(पारित व्दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य.)
(पारित दिनांक-07 नोव्हेंबर,2016)
01. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षां विरुध्द प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केली.
02. तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष कोहीनूर को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड नागपूर ही एक सहाकारी संस्था असून तिचा व्यवसाय हा जमीन विकसित करुन निवासी भूखंड विक्रीचा आहे. तक्रारकर्त्याला निवासी भूखंडाची गरज असल्याने त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) सहकारी संस्थेशी संपर्क साधला असता त्यांनी विरुध्दपक्ष क्रं-2) श्री घनश्याम कोटूमल खुबचंदानी यांचे मालकीचा भूखंड विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे तक्रारकर्त्याला सांगितले. विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थेचे अध्यक्ष यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थेने विकसित केलेला आणि विरुध्दपक्ष क्रं-2) श्री खुबचंदानी यांचे मालकीचा मौजा नारा, पटवारी हलका क्रं-11, खसरा क्रं-180/3 येथील भूखंड क्रं-98, एकूण क्षेत्रफळ- चौरसफूट एकूण किम्मत रुपये-1,25,000/- मध्ये विकत घेण्याचा सौद्दा, विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थेचे मार्फतीने, विरुध्दपक्ष क्रं-2) श्री खुबचंदानी यांचेशी दिनांक-18/02/2009 रोजी केला, त्यावेळी विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थे तर्फे तक्रारकर्त्यास सदर भूखंड विकत घेण्यास ना-हरकत-प्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शवून प्रत्यक्षात विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थे तर्फे दिनांक-13/03/2009 रोजी नाहरकत प्रमाणपत्र सहीनिशी देण्यात आले, त्यानुसार तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं-1) सहकारी संस्थेचा सभासद या नात्याने ग्राहक आहे.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं-2) श्री खुबचंदानी यांचेशी दिनांक-18/02/2009 रोजी केलेल्या भूखंड विक्रीच्या करारा प्रमाणे त्याच दिवशी बयानादाखल विरुध्दपक्ष क्रं-2) यांना रुपये-10,000/- दिले आणि उर्वरीत रक्कम रुपये-1,15,000/- प्रतीमाह रुपये-5000/- प्रमाणे 23 महिन्यात देण्याचे कबुल केले, त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) श्री खुबचंदानी यांना भूखंडाची संपूर्ण उर्वरीत रक्कम रुपये-1,15,000/- ठरल्या प्रमाणे रोख दिली. विरुध्दपक्ष क्रं-2) श्री खुबचंदानी यांनी तक्रारकर्त्याला कुठलीही पावती दिली नाही मात्र तक्रारकर्त्याने प्रत्येक वेळी विरुध्दपक्ष क्रं-2) श्री खुबचंदानी यांना रक्कम देताना अमीरउल्ला खान रहमतखान राहणार बजेरीया, नागपूर यांचे समक्ष दिलेली आहे.
तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्ष क्रं-1) सहकारी संस्थेने विकसित केलेला आणि विरुध्दपक्ष क्रं-2) श्री खुबचंदानी यांचे मालकीचा जो भूखंड विकत घेण्याचा सौदा त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) यांचे सोबत केलेला असल्याने व विरुध्दपक्ष क्रं-1) संस्थेने तक्रारकर्त्यास ना-हरकत-प्रमाणपत्र दिल्याने, विरुध्दपक्ष क्रं-1) संस्था ही कायदेशीर बाबींची पुर्तता करुन भूखंडाचे विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे नोंदवून देण्यास जबाबदार आहे. परंतु विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी तक्ररकर्त्याला मागील 02 वर्षा पासून सदर भूखंडाचा ताबा दिलेला असला तरी सदर भूखंड कायदेशीर बाबींची पुर्तता करुन त्याचे नावे वेळोवेळी विनंती करुनही नोंदवून दिलेला नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) यांनी त्याला दोषपूर्ण सेवा दिली म्हणून त्याने प्रस्तुत तक्रार दाखल करुन विरुध्दपक्षा विरुध्द खालील मागण्या केल्यात.
तक्रारकर्त्याची विरुध्दपक्षा विरुध्दची मागणी-
तक्रारकर्त्याने भूखंडाची संपूर्ण रक्कम विरुध्दपक्ष क्रं-2) यांना अदा केलेली असल्याने त्याचे नावे भूखंडाचे खरेदीखत नोंदवून देण्याचे विरुध्दपक्ष क्रं-1) आणि क्रं-2) यांना वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या आदेशित व्हावे आणि नागपूर सुधार प्रन्यासचे ना-हरकत-प्रमाणपत्र द्दावे. विरुध्दपक्ष क्रं-1) आणि क्रं-2) यांचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- व तक्रार खर्चापोटी रुपये-10,000/- विरुध्दपक्षाने देण्याचे आदेशित व्हावे,अशा मागण्या केल्यात.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) कोहीनूर को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड तर्फे शेरखान समशेरखान यांनी नि.क्रं-8 प्रमाणे लेखी उत्तर मंचा समक्ष दाखल केले. त्यांनी तक्रारकर्त्याने त्यांचे विरुध्दची केलेली संपूर्ण विधाने नाकबुल केलीत. तसेच तक्रारकर्त्याने त्यांचेशी (विरुध्दपक्ष क्रं-1) संपर्क साधून त्यांचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं-2) श्री खुबचंदानी यांचे कडून भूखंड क्रं-98 विकत घेण्याचा सौद्दा केला होता हे विशेषत्वाने नाकबुल केले. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) श्री खुबचंदानी यांचे कडून जो भूखंड विकत घेण्याचा सौद्दे करार दिनांक-18/02/2009 रोजी केला होता या बद्दल त्यांना माहिती नाही. तसेच त्यांनी तक्रारकर्त्यास भूखंड क्रं 98 संबधाने ना-हरकत-प्रमाणपत्र दिले असल्याची बाब नाकबुल करुन ते प्रमाणपत्र खोटे असल्याचे नमुद केले. तक्रारकर्त्याने कथीत भूखंड विक्री व्यवहारा संबधाने केलेली संपूर्ण विधाने आणि दिलेल्या रकमा या बाबी अमान्य केलीत. विरुध्दपक्ष क्रं-2) यांनी तक्रारकर्त्याशी केलेल्या भूखंड व्यवहारा बाबत त्यांची कोणतीही जबाबदारी येत नाही. त्यांनी तक्रारकर्त्यास कथीत भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्याचे कधीही आश्वासन दिले नाही वा ताबा दिलेला नाही. विशेष कथनात नमुद केले की, सर्व्हे क्रं-180/3 चे ले-आऊट हे अनधिकृत असून ते कृषी जमीनीवर टाकलेले आहे आणि अनधिकृत ले आऊट वरील भूखंड विक्रीवर महाराष्ट्र शासनाने बंदी आणलेली आहे व ही बाब तक्रारकर्त्यास चांगल्या प्रकारे अवगत होती. गुंठेवारी कायद्दा प्रमाणे महाराष्ट्र शासनाने अनधिकृत भूखंडा संबधाने विकास शुल्क आकारुन तो भूखंड अधिकृत करण्याची योजना जाहिर केलेली आहे परंतु तक्रारकर्त्याने भूखंड क्रं-98 अधिकृत करण्यास कोणताही प्रयत्न केलेला नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज व्हावी अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं 1) तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) श्री खुबचंदानी यांना मंचाचे मार्फतीने नोंदणीकृत डाकेने पाठविलेली नोटीस 30 दिवसां पेक्षा जास्त कालावधी उलटूनही परत आली नाही वा पोच आलेली नाही यास्तव कलम-28 (A) (3) प्रमाणे त्यांना नोटीस मिळाल्याचे मंचा तर्फे घोषीत करण्यात आले. विरुध्दपक्ष क्रं-2) श्री खुबचंदानी हे न्यायमंचा समक्ष कधीही उपस्थित झाले नाही वा त्यांनी आपले लेखी निवेदनही सादर केलेले नाही.
05. तक्रारकर्त्याने तक्रार प्रतिज्ञालेखावर दाख्ल केली असून सोबत दस्तऐवजाच्या प्रती ज्यामध्ये विक्री करारनामा, नाहरकत प्रमाणपत्राच्या प्रती दाखल केल्यात. तक्रारकर्त्याने पुराव्या दाखल स्वतःचे शपथपत्र आणि अमीरुल्लाखान रहमतखान यांचे शपथपत्र सादर केले तसेच लेखी युक्तीवाद सादर केला.
06. विरुध्दपक्ष क्रं-1) ने उत्तर प्रतिज्ञालेखावर दाखल केले.
07. तक्रारकर्त्याची तक्रार, लेखी दस्तऐवज आणि विरुध्दपक्ष क्रं-1) यांचे लेखी उत्तर तसेच उभय पक्षांचे अधिवक्ता यांचा युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष::
08. तक्रारकर्त्याचे विक्री करारा प्रमाणे वर्णनातीत भूखंड क्रं-98, एकूण क्षेत्रफळ 1000 चौरसफूट हा एकूण किम्मत रुपये-1,25,000/- मध्ये विरुध्दपक्ष क्रं-2) श्री घनश्याम कोटूमल खुबचंदानी यांचे कडून विकत घेण्यासाठी करारनामा दिनांक-18/02/2009 रोजी नोटरी कडे केलेला असून त्याच दिवशी रुपये-10,000/- बयाना दाखल दिल्याचे त्यामध्ये नमुद आहे. भूखंडाची उर्वरीत रक्कम रुपये-1,15,000/- प्रतीमाह रुपये-5000/- प्रमाणे 23 महिन्यात देण्याचे त्यामध्ये नमुद आहे. तसेच तक्रारकर्त्याने उर्वरीत रकमेच्या सुरक्षेपोटी बँक ऑफ महाराष्ट्र, जरीपटका, नागपूर येथील धनादेश क्रं-354416 रुपये-1,15,000/- चा विरुध्दपक्ष क्रं-2) श्री खुबचंदानी यांना दिल्याची बाब सुध्दा त्यामध्ये मान्य केलेली आहे. उर्वरीत रकमेची संपूर्ण परतफेड झाल्या नंतर सुरक्षेपोटी दिलेला धनादेश परत करण्यात येईल असेही त्यामध्ये नमुद आहे. तसेच विक्रीकरारात असेही नमुद आहे की, विरुध्दपक्ष क्रं-2) श्री खुबचंदानी यांनी तो भूखंड श्रीमती पावर्तीबाई सुंदरलाल हिरेन्द्रवार एवं अन्य यांचे कडून खरेदी केला होता.
09. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) कोहीनूर को-ऑपरेटीव्ह सोसायटी, नागपूर यांचे तर्फे लेटर हेडवर निर्गमित केलेले ना-हरकत-प्रमाणपत्र जे दिनांक-13/03/2009 रोजीचे आहे त्याची प्रत दाखल केली, त्यामध्ये श्री विशाल कुमार आणि श्रीमती पावर्तीबाई सुंदरलाल हिरेन्द्रवार हे संस्थेचे सभासद असून त्यांनी भूखंड क्रं 98, एकूण क्षेत्रफळ 1000 चौरसफूट विरुध्दपक्ष फर्मने टाकलेल्या ले आऊट मधील खरेदी केलेला आहे. सबब सदर भूखंड (तक्रारकर्ता) श्री चंदुकुमार अर्जुनदास बुधवानी यांना विकण्यास संस्था परवानगी देत आहे तसेच प्लॉट घेणारी व विकणारी व्यक्ती हे संस्थेचे सभासद असून संस्थेचे सर्व अटी व नियम पूर्णपणे मान्य आहे.
10. यावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने जो कथीत भूखंड क्रं-98 विकत घेण्याचा नोटरी कडे करार विरुध्दपक्ष क्रं-2) श्री घनश्याम कोटूमल खुबचंदानी यांचे सोबत दिनांक-18/02/2009 रोजी केलेला आहे तो मूळातच तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं-2) श्री खुबचंदानी यांचेमधील व्यवहार आहे परंतु सदरचा भूखंड हा मूळात विरुध्दपक्ष क्रं-1) सहकारी संस्थेचे मालकीचा
भूखंड आहे आणि त्यामुळे तक्रारकर्ता हा अप्रत्यक्ष्यरित्या विरुध्दपक्ष क्रं-1) सहकारी संस्थेचा ग्राहक आहे, जरी भूखंड खरेदी व्यवहार हा तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं-2) श्री खुबचंदानी यांचे मध्ये झालेला आहे, त्यामुळे ही तक्रार ग्राहक संरक्षण कायद्दातील तरतुदी अंतर्गत मोडते.
11. विरुध्दपक्ष क्रं-1) कोहीनूर को-ऑपरेटीव्ह सोसायटी, नागपूर यांचे तर्फे लेटर हेडवर निर्गमित केलेले दिनांक-13/03/2009 रोजीचे ना-हरकत-प्रमाणपत्र त्यामध्ये श्री विशाल कुमार आणि श्रीमती पावर्तीबाई सुंदरलाल हिरेन्द्रवार हे संस्थेचे सभासद असून त्यांनी भूखंड क्रं 98, एकूण क्षेत्रफळ 1000 चौरसफूट विरुध्दपक्ष फर्मने टाकलेल्या ले आऊट मधील खरेदी केलेला असल्याचे नमुद केलेले आहे. थोडक्यात वादातील भूखंड क्रं-98 हा मूळात कोहीनूर हाऊसिंग सोसायटीने टाकलेल्या ले आऊट मधील असून तो निरनिराळया व्यवहारा व्दारे हस्तांतरीत झालेला असून आता तक्रारकर्त्याचे नावे कराराव्दारे हस्तांतरीत झालेला आहे.
12. जो पर्यंत करारातील भूखंडाचे विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे नोंदविल्या जात नाही तो पर्यंत तक्रारीचे कारण हे सतत घडत असल्याने (Cause of Action is continuing) या तक्रारीत मुदतीची बाधा येत नाही.
13. तक्रारकर्त्याने भूखंडाचे एकूण किंमतीपोटी बयानादाखल रक्कम देताना उर्वरीत रक्कम रुपये-1,15,000/- चे सुरक्षेपोटी बँक ऑफ महाराष्ट्र, जरीपटका, नागपूर येथील धनादेश क्रं-354416 विरुध्दपक्ष क्रं-2) श्री खुबचंदानी यांना दिल्याची बाब करारात नमुद आहे. तसेच भूखंडाची संपूर्ण रक्कम रुपये-1,25,000/- विरुध्दपक्ष क्रं-2) श्री खुबचंदानी यांना वेळोवेळी रोख स्वरुपात दिल्या बद्दल आणि त्यांनी तक्रारकर्त्याला कुठलीही रितसर पावती दिलेली नसल्या बाबत, ज्यांच्या समोर हा रोख रकमेचा वेळोवेळी व्यवहार झाला त्या अमीरुल्लाखान रहमतखान यांचा प्रतिज्ञालेख प्रकरणात दाखल केलेला आहे.
तसेच तक्रारकर्त्याच्या म्हणण्या प्रमाणे भूखंड क्रं-98 वर त्याचा सध्या कब्जा आहे व ही बाब विरुध्दपक्ष क्रं-1) यांना सुध्दा मान्य आहे. तसेच तक्रारकर्त्याने भूखंडाच्या उर्वरीत रकमेच्या सुरक्षेपोटी दिलेल्या रुपये-1,15,000/- संबधाने कोणताही विवाद तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं-2) यांच्यामध्ये निर्माण झाल्याची बाब मंचा समोर आलेली नाही आणि भूखंडाचा ताबा सध्या तक्रारकर्त्याचेच कब्ज्यात आहे असे खुद्द तक्रारकर्त्याचे प्रतिज्ञालेखावरील कथन आहे तसेच विरुध्दपक्ष क्रं-2) श्री खुबचंदानी हे मंचा समक्ष हजर झालेले नाहीत व त्यांनी तक्रारकर्त्याची सदरची विधाने खोडून काढलेली नाहीत. तक्रारकर्त्याची तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल आहे तसेच सदर भूखंड आणि त्याचे पेमेंट या संबधी जो व्यवहार तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं-2) श्री खुबचंदानी यांचेमध्ये झालेला आहे तो अमीरुल्लाखान रहमतखान यांचे उपस्थितीत झालेला असून त्यांनी सुध्दा प्रतिज्ञालेखावर आपले म्हणणे दिलेले आहे. परंतु करारा प्रमाणे भूखंडाची उर्वरीत रक्कम रुपये-1,15,000/- तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) ला दिल्या बाबत विरुध्दपक्ष क्रं-2) तर्फे निर्गमित कोणतीही पावती तक्रारकर्त्याने पुराव्या दाखल केलेली नाही, तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, त्याला विरुध्दपक्ष क्रं-2) यांनी रक्कम मिळाल्या बाबत एकही पावती दिलेली नाही. तक्रारकर्त्याने ज्यांच्या समोर हा रक्कम देण्या घेण्याचा व्यवहार झाला त्या अमीरुल्लाखान रहमतखान यांचा प्रतिज्ञालेख प्रकरणात दाखल केलेला आहे परंतु केवळ तिस-या व्यक्तीचे प्रतिज्ञालेखाचे आधारे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) ला भूखंडाची उर्वरीत रक्कम रुपये-1,15,000/- अदा केली या व्यवहारावर विश्वास ठेवणे अत्यंत कठीण आहे आणि विरुध्दपक्ष क्रं-2) सुध्दा मंचा समक्ष हजर झालेला नाही वा त्याची बाजू मंचा समोर आलेली नाही. अशापरिस्थितीत तक्रारकर्त्याला करारातील भूखंड हवा असल्यास त्याने भूखंडाची उर्वरीत रक्कम रुपये-1,15,000/- विरुध्दपक्ष क्रं-2) श्री घनश्याम कोटूमल खुबचंदानी यांना देण्याची तयारी दर्शवावी. जर विरुध्दपक्ष क्रं-2) श्री घनश्याम खुबचंदानी यांनी
तक्रारकर्त्या कडून भूखंडाची उर्वरीत रक्कम मिळाल्याची बाब मान्य केली तर तो तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं-2) यांचे आपसी समझोत्याचा एक भाग राहिल. अशा परिस्थितीत परिस्थितीजन्य पुरावे पाहता वरील अटी व शर्तीसह तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्षां विरुध्द मंजूर होण्यास पात्र आहे, त्यावरुन, आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(1) तक्रारकर्ता श्री चंद्रकुमार अर्जुनदास बुधवानी यांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांचे विरुध्द खालील अटी व शर्तीवर अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) सहकारी संस्थेने टाकलेल्या ले-आऊट मधील भूखंडाचा, विरुध्दपक्ष क्रं-2) सोबत आहे त्या स्थितीत भूखंड विक्रीचा करारनामा केलेला असल्याने भूखंडाची नोंदणीकृत विक्री होण्याचे दृष्टीने त्वरीत भूखंड नियमितीकरणाची आवश्यकता असल्यास त्यासाठी शासकीय नियमा नुसार देय असलेले भूखंड नियमितीकरण शुल्क तक्रारकर्त्याने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 60 दिवसांचे आत सक्षम शासकीय यंत्रणेचे कार्यालयात भरावे व संबधित शासकीय यंत्रणेने शासकीय नियमानुसार ते शुल्क तक्रारकर्त्या कडून स्विकारावे. या कामात विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) श्री खुबचंदानी यांनी सुध्दा तक्रारकर्त्यास आवश्यक ते सहकार्य करावे.
(3) विरुध्दपक्ष क्रं-2) श्री घनश्याम कोटूमल खुबचंदानी यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्या सोबत दिनांक-18/02/2009 रोजी करुन दिलेल्या विक्री करारनाम्या नुसार मौजा नारा, पटवारी हलका क्रं-11, खसरा नंबर-180/3 भूखंड क्रं-98, एकूण क्षेत्रफळ-1000 चौरसफूट (92.93चौरसमीटर) भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे त्याचे कडून करारातील भूखंडापोटी घेणे असेलेली उर्वरीत रक्कम रुपये-1,15,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष पंधरा हजार फक्त)
स्विकारुन करारातील भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र त्याचे नावे निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 90 दिवसांचे आत नोंदवून द्दावे. भूखंड विक्रीपत्रासाठी लागणारी आवश्यक नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्काचा भरणा तक्रारकर्त्याने स्वतः सहन करावा. विरुध्दपक्ष क्रं-2) ने भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्त्याला नोंदवून देताना भूखंडा संबधीत आवश्यक ते सर्व दस्तऐवज पुरवावेत तसेच भूखंडाचा ताबा दिल्या बाबत ताबापत्र द्दावे.
(4) विरुध्दपक्ष क्रं-1) कोहीनूर को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड व्दारा अध्यक्ष यांना आदेशित करण्यात येते की, तक्रारकर्त्याचे नावे सहकारी संस्थेने टाकलेल्या ले-आऊट मधील भूखंडाची नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदविल्या नंतर तक्रारकर्त्याला शासन नियमा नुसार विरुध्दपक्ष क्रं-1) सहकारी संस्थेचे सदस्य म्हणून समाविष्ट करावे.
(5) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.