जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 876/2008
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः – 21/07/2008
सामनेवाला यांना नोटीस लागलेली तारीखः 19/08/2008
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 13/08/2009
संजय देवचंद परदेशी,
उ.व.40 वर्षे, धंदाःशेती,
मु.पो.पिंपळगांव, ता.भडगांव, जि.जळगांव. .......... तक्रारदार
तक्रारदार स्वतःसाठी व मयत आई
रखुमाबाई देवचंद परदेशी यांचेसाठी
विरुध्द
श्री.किशोर मिस्तरी,
उ.व.सज्ञान, धंदाः बांधकाम ठेकेदार,
मु.पो.भडगांव, ता.भडगांव, जि.जळगांव. ....... सामनेवाला.
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 13/08/2009)
(निकाल कथन न्याय मंच अध्यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून )
तक्रारदार तर्फे श्री.हेमंत अ.कुलकर्णी वकील हजर
सामनेवाला तर्फे श्री.प्रकाश बी.तिवारी वकील हजर.
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. तक्रारदार याचे मालकीचे मौजे पिंपळगांव ग्रामपंचायत हद्यीतील घर जुने व पडके झाले असल्याने तक्रारदाराने त्याचे स्वतःचे रहीवासासाठी सन 2008 या वर्षी नवीन सिमेंट कॉन्ट्रॅक्ट मध्ये बांधकाम करण्याचे ठरविले व सामनेवाला यांचेशी भेटुन तक्रारदार व सामनेवाला यांचेत झालेल्या करारानुसार तक्रारदाराने सामनेवाला यास रक्कम रु.65,000/- येवढे बांधकामाच्या गतीनुसार अदा करावयाचे होते त्यानुसार तक्रारदाराने दि.12/1/2008 रोजी सामनेवाला यास बयाणा रक्कम रु.50,000/- अदा केल्यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदाराचे घराचे बांधकाम सुरु केले. तक्रारदार हा सामनेवाला यास वेळोवेळी बांधकामास लागणारे साहीत्य विटा, सिमेंट, वाळु, बांधकाम कारागीरांचा मजुरी यासाठी लागणारा पैसा इत्यादी वेळोवेळी सामनेवाला यांचे मागणीनुसार लागलीच अदा करीत असे. तथापी सामनेवाला हा सदरच्या बांधकामासाठी आवश्यक ते मटेरियल वापरत नव्हता व लेखी करारानुसार आवश्यक विटा सिमेंट वाळु लोखंड बांधकामाचे प्रमाणीत सुत्र यांचा वापर करीत नसल्याचे तक्रारदाराचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार हा सामनेवाला यास वेळोवेळी सांगत असे परंतु सामनेवाला त्यास कोणतीही दाद देत नसे. सामनेवाला यांनी निकृष्ठ प्रतीचे बांधकाम करणे सुरुच ठेवल्याने तक्रारदाराने बांधकाम थांबविणेचे सामनेवाला यास वेळोवेळी सांगीतले तथापी सामनेवाला यांनी त्यास दाद दिली नाही. दि.9/4/2008 रोजी तक्रारदार हा त्याचे आईचे मदतीने बांधकामावर पाणी ओतत असतांना अचानकपणे तक्रारदार पाणी देत असलेली भिंत कोसळली व त्यात तक्रारदार व त्याची आई गंभीर जखमी झाले व सदर अपघातात उपचार घेत असतांना तक्रारदाराची आई दि.24/4/2008 रोजी मयत झाली. तक्रारदाराचे करारात ठरल्याप्रमाणे बांधकाम न करता निकृष्ठ दर्जाचे बांधकाम करुन तसेच तक्रारदाराचे आईस सदर निकृष्ठ प्रतीचे बांधकामात झालेल्या अपघातात प्राणास मुकावे लागुन सामनेवाला यांनी तक्रारदारास सदोष व दोषरहीत सेवा दिलेली आहे. सबब तक्रारदारास सामनेवाला यांचेकडुन करारात ठरलेनुसार बांधकामापोटी दिलेली रक्कम रु.76,700/- देणेचे आदेश व्हावेत, डॉक्टर खर्च रक्कम रु.15,000/-, तक्रारदाराचे आई करिता झालेला औषधोपचार खर्च रु.31,800/- तसेच तक्रारदाराचे आईचे मृत्युस सामनेवाला कारणीभुत झालेने सामनेवाला याचेकडुन रक्कम रु.1,50,000/- एवढी रक्कम देण्याचे आदेश व्हावेत, तक्रारीचा खर्च रु.10,000/- व कराराप्रमाणे सामनेवाला यांनी बांधकाम न केल्याने अपुर्ण बांधकामास येणारा खर्च रु.30,000/- सामनेवाला यांचेकडुन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.
2. सामनेवाला यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. तक्रारदाराची संपुर्ण तक्रार लबाडीची व खोटारडेपणाची असुन ती सामनेवाला यास मान्य नाही. तक्रारदाराने त्याच्या स्वतःच्या अटी शर्तीवर को-या कागदावर करार लिहुन आणला होता व त्यावर सामनेवाला यांची बेकायदेशीररित्या सही घेतली आहे. सामनेवाला हा किरकोळ बांधकाम करुन देण्याचा व्यवसाय असलेला इसम आहे. तक्रारदाराने सामनेवाला यास घराचे होऊ घातलेल्या बांधकामाची जागा दाखवुन रक्कम रु.65,000/- मध्ये बांधकाम देतो असे सांगुन सामनेवाला यास रक्कम रु.50,000/- बयाणापोटी देऊन काम सुरु करण्यास सांगीतले होते. त्यावेळी तक्रारदारास त्याचे उत्तरेकडील भिंतीचे बांधकामाबाबत सामनेवाला यांनी शंका काढुन प्रश्न उपस्थित केला होता की, तुमचे व शेजा-याची भिंत एकत्रीत बांधकाम करणार आहात काय त्यावेळी तक्रारदाराने सांगीतले की, शेजा-याची भिंत सोडुन 9 इंच जागा सोडुन मला बांधकाम करावयाचे आहे तसे तु मला करुन द्यावे. त्यावेळी पाया खणुन त्यावर भिंत बांधल्यानंतर त्याचे आजुबाजूस होणारे गडडे भरुन काढण्याचे तक्रारदाराने कबुल केले होते परंतू बांधकामावर पाणी मारण्याचे काम तक्रारदाराने स्वतःकडे न घेता सामनेवाला यांचेवर सोपविले होते. त्यावेळी सामनेवाला यांनी पाया खणुन तक्रारदाराने सांगीतलेल्या जागेवर भिंतीचे बांधकाम सुरु केले. सामनेवाला यांनी त्यावेळी तक्रारदाराकडे रक्कमेची मागणी केली असता तक्रारदाराने रक्कम देण्यास टाळाटाळ केली. साधारणपणे दि.7/4/2008 रोजी पाया भरुन त्यावर भिंतीचे बांधकाम सामनेवाला यांनी पुर्ण केले व तक्रारदाराकडे रक्कमेची मागणी केली त्यावेळी तक्रारदाराने सामनेवाला यास बांधकाम पुर्ण कर नाहीतर बदनामी करेल असे सांगुन रक्कम देण्यास नकार दिला. त्यानंतर सामनेवाला यांनी सदरच्या कामाकडे दुर्लक्ष करुन रक्कम मिळेल त्यावेळी काम करु असा विचार केला होता व त्यानंतर सामनेवाला हे बांधकाम करणेकामी अथवा बांधकामावर पाणी मारणेकामी गेले नव्हते. त्यामुळे पुढे त्या बांधकामावर काय झाले याची कोणतीही कल्पना सामनेवाला यांना नाही. स्वतःचे पैसे खर्च करुन उत्कृष्ठ मटेरियल चा वापर करुन सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या भिंती उभ्या केलेल्या होत्या. तथापी त्यानंतर तक्रारदाराने सामनेवाला यांचे पैसे न दिल्याने सामनेवाला यांनी हेतुपुर्वक बांधकाम केले नाही अगर बांधकामावर पाणी मारण्यास सामनेवाला अगर त्याचे मजुर गेलेले नव्हते व नाहीत. त्यामुळे तक्रारदाराने तक्रारीत नमुद केलेल्या मजकुराशी सामनेवाला यांचा काहीएक संबंध नाही. सामनेवाला यांची देणे असलेली रक्कम बुडवण्याचे हेतुने तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज रद्य करण्यात यावा व सामनेवाला यांची राहीलेली रक्कम व्याजासह तक्रारदाराने देणेबाबत आदेश व्हावेत, आर्थिक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- मिळावेत अशी विनंती सामनेवाला यांनी केली आहे.
3. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे अवलोकन केले असता व उभयंतांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1) सामनेवाला यांनी निकृष्ठ प्रतीचे बांधकाम केल्याचे
तक्रारदाराने सिध्द केले आहे काय ? नाही.
2) असल्यास काय आदेश ? शेवटी दिलेप्रमाणे.
मुद्या क्र.1
4. तक्रारदाराची आई सुरु असलेल्या बांधकामाची भिंत पडून, सदरील दुर्घटनेत त्या मृत्यु पावलेल्या आहेत. हे थोडयावेळाकरिता जरी ग्राहय धरले तरी सामनेवाला यांनी त्यांचे बांधकामात निकृष्ठ प्रतीचे सामान उदा.सिमेंट, वाळु, विट इत्यादी वापरले होते याबाबतचा बांधकाम क्षेत्रातील तज्ञाचा अहवाल तक्रारदार यांनी तक्रारीत सादर केलेला नाही. सबब तज्ञांच्या अहवालाच्या अनुपस्थितीत सामनेवाला यांनी बांधकामात निकृष्ठ प्रतीचा सामान वापरला हे सिध्द होत नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना बांधकामाचे करारनाम्यापोटी किती रक्कम दिली याचा कोणताही पुरावा तक्रारीत दाखल केलेला नाही. सबब तक्रारदार यांनी करारनाम्याप्रमाणे सामनेवाला यांना उर्वरीत रक्कम देऊन त्यांचे बांधकाम पुर्ण करुन घ्यावे. सबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
( अ ) तक्रारदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो.
( ब ) खर्चाबाबत आदेश नाही.
ज ळ गा व
दिनांकः- 13/08/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष