जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/15. प्रकरण दाखल तारीख - 11/01/2010 प्रकरण निकाल तारीख – 15/07/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. शंकर पि. रामजी जाधव वय 50 वर्षे, धंदा शेती अर्जदार रा.धावरी ता.भोकर जि. नांदेड विरुध्द. 1. किसान कृषी सेवा केंद्र मार्फत प्रो.प्रा. किनवट ता.भोकर जि. नांदेड 3. मॅनेजर, महिको सिडस लि. गैरअर्जदार रेशम भवन, 78, वीर नरिमन रोड, मुंबई-20 अर्जदारा तर्फे वकील - अड.जी.डी. जोशी गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदार क्र.2 तर्फे वकिल - अड.पी.एस.भक्कड निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे, पाटील, अध्यक्ष ) गैरअर्जदार यांनी बोगस बियाणे पूरवुन ञूटीची सेवा दिल्यामूळे गैरअर्जदार यांचे विरुध्द तक्रार दाखल केली असून ती खालील प्रमाणे आहे. अर्जदार हे शेतकरी असून शेत जमिन गट नंबर 44 मौजे धावरी (खु) ता. भोकर जि. नांदेड येथे 0.86 आर एवढया जमीनीचे मालक आहेत. अर्जदार यांनी दि.20.01.2008 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून गैरअर्जदार क्र.2 यांनी उत्पादीत केलेले मिरची पिकाचे बियाणे खरेदी केले. त्यांचे रोपासाठी ते बियाणे दि.30.01.2008 रोजी पेरले. रोप झाल्यानंतर त्यांची लागवड दि.10.03.2008 रोजी केली. अर्जदाराचे शेतात सदरील पिक हे प्रत्यक्ष झाडाची फळधारणा अत्यंत कमी म्हणजे 10 ते 20 टक्के म्हणजे अर्जदाराचे 80 ते 90 टक्के म्हणजे जवळपास रु.1,00,000/- चे नूकसान झाले. या बददल कृषी अधिका-याकडे दि.16.08.2008 रोजी तक्रार केली. त्यांनी गैरअर्जदार क्र.2 यांना नोटीस देऊन शेतात दि. 10.09.2008 रोजी हजर राहण्याचे सांगितले व कंपनीचे प्रतिनीधी श्री.दिलीप नामदेवराव जाधव व दोन साक्षीदारा समक्ष पंचनामा केला. त्यात अर्जदाराचे 100 टक्के नूकसान झाल्याचा अभिप्राय कृषी अधिकारी यांनी दिला. कंपनीला नूकसान भरपाईची मागणी अनेक वेळा केली. त्यांनी ती दिली नाही म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, नूकसान भरपाईपोटी रु.1,00,000/- गैरअर्जदार यांचेकडून मिळावेत. गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्याचेवर लावलेला दावा हा संपूर्ण खोटा व कायदेशीर चौकटीत नसल्यामूळे तसेच यात गैरअर्जदार यांचा प्रत्यक्ष सहभाग नसल्यामूळे दावा फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. गैरअर्जदार यांचा बि-बियाणे विकण्याचा व्यवसाय आहे. अर्जदाराने महिको कंपनीच्या मिरचीचे बियाणे गैरअर्जदार यांचेकडून त्यांनी विकत घेतले हे त्यांना मान्य आहे. ते बियाणे महिको कंपनीचे अधिकृत वितरक मामीडवार कृषी सेवा केंद्र यांचेकडून खरेदी केलेले आहे. बियाणे हे अर्जदार यांचे मागणीवरुन दिलेले आहे. गैरअर्जदार हा उत्पादक कंपनी नाही. बियाणे हे महिको सिडस जालना यांनी उत्पादित केलेले आहे. त्यामूळे त्या बियाण्यापासून त्यांना उत्पादन मिळाले नाही. यांस ते जबाबदार नाहीत. गैरअर्जदाराने सदर बियाणे हे संपूर्णपणे सिलबंद केलेले जसेच्या तसे अर्जदारास विकले आहेत. बियाणे कायदा नियम 7 बी नुसार सिलबंद पॅकेटच्या गूणवतेस उत्पादक हाच जबाबदार असतो. त्यामूळे त्यांचे विरुध्दचा दावा फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी आपले म्हणणे वकिलामार्फत दाखल केलेले आहे. त्यांचेकडे सेवेतील कोणतीही कमतरता झालेली नाही. त्यांनी अनूचित व्यापार पध्दतीचे उल्लंघन केलेले नाही. जो पर्यत संबंधीत बियाणे प्रयोगशाळेमध्ये पाठवून त्यांची तपासणी होत नाही तोपर्यत त्या बियाण्यामध्ये दोष आहे असे म्हणता येणार नाही. अर्जदाराने किंवा कृषी अधिका-याने सदरचे बियाणे तपासण्यासाठी पाठविले नाही. केवळ तर्काचे आधारावर व कोणतेही शास्ञोक्त कारण न देता आपला अभ्रिप्राय दिलेला आहे जो कायदयास अमान्य आहे. महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्हामध्ये तज्ञ व्यक्तीची सिड समिती स्थापन केलेली आहे. त्या कमिटीने तो अहवाल कारणे देऊन लिहीलेला पाहिजे. गैरअर्जदाराने म्हटल्याप्रमाणे तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी विकास अधिकारी यांनी अर्जदाराच्या शेतावर जाण्यापूर्वी गैरअर्जदार यांना सूचना किंवा नोटीस दिलेली नाही व गैरअर्जदार यांचे माघारी केलेला पंचनामा व अहवाल ग्राहय धरता येणार नाही.