निकालपत्र :- (दि.16.07.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांच्या रहात्या घरी सामनेवाला, कोल्हापूर महानगरपालिकेने पाणी पुरवठा केलेला आहे. एप्रिल 2010 पासून तक्रारदारांच्या भागात पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन बदलणेची असल्याने पूर्वीचे कनेक्शन बंद करुन नविन टाकलेल्या पाणी लाईनमधून पाणी कनेक्शन घेणे ठरवून त्यानुसार सर्व ग्राहकांचे पाणी कनेक्शन जुन्या पाईप लाईनमधून बंद करुन नविन टाकलेल्या पाईप लाईनमधून पाणी पुरवठा करुन घेतलेला आहे.
(3) तक्रारदार पुढे सांगतात, तक्रारदार हे मुख्य पाईप लाईनपासून अंदाजे 500 फूटावर रहात असल्याने मुख्य पाईप लाईनपासून पाणी पुरवठा घेणेसाठी अंदाजे रक्कम रुपये 10,000/- इतका पाईप खरेदीसाठी खर्च केलेला आहे. सदरचा खर्च व जोडणी खर्च असा एकूण रुपये 20,000/- खर्च झालेला आहे. परंतु, माहे एप्रिल, 2010 पासून सामनेवाला यांनी जुनी पाईप लाईन बदलून 10 फूट अंतरावर नविन पाईप लाईन टाकलेली आहे. त्याप्रमाणे त्या पाईप लाईनमधून सर्व ग्राहकांना पाणी कनेक्शन जोडून पाणी पुरवठा केलेला आहे; परंतु, तक्रारदार ग्राहकांना मुख्य पाईप लाईनमधून पाणी कनेक्शन देणेस टाळाटाळ करीत आहेत. सबब, सामनेवाला यांनी नविन 10 फूट अंतरावर टाकलेल्या पाईप लाईनमधून पाणी कनेक्शन जोडणेचा आदेश व्हावा. मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रुपये 10,000/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत पाणी कनेक्शन करीता भरलेली रक्कम, सेवा शुल्क फीची पावती, बिल भरलेची पावती, बिल इत्यादीच्या छायाप्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला महानगरपालिकेने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, पाणी पुरवठा करणे व सदर पाणी पुरवठा करताना सर्व ग्राहकांना योग्य दाबाने पाणी मिळणेसाठी उपजलवाहिनीमधून कनेकशन देणे हे निर्णय तांत्रिक स्वरुपाचे आहेत, तसेच प्रशासकिय स्वरुपाचे आहेत. सदर निर्णय क्षमतेवर बंधन येईल अशा स्वरुपाची मागणी तक्रारदारांना करता येणार नाही व प्रस्तुत प्रकरणी अशी मागणी करुन प्रशासकिय कामामध्ये ढवळाढवळ करणेचा प्रयत्न तक्रारदार करीत आहेत. (6) सामनेवाला पुढे सांगतात, नविन उपजलवाहिनी टाकताना त्यावरील संभाव्य कनेक्शन यांचा विचार करुन वाहिनीची लांबी व रुंदी ठरविली जाते व पाण्याचा दाब कमी होणार नाही याची दक्षता घेवून उपजलवाहिनीवरुन कनेक्शन दिले जाते. तक्रारदार ज्या ठिकाणाहून कनेक्शन मागत आहेत असे कनेक्शन दिल्यास अस्तित्त्वात असलेल्या कनेक्शनवर त्याचा परिणाम होवून सदर वाहिनीवर ताण पडून सर्व ग्राहकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तक्रारदारांना पाणी पुरवठा करणेची जबाबदारी सामनेवाला यांची आहे व ते सक्षमपणे जबाबदारी पार पाडीत आहेत. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे.
(7) या मंचाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सविस्तर व विस्तृतपणे ऐकलेला आहे. तक्रारदारांना सामनेवाला महानगरपालिकेने पाणी पुरवठा केलेला आहे. तक्रारदारांची तक्रार ही त्यांना मुख्य पाईप लाईनमधून पाण्याची जोडणी करुन देणेची मागणी करीत आहेत. सामनेवाला हे उपजलवाहिनीवरुन पाणी पुरवठा करणेस तयार आहेत. पाणी पुरवठा कोणत्या वाहिनीवरुन द्यावयाचा याबाबतचा महानगरपालिकेचा निर्णय हा तांत्रिक व प्रशासकिय स्वरुपाचा निर्णय आहे. सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये तक्रारदारांना पाणी पुरवठा करणेस ते सक्षम आहेत असे नमूद केले आहे. कोणत्याही वाहिनीवरुन पाणी पुरवठा करावयाचा हा निर्णय महानगरपालिकेचा आहे. अशा तांत्रिक व धोरणात्मक निर्णयामध्ये हे मंच हस्तक्षेप करीत नाही. सबब, उपरोक्त सर्व तक्रारींमध्ये हे मंच एकत्रित आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. उपरोक्त सर्व तक्रारी नामंजूर करणेत येतात. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |