जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्षा-सौ.वी.वी.दाणी. मा.सदस्या-सौ.एस.एस.जैन.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – १३५/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २८/०८/२०१२
तक्रार निकाली दिनांक – २१/०६/२०१३
श्री.श्रावण सखाराम माळी. ----- तक्रारदार.
उ.व.५३, धंदा-शेती.
राहणार-दहिवेल.ता.साक्री.
जि.धुळे.
विरुध्द
(१)किवी बायोजीन सीड्स प्रा.लि. ----- सामनेवाले.
प्लॉट नं.२०, विजयशांती,इनप्लेव,
एनएच-७,कोम्लाय,सिकंदराबाद-१४.
(२)मे.समर्थ कृषी सेवा केंद्र.
प्रो.श्री.सुधीर हिरालाल देवरे.
मेनरोड,दहिवेल,ता.साक्री,जि.धुळे.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.वी.वी.दाणी.)
(मा.सदस्याः सौ.एस.एस.जैन.)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.डी.डी.जोशी.)
(सामनेवाले क्र.१ तर्फे – वकील श्री.ओ.एस.तिपोळे.)
(सामनेवाले क्र.२ तर्फे – वकील श्री.यु.व्ही.मराठे.)
------------------------------------------------------------------------
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.वी.वी.दाणी.)
(१) तक्रारदारांनी, सामनेवाले यांच्याकडून सदोष बियाण्यापोटी नुकसान भरपाई मिळणेकामी सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाले नं.१ यांनी उत्पादीत केलेले “ किवी ४०, KBS-11-CF-8-1” हे फलॉवर बियाणे सामनेवाले नं.२ यांच्याकडून विकत घेतले. तसेच दि.०२-०१-२०१२ रोजी त्याची नर्सरी तयार करुन, पूर्ण लागवड दि.२४-०१-२०१२ रोजी पूर्ण केली. त्यावेळी आवश्यक असणारे शेणखत, किटक नाशके दिलीत व जंतुनाशकाची फवारणी केली. यामुळे पिकाची उगवण व वाढ चांगली झाली परंतु प्रत्यक्षात फुलकोबी लागलीच नाही.
त्यामुळे दि.२६-०४-२०१२ रोजी क्रृषि अधिकारी, पंचायत समिती, साक्री यांच्याकडे अर्ज केला. त्याप्रमाणे दि.०३-०५-२०१२ रोजी सदर शेतजमीन पिकाची त्यांनी पाहणी केली व पिकाचा प्रत्यक्ष पंचनामा करुन सदोष बियाण्यामुळे फुलकोबी पिकाचे उत्पन्न येणार नाही, असे मत व्यक्त केले आहे. तज्ज्ञ व्यक्तिंच्या मतावरुन सामनेवाले नं.१ यांनी सदोष बियाणे उत्पादीत केले आहे आणि ते सामनेवाले नं.२ मार्फत विक्री केले आहे. त्यामुळे दोन्ही सामनेवाले तक्रारदारास नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. तक्रारदार यांना उत्पन्न न मिळाल्याने त्याकामी येणारा खर्च असे एकूण रु.५,७९,२००/- चे नुकसान झालेले आहे. ही नुकसान भरपाई देण्यास सामनेवाले जबाबदार आहेत. त्याकामी सामनेवाले यांनी दि. २८-०५-२०१२ रोजी नोटिस पाठविली. परंतु त्याप्रमाणे सामनेवाले यांनी पुर्तता केली नाही. सबब सदरचा तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले आहे.
(३) तक्रारदारांची विनंती अशी आहे की, सामनेवाले यांचेकडून रक्कम रु.५,७९,२००/- आणि आर्थिक, शारीरिक व मानसिक ञासापोटी रक्कम रु.५०,०००/- १२ टक्के व्याजासह मिळावेत. तसेच तक्रार अर्जाचा खर्च मिळावा.
(४) सामनेवाले नं.१ यांनी त्यांची कैफीयत देऊन सदरचा अर्ज नाकारला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांनी बियाणे खरेदी केले हे मान्य आहे. परंतु प्रत्यक्षात सदर पिकास फुलकोबी लागलीच नाही हे म्हणणे खरे नाही. सदर बियाणे हे चुकीचे व सदोष नव्हते व नाही. त्यामुळे तक्रारदाराच्या नुकसानीस सामनेवाले हे जबाबदार नाहीत. सदर बियाणे हे वेगवेगळया विक्रेत्यांमार्फत अनेक शेतक-यांना विक्री केलेले आहे. परंतु इतर कुठल्याही शेतक-याची त्या बाबत तक्रार नाही. तक्रारदार यांनी पिकाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत केव्हाही तक्रार केलेली नाही. तसेच बियाण्याच्या गुणवत्तेबाबत समितीने कुठलाही अहवाल दिलेला नाही. पिकाचे उत्पन्न हे पूर्णपणे हवामान, तापमान, खते, खतांची माञा, किटक नाशके, इत्यादीवर अवलंबून असते. सदर पंचनामा हा शासन परिपञकाप्रमाणे केलेला नाही. सदरचा तक्रार अर्ज हा तक्रारदाराने गैरहेतूने दाखल केलेला आहे. त्यामुळे सदरचा अर्ज खर्चासह रद्द करण्याची मागणी केली आहे.
(५) सामनेवाले नं.२ यांनी त्यांची कैफीयत देऊन सदरचा अर्ज नाकारला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, सामनेवाले नं.२ हे बियाणे कंपनीचे वितरक आहेत. बियाणे वितरक कंपनीने तयार केलेले बियाणे जसे आहे तसे विक्री करण्याची त्यांची जबाबदारी आहे. त्याप्रमाणे कंपनीचे बियाणे त्यांनी विक्री केले आहे. सबब बियाण्यातील असलेल्या दोषास अथवा त्यामुळे तक्रारदारांच्या होणा-या नुकसानीस सामनेवाले नं.२ जबाबदार नाही. सदरची तक्रार त्यांचे विरुध्द रद्द करावी अशी विनंती केली आहे.
(६) तक्रारदारांचा अर्ज, शपथपञ, कागदपञ एकूण १ ते १२ तसेच सामनेवाले नं.१ व २ यांचा संयुक्तिक खुलासा, शपथपञ, कागदपञ एकूण १ ते १६ पुराव्याचे शपथपञ आणि सामनेवाले नं.१ यांची कैफीयत, शपथपञ, कागदपञ एकूण १ ते ३, लेखी युक्तिवाद व दाखल न्यायनिवाडे तसेच सामनेवाले नं.२ यांचा खुलासा, शपथपञ पाहता तसेच तक्रारदारांच्या विद्वान वकीलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे सामनेवाले नं.१ व २ यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब)सामनेवाले यांच्या सेवेत ञृटी स्पष्ट होते काय ? | : नाही. |
(क)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे. |
विवेचन
(७) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सदर बियाणे खरेदी केल्याची पावती पान नं.९ वर दाखल केलेली आहे. सदर पावती पाहता ती तक्रारदारांचा मुलगा नामे आबासाहेब श्रावण माळी यांच्या नांवे असून त्यावर “ किवी ४०, KBS-11-CF-8-1” हे फलॉवर बियाणे सामनेवाले नं.२ यांच्याकडून दि.२७-१२-२०११ रोजी, १० ग्रॅम पॅकींगचे एकूण १२ नग म्हणजेच एकूण १२० ग्रॅम प्रत्येकी रु.३५०/- या प्रमाणे एकूण रक्कम रु.४२००/- किमतीस विकत घेतल्याची नोंद आहे. सदर पावतीचा विचार करता तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. म्हणून मुद्दा क्र. “अ” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांनी सदर बियाण्याची योग्य त्या पध्दतीने लागवड स्वत:चे शेतात केल्यानंतर त्याचे उत्पादन आले नाही त्या बाबत कृषिअधिकारी पंचायत समिती, साक्री, जि.धुळे यांचेकडे दि.२६-०४-२०१२ रोजी तक्रार अर्ज केला आहे. त्यानंतर जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समिती यांनी दि.०३-५-२०१२ रोजी पिक परिस्थितीचा पंचनामा केलेला आहे. सदर पंचनामा पान नं. १२ वर दाखल आहे. सदर पंचनामा पाहता यामध्ये फलॉवर पिकाची उगवण चांगली, पिकाची वाढ चांगली, पिकावर किडीचा प्रादुर्भाव नाही, पिकात आंतर्गत मशागत उत्तम, पिकात इतर वाणांची भेसळ नाही, असे नमूद केलेले आहे. तसेच या मुद्यांचा विचार घेऊन अभिप्राय नमूद केला आहे की, फलॉवर पिकाची क्षेञ पाहणी केली असता सदर पिकास फुलकोबीचा गड्डा आढळून आला नाही. हे पिक प्रामुख्याने रब्बी हंगामाचे असून, कंपनीने उन्हाळी हंगामासाठी सुध्दा शिफारस केलेली आहे. सदर पिकास उत्पन्न आलेले नाही. यावरुन असे निदर्शणास येते की, सदरच्या सदोष बियाण्यामुळे फुलकोबी पिकाचे उत्पन्न येणार नाही असे मत व्यक्त केले आहे.