अर्जदाराने बियाणे हे दि.20.01.2008 रोजी विकत घेतले व त्यांची लागवड केली यात नेमकी दिनांक दिलेली नाही. जी की दि.01.09.2008 अशी दिसते. पंचनाम्याप्रमाणे दि.30.01.2008 रोजी रोपासाठी पेरणी केली. दि.10.03.2008 रोजी त्यांची लागवड केली. मिरचीच्या झाडास पेरणीच्या 65 दिवसांपासून फळे लागायला सूरुवात होते व 70 ते 72 दिवसात पहिल्यांदा मिरच्या तोडल्या जातात. मिरचीच्या झाडाला फळ अंदाजे 180 दिवसापर्यत लागते. पंचनाम्यामध्ये लॉट नंबर टीकेबी 257008 असा दाखवलेला आहे. ते बियाणे कोठून विकत घेतले या बददलची माहीती नाही. बियाण्याची अंतीम दि.03.07.2007 अशी आहे यांचा अर्थ गैरअर्जदाराने गेल्या वर्षीचे बियाणे पेरले असेल किंवा कोणाचे तरी मागवून आणून पेरले असेल. अर्जदाराने 13 गूंठे जमिनीमध्ये 5 पोते डिएपी, पाच पोते 10 26 26 , पाच पोते 15 15 15 असे एकूण 15 पोते खत वापरले आहे. खताचे प्रमाण जास्तीचे आहे. अर्जदाराचे 80 ते 90 टक्के नूकसान झाले हे त्यांना अमान्य आहे. अर्जदाराने तक्रारीत किती रुपयाची मिरची झाली होती यांचा उल्लेख केलेला नाही. अर्जदाराने दाखल केलेल्या 7/12 वर मिरचीच्या पे-याचा उल्लेख नाही. गैरअर्जदाराने लॉट नंबर टीकेबी 100756 हे टूथफूल बियणे तयार केले, ते गैरअर्जदाराने स्वतःचे प्रयोगशाळेमध्ये तपासणी करुन घेतले आहे व सदरील बियाणे विकण्यास उत्कृष्ट होते त्यांच बियाण्याची विक्री केलेली आहे. यामध्ये गैरअर्जदार यांनी 1. 2008(3) सीपीआर, पान 280, 2. 2008(2) सीपीआर पान 193, 3. 2009(1) सीपीआर पान 182 चा आधार घेतलेला आहे. तक्रारदाराचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी विनंती केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1,2,3 व 5 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार हे शेतकरी आहेत व त्यांचे मालकीच्या शेत गट नंबर 44 मध्ये 0.86 आर जमिनीत त्यांनी दि.20.01.2008 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून महिको कंपनीचे मिरचीचे बियाणे घेतले व दि.30.01.2008 रोजी त्यांची रोपे तयार केली व दि.10.03.2008 रोजीला त्यांचे शेतात लागवड केली. परंतु या झाडास फळधारणा अत्यंत कमी म्हणजे 10 ते 20 टक्के झाली असे म्हटले आहे. अर्जदारानी यासाठी गैरअर्जदार क्र.1 यांचे दि.20.01.2008 रोजीचे बिल नंबर 3701 ज्यांचा लॉट नंबर टीकेबी 100756 महिको पाच पाकीटे खरेदी केल्या बददल बिल दाखल केलेले आहे. यांची तक्रार त्यांनी दि.16.09.2008 रोजी तहसीलदार भोकर यांचेकडे केली. यात मिरचीच्या झाडाची पाहणी केल्याची नक्कल मागितली. पोलिस स्टेशन भोकर यांचेकडे दि.30.01.2008 रोजी तक्रार केली. कृषी अधिकारी यांचेकडेही तक्रार केली. त्याप्रमाणे दि.10.09.2008 रोजीला अर्जदाराच्या शेतात जायमोक्यावर जाऊन टीकेबी 100756 ची चार पॉकीट बियाणे खरेदी करुन त्यांची लागवड दि.10.03.2008 रोजीला केल्याबददल खताचा माञाच्या पाच बँग असे लिहीलेले आहे. यावर इन्सेक्टीसाईड औषधी फवारलेंली आहे. कृषी अधिकारी व साक्षीदाराने जे पाहिले त्यात झाडाची उंची 2 ते 3 फूट असून व झाडास फळधारणा कमी झाली असे म्हटले आहे. या मिरचीस बाजारात भाव नाही व त्यामूळे शेतक-याचे नूकसान झाले असा अभिप्राय दिलेला आहे. शेतक-याने गाव नमूना सात दाखल केलेला आहे. अर्जदाराचे नांवे 0.86 आर जमिन आहे. पिकाचे नोंद वहीत अर्जदाराने मिरचीचे पिक घेतल्याबददलची नोंद नाही. यात मूग, उडीद घेतल्याचे दिसत आहे. या पंचनाम्यावर आक्षेप घेत जिल्हा सिड कंमिटीने हा पंचनामा केलेला नसून संपूर्ण कारणे देऊन अभिप्राय दिलेला नाही. तसेच तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे गैरअर्जदारांना कोणतीही नोटीस मिळालेली नाही. त्यामूळे हा पंचनामा त्यांना अमान्य आहे. दूसरा आक्षेप असा घेतला आहे की, दि.20.01.2008 रोजी बियाणे विकत घेतले व पंचनामा हा दि.10.09.2008 रोजी केलेला आहे. मिरचीच्या झाडाला पेरणीपासून 65 दिवसात फळे लागायला सूरुवात होते व 70 ते 72 दिवसात पहिल्यांदा मिरच्या तोडल्या जातात. मिरचीच्या झाडाला फळ अंदाजे 180 दिवसापर्यत लागते. पेरणीची दि.30.01.2008 पासून 180 दिवस मोजल्यास दि.30.07.2008 रोजी अशी तारीख होते म्हणजे पंचनामा जर दि.10.09.2008 रोजीला झालेला असेल तर फळ लागण्याचा काळ संपलेला आहे म्हणजे पंचनामा करते वेळेस फळ दिसणे शक्य नाही. हा त्यांचा आक्षेप खरा धरुन पंचनाम्याचे वेळेस फळधारणाचा काळ संपलेला असून त्यावेळेस फळ दिसणे अपेक्षीत नाही. कदाचित फळधारणा ही आधीही झालेली असू शकते व अर्जदाराने स्वतः असे म्हटले आहे व पंचनाम्यात ही म्हटलेले आहे की, 20 टक्के मिरच्या लागलेल्या आहेत जर एवढया मिरच्या लागलेल्या असेल तर फळधारणा कमी होण्यामागे खताची माञा जास्त झाली हे कारण होऊ शकते, पाणी कमी असेल किंवा हवामान पोषक नसेल हे कारण होऊ शकते. त्यामूळे 20 टक्के जर मिरच्या आलेल्या असेल तर बियाण्यात दोष होता असे म्हणता येणार नाही. गैरअर्जदाराने लॉट नंबर टीकेबी 257008 या लॉटचे बियाणे हे 2007 चे उत्पादन होते म्हणजे यांची लागवडीची दिनांक ही नीघून गेली होती. तसेच महिको कंपनीचे बियाणे हे गैरअर्जदार क्र.1 यांचे म्हणण्यावरुन त्यांचे अधिकृत विक्रेते हे मामीडवार कृषी केंद्र होते यांचा अर्थ अर्जदाराने अधिकृत विक्रेते कडून बियाणे घेतले नाही. गैरअर्जदार क्र.2 यांचा आक्षेप की 7/12 वर मिरची पिकाची नोंदच नाही हे खरे आहे. अर्जदाराने तलाठयाचे लागवडी बददलचे प्रमाणपञ दाखल केलेले नाही. गैरअर्जदार क्र.2 यांनी क्वालिटी कंट्रोल लॅबोरटरी टेस्ट रिपोर्ट दाखल केला असून वर उल्लेख केलेल्या लॉट नंबरचे बियाणे हे 99.81 टक्के शूध्द बियाणे असून ते पास केलेले आहे. त्यामूळे बियाण्यात दोष आहे हे सिध्द करण्यासाठी कोणताही ठोस पूरावा समोर येत नाही. गैरअर्जदारांनी एक परिपञक दाखल केले त्यांत पंचनामा कोण व कसा करावा, तसेच अहवाल देतांना कारणे द्यावीत. I (2007) CPJ 258 Maharashtra State Consumer Disputes Redressal Commission Mumbai, Maharashtra State Seeds Coporation Ltd & ano. Vs. Narendra Motiramji Burade & anr. यात देखील बियाण्याची उगवण ही 15 ते 20 टक्के दाखवलेले आहे व ग्राहक मंचाने बियाण्याची किंमत दयावी असा आदेश दिला तो राज्य आयोगाने रदद ठरविला आहे. I (2007) CPJ 266 (NC) National Consumer Disiputes Redressal Commission, New Delhi, Maharashtra Hybrid Seeds Com. Ltd. Vs. Gowri Peddanna & ors. यात देखील बियाणे हे लॅबोरटरी पाठविले नाही व सिड हे 99.6 टक्के शूध्द होते त्यामूळे बियाण्यातील दोष सिध्द होत नाही असे म्हटले आहे. 2007 NCJ 303 (NC) National Consumer Disputes Redressal Commission New Delhi, Maharashtra Hybrid Seeds Co. Ltd. Vs. Gowri Peddaana & ors. इत्यादी सायटेशन दिलेले आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. उभयपक्षाना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री. सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जयंत पारवेकर लघूलेखक. |