नि का ल प त्र :- (दि. 07/09/2011) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतच्या तक्रारी स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सुनावणीच्यावेळेस तक्रारदारांच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकला. तसेच सामनेवाला क्र. 1 यांचे वकिलांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाला क्र. 2 यांचे वकिल गैरहजर. (2) प्रस्तुत तीनही तक्रारींमध्ये तक्रारदार हे वेगवेगळे आहेत. व तक्रारींच्या विषयांमध्ये साम्य आहे. तसेच, सामनेवाला हे देखील एकच असल्याने हे मंच तीनही प्रकरणांमध्ये एकत्रितरित्या निकाल पारीत करीत आहे. (3) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला क्र. 1 हे सामनेवाला क्र. 2 हे हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन या कंपनीचे गॅस सिलेंडर वितरक आहेत. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत. सामनेवाला हे तक्रारदारांना सन 2001 पासून गॅस सिलेंडर पुरवठा करतात. सामनेवाला क्र. 1 गॅस वितरण एजन्सीने तक्रारदारांना मार्च 2011 पासून कोणत्याही सबळ कारणांशिवाय गॅस सिलेंडर वितरण थांबविले आहे. व तक्रारदार ग्राहकांना गॅस सिलेंडर्स वितरीत करण्याचे नाकारले आहे. तक्रारदार त्यांचे तक्रारीत पुढे सांगतात, घरगुती गॅस वितरण सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. कोणत्याही संयुक्तिक कारणांशिवाय गॅस पुरविण्याचे बंद करुन सेवेत त्रुटी केलेली आहे. तक्रारदार हे इचलकरंजी पासून शिरदवाड-बोरगाव, बेडकीहाळ, ता. चिकोडी हे 10 कि.मी. अंतरावर राहतात. सदरचे गाव कनार्टक हद्दीमध्ये येते या कारणांवरुन गॅस पुरवठा नाकारण्याचा अधिकार सामनेवाला यांना नाही. त्यामुळे तक्रारदार व त्यांचे कुटूंबियांचे हाल होत आहेत. ते पैशात मोजता येणार नाही. इचलकरंजी येथील अन्य गॅस वितरक उदा. आनंदी गॅस एजन्सी, सूरज गॅस एजन्सी, भारत गॅस एजन्सी असे अनेक वितरण असून त्यांनी देखील बोरगांव व शिरदवाड या गावातील सुमारे 1000 गॅस कनेक्शन दिलेली असून, सदर एजन्सी त्यांना सुरळीत व नियमित गॅस सिलेंडरचा पुरवठा आजअखेर करीत आहेत. अशा स्थितीत तक्रारदार व अन्य ग्राहकांना कनार्टक येथील आहेत या कारणावरुन गॅस वितरण थांबविता येणार नाही. सबब, सामनेवाला यांनी तक्रारदार व शिरदवाड-बोरगांव, ता. चिकोडी येथील ग्राहकांना गॅस सिलेंडर वितरण नियमित व अग्रहक्काने करावा असे सामनेवाला यांचेविरुध्द आदेश व्हावा. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- नुकसानीदाखल मिळावी अशी विनंती केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस, व प्रत्येक तक्रारदारांनी गॅस कार्डाच्या प्रती इत्यादींच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केलेली आहेत. (5) सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे म्हणण्याअन्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांचे म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदार हे ता. चिकोडी, जि. बेळगांव म्हणजेच कर्नाटक राज्यातील आहेत. सदर भागांमध्ये पूर्वी गॅस वितरण व्यवस्था नव्हती. त्यामुळे सामनेवाला यांचेकडे गॅस कनेक्शन सदर ग्राहकांनी घेतलेली आहेत. परंतु सन 2008 मध्ये सदलगा, ता. चिकोडी येथील इंडियन ऑईल कार्पोरेशन यांनी घरगुती गॅस वितरण करणेकरिता अन्नपुर्णेश्वरी इंडियन गॅस या गॅस एजन्सीची नेमणूक केलेली आहे. व सदर गॅस एजन्सीच्या कार्यक्षेत्रात येणा-या गावामधील लोकांना सदर गॅस वितरकाकडून गॅस घेणे बंधनकारक आहे. सन 2006 पासून सदर कनेक्शन तक्रारदारांना ट्रान्सफर करुन घेणे आवश्यक होते. याबाबत तक्रारदारांना वेळोवेळी सांगितले परंतु त्यांनी त्यावर काहीही कृती केली नाही. तसेच तक्रारदारांचे गॅस सिलेंडर ट्रान्सफर करुन घेणेची नोंद केली तरी तक्रारदारांनी नियमाप्रमाणे गॅस ट्रान्सफर करुन घेतलेले नाहीत. त्यामुळे तक्रारदारांना गॅस पुरवठा बंद करावा लागेल असे सांगितले असता तक्रारदारांनी जुलै 2010 रोजी गॅस ट्रान्सफर करुन घेतो असे लेखी पत्र दिले. परंतु त्यानंतर तक्रारदारांनी गॅस कनेक्शन ट्रान्सफर करुन घेतले नसल्यामुळे नियमानुसार गॅस कनेक्शन बंद करणे भाग पडले आहे. सामनेवाला त्यांचे म्हणण्यात पुढे सांगतात, घरगुती गॅस पुरवठा हा शासन अनुदानीत असून त्यांचेवर केंद्रशासन, तेल कंपन्या व राज्य शासन यांचे नियंत्रण आहे. गॅस सिलेंडर्सचे दुहेरी वाटप होऊन नये म्हणून गॅस वितरकांवर रेशन कार्डावर नोंदी व नियंत्रण ठेवणे, गॅस वितरणाबाबत पुरवठा विभाग यांचेकडे वेळोवेळी माहिती हजर करणे आवश्यक असते. तक्रारदार हे जिल्हा बेळगांव, कनार्टक येथे राहत असलेने रेशन कार्डावर नोंद झालेली नाही. तसेच त्याबाबतची नोंदी बेळगांव जिल्हा प्रशासनाकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती आजपर्यंत हजर केलेली नाही. त्यामुळे गॅस धारकांनी नवीन गॅस एजन्सीकडून अथवा अन्य वितरकांकडून गॅस घेतला आहे किंवा नाही याबाबतची माहिती मिळू शकत नाही. उपविभागीय अधिकारी, व तहसिलदार यांचे बैठकीमध्ये गॅस सिलेंडरची गोडावूनमध्ये सिलेंडरची डिलिव्हरी देऊ नयेत असे आदेश आहेत. तक्रारदार हे कर्नाटक राज्याच्या हद्दीत असल्याने त्या ठिकाणी गॅस पुरवठा करण्यासाठी वाहतुक परवाना सामनेवाला यांना नाही. गॅस वितरण हे शासन नियमानुसार चालते. सबब, तक्रारदारांची तक्रारदारांची तक्रार चुकीची असलेने खर्चासह नामंजूर करण्यात यावी. ग्राहक सरंक्षण कायदा, कलम 26 प्रमाणे रक्कम रु. 10,000/- दंड देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (6) सामनेवाला क्र.1 यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे दि. 24/02/2009 व दि. 14/04/2011 रोजीची पत्रे, तक्रारदार यांनी सामनेवाला यांना दिलेली पत्रे इत्यादीच्या झेरॉक्स प्रती दाखल केलेल्या आहेत. (7) सामनेवाला क्र. 2 कंपनीने त्यांचे म्हणण्याअन्वये तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. ते त्यांचे म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला क्र. 2 हे सार्वजनिक क्षेत्रातील ऑईल कंपनी आहे. सदर कंपनीवरती पेट्रोलियम व नॅचरल गॅस मंत्रालयाचे नियंत्रण आहे. सदर कंपनी व गॅस वितरण यांचेतील अग्रीमेंट हे प्रिन्सीपल टू प्रिन्सीपल असे आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सदर कंपनीने सामनेवाला क्र. 1 यांचे वितरण कार्यक्षेत्रात बदल केलेला आहे. चिकोडी व आसपासची गावे ही येथील इंडियन ऑईल कार्पोरेशन व सदलगा, ता. चिकोडी, जि. बेळगाव येथील वितरक यांचे तक्रादार हे त्यांचे कार्यक्षेत्रात असल्याने सदरचे ग्राहक हे सदलगा येथील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन व त्यांचे डिलर यांचेकडे हस्तांतरण केलेली आहेत. तक्रारदार राहत असलेल्या ठिकाणाचे कार्यक्षेत्रात हे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन व त्यांनी नेमणूक केलेले वितरण यांचे कार्यक्षेत्र असलेले पेट्रोलियम व नॅचरल गॅस मंत्रालय यांनी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार गॅस वितरण क्षेत्र निश्चित केलेली आहेत. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे. (8) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद सविस्तर व विस्तृतपणे ऐकला आहे. उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता सामनेवाला क्र. 2 ही ऑईल कंपनी असून सदर कंपनीचे सामनेवाला क्र. 1 हे वितरक आहेत. व तक्रारदारांनी सन 2001 पासून गॅस कनेक्शन सामनेवाला कंपनी यांचेकडून घेतलेली आहेत. तक्रारदार हे बोरगाव-शिरदवाड, ता. चिकोडी, जि. बेळगांव कर्नाटक राज्य येथील आहेत. तक्रारदार राहत असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये इंडियन ऑईल कार्पोरेशनने गॅस सिलेंडर वितरणाकरिता वितरकांची नेमणूक सन 2006 पासून केलेली आहे ही वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येत आहे. पेट्रोलियम कंपनीवर भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाचे नियंत्रण आहे. सदर पेट्रोलियम मंत्रालयाने गॅस वितरित करणेकरिता गॅस कंपन्यांना वितरण करण्याबाबतचे कार्यक्षेत्र निश्चित केलेले आहे. व वेळोवेळी सदर कार्यक्षेत्रामध्ये बदलही केलेले आहेत. याबाबतची मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत. प्रस्तुत प्रकरणाचा विचार करता तक्रारदार राहत असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये इंडियन ऑईल कार्पोरेशनने गॅस सिलेंडर वितरित करण्यासाठी वितरक नेमणूक केलेले आहेत. सदर वितरकांकडे तक्रारदारांनी गॅस कनेक्शन घ्यावे याबाबत वेळोवेळी तक्रारदारांना कळविलेले आहे. तक्रारदारांनी सामनेवाला क्र. 1 वितरकांना तक्रारदार राहत असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये गॅस एजन्सीकडून गॅस कनेक्शन त्यांचे सोईचे नाही. व गॅस सिलेंडर पुरवठा सुरु ठेवावा असे पत्र दिलेले आहे. तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तीवादाच्यावेळेस इंडियन ऑईलचे गॅस वितरक सध्या कनेक्शन ट्रान्सफर करुन घेत नाहीत या मुद्दयाकडे या मंचाचे लक्ष वेधले आहे. तक्रारदारांचे गॅस कनेक्शन तक्रारदार राहत असलेल्या कार्यक्षेत्रातील इंडियन ऑईल कार्पोरेशन व गॅस वितरक यांनी हस्तांतरण करण्याबाबत हस्तांतरण प्रक्रियेचा अवलंब केलेला आहे. व हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केलेली आहे याबाबत कोणताही पुरावा प्रस्तुत कामी दाखल केलेला नाही. उपरोक्त विवेचन केलेप्रमाणे तक्रारदार राहत असलेल्या कार्यक्षेत्रात गॅस सिलेंडर वितरक हे तक्रारदारांचे कनेक्शन ट्रान्सफर करुन घेत नाहीत व त्याबाबतची प्रक्रिया सामनेवाला क्र. 1 गॅस वितरक व सामनेवाला क्र. 2 ऑईल कंपनी यांनी केली नसलेचे दिसून येते. गॅस सिलेंडर पुरवठा कंपनी अथवा वितरक कोण असावेत हे ग्राहकांचे इच्छेवर असत नाही तर ते पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार निश्चित वितरण कार्यक्षेत्र कंपनी व वितरकांच्या मार्फतच गॅस कनेक्शन घेणे आवश्यक आहे. उपरोक्त विवेचनाचा विचार करता तक्रारदारांनी ते राहत असलेल्या ठिकाणाच्या अधिकृत ऑईल कंपनी व गॅस वितरकांकडे गॅस कनेक्शन घेणेबाबत योग्य त्या प्रक्रियेचा अवलंब करावा व सामनेवाला कंपनी व वितरक यांनी गॅस कनेक्शन हस्तांतरीत करणेबाबत योग्य त्या प्रक्रियेचा अवलंब करुन तक्रारदार ग्राहकांना सहकार्य करावे. सदरची प्रक्रिया सदर आदेश मिळालेपासून 3 (तीन) महिन्यात पुर्ण करावी व नैसर्गिक न्यायतत्वाचा विचार करता दरम्यानच्या कालावधीमध्ये सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्वरीत गॅस सिलेंडर पुरवठा करावा या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, आदेश. आ दे श 1. तक्रारदारांच्या तीनही तक्रारी अंशत: मंजूर करण्यात येतात. 2. तक्रारदारांनी ते राहत असलेल्या कार्यक्षेत्रातील इंडियन ऑईल कंपनी व त्यांचे वितरक यांचेकडे गॅस कनेक्शन मिळणेबाबत मागणी करावी व सामनेवाला यांनी तक्रारदार ग्राहकांचे गॅस ट्रान्सफर करण्याबाबत योग्य त्या प्रक्रियेचा अवलंब करावा. व सदरची प्रक्रिया सदर आदेश मिळालेपासून 3 (तीन) महिन्यात पुर्ण करावी. व दरम्यानच्या कालावधीमध्ये सामनेवाला यांनी तक्रारदारांना गॅस सिलेंडरचा पुरवठा करावा. 3. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |