::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 22/11/2016 )
आदरणीय, अध्यक्ष श्रीमती एस.एम.उंटवाले यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सदर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चा संयुक्त लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्तीचे प्रतिउत्तर व उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन मंचाने खालील प्रमाणे निर्णय नमुद केला.
उभय पक्षाला ह्या बाबी कबुल आहेत की, तक्रारकर्ती व विरुध्दपक्ष यांचेमध्ये विरुध्दपक्षाच्या सिध्दी विनायक सिटी नावाच्या डुप्लेक्स / रो हाऊस क्र. 2, ज्याचे तळमजला व पहीला मजला मिळून एकूण बिल्टअप बांधकाम क्षेत्रफळ 92.38 चौ. मिटर मधील एक हॉल, एक बेडरुम, किचन, संडास, बाथरुम व पहील्या मजल्यावर एक बेडरुम व संडास बाथरुम ह्या बांधकामासह, तसेच ह्या डुप्लेक्स खालील प्लॉट क्र. 32 मधील 79,92 चौ. मिटर जागेसह रु. 15,51,000/- या रकमेत विकत घेण्याचा सौदा झाला होता व त्यानंतर दि. 21/1/2014 रोजी रजिस्टर खरेदी खताद्वारे याची खरेदी तक्रारकर्तीने केली होती, त्यामुळे तक्रारकर्ती विरुध्दपक्षाची ग्राहक आहे, या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.
तक्रारकर्तीचा युक्तीवाद असा आहे की, सदर डुल्पेक्स / रो हाऊसचे बांधकाम करतांना विरुध्दपक्षाने खालील प्रमाणे सुख सुविधा पुरविण्याबाबतची हमी दिली होती.
- सदर डुप्लेक्सला तिन्ही बाजुने वॉल कंपाउंड बांधून देण्याची हमी दिली होती.
- टॅरेसवर टाईल्स लावून देण्याची हमी दिली होती, तसेच तळ मजल्यावरच्या टॅरेसवर छपाई करुन देण्याची हमी दिली होती.
- तसेच संपुर्ण डुप्लेक्स / रो हाऊस ला उच्च प्रतीची रंगरंगोटी करुन देण्याची हमी दिली होती.
- तसेच प्रत्येक डुप्लेक्स / रो हाऊस ला एक स्वतंत्र सेप्टीक टँक तयार करुन देण्याची हमी दिली होती.
- बाथरुम मध्ये 7 फुटा पर्यंत चारही भिंतींना टाईल्स लावून देण्याची हमी दिली होती.
- तसेच डुप्लेक्स / रो हाऊसच्या प्रत्येक रुम मध्ये 2X2 ची वेट्रीफाईड टाईल्स लावून देण्याची हमी दिली.
- तसेच किचन मध्ये मार्बलचा ओटा व स्टेनलेस स्टील सिंक व डेडो ग्लेझेड टाईल्स लावून देण्याची हमी दिली होती.
- दरवाजे हे लेमिनेटेड व उत्कृष्ट सागवानी लाकडाचे लावून देण्याची हमी दिली होती. तसेच खिडक्या ह्या स्लायडींगच्या लावून देण्याची हमी दिली होती.
- प्रत्येक डुप्लेक्स / रो हाऊस पर्यंत पक्के रस्ते तसेच रस्त्यांवर पथदिवे लावून देण्याची हमी दिली होती.
- विद्युत पुरवठा योग्य दाबाने व्हावा या करिता स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसवून 3 अश्वशक्तीचा विद्युत पुरवठा देण्याची हमी दिली होती.
- योग्य व उत्कृष्ट दर्ज्याचे इले. फिटींगचे साहीत्य वापरण्याची हमी दिली हेाती.
- पाण्याचे बोअरवेल योग्य खोली पर्यंत खोदुन पाण्याचा पुरवठा सतत व अखंडीतपणे होईल, हयाची हमी दिली होती.
- वाटर हार्वेस्टींग टँक बसवून देण्याची हमी दिली होती.
- पहील्या मजल्यावर असलेल्या संडास बाथरुम मध्ये चारही भिंतींना 7 फुट टाईल्स लावून देण्याची हमी दिली होती.
- सांडपाण्याची स्वतंत्र व्यवस्था करुन देण्याची हमी दिली होती.
- तसेच इतरही सुखसुविधा पुरविण्याची हमी दिली होती.
परंतु ताबा घेतांना तक्रारकर्तीच्या असे लक्षात आले की, विरुध्दपक्षाने ह्या सुख सुविधा आश्वासनाप्रमाणे करुन दिल्या नाही. त्यामुळे तक्रारकर्तीने ह्या त्रुटया विरुध्दपक्षाने दुर कराव्या, अशी विनंती केली होती. मात्र विरुध्दपक्षाने त्यावेळेस सदर त्रुटया लवकर दुर करुन देण्याची हमी दिली होती. परंतु ताबा घेतल्यानंतर देखील विरुध्दपक्षाने सदर डुप्लेक्स / रो हाऊसच्या ब्राऊचर मध्ये दर्शविल्याप्रमाणे, त्यातील कामे – त्रुटया दुर केल्या नाही. त्यामुळे तक्रारकर्तीला ह्या कामाचा खर्च अंदाजे रु. 4,50,000/- ते रु. 5,00,000/- पर्यंतचा आहे. शिवाय ही विरुध्दपक्षाच्या सेवेतील न्युनता ठरते, म्हणून प्रार्थनेप्रमाणे तक्रार मंजुर करण्यात यावी.
यावर, विरुध्दपक्षाचा युक्तीवाद असा आहे की, सदर डुप्लेक्सचे ब्राऊचर हा कराराचा भाग नाही. तसेच सदर बांधकामाविषयी तक्रारकर्तीला संपुर्ण माहीती दिली होती व तक्रारकर्तीने खरेदी खतात हे मान्य केले आहे. त्यामुळे आता तक्रारकर्तीस त्या विषयी तक्रार करण्याचा अधिकार नाही. विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीच्या डुप्लेक्स / रो हाऊसचे सर्व काम ठरल्याप्रमाणे चोख करुन दिले आहे. विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीचे जास्तीचे काम करण्यास नकार दिला. त्यामुळे तक्रारकर्तीने ही खोटी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारकर्तीने सदर प्रकरणात न्यायालयीन आयुक्ताची नेमणुक करुन स्थळ अहवाल मागविणेबाबत अर्ज केला होता. त्यावर उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकून दि.1/6/2016 रोजीच्या आदेशान्वये मंचाने सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोला येथील अभियंत्याची, सदर डुप्लेक्स / रो हाऊस बद्दल स्थळ निरीक्षण अहवाल मागविण्याकरिता कमीश्नर म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी दि. 08/08/2016 रोजी मुद्दे निहाय अहवाल मंचात दाखल केला.
विरुध्दपक्षाने या अहवालावर आक्षेप घेत असा युक्तीवाद केला की, तक्रारकर्ती व विरुध्दपक्षात बांधकाम सुविधांबद्दल लेखी करार झाला नव्हता. त्यामुळे अहवालातील मुद्दे मंचाला गृहीत धरता येणार नाही. विरुध्दपक्षाने तक्रारीमधील सर्व त्रुटी विषयक बांधकाम करुन दिलेले आहे.
उभय पक्षाने वादातील डुप्लेक्स / रो हाऊस संबंधी सुविधा / सौंदर्यासंबंधी मजकुर असलेले विरुध्दपक्षाचे ब्राऊचर मंचात दाखल केले आहे. विरुध्दपक्षाच्या मते या ब्राऊचर वरील तळटिप तक्रारकर्तीने मुद्दाम दाखल केली नाही. विरुध्दपक्षाच्या मते ती तळटिप खालील प्रमाणे आहे.
Note : Possession will be given after 15 dyas of settlement of all accounts. Extra work will executed after receipt of full advance payment
Documentation Charges …………….
This Boucher does not form any part of any agreement or any legal document; it is for information purpose only.
परंतु सदर ब्राऊचरवरील मजकुरावरुन वादातील बांधकाम विरुध्दपक्ष कसे करणार होते, याबद्दलचे Specification and Amenities त्यावर नमुद आहे. त्यामुळे उभय पक्षात सदर बांधकामाविषयी हमीपत्र अगर लेखी करार नसला तरी विरुध्दपक्ष स्वत:च्या ब्राऊचर वरील नमुद सुविधा डुप्लेक्स / रो हाऊसमध्ये करुन देण्यास बांधील होते, असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्षाचा असा आक्षेप आहे की, तक्रारकर्तीने सदर डुप्लेक्स / रो हाऊसचा ताबा घेतला व तो घेण्यापुर्वी खरेदीखतात असे लिहून दिले की,“ सदर डुप्लेक्स / रो हाऊसचे बांधकामाबाबत संपुर्ण माहीती विरुध्दपक्षाने दिली आहे. तसेच सदर जागा व योजनेबाबत तक्रारकर्तीने सर्व कागदपत्रे तपासून स्वत:चे समाधान करुन सदर डुप्लेक्स / रो हाऊस विकत घेतले आहे व या डुप्लेक्स / रो हाऊस बद्दल तक्रारकर्तीची कोणत्याही प्रकारची तक्रार राहीली नाही. त्यामुळे आता तक्रारकर्तीस सदरहू तक्रार करता येणार नाही. परंतु तक्रारकर्तीने ही तक्रार विरुध्दपक्षाने सदर बांधकामाविषयी जी माहीती दिली होती व त्यानुसार विरुध्दपक्षाने जे बांधकाम केले, त्यात कश्या त्रुटया आढळल्या, हे दर्शविण्यासाठी केली आहे, असे मंचाने गृहीत धरल्यामुळे, विरुध्दपक्षाचा हा आक्षेप फेटाळला आहे. विरुध्दपक्षाने त्यांच्या लेखी जबाबात असे कथन केले की, तक्रारकर्ती वारंवार जास्तीचे काम करुन देण्याबबात तगादा लावत होती, परंतु त्या बद्दल विरुध्दपक्षाच्या ब्राऊचरच्या तळटिप मध्ये असे नमुद आहे की, Extra work will executed after receipt of full advance payment म्हणजे विरुध्दपक्षाला जास्तीचे काम करण्याचे पुर्ण पैसे तक्रारकर्तीकडून मिळाले असावे, म्हणूनच, त्या रकमेची डिमांड नोटीस विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीला दिल्याचे दिसत नाही. त्यामुळे विरुध्दपक्षाचा हा आक्षेप सुध्दा मंचाला गृहीत धरता येणार नाही. तसेच विरुध्दपक्षाच्या सदर डुप्लेक्स / रो हाऊस बांधकामाबाबतच्या या ब्राऊचरवर खालील प्रमाणे Specification and Amenities नमुद आहेत.
