जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 540/2010
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-04/05/2010.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 17/02/2014.
श्री.मनिष सतिष जैन,
प्रोप्रा.एम.जे.ट्रेडर्स,
उ.व.सज्ञान, धंदाः व्यवसाय,
रा.यश प्लाझा,जुना पिंप्राळा रोड,जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. किसन रामचंद्रा ऑक्शनर्स प्रा.लि.मॅनेजर,
रा.डेक्कन टॉवर्स, 5, मेझानिन मजला,पोलगेट,
पुणे.
2. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसीटी बोर्ड,मॅनेजर,
रा.ऑफीस एक्सिटिव्ह इंजिनिअर (स्टोअर्स)
मेजर स्टोअर्स ए.एन.टी.पी.एस.
एकलहरा (व्हीज नाशिक रोड) नाशिक. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्रध्दा एस.काबरा(चंद्रात्रे) वकील.
विरुध्द पक्ष क्र.1 तर्फे श्रीमती ए.एच.पिले वकील.
विरुध्द पक्ष क्र. 2 तर्फे श्री.कैलास एन.पाटील वकील.
निकालपत्र
श्री.विश्वास दौ.ढवळे,अध्यक्षः विरुध्द पक्ष यांचेकडे ऑक्शन कॉस्मो टेंडर पोटी रक्कम भरणा केल्यानंतर ज्या लॉटकरिता पैसे भरले त्यात आढळुन आलेल्या तफावतीमुळे झालेल्या नुकसानी दाखल तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदार हे वर नमुद पत्यावर व्यवसाय करीत असुन विरुध्द पक्ष क्र.2 यांचा टेंडर काढण्याचा व्यवसाय असुन त्यांनी वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीनुसार एम.एस.रेल पोल भंगार यांचे ऑक्शन रोल वर्क्स क्लब, एम.एस.ई.बी.एन.टी.पी.एस.एकलहरा यांचे ऑक्शनबाबत कॉस्मो टेंडर जाहिरातीनुसार तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 1 यांचेशी संपर्क साधला व लॉट नं.14 रेल पोल घेण्याचे निश्चित केले. त्यावेळी तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 1 यांचे सुचनेनुसार मालाच्या रक्कमेच्या ¼ रक्कम रु.81,550/- व 4 टक्के सेल टॅक्स ची रक्कम रु.26,612/- विरुध्द पक्ष यांचेकडे अदा केली व तशी पावती घेतली. त्यानंतर विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दिलेल्या तारखेनुसार दि.27/07/2004 रोजी तक्रारदार ठरलेल्या वेळी ठरलेल्या स्थळी पोहचले व लॉट नंबर 14 ची पाहणी केली असता ज्या लॉटसाठी पैसे भरले होते त्या लॉटमध्ये व आताच्या लॉट मध्ये बरीच तफावत दिसुन आली. रेल पोल चा माल न दिसता रेल्वे पोलला फीशर प्लेट व बरीचशी माती लागल्याचे दिसुन आले त्यामुळे मालाचे वजन बरेच वाढले होते. त्यावेळी तक्रारदाराने पैसे भरणा करतेवेळी जो माल दाखवला होता तो देण्याबाबत तसेच फीशरप्लेट ची माती साफ करुन देण्याबाबत विनंती केली असता विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारास बराच वेळ थांबवुन ठेवले व कोणताही प्रतिसाद दिली नाही. तक्रारदाराने त्यानंतर ब-याच वेळा विरुध्द पक्षाकडे पैशांची मागणी केली असता व नोटीसीने कळविले असता विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी नोटीस उत्तरासोबत रक्कम रु.38,587/- चा डिमांड ड्राफट पाठविला. सदरचा डिमांड ड्राफट हा फक्त ¼ अमाऊंट सेल टॅक्स बाबत रक्कम रु.26,152/- वर द.सा.द.शे.9 टक्के दराने होणा-या रक्कमेचा पाठविला व उर्वरीत रक्कमेस खोटया आशयाचे उत्तर दिले. सबब विरुध्द पक्षाकडुन आर्थिक नुकसानीपोटी रु.81,550/- द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह मिळावेत, मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार अर्जाचे खर्चादाखल रु.10,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने तक्रार अर्जातुन केलेली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या.
4. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. विरुध्द पक्ष क्र. 2 यांचेकडील एम.एस.रेल पोल भंगार यांचे ऑक्शन रोल वर्क्स क्लब, एम.एस.ई.बी.एन.टी.पी.एस.एकलहरा यांची ऑक्शन बाबत कॉस्मो टेंडर या मासिकात दिलेल्या जाहिरातीनुसार तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 1 यांचेशी संपर्क साधुन तक्रारदारास मालाची कल्पना व लिलावाच्या अटी व शर्ती व त्याची पुर्तता याबाबत संपुर्ण माहिती दिली व कॅटलॉगही दिला. कॅटलॉगच्या टर्म कंडीशन प्रमाणे मालाची पाहणी ऑक्शनचे आधी एक दिवस म्हणजे दि.26/07/2004 तसेच ऑक्शनच्या दिवशी सकाळी 8.30 ते 10.30 या वेळेत करावयाची होती त्याप्रमाणे तक्रारदाराने पाहणी केली व लॉट नंबर 14 ला 23,100/- पर मे.टन ही सर्वात जास्त बोली बोलली. तक्रारदाराने लॉट नंबर 14 मधील मालाचे ऑक्शनमध्ये दिलेला सर्वात जास्त रेट अन्य कुणीही न दिल्याने ऑक्शनमध्ये दिलेल्या रेटप्रमाणे होणारी 25 टक्के रक्कम रु.81,550/- व विक्रीकराची 4 टक्के प्रमाणे रक्कम रु.26,612/- विरुध्द पक्ष क्र. 1 कडे लिलावाच्या अटी व शर्ती मान्य करुन माल पसंत असल्याने तक्रारदाराने अदा केली त्यामुळे ऑक्शनच्या वेळी सदर माल रेल्वे पोलला फीशर प्लेट व बरीचशी माती लागली होती त्यामुळे मालाचे वजन वाढले होते हे तक्रारदाराचे म्हणणे विरुध्द पक्षास मान्य नाही. कॅटलॉग मध्ये लॉट नं.14 चे माल तसेच वजनाबाबत नमुद असुन विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी वारंवार कळवुनही तक्रारदाराने उर्वरीत 75 टक्के रक्कम भरली नाही व मालाची डिलेव्हरी घेतली नाही त्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी पत्र क्र.486 दि.21/2/2005 अन्वये तक्रारदाराने भरलेली ¼ रक्कम फॉरफीट केली व तसे तक्रारदाराला कळविले, तक्रारदाराने माल न उचलल्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारदारास विक्री कराचा परतावा 9 टक्के व्याजासह पाठविला आहे व तो मिळाल्याचे तक्रारदाराने कबुल केले आहे. अशा परिस्थितीत तक्रारदाराने भरलेली रक्कम रु.81,550/- व्याज व इतर खर्च रिफंड मागण्याचा कोणताही अधिकार नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्य करण्यात यावी व नुकसानी दाखल रु.35,000/- तक्रारदाराकडुन मिळावेत अशी विनंती विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी केलेली आहे.
5. विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. कंपनीचे व्यवहारात पारदर्शकता असुन कोणाचीही फसवणुक केली जात नाही. तक्रार अर्जातील मुद्या क्र. 1 प्रमाणे विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारदारास लॉट नं.14 चा माल दाखवला व मालाच्या रक्कमेच्या ¼ सुरक्षा अनामत रक्कम रु.81,550/- व सेल्स टॅक्स रक्कम रु.26,612/- याची पुर्तता झाल्यानंतर दि.27/7/2004 रोजी ऑक्शन होणार असल्याचे सांगुन सकाळी 10.00 वाजता हजर राहण्यास सांगीतले. यासंदर्भात लिलावात बोली निश्चित झाल्यावरच मालाचा दर निश्चित होतो व दर निश्चित झाल्यानंतर पुर्ण मालाची रक्कम निश्चित होते आणि त्यानंतरच मालाच्या किंमतीच्या ¼ रक्कम सुरक्षा अनामत व 4 टक्के सेल्स टॅक्स भरावयास सांगण्यात येते व तसे तक्रारदारास सांगीतले होते. ज्या दिवशी लिलाव झाला त्याच दिवशी तक्रारदाराला माल दाखवुन त्याने रक्कम भरणा केली असल्याने मालात तफावत असण्याची शक्यताच नाही. जाहिर लिलाव दि.27/07/2004 रोजी सकाळी 11.00 वाजता ठरल्याप्रमाणे नियोजित स्थळी झालेला आहे, लिलावानंतर मे.एम.जे.ट्रेडर्स,जळगांव यांनी लॉट नंबर 14 घेतल्याचा डिक्लरेशन फॉर्म भरुन दिलेला आहे. मे.एम.जे.ट्रेडर्स,जळगांव यांनी अनामत रक्कम विरुध्द पक्ष क्र. 1 कडे भरणा केली असुन त्याचा पावती क्र.5760, दि.27/07/2004 असा आहे. अनामत रक्कम भरल्यानंतर तक्रारदारास सेल ऑर्डर देण्यात आली त्यात लिलावाच्या अटी व शर्ती नुसार एम.जे.ट्रेडर्स,जळगांव यांना लिलावाचे दिवसापासुन कामाचे 15 दिवसाचे आंत मालाची उर्वरीत रक्कम भरण्याचे सांगीतले होते परंतु त्यांनी मुदतीत पैसे भरणा केले नाहीत व कामाच्या 30 दिवसाचे आंत माल उचललेला नाही. यानंतर मालाची रक्कम भरण्याकरिता अधिक्षक अभियंता,(डी.सी)मुंबई यांनी मुदत वाढीचे पत्र क्र.2288, दि.16/08/2004 अन्वये एम.जे.ट्रेडर्स,जळगांव यांना मालाची उर्वरीत शिल्लक रक्कम रु.5,83,730/- दि.30/08/2004 पर्यंत भरण्याची संधी दिली होती परंतु त्यांनी रक्कम भरली नाही त्यामुळे लिलाचाची अट व शर्त क्र.2.1 व 3.4 नुसार मालाची उर्वरीत शिल्लक रक्कम रु. 5,83,730/- न भरल्यामुळे तक्रारदार यांना या कार्यालयाने नोटीस दिली असुन नियमाप्रमाणे अनामत रक्कम रु.81,550/- जप्त करण्यात आली असुन तसेच कार्यालयीन पत्र क्र.486 दि.21/02/2005 नुसार कळविण्यात आलेले आहे. येणेप्रमाणे विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी खुलासा दाखल केलेला आहे.
6. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, विरुध्द पक्ष यांचे लेखी म्हणणे, सोबत दाखल केलेली कागदपत्रे व उभयतांचा युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर.
1. तक्रारदाराची तक्रार या मंचाचे अधिकार क्षेत्रात चालण्यास
पात्र आहे काय ? नाही.
2. तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे अंतीम आदेशानुसार
7. मुद्या क्र. 1 - वृत्तपत्रात एम.एस.रेल पोल भंगार यांचे ऑक्शन रोल वर्क्स क्लब, एम.एस.ई.बी.एन.टी.पी.एस.एकलहरा यांचे ऑक्शनबाबत कॉस्मो टेंडर जाहिरातीनुसार तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 1 यांचेशी संपर्क साधला व लॉट नं.14 रेल पोल घेण्याचे निश्चित केले. त्यावेळी तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 1 यांचे सुचनेनुसार मालाच्या रक्कमेच्या ¼ रक्कम रु.81,550/- व 4 टक्के सेल टॅक्स ची रक्कम रु.26,612/- विरुध्द पक्ष यांचेकडे अदा केली व तशी पावती घेतली. या तक्रारदाराने तक्रार अर्जात नमुद केलेल्या बाबी दोन्ही पक्षांना मान्य आहेत. तथापी अगोदर पाहीलेला माल न देता लिलावाचे वेळेस दुसराच अन्य माती लागलेला माल दिल्याचे नमुद करुन तक्रारदाराने लिलावात भरणा केलेली रक्कम रु.81,550/- व्याजासह परत मिळावी व अन्य नुकसानी दाखल प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे.
8. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी याकामी हजर होऊन विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी दिलेल्या अधिकारानुसार जाहिरातीचे टेंडर देणे व त्याची प्रक्रिया राबविण्याचे कार्य करीत असल्याचे लेखी म्हणणे व युक्तीवादातुन नमुद करुन तक्रारदाराने कराराप्रमाणे व लिलावात बोली बोलल्याप्रमाणे मालाची उर्वरीत रक्कम भरणा न केल्याने लिलाचाची अट व शर्त क्र.2.1 व 3.4 नुसार तक्रारदार यांना विरुध्द पक्ष क्र. 2 यांचे कार्यालयाने नोटीस दिली असुन नियमाप्रमाणे अनामत रक्कम रु.81,550/- जप्त करण्यात आली असुन तसेच कार्यालयीन पत्र क्र.486 दि.21/02/2005 नुसार कळविण्यात आलेले आहे असे विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी युक्तीवादातुन नमुद केले.
