न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील बी वॉर्ड, जवाहरनगर, कोल्हापूर येथील रि.स.नं.623/अ/4 व 624/2 या मिळकतीवर रेखांकन करणेकरिता तक्रारदारांनी अर्ज दिला होता. त्या अनुषंगाने दि. 18/07/2014 रोजी अंतिम रेखांकन मंजूरी दिली होती. सदर मंजूरीमध्ये वर नमूद मिळकतीच्या पश्चिमेकडील नमूद मिळकतीच्या लगतचा प्रस्तावित 12 मीटर डी.पी. रस्ता सदर परवानगी अंतर्गत करुन देणेचे ठरले होते व तसा आदेश केला होता. सदर 12 मीटर डी.पी. रस्ता हा या तक्रारअर्जाचा विषय आहे. सदर मिळकतीचा डी.पी.रस्ता वि.प. यांच्या कार्यक्षेत्रातील असून रस्ता तयार करणे व देखभाल करणेची जबाबदारी शासन निर्णयानुसार वि.प. यांचेवर होती व आहे. परंतु असे असतानाही वि.प. यांनी सदरचा रस्ता तयार करणेकरिता तक्रारदारांकडून दि. 25/5/2011 रोजी रक्कम रु.4,52,378/- व दि. 4/03/2014 रोजी रक्कम रु. 10,42,948/- भरुन घेतलेली आहे. तसेच तक्रारदारांकडून सदर रस्ता निर्माण करणेकरिता मुरुम, खडी तसेच त्याची लेवल वगैरे करणेचा खर्च रक्कम रु. 2,77,037/- अशी एकूण रक्कम रु. 17,72,400/- वि.प. यांनी घेतली आहे. परंतु अद्यापही वि.प. यांनी डी.पी.रस्ता तयार केलेला नाही अथवा तक्रारदार यांना भरणा केलेली रक्कमही परत केलेली नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून वर नमूद मिळकती लगतच्या 12 मीटर डी.पी.रस्ता शासन नियमाप्रमाणे स्वखर्चाने नियमानुसार 12 आठवडयांच्या आतमध्ये रहदारीसाठी खुला करुन देणेचा आदेश व्हावा, तक्रारदारांकडून स्वीकारलेली रक्कम रु. 17,72,400/- तसेच त्यावर दि. 31/7/21 रोजीपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के दराने होणारे व्याज रु. 62,64,689/-, मानसिक त्रासापोटी रु.5,00,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.50,000/- वि.प. कडून मिळावा तसेच अंतिम रेखांकन मंजूरीसाठी वेठील धरुन कायद्याविरुध्द पैसे भरुन घेणा-या सर्व अधिका-यांना शिक्षा व्हावी अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 5 कडे अनुक्रमे तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेल्या रकमांच्या पावत्या, तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेली पत्रे वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत हमीपत्र, वि.प. तर्फे रेखांकनास तात्पुरती मंजूरी दिलेबाबतचा आदेश, मूळ मालकांनी नगररचना विभागाकडे दिलेले पत्र, वि.प. यांचा रेखांकनास अंतिम मंजूरी देणेत आलेला आदेश, वि.प. यांनी रेखांकन रद्द केलेबाबतचा आदेश वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत.
5. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे कधीही रेखांकन करणेकरिता अर्ज दिलेला नव्हता. तसेच रेखांकन मंजूरीमध्ये 12 मीटर डी.पी.रस्ता करुन देणेचे ठरले नव्हते. उलटपक्षी सदरील मिळकतीचे त्यावेळचे मालक श्रीमती कमल दिगंबर पाटील व इतर तर्फे श्री राजेंद्र डी. पाटील व मुमताज बेगम शहाबद्दीन उर्फ शाबाजखान जमादार व इतर तर्फे वटमुखत्यार महंमद इक्बाल श. जमादार यांनी वि.प. कडे दि. 17/6/2011 व दि. 21/6/11 रोजी हमीपत्रे सादर करुन सदरील मिळकतीवरील अतिक्रमणे काढून देणेची हमी घेतली होती. त्यानुसार दि. 4/7/11 रोजी रेखांकनास तात्पुरती मान्यता दिली होती. परंतु आजतागायत सदरील मिळकतीचे मालक रेखांकन आदेशातील अटी व शर्तींचे पालन करणेस असमर्थ ठरले आहेत. तदनंतर दि. 18/7/2014 रोजी वि.प. यांनी रेखांकनास अंतिम मंजूरी दिलेली होती. परंतु सदर आदेशातील अटी व शर्तींचे पालन करणेस मूळ मालक असमर्थ ठरलेने वि.प. यांनी सदरचा अंतिम रेखांकन आदेश दि. 16/5/2015 रोजी रद्द केला.
iii) तक्रारदार यांनी याकामी कोणत्याही प्रकारची रक्कम भरलेली नसून सदर मिळकतीचे मालक श्री महंमद इकबाल जमादार व सौ कमल दिगंबर पाटील यांचेतर्फे अतिम रेखांकनाबाबतचे शुल्क म्हणून रक्कम रु.14,95,363/- इतकी वेगवेगळया तारखांना भरलेली आहे.
iv) वि.प. यांनी जरी सदरील शुल्क भरुन घेतले असले तरी सदरील मिळकतीचे मालक यांनी हमीपत्र सादर करुन नमूद मिळकतीमधील अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी घेतली होती. ती जबाबदारी सदरील मिळकतीचे मालक पार पाडू शकले नाहीत. त्यामुळे 12 मीटर डी.पी. रस्त्याबाबत पुढील कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
v) वि.प. यांनी तक्रारदाराकडून सेवेपोटी कोणत्याही स्वरुपाची रक्कम स्वीकारलेली नाही. त्यामुळे तक्रारदार हे कोणत्याही स्वरुपाची रक्कम मिळणेस पात्र नाहीत.
vi) वि.प. यांचेकडे अंतिम रेखांकनाबाबत त्यावेळचे मालक यांनी रक्कम रु. 14,95,363/- इतकी रक्कम भरलेली आहे आणि आजघडीला अंतिम रेखांकन आदेश रद्द केलेमुळे यातील वि.प. हे सदरील शुल्क रक्कम मालकांना परत करणेसाठीची कार्यवाही करीत आहेत. सदरचे मूळ मालकांनी वेळेत मागणी करणे जरुरीचे होते परंतु त्यावेळचे मिळकतधारक वेळेत योग्य ती कायदेशीर कारवाई करणेस असमर्थ ठरले आहेत.
vii) मिळकतीच्या 7/12 पत्रकी तक्रारदारांचे नावाची नोंद असल्यामुळे त्यांना मूळ मिळकतधारकांनी भरलेली शुल्क रक्कम परत मागणेचा अधिकार प्राप्त होत नाही. त्यामुळे तक्रारदारांना प्रस्तुतची तक्रार दाखल करणेचा कोणताही अधिकार नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
6. वि.प. यांनी याकामी पुरावा शपथपत्र दाखल केलेले नाही. तसेच लेखी युक्तिवादही दिलेला नाही. वि.प. तर्फे वकील हे सातत्याने नेमलेल्या तारखांना गैरहजर राहिले. वि.प. यांना संधी देवूनही ते युक्तिवादास हजर राहिले नाहीत. त्यामुळे तक्रारदाराचा युक्तिवाद ऐकण्यात येवून प्रस्तुत प्रकरण निकालावर घेण्यात आले.
7. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून, भरलेली रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
8. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण वि.प. यांनी कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील बी वॉर्ड, जवाहरनगर, कोल्हापूर येथील रि.स.नं.623/अ/4 व 624/2 या मिळकतीच्या पश्चिमेकडील लगतच्या प्रस्तावित 12 मीटर डी.पी. रस्ता तयार करणेकरिता तक्रारदार यांचेतर्फे श्री महंमद इकबाल शा. जमादार व राजेंद्र दि. पाटील यांचेकडून दि. 25/5/2011 रोजी रक्कम रु.4,52,378/- व दि. 4/03/2014 रोजी रक्कम रु. 10,42,948/- भरुन घेतलेली आहे. सदरच्या पावत्या याकामी तक्रारदारांनी दाखल केल्या आहेत. तसेच तक्रारदारांनी सदरच्या रकमेची मागणी वि.प. यांचेकडे केलेचे दि. 6/01/2020 चे पत्र याकामी दाखल केले आहे. रस्ता करण्यासाठी रक्कम स्वीकारल्याची बाब वि.प. यांनी नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
9. प्रस्तुतकामी वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये, तक्रारदार यांनी याकामी कोणत्याही प्रकारची रक्कम भरलेली नसून सदर मिळकतीचे मालक श्री महंमद इकबाल जमादार व सौ कमल दिगंबर पाटील यांचेतर्फे अतिम रेखांकनाबाबतचे शुल्क म्हणून रक्कम रु.14,95,363/- इतकी वेगवेगळया तारखांना भरलेली आहे. परंतु वि.प. यांनी जरी सदरील शुल्क भरुन घेतले असले तरी सदरील मिळकतीचे मालक यांनी हमीपत्र सादर करुन नमूद मिळकतीमधील अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी घेतली होती. ती जबाबदारी सदरील मिळकतीचे मालक पार पाडू शकले नाहीत. त्यामुळे 12 मीटर डी.पी. रस्त्याबाबत पुढील कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आजघडीला अंतिम रेखांकन आदेश रद्द केलेमुळे यातील वि.प. हे सदरील शुल्क रक्कम मालकांना परत करणेसाठीची कार्यवाही वि.प. हे करीत आहेत असे कथन केले आहे.
10. वि.प. यांनी त्यांचे म्हणणेचे परिच्छेद नं. 6 मध्ये तक्रारदारांनी दि. 25/05/2011 व दि. 04/03/2014 रोजी शुल्क रक्कम वि.प. कडे जमा केलेले आहेत ही बाब मान्प्य केली आहे. म्हणजेच तक्रारदाराने रक्कम जमा केल्याची बाब वि.प. यांनी मान्य केली आहे व रेखांकन आदेश रद्द झाल्याने विप यांनी वादातील डी.पी. रस्ता तयार करुन दिला नाही ही बाबही मान्य केली आहे व वि.प. हे सदरील शुल्क रक्कम मालकांना परत करणेसाठीची कार्यवाही वि.प. हे करीत आहेत असे कथन केले आहे. सबब, वि.प. यांनी रक्कम स्वीकारुनही रस्ता तयार केलेला नाही व सदरची रक्कम परतही केलेली नाही ही बाब विप यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये मान्य केली आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
11. तक्रारदार यांनी याकामी दि. 25/5/2011 रोजी रक्कम रु.4,52,378/- व दि. 4/03/2014 रोजी रक्कम रु. 10,42,948/- भरल्याच्या पावत्या दाखल केल्या आहेत. सदरचे पावत्यांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून एकूण रक्कम रु. 14,95,363/- भरल्याची बाब शाबीत होते. सबब, सदरची रक्कम रु. 14,95,363/- वि.प. यांनी तक्रारदारास अदा करणे न्यायोचित वाटते. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे तक्रारअर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. 14,95,363/- अदा करावेत व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. यांनी तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींप्रमाणे कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.