SPECIFICATION & AMENITIES
Structure
R.C.C. Framed Structure
Walls
9” External wall & 4” Internal wall
Door
All R.C.C. Door Frame with flush door & Main Door with good Design laminated flush Door.
Tiles
2X2 Vetrified tiles in all rooms.
Kitchen
Platform marble top & stainless steel sink & dado glaze tiles.
Bathroom
Bathroom with 7’ height dado glaze tiles & flooring with ceramic tiles.
Electrification
Concealed wiring of ISI mark with modular switches and provision for inverter
Plumbing
ISI mark concealed internal plumbing pipe.
Water & Bor
1000 Ltr. Special & Sepret Water Tank & one Bore well for 2 Duplex.
म्हणून वरील नमुद बाबीनुसार मंचाने दाखल तज्ञांचा अहवाल तपासला असता त्यातील खालील काही मुद्दे विरुध्दपक्षाची सेवा न्युनता दर्शवितात, जसे की,…
- तळ मजला तसेच पहील्या मजल्याच्या टेरेसवरुन पावसाचे पाणी झिरपते.
- संपुर्ण डुप्लेक्सला उच्च प्रतीची रंगरंगोटी आढळत नाही.
- बाथरुम मध्ये चारफुट दोन इंच उंची पर्यंत भिंतीला टाईल्स लावण्यात आल्या ( ब्राऊचर वरील त्या बाबत नमुद केलेल्या बाबीचे उल्लंघन आहे)
- डुप्लेक्स मध्ये 18X18 इंच साईजची वेट्रीफाईड टाईल्स आहेत.
- दरवाजे लॅमीनेटेड फ्लश डोअर असून उच्च सागवानी लाकडाचे नाहीत.
- योग्य उत्कृष्ट दर्जाचे इलेक्ट्रीक फिटींगचे साहीत्य वापरले नाही.
- पहील्या मजल्यावर असलेल्या संडास व बाथरुम मध्ये चारही भिंतींना 4 फुट 2 इंच उंचीच्या टाईल्स लावल्याचे आढळते ( ब्राऊचर वरील त्या बाबत नमुद केलेल्या बाबीचे उल्लंघन आहे)
- सांडपाण्याकरिता स्वतंत्र व्यवस्था नाही.
त्यामुळे या त्रुटयांबाबतची नुकसान भरपाई अंदाजे रक्कम रु. 35,000/-तसेच इतर नुकसान भरपाई व प्रकरण खर्च विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्तीस दिल्यास ते न्यायोचित होईल, कारण या बाबत तक्रारकर्तीने मागीतलेली नुकसान भरपाई सिध्द होत नाही, म्हणून अंतीम आदेश खालील प्रमाणे पारीत केला.
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्तीची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीकपणे वा संयुक्तरित्या तक्रारकर्तीस बांधकामात ठेवलेल्या त्रुटींची पुर्तता करण्यापोटी रक्कम रु. 35,000/- ( रुपये पस्तीस हजार ), दरसाल दरशेकडा 8 टक्के व्याज दराने दि. 03/09/2015 ( प्रकरण दाखल तारीख ) पासून प्रत्यक्ष रक्कम अदाई पर्यंत व्याजासहीत द्यावी. तसेच यामुळे झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- (रुपये पांच हजार ) व प्रकरणाचा न्याईक खर्च रु. 3000/- ( रुपये तिन हजार ) द्यावा.
- सदर आदेशाची पुर्तता निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावी, अन्यथा वरील प्रमाणे मंजुर केलेल्या रकमांवर आदेश पारीत दिनांक 23/11/2016 पासून देय तारखेपर्यंत दरसाल दरशेकडा 12 टक्के दराने व्याज आकारण्यात येईल.
सदर आदेशाच्या प्रती संबंधीतांना निशुल्क देण्यात याव्या.