यावरुन असे दिसते की, तक्रार निवारण समितीने पाहणी केली परंतु फुलकोबीच्या पिकास गड्डा हा आलेला नाही व येणार नाही असे केवळ मत व्यक्त केलेले आहे परंतु पिक न येण्याबाबत कोणताही खुलासा व परिस्थिती नमूद केलेली नाही. या पंचनाम्यावरुन असे स्पष्ट होते की, बियाण्यात भेसळ नाही व फुलकोबीचे पिक हे चांगले आले आहे परंतु गड्डा आलेला नाही. या पंचनाम्यासोबत बियाणे कंपनीच्या प्रतिनिधीची साक्ष नोंद केलेली आहे. त्यामध्ये, फुलकोबीचे गड्डे लागले नाहीत परंतु तुरळक ठिकाणी गड्डे लागलेले आहेत असे नमूद आहे. या पुष्टयर्थ तक्रारदार यांनी तक्रारदारांच्या शेतातील पिकाचे फोटो दाखल केलेले आहेत. सदर फोटो पाहता या फोटोमध्ये पिकास फुलकोबीचे गड्डे आलेले दिसत आहे. त्याचप्रमाणे योग्य व पुरेसे उत्पन्न आलेले दिसत नाही. याचा विचार होता सदर फुलकोबीच्या पिकास एकही गड्डा आला नाही असे नाही, तर पिक हे आलेले आहे परंतु अपक्षीत उत्पादन मिळालेले नाही. यावरुन सदर पिकास कमी प्रमाणात गड्डे आलेले आहेत ही बाब स्पष्ट होत आहे.
सदर पंचनाम्यामध्ये पिक न येण्याबाबत कोणतेही ठोस कारण दिलेले नसल्यामुळे, तक्रारदारांनी कृषिअधिका-यांना कोणतीही विचारणा केलेली नाही किंवा बियाणे सदोष असल्याबाबतचा इतर कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तसेच इतर शेतक-यांचा प्रतिज्ञापञावर पुरावा दाखल केलेला नाही. याचा विचार होता सदर बियाण्यामध्ये दोष नसून पिकाची उत्तम वाढ झालेली आहे. परंतु सदर पिकास उत्तम उत्पादन मिळालेले नाही, या परिस्थितीस आमच्यामते त्यावेळचे हवामान, पाऊस, खतांची माञा, किटकांचा प्रादुर्भाव इत्यादी गोष्टी कारणीभुत झालेल्या दिसत आहेत. केवळ सदोष बियाणे ही एक बाब असू शकत नाही असे आमचे स्पष्टपणे मत आहे. त्यामुळे सदर बियाण्यात दोष नाही हे सिध्द होत आहे.
(९) सामनेवाले कंपनीने असा बचाव घेतला आहे की, सदर बियाणे सदोष नाही व पिकाचे उत्पन्न येण्याकामी हवामान, तापमान, खते, किटकनाशके इत्यादी बाबी अवलंबून असतात. परंतु या बाबत सामनेवाले यांनी कृषि विषयक कोणतेही माहितीपञक दाखल केलेले नाही. सामनेवाले यांनी सदर रोपे तयार करण्याचा परवाना दाखल केलेला आहे. तसेच त्या बाबत बियाण्याचा रिपोर्ट दाखल केलेला आहे. या सर्व बाबीचा विचार होता, सामनेवाले नं.१ यांच्या सेवेत ञृटी स्पष्ट होत नाही.
(१०) सामनेवाले नं.२ हे सामनेवाले नं.१ या कंपनीचे वितरक आहेत. त्यांनी कंपनीने उत्पादीत केलेले बियाणे केवळ तक्रारदारास विक्री केले आहे. त्यामुळे बियाण्यातील दोषास वितरक जबाबदार होणार नाही. सामनेवाले नं.२ यांनी बियाणे भेसळ केल्याबाबत तक्रारदारांचे म्हणणे नाही, तसेच पुरावाही नाही. त्यामुळे तक्रारदारांच्या होणा-या नुकसानीसही वितरक जबाबदार नाही असे आमचे मत आहे. यावरुन सामनेवाले नं.२ यांच्या सेवेत ञृटी स्पष्ट होत नाही. या बाबीचा विचार करता मुद्दा क्र. “ब” चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(११) तक्रारदार यांनी त्यांच्या कथनाचे पुष्टयर्थ खालील न्यायनिवाडे दाखल केले आहेत.
· 2002 (III) CPJ 283 (NC)
Maharashtra Hybrid Seed Co.Ltd. Vs Annapureddy
सामनेवाले यांनी त्यांच्या कथनाचे पुष्टयर्थ खालील न्यायनिवाडे दाखल केले आहेत.
धुळे.