निकालपत्र :- (दि.01.01.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, शहर कोल्हापूर येथील ई वॉर्ड सि.स.नं.239/अ/1 ही मिळकत सामनेवाला यांनी विकसित करुन ‘गणपत हाईटस्’ हे अपार्टमेंट बांधलेले आहे. सदर अपार्टमेंटमधील दुस-या मजल्यावरील ऑफिस नं.ओ.एस्. नं.1-अ, क्षेत्र 320.33 चौरस फूट (29.77 चौरस मिटर) ही मिळकत तसेच सि.स.नं.1413/1, सी वॉर्ड, कोल्हापूर ही मिळकत नरेंद्र सर्जेराव पाटील यांनी विकसित करणेचे ठरवून त्यामध्ये ‘माया चेंबर्स’ नांवाने इमारत बांधण्याचे ठरविले. सदर इमारतीतील पहिल्या मजल्यावरील व तळमजल्यावरील क्षेत्र खरेदी घेणेचे ठरले. सदर व्यवहारापोटी नरेंद्र पाटील यांना रुपये 6,70,401/- ही रक्कम संचकार म्हणून दिली. परंतु, सदरची मिळकत त्यांनी विकसित केली नाही. सामनेवाले व नरेंद्र पाटील हे नातेवाईक आहेत. सि.स.नं.239/अ/1 ही मिळकत श्रीमती वत्सला गणपतराव साळोखे वगैरे 5 यांचेकडून विकसनाकरिता घेतली व सदर मिळकतीमध्ये गणपत हाईटस् या नांवाने अपार्टमेंट बांधण्याचे ठरविले. त्याप्रमाणे नरेंद्र पाटील यांचेशी तक्रारदारांनी केलेल्या व्यवहाराबाबत सामनेवाला यांचेशी वाटाघाटी होवून वर नमूद केलेली मिळकत यातील तक्रारदार यांनी रक्कम रुपये 3,75,300/- इतक्या रक्कमेस घेणेचे ठरले व उर्वरित रक्कम तक्रारदारांना परत देणेचे ठरले व त्याप्रमाणे संचकारपत्र झाले आहे व करारापासून चार महिन्यात मिळकतीचा ताबा देणेचे ठरले. परंतु, सामनेवाला यांना संपूर्ण मोबदला देवूनही ऑफिस युनिटचा ताबा देवून खरेदीपत्र केलेले नाही. सबब, उपरोक्त उल्लेख केलेले ऑफिस युनिटचे खरेदीपत्र सामनेवाला यांनी पूर्ण करुन देणेचे आदेश व्हावेत. तसेच, शारिरीक-मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च देणेचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत दस्त क्र.1120/07 चे अॅग्रीमेंट ऑफ सेल, वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला यांनी नरेंद्र पाटील यांचे व्यवहारापोटी त्यांना कसबा बावडयातील मिळकत संचकार पत्राने विकसित करणेस दिली असता तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून जादा रक्कम व दोन्ही मिळकती हडप करणेचे उद्देशाने खोटी तक्रार केली आहे. श्री.नरेंद्र पाटील यांनी सि.स.नं.1413/1 ही मिळकत विकसित न केल्याने व त्या मिळकतीवर बांधकाम न केल्याने त्यापोटी तक्रारदार यांना कसबा बावडा येथील फलॅट मिळकतीचे संचकारपत्र करुन दिले आहे. त्यामुळे तक्रारीत नमूद केलेली मिळकत मागणेचा अधिकार तक्रारदारांना पोहोचत नाही. तक्रारदारांकडून घेतलेली रक्कम रुपये 6,70,401/- पैकी रक्कम रुपये 2,95,101/- इतकी रक्कम अॅक्सिस बँकेच्या चेकने परत केली आहे. (5) सामनेवाला पुढे सांगतात, तक्रारदारांनी प्रथम कसबा बावडा येथील मिळकत संचकार करुन घेतलेली आहे व नंतर सि.स.नं.239/अ/1 यावर सामनेवाला यांनी विकसनाकरिता घेतलेल्या मिळकतीमधील ऑफिस युनिटची मागणी केल्याने सामनेवाला यांनी तक्रारदारांना संचकारपत्र करुन दिले आहे. परंतु, कसबा बावडा येथील मिळकतीचा संचकारपत्राचा हक्क न सोडता तक्रारदार हे तक्रारीत नमूद केलेल्या मिळकतीचे खरेदीपत्र करुन मागत आहेत. दोन्ही मिळकती एकाच किंमतीत खरेदी करु पहात आहेत. सदरची मागणी ही चुकीची असून तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी व कॉम्पेनसेटरी कॉस्ट रुपये 10,000/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (6) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद सविस्तर ऐकलेला आहे. तसेच, उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये सामनेवाला यांचेबरोबर ऑफिस युनिट खरेदीबाबत करार झाला असून त्याप्रमाणे मोबदला दिला आहे व सामनेवाला हे सदर ऑफिस युनिटचे खरेदीपत्र करुन कब्जा देत नाहीत याबाबतची तक्रार आहे. तक्रारदारांनी तक्रारीत उल्लेख केलेले ऑफिस युनिट हे वाणिज्यिक प्रयोजनासाठी घेतलेचे दिसून येते. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 2(1)(ड) यातील तरतुदीचा विचार करता वाणिज्यिक प्रयोजनासाठी घेतलेल्या सेवा या ग्राहक वाद होत नाहीत. तसेच, सदरची घेतलेली सेवा ही स्वंयरोजगारासाठी घेतलेली आहे याबाबतही तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत उल्लेख केलेला नाही. सबब, ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 2 (1)(डी) यातील तरतुदीचा विचार करता तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |