3 यांनी नोटीस Not Claim ची प्रत दि. 23-05-2012, अ.क्र. 12 कडे वि.प. नं. 4 यांनी नोटीस Not Claim ची प्रत दि. 23-05-2012, अ.क्र. 13 कडे वि.प. नं. 5 ते 7 यांनी नोटीसीस दिलेले उत्तर दि. 4-06-2012 इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केलेले आहे.
(4) वि.प. नं. 1 ते 4 यांनी तक्रारदारांच्या तक्रारीस तक्रार अर्जास म्हणणे दाखल केले आहे. तक्रार अर्जातील मजकूर मान्य व कबूल नसून परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदारांची तक्रार चालणेस पात्र नाही. तक्रार चालणेपूर्वी काही प्राथमिक मुद्दे काढून मुद्दयांवर निर्णय होणे आवश्यक आहे. प्रस्तुतची तक्रार मुदतीत नाही. तक्रारदार यांनी दुकानगाळयाचा ताबा सन 2002 मध्ये घेतलेला आहे. ताबा घेतलेपासून तक्रार दोन वर्षांचे आत दाखल करणे आवश्यक आहे. तक्रारदार यांनी 8 वर्षे उशिरा तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीस मुदतीचा बाधा येत आहे. तक्रारदारांनी यांनी व्यावसायिक कारणाकरिता दुकानगाळा खरेदी केलेचे तक्रार अर्जात नमूद केले आहे, त्यामुळे तक्रार चालणेस पात्र नाही. वि. प. नं. 2 ते 7 ही संस्था आहे हे तक्रारदार म्हणणे खोटे आहे. वि.प. नं. 1 ते 4 व वि. प.नं. 5 ते 7 हे पूर्णपणे स्वतंत्र असून त्यांचा व्यवसाय स्वतंत्र आहे. तक्रार अर्ज कलम 1 ते 3 मधील मजकूर बरोबर आहे. तक्रारदार यांनी करारपत्राप्रमाणे पालन केलेले नाही. तक्रारदारास 1000 चौ.फू. बेसमेंट 400/- रुपये दराने देणेचे ठरले होते, त्या बेसमेंटची किंमत रु. 4,00,000/- ठरली होती हे तक्रारदाराचे म्हणणे खोटे आहे. तसेच तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये तोंडी करार होऊन वि.प. यांना रु.1,50,000/- दिले हे तक्रारदारांचे म्हणणे खोटे आहे. वि.प. यांनी तक्रारदार यांना कोणताही करार करुन दिलेले नाही. तसेच कोणतीही रक्कम वि.प. यांनी तक्रारदारांकडून बेसमेंट करिता स्विकारलेली नाही. तक्रारदार यांना वि.प. यांनी बदली गाळा दिला हे तक्रारदार यांचे कथन खोटे आहे. तक्रारदार यांना करारात ठरलेप्रमाणे गाळा दिलेला आहे. तक्रारदार यांनी सन 2002 मध्ये गाळयाचा ताबा घेतला आहे व सन 2012 मध्ये तक्रार दाखल केली आहे त्यामुळे तक्रार ही मुदतीत नाही. तक्रार अर्ज कलम 5 व 7 मधील मजकूर खोटा असून मान्य नाही. दुकानगाळयाचे संपूर्ण काम पूर्ण करुन तक्रारदार यांना वि.प. यांनी सन 2002 मध्ये ताबा दिला आहे. तक्रारदार यांनी कराराप्रमाणे मुदतीत उर्वरीत रक्कम व व्याजही दिलेली नाहीत ते देणे लागू नये म्हणून तक्रारदार यांनी खरेदीपत्र पुर्ण करुन घेतलेले नाही. वि.प. यांची रक्कम बुडविणेसाठी तक्रारदार यांनी खोटी तक्रार दाखल केली आहे. तक्रार अर्ज कलम 8 ते 14 मधील मजकूर खोटा व चुकीचा असून मान्य नाही. तक्रारदार यांनी खोटी व चुकीची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह रद्द करणेत यावा अशी विनंती केली आहे.
(5) वि.प. नं. 5 ते 7 यांनी तक्रारदारांच्या तक्रारीस तक्रार अर्जास म्हणणे दाखल केले आहे. तक्रार अर्जातील मजकूर मान्य व कबूल नसून परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदारांची तक्रार चालणेस पात्र नाही. तक्रार चालणेपूर्वी काही प्राथमिक मुद्दे काढून मुद्दयांवर निर्णय होणे आवश्यक आहे. प्रस्तुतची तक्रार मुदतीत नाही. तक्रारदार यांनी दुकानगाळयाचा ताबा सन 2002 मध्ये घेतलेला आहे. ताबा घेतलेपासून तक्रार दोन वर्षाचे आत दाखल करणे आवश्यक आहे. तक्रारदारांनी दुकानगाळा व्यावसायिक कारणासाठी खरेदी केलेला आहे. तक्रार अर्ज कलम 1 ते 7 मधील मजकूराशी वि.प. नं. 5 ते 7 यांचा काहीही संबंध नाही. तक्रार अर्ज कलम 8 ते 14 मधील मजकूर चुकीचा असून खोटा आहे. तक्रारदार यांनी वि.प. यांना कोणताही मोबदला दिलेला नाही. व वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडून कोणतीही रक्कम स्विकारलेली नाही. तक्रारदार यांना वि.प. यांनी कोणताही करार करुन दिलेला नाही. वि.प. नं. 5 ते 7 यांनी वि.प. नं. 1 ते 4 यांचेकडून मिळकत विकसीत करणेकरिता विकसन कराराने घेतलेली नाही. व कोणतेही दायित्व घेतलेले नाही. तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये ग्राहक व विक्रेता असे नाते निर्माण होत नाही. वि.प.नं. 5 व 7 वि.प. संस्थेचे संचालक नाहीत. वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेमध्ये कोणतीही सेवा देण्यात कसूर केलेली नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार पूर्णपणे खोटी व चुकीची आहे. तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारदार यांनी तक्रार अर्ज मुदतीत आणणेसाठी खोटे कारण दाखविले आहे. तक्रारदाराची तक्रार मे. कोर्टाचे अधिकारक्षेत्रात येत नाही. तक्रारदार यांना वि.प.नं. 1 ते 4 कडून सन 2002 साली दुकानगाळयाचा ताबा दिलेला आहे, त्यावेळेपासून मुदत सुरु होते तक्रार मुदतीत नाही. तक्रारदारांची तक्रार मुदतीसाठी खोटे कारण दाखविलेले आहे. तक्रारदारांनी खोटी व चुकीची तक्रार दाखल केली आहे. वि.प. यांनी विनाकारण त्रास देणेच्या उद्देशाने तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे वि.प. यांना आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे सदर नुकसानीपोटी रक्कम रु. 1,00,000/- तक्रारदार यांचेकडून वि.प. यांना मिळावेत. सबब, प्रस्तुतचा तक्रार अर्ज खर्चासह रद्द करणेत यावा अशी विनंती वि.प. यांनी केली आहे.
(5) तक्रारदारांची तक्रार, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, तक्रारदारांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र, वि.प. यांचे म्हणणे, दाखल कागदपत्रे, व उभय पक्षकारांचे वकिलांचा युक्तीवादाचा विचार करता पुढील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदाराची तक्रार मुदतीत आहे काय ? होय.
2. वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत
त्रुटी ठेवली आहे का ? होय.
3. तक्रारदार हे मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम
मिळणेस पात्र आहेत का ? होय.
4. आदेश काय ? तक्रार अशंत: मंजूर.
कारणमीमांसा:-
मुद्दा क्र. 1 :
प्रस्तुतची तक्रार अर्जात नमूद केलेल्या बी वॉर्ड, मंगळवार पेठ येथील भूमापन क्र. 2608/4,2607/ए, एकूण क्षेत्र 85000.3 चौ.मी. या मिळकतीवर बांधणेत येणारे व्यापारी संकुलामधील दुकानगाळा नं. 1 सदर दुकानगाळे खरेदी करण्यासाठी तक्रारदार व वि.प. यांचे दरम्यान दि. 25-10-2002 रोजी दस्त अन्वये नं. 4894/2002 अॅग्रीमेंट टू सेल(Agreement for sale) झालेले असून खरेदीपत्र पूर्ण करुन दिले नाही व ताबाही दिलेला नाही. त्यामुळे सदरचे तक्रारीस सततचे continuous cause of action घडत असलेने प्रस्तुतची तक्रार तक्रारदार यांनी मुदतीत दाखल केली आहे या निष्कर्षास हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 2 :
कोल्हापूर शहर बी वॉर्ड, मंगळवार पेठ येथील भूमापन क्र. 2608/4,2607/ए, एकूण क्षेत्र 85000.3 चौ.मी. ही मिळकत वि.प. नं. 1 कोल्हापूर स्पोर्टस असोसिएटस, कोल्हापूर वि.प.1 या धर्मादाय संस्थेच्या मालकीचे आहेत. मिळकत खेळ मैदानासाठी विकसित करणेसाठी व मैदानाला सभोवर व्यापारी संकुल बांधण्यासाठी वि.प. 1 ट्रस्टने वि.प. नं. 2 करण असोसिएटस रजि. पार्टनरशिप फर्मबरोबर रजि. विकसन करारपत्र दि. 16-12-1997 रोजी करुन सदरचे व्यापारी तत्वावर बांधकाम करुन खरेदी -विक्री करणेचे अधिकार वि.प. नं. 1 यांनी रजि. वटमुखत्यारव्दारे वि.प. 2 करण असोशिएटस रजि. पार्टनरशिप फर्मला सर्व सर्वाधिकार दिलेले होते. वि.प. हे मिळकती मालकांकडून विकसन करारपत्राव्दारे घेऊन विकसित करुन घरे, दुकानगाळे, व्यापारी संकुले, तळघरे अशी बांधकामे अॅडव्हान्स रक्कम घेवून ग्राहकांना विक्री करणेचा व्यवसाय करुन सेवा देतात, त्याप्रमाणे वि.प. यांनी संबंधित महानगरपालिकेकडून फायनल व रिवाईज ले-आऊट मंजूर करुन नकाशा तयार करुन ग्राहकांकडून मोबदला स्विकारुन खरेदी करणेचे प्रस्ताव देणेत आला होता. तक्रारदाराना गाळा व बेसमेंटची आवश्यकता असल्याने वि.प. करण असोशिएटस व तक्रारदार यांचे दरम्यान रजि.दस्त नं.4894/2002 चे अॅग्रीमेंट-टू-सेल प्रमाणे उत्तर-पश्चिम कोप-यातील 50 चौ.मी. तळमजल्यावरील दुकानगाळा 1 त्याचे क्षेत्रफळ 538 चौ. फूट रक्कम रु. 4,51,100/- इतक्या किमंतीस तक्रारदार यांना विकत देणेचे ठरविले. प्रस्तुत कामी तक्रारदाराने संचकारपत्राची प्रत अ.क्र. 1 कडे दाखल केली आहे. तक्रारदाराने रक्कम रु. 1,44,100/- बँकेचे चेकव्दारे वि.प. करण असोशिएटस यांना अदा केली आहे व उर्वरीत रक्कम बांधकामाचे प्रगतीप्रमाणे व खरेदीपत्रावेळी देण्याचे ठरले होते. प्रस्तुत संचकारपत्राचे अवलोकन केले असता असे दिसून येते. तक्रारदार यांना गोडावूनसाठी जागेची आवश्यकता असलेने तदनंतर वि.प. बरोबर चर्चा करुन 1000 चौ.फू. चे बेसमेंटमधून दुकानगाळयात येण्या-जाण्यासाठी सिमेंट क्रॉंकीटचा जीना करुन लोखंडी शटर बसवून देण्याचे ठरवून तक्रारदाराने व वि.प. नं. 2 ते 4 यांचेमध्ये 1000 चौ.फू. चे गोडावून प्रति चौरस फूटास रु. 400/- प्रमाणे एकूण रक्कम रु. 4,00,000/-किंमतीस गोडावून घेणेचे ठरविले व सदरचा व्यवहार हा वि.प. 2 व तक्रारदार यांचेमध्ये तोंडी बोलणी होऊन तक्रारदाराने रक्कम रु.1,05,000/- ठरल्याप्रमाणे रोखीने अदा केले आहेत. सदरची रक्कम वि.प. 2 करण असोशिएटस यांना मिळाली रक्कम मिळालेबाबत वि.प. 2 यांनी रक्कम पोहचलेचे दि. 22-05-2002 रोजी रक्कम पोहचलेचे पावती तक्रारदारांना लिहून दिलेले आहे. सदर पावतीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, दि. 21-03-2002 रोजी बेसमेंटपोटी शिवाजी स्टेडियम साईडकडील रक्कम रु. 1,05,000/- पोहचले सदर पावतीवर करण असोशिएटस यांची सही व शिक्का आहे. सदरचा व्यवहार हा बेसमेंटपोटी झालेला आहे असे दिसून येते. यावरुन हे स्पष्ट होते की, सदरचा व्यवहार हा गोडावूनसाठी झालेला आहे. सदरचे रजि. करारपत्र व तोंडी बोलणी गोडावूनसाठी झालेनंतर कामाचे प्रगतीप्रमाणे रक्कम देणे होते असे असताना तक्रारदार हे रक्कम देण्यास तयार होते, परंतु वि. प. यांनी बांधकाम केले नाही. तदनंतर तक्रारदाराने वेळोवेळी वि.प.नं. 2 ते 4 यांना बांधकाम पूर्ण करुन दुकान गाळा व बेसमेंट देण्यासाठी विनंती केली, तसेच तक्रारदारांनी दि. 27-12-2010 रोजी पत्र देऊन रजिस्टर करारपत्रातील अॅनेक्चर-ए मध्ये नमूद केलेल्या दुकान गाळयाचे तुम्ही बांधकामास सुरुवातही केलेली नाही. त्याबाबतचे पत्राची प्रत तक्रारदाराने अ.क्र. 3 कडे दाखल केले आहे. वि.प. यांना वेळोवेळी भेटून बांधकाम पूर्ण करुन देण्याची विनंती केली, परंतु वि.प. यांनी तक्रारदारांना सांगितले की व्यवसायात अडचणी निर्माण झाले आहे अशा सबबीची कारणे सांगून तक्रारदारांना दुकानगाळा नं. 1 व गोडावूनचा ताबा दिलेला नाही. तदनंतर तक्रारदाराने वि.प. यांना कळविले की, त्यांना व्यवसायात जागेची अडचणी निर्माण होत आहे, त्यामुळे वि.प. 2 ते 4 यांनी तक्रारदारास शाहू स्टेडियम कमर्शियल कॉम्प्लेक्समधील उत्तर-पश्चिम कोप-यातील आऊटर बिल्डींगमधील (तळमजल्यावरील) उत्तर-पश्चिम कॉर्नरवरील गाळा नं. 1 बुकींग गाळयाबद्दल पर्यायी शाहू स्टेडियम कमर्शिअल कॉम्प्लेक्स, (मुख्य इमारत) मधील शिवाजी स्टेडियम रोड बाजूकडील लोअर ग्राऊंड गाळा नं. 19 व शिवाजी स्टेडियम रोड बाजूकडील लोअर ग्राऊंड गाळा नं. 21 तुर्तास वापरास दिलेला आहे. तक्रारदारांनी बुकींग केलेली मिळकतीचा बांधकाम पूर्ण करुन कब्जा व खरेदीपत्र करुन दिलेनंतर वि.प. यांनी तक्रारदारांना तुर्तास वापरास दिलेले लोअर ग्राऊंड गाळा नं. 19 व 21 चा कब्जा सोडून देणेचे ठरले.
तक्रारदार व वि.प. 1 ते 4 यांचेमध्ये झालेल्या करारपत्राप्रमाणे वि.प. यांनी बांधकाम सुरुवात केले नाही, त्याबाबत तक्रारदारांनी वि.प. कडे तोंडी विचारणा करुन दि. 27-12-2010 व 14-09-2011 रोजी लेखी पत्रे पाठविली. वि.प. यांनी त्यास उत्तर न देता आर्थिक अडचणीमुळे असमर्थता दाखविली. वि.प. 1 ते 4 यांनी आर्थिक अडचणीमुळे व्यापारी संकुलातील पुर्ण, अर्धवट व न केलेल्या बांधकामाची पुर्वीचे मंजूर नकाशाप्रमाणे ट्रस्ट माध्यमातून वि.प. 5 ते 7 यांना विक्री करण्याचे ठरविले. वि. प. 1 ते 4 यांनी वि.प. 5 ते 7 यांचेमध्ये दस्त क्र. 1702 अन्वये दि. 19-03-2012 रोजी वर नमूद मिळकतीचे व्यवहार पूर्ण केलेला आहे. वि.प. 1 ते 4 यांनी जे करार तक्रारदारांबरोबर केले त्या कराराची पुर्तता करणेची जबाबदारी वि.प. 5 ते 7 यांनी मान्य व कबूल केलेले होते.
वि.प. 1 ते 4 यांनी तुर्तास वापरास शाहू स्टेडियम कमर्शियल कॉम्प्लेक्स मुख्य इमारतीमधील शिवाजी स्टेडियम रोड बाजूकडील गाळा नं. 19 व 21 वापरास दिलेला आहे. तक्रारदारांनी बुकींग केलेली मिळकतीचा बांधकाम पूर्ण करुन कब्जा व खरेदीपत्र करुन दिलेनंतर वि.प. यांनी तक्रारदारांना तुर्तास वापरास दिलेले लोअर ग्राऊंड गाळा नं. 19 व 21 चा कब्जा सोडून देणेचे ठरले असे तकारदाराने शपथपत्रात कथन केले आहे. वि.प. यांनी कराराप्रमाणे बांधकाम पूर्ण करुन खरेदीपत्र पूर्ण करुन दिले नसलेमुळे तक्रारदाराने वि.प.यांना दि. 27-12-2010 व 14-09-2010 रोजी लेखी स्मरणपत्र पाठविले. सदरचे पत्र अ.क्र. 3 व 4 कडे दाखल आहेत. तसेच तक्रारदाराने वकिलांमार्फत नोटीस बांधकाम पूर्ण करणेकरिता पाठविली अ.क्र. 7 व 8 कडे नोटीसची प्रत दाखल आहेत. सदरची नोटीसीप्रमाणे वि.प. यांनी बांधकाम पूर्ण करुन दिलेले नाही, सदरची नोटीसीची पोहोच पावती अ.क्र. 10 कडे आहेत.
