नि. 12
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली
मा.अध्यक्ष : श्री.ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य : श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 39/2011
----------------------------------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 10/02/2011
तक्रार दाखल तारीख : 17/02/2011
निकाल तारीख : 04/05/2013
-----------------------------------------------------------------
श्री बाळासो विठ्ठल नाईक
वय वर्षे – 50, व्यवसाय – शेती
रा. शेगांव ता.जत, जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. किर्लोस्कर इलेक्ट्रीक कंपनी लि.
युनिट 25, गब्बुर ए.सी. जनरेटर्स
हुबळी, कनार्टक
2. एस.एस.ट्रेडींग,
मंगळवार पेठ, जत, ता.जत
जि. सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड सी.ए. शिंदे
जाबदार : अॅडएकतर्फा
- नि का ल प त्र -
द्वारा – मा. सदस्य - श्री के.डी.कुबल
1. प्रस्तुतची तक्रार जाबदार यांनी इलेक्ट्रीक जनरेटर वॉरंटी पिरेडमध्ये बिघाड होऊन देखील बदलून दिला नाही म्हणून तक्रारदार यांनी मंचासमोर दाखल केली आहे.
2. सदर तक्रार अर्जाचा तपशील थोडक्यात पुढीलप्रमाणे -
तक्रारदार यांनी जाबदार क्र.2 यांच्याकडून जाबदार क्र.1 च्या कंपनीचा इलेक्ट्रीक जनरेटर दि.15/5/2010 रोजी रु.84,000/- ना (खरेदी पावती नि.क्र.4/2) शेतीच्या पाणी वापरासाठी खरेदी केला. सदरच्या इलेक्ट्रीक जनरेटरची 1 वर्षाची वॉरंटी होती (नि.क्र.4/1). खरेदीपश्चात थोडयाच दिवसांत इलेक्ट्रीक जनरेटर वारंवार बंद पडू लागल्याने जाबदार क्र.2 यांचेकडे प्रत्यक्ष भेटून जनरेटरच्या बि घाडाची कल्पना दिली. जाबदार क्र.2 यांनी जनरेटर दुरुस्त करुन देतो असे सांगितले तथापि, दुरुस्ती केलेवर वॉरंटी पिरेडमध्ये असूनसुध्दा रु.16,800/- चे बिल करुन दिले. सदरचे बिल दिल्याशिवाय जनरेटर देणार नाही अशी जाबदार क्र.2 यांनी भूमिकाघेतल्याने नाईलाजाने तक्रारदाराने सदर बिल अदा करुन जनरेटर ताब्यात घेतला. मात्र त्यानंतर पुन्हा जनरेटर बंद पडल्याने तक्रारदाराचे शेतीचे मोठे नुकसान झाले. विक्रीपश्चात सेवा जाबदार क्र.1 व 2 यांनी न दिल्याने तक्रारदाराने आपल्या विधिज्ञांमार्फत जाबदार यांना नोटीसा पाठविल्यानंतरही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद तक्रारदाराला दिलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराने जनरेटर बदलून नवीन मिळावा तसेच रु.16,800/- जनरेटर दुरुस्तीचा खर्च, प्रवास खर्च रु.500/-, मानसिक त्रासापोटी रु.25,000/-, जनरेटर बंद होता त्या कालावधीत भाडयाने जनरेटर आणून पिकास दिलेल्या पाण्याची रक्कम असे एकूण रु.96,800/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजदराने मिळावे यासाठी हा तक्रारअर्ज मंचासमोर दाखल केला आहे. तक्रारदाराने तक्रारअर्जासोबत आपले म्हणणेचे पुष्ठयर्थ स्वतःचे शपथपत्रासह नि.4 वर एकूण 5 कागदपत्रे दाखल केली आहेत.
3. जाबदार क्र.1 व 2 यांना नोटीसा लागू होऊन सुध्दा ते हजर झालेले नाहीत, तसेच त्यांनी म्हणणेही दाखल केलेले नाही. त्यामुळे त्यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत करणेत आले.
4. तक्रारदाराची तक्रार, त्यांचे लेखी म्हणणे, कागदोपत्री पुरावा व तक्रारदाराचे विधिज्ञांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर मंच खालील नि र्णयाप्रत आला.
अ.क्र. |
मुद्दे |
उत्तरे |
1. |
तक्रारदार हे जाबदार यांचा ग्राहक आहेत काय ? |
होय |
2 |
जाबदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? |
होय |
3 |
काय आदेश ? |
अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 ते 3
* जाबदार क्र.2 यांचेकडून तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 या कंपनीचे इलेक्ट्रीक जनरेटर खरेदी केल्याचे नि.4/2 चे पावतीवरुन दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे जाबदार क्र.1 व 2 चे ग्राहक आहेत हे सबळ पुराव्यावरुन दिसून येते.
* जाबदार क्र.1 व 2 यांनी सदर इलेक्ट्रीक जनरेटर वॉरंटी पिरेडमध्ये असतानासुध्दा जनरेटर दुरुस्तीचा खर्च तक्रारदाराकडून घेवून दूषीत सेवा दिल्याचे दिसून येते. विक्रीपश्चात सेवा तक्रारदाराला देणे क्रमप्राप्त असताना तशी सेवा न देवून जाबदार क्र.1 व 2 यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केल्याचे दिसून येते.
* विधिज्ञांनी नोटीस (नि.4/4) देऊनही त्यांची दखल जाबदार क्र.1 व 2 यांनी घेतली नाही. त्याहीपलिकडे मंचाची नोटीस प्राप्त झाल्यावरही मंचासमोर आपले म्हणणे त्यांनी मांडले नाही आणि म्हणूनच त्यांचेविरुध्द मंचाला एकतर्फा आदेश पारीत करावा लागला. यावरुन तक्रारदाराची तक्रार किंवा कथन जाबदार क्र.1 व 2 यांना मान्य असल्याचेच स्पष्ट होते असे मंचाला वाटते.
* जाबदार क्र.1 व 2 यांनी जाणीवपूर्वक तक्रारदार यांना विक्रीपश्चात सेवा न देवून सेवेतील त्रुटी निर्माण केली असून तक्रारदाराच्या नुकसानीला ते जबाबदार आहेत, त्यामुळे तक्रारदारांची तक्रारअर्जातील मागणी अंशतः मान्य करुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
2. जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारदार यांना नवीन इलेक्ट्रीक जनरेटर दयावा अथवा इलेक्ट्रीक जनरेटरची प्रचलित बाजारमूल्याप्रमाणे असणारी किंमत दि.15/5/2010 पासून द.सा.द.शे. 8 टक्के व्याजदराने अदा करावी.
3. जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारदार यांना जनरेटर दुरुस्तीपोटी घेतलेली रक्कम रु.16,800/- दि.5/8/2010 पासून द.सा.द.शे. 8 टक्के व्याजदराने देणेचा आदेश पारीत करण्यात येत आहे.
4. जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारदार यांना शारीरिक, मानसिक ञास तसेच नुकसान भरपाईपोटी रु.25,000/- अदा करणेचे आदेश करण्यात येत आहेत.
5. वर नमूद आदेशाची अंमलबजावणी जाबदार यांनी 45 दिवसांत करावी. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 04/05/2013
(के.डी. कुबल ) ( ए.व्ही. देशपांडे )
सदस्य अध्यक्ष