जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २७३/२०१०
तक्रार दाखल दिनांक – २९/११/२०१२
तक्रार निकाली दिनांक – ११/०७/२०१३
रमेश कृष्णा माळी
उ.व. – ४५ वर्ष, धंदा – कटलरी दुकान,
रा. ग्रामपंचायत ऑफिस जवळ, सोनगीर
ता.व.जि. धुळे. ................ तक्रारदार
विरुध्द
किसान इलेकट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रीकल्स
प्रो.प्रा. राजधर त्र्यंबक माळी
उ.व.-४६ वर्षे, धंदा – इलेक्ट्रीक दुकान,
रा. जैन मंदिर जवळ, सोनगीर,
ता.जि. धुळे. ............ सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.डी.डी. शार्दुल)
(विरुध्दपक्ष तर्फे – अॅड.ए.आर. साळी)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा नादुरूस्त फ्रिज दुरूस्त न करून देवून सदोष सेवा दिलेली आहे म्हणून तक्रारदार यांनी सदर तक्रार मे. मंचात दाखल केलेली आहे.
१. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी गोदरेज कंपनीचे फ्रिज मॉडेल क्रं.१६५ हे सामनेवाला यांच्या दुकानात रिपेअरिंगसाठी सन २००८ मध्ये नेला असता सामनेवाला यांनी फ्रिजचे कॉम्प्रेसर साठी रू.३१००/- व जुने कॉंम्प्रेसर रू.३०० असे एकूण रू.३४००/- खर्च सांगितला. सामनेवाला यांचे सांगणेवरून तक्रारदारने सामनेवाला यांना रू.३४००/- रोख दिले. त्याचे कच्चे बिल सामनेवाला यांनी तक्रारदारास देवून त्यावर १६ महिन्यांची कॉंम्प्रेसर गॅरंटी असे तक्रारदारास लिहून दिले.
२. तक्रारदारचे पुढे असे म्हणणे आहे की, फ्रिज रिपेअर करून आणल्यानंतर १५ दिवसांपर्यंत फ्रीज व्यवस्थित चालला परंतु त्यानंतर खराब झालेने पुन्हा सामनेवाला यांचेकडे रिपेअरींगसाठी नेला. सामनेवाला यांनी फ्रीज रिपेअरिंग करून दिल्यानंतर काही दिवस चालल्यावर पुन्हा तशीच अडचण येवू लागली. त्यांनतर पुन्हा फ्रिज रिपेअरिंगला नेला असता सामनेवाला यांनी फ्रिजच्या मागील जाळी बदलण्यास सांगितले. फ्रिजची जाळी बदलवून देखील फ्रिज पूर्णपणे दुरूस्त झालेला नव्हता. सामनेवाला यांना त्याबाबत कल्पना दिली असता त्यांनी गैरवर्तणूक करून तक्रारदार यांना दुकानाच्या बाहेर हाकलून दिले व तक्रारदार यास कॉंम्प्रेसर दुरूस्त किंवा बदलवून दिलेला नाही. याबाबत तक्रारदार यांनी दि.२३/०९/०९ रोजी वकिलांमार्फत सामनेवाला यांना पोटीस पाठविली असता नोटीस मिळूनही सामनेवाला यांनी नोटीसीस उत्तरही दिलेले नाही, अगर फ्रिजही दुरूस्त करून दिलेला नाही.
३. सबब सामनेवाला यांचेकडून सदरचा फ्रिज दुरूस्त करून आणि कॉम्प्रेसर बिघडले असल्यास कायमस्वरूपी दुरूस्त करून किंवा नवीन बदलवून मिळावे. शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी रू.५०००/- दयावेत. तक्रार अर्जाचा खर्च रू.३०००/- मिळावा अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे.
४. तक्रारदार यांनी आपले म्हणण्याच्या पृष्टयार्थ नि.५ च्या यादी सोबत ५/१ वर बीलाची झेरॉक्स प्रत, ५/२ वर सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस, ५/३ वर नोटीसची पोहच पावती इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
५. सामनेवाला यांनी आपला खुलासा नि.१३ वर दाखल केलेला आहे. त्यात त्यांनी तक्रारदार हे ग्राहक नाहीत. त्यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. तक्रारदारास कधीही फ्रिज दुरूस्त करून दिलेला नाही किंवा कॉम्प्रेसरची गॅरंटी दिलेली नाही. सामनेवाला इलेक्ट्रानिक्स अगर इलेक्ट्रीकल्स वस्तूंचा विक्रेता नाही. सामनेवाला यांना त्रास देण्याच्या गैरउददेशाने खोटा पुरावा निर्माण करण्याच्या हेतूने खोटी व लबाडीची नोटीस तक्रारदाराने पाठविलेली आहे. त्यामुळे नोटीस पुर्तता अगर उत्तर देणेचा प्रश्नच उदभवत नाही. सबब तक्रारदारची तक्रार खर्चासह रदद करणेत यावी. तसेच सामनेवाला यांना खोटी तक्रार करून त्रासात/ खर्चात टाकल्याने नुकसानी दाखल रक्कम रू.१०,०००/- देण्यात यावे. असे नमूद केलेले आहे.
६. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचा खुलासा, युक्तिवाद ऐकला व दाखल कागदपत्रे पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
१. तक्रारदार हे ग्राहक आहेत काय ? होय
२. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या
सेवेत त्रृटी केली आहे काय ? होय
३. तक्रारदार हे कोणता अनुतोष मिळण्यास
पात्र आहेत काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
४. अंतिम आदेश ? खालीलप्रमाणे
७. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी नि.५ सोबत नि.५/१ वर बीलाची प्रत दाखल केलेली आहे. सदर बिलावर तक्रारदार यांचे नाव नमूद आहे. तसेच त्यावर किसान इलेक्ट्रानिक्स व इलेक्ट्रीकल्स करिता म्हणुन सामनेवाला यांची सही आहे. यावरून तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे आम्हांस वाटते. म्हणून मुददा क्रं.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा क्र.२- तक्रारदार यांची मुख्य तक्रार अशी आहे की, त्यांनी सन २००८ मध्ये त्यांचे गोदरेज कंपनीचे फ्रिज रिपेअरींगसाठी नेले असता सामनेवाला यांनी फ्रिजचे कॉम्प्रेसर नविन टाकण्यास सांगून त्यासाठी एकंदरीत रूपये ३,४००/- खर्च लागेल असेही सांगितले. तक्रारदार यांनी रू.३४००/- सामनेवाला यांना रोख अदा केल्यावर सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा फ्रिज रिपेअर करून दिला. परंतु १५ दिवसांनंतर फ्रिज परत नादुरूस्त झालेने तक्रारदारने फ्रिज पुन्हा सामनेवाला यांचेकडे रिपेअरिंग साठी नेले असता सामनेवाला यांनी तो पुन्हा रिपेअरिंग करून दिला. त्यांनंतरही फ्रिजला परत तशीच अडचण येवू लागल्याने तक्रारदारने परत फ्रिज रिपेअरिंगसाठी सामनेवाला यांचेकडे नेला असता सामनेवाला यांनी फ्रिजची मागील जाळी बदलवून दिली. फ्रीजची जाळी बदलवूनही फ्रिज पूर्णपणे दुरूस्त न झालेने तक्रारदार सामनेवाला यांचेकडे गेला असता सामनेवाला यांनी तक्रारदाराशी गैरवर्तवणूक करून दुकानाच्या बाहेर हाकलून दिले व आजपावेतो कॉम्प्रेसर दुरूस्त किंवा बदलवून दिलेले नाही व सदोष सेवा दिलेली आहे.
९. या संदर्भात सामनेवाला यांनी आपल्या खुलाश्यामध्ये त्यांनी तक्रारदारास कधीही फ्रिज दुरूस्त करून दिलेला नाही. अगर त्यासाठी रक्कम स्विकारलेली नाही. कॉम्प्रेसरची कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. तक्रारदारने बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटी तक्रार दाखल केलेली आहे. असे नमुद केले आहे.
१०. आम्ही तक्रारदार यांनी दाखल केलेल्या नि.५ वरील कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले आहे. त्यात नि.५/१ वर सामनेवाला यांनी दिलेल्या बिल क्र.०००२७४ ची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे. सदर बिलावर सामनेवाला यांची सही आहे. सदर सही व सामनेवाला यांची वकीलपत्रावरील सही सारखीच आहे. तसेच सदर बिलावर कॉम्प्रेसर रिप्लेसमेंट १६ महिने मुदत पर्यंत असे लिहीलेले आहे. त्यामुळे सामनेवाला यांचे म्हणणे की त्यांनी तक्रारदार यास फ्रिज दुरूस्त करून दिला नाही. तसेच कॉम्प्रेसरची कोणतीही गॅरंटी दिलेली नाही हे चुकीचे, खोटे व कोर्टाची दिशाभूल करणारे आहे असे आम्हांस वाटते. तसेच बिलावर सामनेवाला यांची सही असलेने तक्रारदारने बनावट कागदपत्रे तयार करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. यावरून सामनेवाला यांनी तक्रारदार यांना फ्रिज दुरूस्त न करून देवून तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रृटी केलेली आहे. असे आम्हांस वाटते म्हणून मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
११. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून फ्रिज दुरूस्त करून आणि कॉम्प्रेसर बिघडले असल्यास कायमस्वरूपी दुरूस्त करून किंवा नवीन बदलवून मिळावे. शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी रू.५०००/- मिळावेत तसेच तक्रार अर्जाचा खर्च रू.३०००/- मिळावा अशी मागणी केलेली आहे. वरील विवेचनावरून तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून फ्रिज दुरूस्त करून आणि कॉम्प्रेसर बदलवून मिळण्यास पात्र आहेत. तसेच मानसिक त्रासापोटी रू.१०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रू.५००/- मिळण्यास पात्र आहेत असे आम्हांस वाटते.
१२. मुद्दा क्र.४- वरील विवेचनावरून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. सामनेवाला किसान इलेकट्रानिक्स आणि इलेक्ट्रीकल्स यांनी तक्रारदारास फ्रिज दुरूस्त करून आणि नविन कॉम्प्रेसर या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसांचे आत बदलून दयावे.
२. सामनेवाला किसान इलेकट्रानिक्स आणि इलेक्ट्रीकल्स यांनी तक्रारदारास
मानसिक त्रासापोटी रू.१०००/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रू.५००/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसांचे आत दयावेत.
(सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.