वि.प. नं. 1 ते 4 यांना आर्थिक अडचणी निर्माण झालेमुळे बांधकाम पूर्ण करता आले नाही. त्यामुळे सदरचे बांधकाम पूर्ण करणेसाठी वि.प. नं. 5 ते 7 यांचे बरोबर दि. 19-03-2012 रोजी रजिस्टर विकसन करार रजि. दस्त नं. 1702 अन्वये केला आहे.सदर करारापत्राची प्रत तक्रारदारांनी या कामी दि. 18-06-2013 रोजीच्या यादीसोबत अ.क्र. 2 कडे दाखल केलेली आहे. वि.प. नं. 5 ते 7 यांनी पूर्वीचे हक्काने वि.प.नं. 1 ते 4 यांचेकडून सदरची मिळकत अर्धवट बांधकाम पूर्ण करणेसाठी व खरेदीपत्र पूर्ण करणेसाठी केलेले आहे. सदरचे तोंडी कराराचे वेळेस श्री. मोहन सदाशिव बागणे व चंद्रकांत दत्तात्रय रामणे हे हजर होते असे तक्रारदारांनी शपथपत्रामध्ये कथन केले आहे. व साक्षीदाराचे शपथपत्र श्री. मोहन सदाशिव बागणे यांचे दाखल केले आहे. वि.प. यांनी मे. मंचात साक्षीदाराचा उलटतपास घेण्यास परवानगी मागण्यात आली व मे. मंचाने उलटतपास घेण्यास परवानगी अर्ज मंजूर करुन त्याअनुषंगाने वि.प. यांनी प्रश्नावली दाखल केली. सदरची प्रश्नावली परिशिष्ट – ‘ए’ देण्यात आले. प्रश्न क्र. 6 व 7 वाद विषय मिळकतीचा करार कोठे व केंव्हा व कधी कोणा-कोणासमक्ष झाला ? उत्तर- करार हा तक्रारदार व श्री. मुरलीधर जाधव वैयक्तीक व मे. करण असोशिएटस यांचेमध्ये झाला आहे. प्रश्न– वाद मिळकतीची चतु:सिमा सांगता येईल का ? उत्तर- साक्षीदाराने चतु:सिमा सांगितली आहे. प्रस्तुत कामी उपलब्ध सर्व कागदपत्राचे अवलोकन केले असता वरील सर्व बाबींचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदारांना आजतागायत करारपत्राप्रमाणे दुकानगाळा व बेसमेंट गोडावूनचे बांधकाम आजतागायत पूर्ण करुन न देऊन तक्रारादारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. म्हणून, मुद्दा क्र. 2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 3 :
प्रस्तुतची तक्रार ही वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेमुळे तक्रारदारांना मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला तसेच तक्रार दाखल करण्यासाठी खर्च करावा लागला आहे, त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- मिळण्यास पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र. 3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 4 :
वि. प. यांनी तक्रारदारांना रजि. करारपत्रात नमूद ग्राऊंड फलोअरचा दुकान गाळा नं. 1, तसेच गोडावूनचे 1000 चौ.फुटाचे चे बांधकाम पूर्ण करुन सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता पुर्ण करुन खरेदीपत्र पूर्ण करुन द्यावे व तकारदारांनी उर्वरीत रक्कम करारपत्राप्रमाणे वि.प. यांना अदा करावी. तदनंतर तक्रारदारांनी त्यांचे ताब्यात असलेले गाळा क्र. 19 व 21 चा ताबा वि.प. यांना द्यावा. या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, हे मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. वि. प. यांनी तक्रारदारांना रजि. करारपत्रात नमूद ग्राऊंड फलोअरचा दुकान गाळा क्र. 1, तसेच गोडावूनचे 1000 चौ.फूटाचे बांधकाम पूर्ण करुन सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता पुर्ण करुन खरेदीपत्र पूर्ण करुन द्यावे व तकारदारांनी उर्वरीत रक्कम करारपत्राप्रमाणे वि.प. यांना अदा करावी, तदनंतर तक्रारदारांनी त्यांचे ताब्यात असलेले गाळा क्र. 19 व 21 चा ताबा वि.प. यांना द्यावा.
3. वि.प. यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) अदा करावेत.
4. वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 90 दिवसांचे आत आदेशाची पूर्तता करावी.
5. सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.