9. उपरोक्त एकुण विवेचनाचा विचार केला असता व दाखल कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन करता तक्रारदाराने किसन रामचंद्रा ऑक्शनर्स प्रा.लि., डेक्कन टॉवर्स, पुणे असा पत्ता नमुद असलेले व एम.एस.ई.बी.एम.एस.ए.एकलहरा,नाशिक येथे दि.27/07/2004 रोजी झालेल्या ऑक्शन वेळी रक्कम रु.81,550/- व 4 टक्के सेल्स टॅक्स ची रक्कम रु.26,612/-भरल्याचे नि.क्र.3/1 व 3/2 लगत दाखल पावतीवरुन स्पष्ट होते. उपरोक्त दोन्ही पावत्यांचे अवलोकन करता तक्रारदाराने सदरच्या रक्कमा या नाशिक येथे लिलावाचे वेळेस भरणा केलेल्या आहेत. सदरच्या रक्कमा हया जळगांव येथे भरणा केल्याचे तसेच जळगांव ग्राहक मंचाचे अधिकार कक्षेत भरणा केल्याचे दिसुन येत नाही. तसेच विरुध्द पक्षाचे शाखा कार्यालय जळगांव येथे असल्याचेही तक्रारीत नमुद नाही. त्यामुळे तक्रारदाराच्या तक्रारीस या मंचासमोर कोणतेही अधिकार क्षेत्र नसल्याचे स्पष्ट होते.
ग्राहक संरक्षण कायदा,1986 चे कलम 11(2)(अ) (ब) (क) खालीलप्रमाणेः-
2) ज्याच्या अधिकारितेच्या स्थानिक सिमेत,
(अ) विरुध्द पक्ष किंवा ते एकापेक्षा अधिक असल्यास विरुध्द पक्षांपैकी प्रत्येक व्यक्ती फीर्याद दाखल करण्याच्या वेळी प्रत्यक्षपणे आणि स्वेच्छेने राहत असेल किंवा व्यवसाय करीत असेल किंवा तिचे शाखा कार्यालय असेल किंवा लाभासाठी व्यक्तीशः काम करीत असेल किंवा
(ब) विरुध्द पक्ष एकापेक्षा अधिक असल्यास त्यापैकी कोणीही तक्रार दाखल करण्याच्या वेळी प्रत्यक्षपणे आणि स्वेच्छेने राहत असेल, किंवा व्यवसाय करीत असेल किंवा शाखा कार्यालय असेल किंवा लाभासाठी व्यक्तीशः काम करीत असेल, परंतु अशा प्रकरणी जिल्हा मंचाने परवानगी दिली असेल किंवा ज्या राहत नसतील किंवा व्यवसाय करीत नसतील किंवा शाखा कार्यालय नसेल किंवा व्यवसाय करीत नसतील किंवा शाखा कार्यालय नसेल किंवा व्यवसाय करीत नसतील किंवा प्रकरणपरत्वे लाभासाठी व्यक्तीशः काम करीत नसतील अशा विरुध्द पक्षांनी फीर्याद दाखल करण्यास मुक संमती दिली असेल किंवा
(क) वादाचे कारण पूर्णपणे किंवा भागशः घडले असेल,
10. वरील संपुर्ण विवेचनावरुन वर कायदयात नमुद अटींमध्ये तक्रारदाराच्या तक्रारीस या मंचाचे अधिकार क्षेत्रात कोणत्याही स्वरुपाचे कारण घडल्याचे दिसुन येत नाही. त्यामुळे तक्रारदाराचे तक्रारीस अधिकार क्षेत्राची बाधा येत असल्याचे निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. तसेच तक्रारदाराने त्याचा वाद हा योग्य त्या न्यायाधिकरणापुढे उपस्थित करावा, सदर तक्रारीकामी व्यतीत केलेला कालावधी हा मुदतमाफीसाठी ग्राहय धरण्यात यावा. तक्रारदाराचे तक्रारीत कोणत्याही प्रकारची गुणवत्ता नसल्याचे कारणास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. तक्रारदाराने त्याची तक्रार योग्य त्या न्यायाधिकरणापुढे दाखल करावी, सदर तक्रारीकामी व्यतीत केलेला कालावधी हा विलंब माफीसाठी ग्राहय धरावा.
2. खर्चाबाबात आदेश नाही.
ज ळ गा व
दिनांकः- 10/02/2014.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.